डॉक्टरांचं व्यक्तीमत्व बहुआयामीच होतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचे नाव त्यांना चिकटलं होतं. मात्र त्यांचं व्यसनमुक्तीचं काम लोकांना फारसं माहीत नव्हतं. कारण शैला वहिनी व हमीद ते काम नेटानं पुढं नेत आहेत.
1988/89 च्या आसपास, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याच्या अनिल अवचटांचे ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र डॉक्टर व शैला वहिनी यांच्या पहाण्यात आले. डॉ. अनिता अवचटांना शैला वहिनींनी या कामाबद्दल आस्थेने विचारले डॉ. अनिता अवचटांनी सातारच्या पेशंटसाठी संपर्क मिटींग चालू करण्यास सुचवले.
डॉक्टरांनी व शैलावहिनींनी ते मान्य केले. सुरवातीचे गर्दचे 2 व दारूचा 1 अशा 3 जणांची संपर्क मिटींग डॉक्टरांच्या दवाखान्यात म्हणजे सदाशिव पेठेत चालू झाली. शैला वहिनी मिटींगा घेत मार्गदर्शनासाठी डॉ. प्रसन्न दाभोलकरांची मदत व्हायची, अंनिसचे काम बघत डॉक्टरही मदत करायचे.
परिवर्तन या शब्दाचा अर्थ बदल. पण बदल हा आपोआप होत असतो आणि परिवर्तन हे घडवावे लागते म्हणूनच 1991 साली परिवर्तन नावाने ट्रस्ट स्थापन केला. तो या उद्देशाने की, समाजातील वाढती व्यसनाधीनता ही चिंताजनक आहे. व्यसनात अडकलेल्या व्यसनाधीन लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे प्रयत्न करणे या हेतूने परिवर्तनाची सुरवात झाली. कारण व्यसन हा आजार आहे तो प्रयत्न करूनच बरा होऊ शकतो हे डॉक्टरांनी जाणले होते. परिवर्तनचे काम प्रबोधन, संघर्ष, उपचार व पुनर्वसन या पातळीवर चालते. डॉक्टर या सर्वात सक्रीय होते. प्रबोधनासाठी व्यसनाच्या समस्येसाठी चांगला अभ्यास होता. प्रासंगिक उपचारासाठी आजाराचे चांगले ज्ञान होते. संघर्षासाठी सामाजिक भान होते व पुनर्वसनासाठी माणुसकीची कणव होती.
1996 पासून निवासी उपचार केंद्र चालू झाले. सुरवातील 15 बेडची मान्यता होती पण जेव्हा संख्या वाढू लागली तेव्हा 30 बेडची मान्यता मिळाली व रूग्णांची संख्याही वाढली. केंद्र चांगले चालू लागले पण डॉक्टर नेहमी म्हणत की, आपले केंद्र चांगले चालणे हे चांगली बाब नसून वाईट बाब आहे कारण समाजात व्यसन वाढत आहे. म्हणूनच प्रबोधन व संघर्ष या पातळीवर ते लढा देत होते. प्रबोधनात त्यांचा हातखंडा होता. वर्तनमानपत्र, साप्ताहिक, मासिक या मधूनही त्यांनी बरेच लेखन केले आहे. साधनेचे संपादक असताना या विषयावर एक विशेषांकही त्यांनी काढला होता. तसेच दूरचित्रवाणीवर डॉक्टरांच्या या विषयावर चर्चासत्र, मुलाखती झाल्या होत्या.
आम्हाला ऐनवेळचे पाहुणे म्हणून ते हक्काचे होते म्हणूनच कायम उपयोगी पडायचे. असेच मागील वर्षी(मे 2013) झाले. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन, प्रमुख पाहुणे सातार्यातील एक मानसोपचार तज्ञ ठरले होते. कार्यक्रम 2.30 वा.होता 2.15 ला त्यांचा फोन आला की, काही कारणांने येऊ शकत नाही. ऐनवेळी डॉक्टरांना विनंती केल्यावर त्यांनी ती मान्य केली. त्यांच्या भाषणात तंबाखूविषयी इतकी सविस्तर सखोल व अद्यावत आकडेवारी तोंडपाठ होती की, जी आम्हाला त्या क्षेत्रात काम करत असूनही नवीन होती. इतका त्यांचा सखोल अभ्यास होता.
संघर्षामध्ये महाराष्ट्रात गुटखाबंदी व्हावी यासाठी 10 वर्षांपासून धरणे, आंदोलन, सरकारला विद्यार्थ्यांकडून पत्र पाठवणे हे केले होतेच तसेच गेल्या 15 वर्षांपासून सातारा जिल्ह्यात दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे, शासनाला 50,000 पोस्टकार्ड पाठवणे, उपोषण, साखळी उपोषण, धरणे, व्यसनविरोधी निर्धार परिषद सातारला भरवली होती. सरकारच्या संबंधित अधिकार्यांची भेट घेणे या सर्वात डॉक्टर होते.
अलिकडील काही वर्षात महाराष्ट्रात झाडाच्या मोहापासून दारू बनवण्याचे जाहीर झाले. तेव्हाही त्यांनी आवाज उठवला व धान्यापासून दारूनिर्मितीचे धोरण शासनाने अवलंबले तेव्हा महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायचे आहे काय? असा सवाल करून त्यांनी या धोरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून अण्णा हजारे, अभय बंग, अनिल अवचट या दारूविरोधी चळवळीतील सहकार्यासोबत आवाज उठवला व सरकारने जाहीर केले की, यापुढे कारखान्यांना परवानगी नाही.
अंधश्रद्धा व व्यसन माणसाला दुबळं बनवतात कारण अंधश्रद्धा माणसाला बाहेरून तर व्यसन आतून व बाहेरून पोखरते असे डॉक्टर म्हणत. म्हणूनच तरूण मुलां-मुलींमध्ये व्यसनाचे आकर्षण वाढू नये म्हणून 31 डिसेंबरला समितीच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ सारखा नाविन्यपूर्ण उपक्रम डॉक्टरांनी चालू केला. तर अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच व्यसनमुक्तीचंही काम पुढं नेण्यासाठी कृतीकार्यक्रम सुरू केला.
याचबरोबर सातारमध्ये एकता शिक्षण प्रसारक संस्था नावाने अनौपचारिक शिक्षणाची एक संस्था चालू आहे. त्याचे सुरवातीपासून डॉक्टर उपाध्यक्ष होते. ही संस्था 1975 ला डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी चालू केली. तत्कालीन जिल्हाधिकार्यांकडून संस्थेला मोफत जागा मिळवण्यामागे डॉक्टरांचा सहभाग मोलाचा होता. या संस्थेसाठी मदत म्हणून पैसे गोळा करायचे होते, तेव्हा संस्थेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. एक मोठी व्यक्ती दरमहा 1 तारखेला 10 रूपये द्यायची. 1 तारखेला गेले नाही तर पैसे मिळायचे नाहीत. तेव्हा डॉक्टरही 1 तारखेला न चुकता ते पैसे आणण्यास जात होते.
डॉक्टरांनी पु. ल. देशपांडे यांच्याकडून देणगी मिळवून संस्थेसाठी मोठा हॉल बांधला व मुक्तांगण असे नाव दिले. महाराष्ट्र अंनिसच्या सर्व बैठका तिथेच होत असत. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना तिथे राहण्याची उत्तम सोय होती. तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालवले जात होते. या वसतीगृहात राहून, शिकून गेलेले अनेकजण डॉक्टरांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
असे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे नेतृत्व हरपले आहे. याची खंत सतत मनात राहील पण त्यांचे अपूर्ण काम पुढे नेण्याची जिद्द, चिकाटी व सातत्याही राहील.
–उदय चव्हाण