देव, धर्म, दैव आणि अंधश्रद्धा यांचा त्याग करून विज्ञान आणि मानवतावाद यावर आधारित जीवनपद्धती अनुसरल्यास मानवजात निश्चित सुखी समाधानी आणि संपन्न होईल. याला कदाचित 5 हजार वर्षे लागतील, पण मानवाचे या पृथ्वीवर आगमन झाल्यापासून प्रस्थापित धर्म निर्माण व्हायला सुमारे 3 कोटी वर्षे लागली; त्या तुलनेने हा काळ कमीच आहे.
परमेश्वरवादी विरूद्ध उत्क्रांतीवादी असा एक जंगी सामना सध्या पाश्चात्य बुद्धिवादी जगात चालू आहे. हे जग (विशेषत: जगातील प्राणी) परमेश्वराने(आहे असे 7 दिवसात) निर्माण केले का नैसर्गिक घडामोडीतून हळूहळू बदलत काही कोटी वर्षांत या अवस्थेला पोचले हा या वादाचा मुख्य विषय आहे. असे असताना परमेश्वराच्याच उत्क्रांतीचा विषय मी मांडत असलेला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, कारण अनेक मानवी संकल्पनांचेप्रमाणे परमेश्वर ही देखील एक संकल्पना असल्यामुळे त्यात कालमानाने फेरफार होणे नैसर्गिक मानले पाहिजे. पण परमेश्वरवादी मंडळी परमेश्वर ही संकल्पना(abstract idea) आहे हेच मान्य करत नाहीत. त्यांना परमेश्वर ही प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी(concrete) चीज वाटते. कदाचित हा लेख वाचल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल.
प्राणी किंवा पक्षी परमेश्वर मानत नाहीत; निदान मानताना दिसत नाहीत कावळ्यांनी किंवा उंटांनी एखादे देऊळ बांधले आहे, त्यातल्या देवाची ते रोज पूजा, आरती करतात, संकटात सापडले की त्याची प्रार्थना करतात, त्याला नवस करतात; असे काही दिसत नाही. कारण उघड आहे. माणसाचे अंगी असणारी विचारशक्ती वा बुद्धी त्यांचेपाशी नसते.
एकटा माणूस शिकार करत वा कंदमुळे गोळा करत फिरत असेल त्या वेळीही असे काही करत नसणार. सकाळी उठल्यावर देवापुढे हात जोडून आज चांगली शिकार मिळू दे. दिवस चांगला जाऊ दे असे तो म्हणत नसावा. कुठे वादळात वा भूकंपात सापडला, किंवा समोर सिंह दिसला, तरी नवस वगैरे करत नसणार! मग हे सर्व केव्हा सुरू झाले असावे? मला वाटते हे प्रकार माणूस टोळी करून राहायला लागल्यावर निर्माण झाले असले पाहिजेत. कारण टोळीतील कोणी एक टोळीचा प्रमुख म्हणून मानला जात असला पाहिजे. हा सर्वात सामर्थ्यवान, धाडसी, निर्भय असणार. टोळीवर नियंत्रण ठेवणे, कोणी चुकल्यास शासन करणे, चांगली कामगिरी केल्यास बक्षीस देणे, क्वचित लहरीपणे वागणे, शत्रूचा समाचार घेणे, ज्याच्यावर मन बसेल त्याला खास प्रेमाने वागवणे ही त्याची व्यवच्छेदक लक्षणे असणार. तर अशाच प्रकारे अन्य सृष्टीचेही नियंत्रण करणारा, अपराध्याला शासन करणारा, चांगल्या कामाचे बक्षीस देणारा, अडचणीत मार्ग दाखवणारा असा कोणी महानायक असावा अशी कल्पना सामान्य वकुबाच्या त्या काळच्या ‘आम आदमी’च्या मनात येणे अगदी स्वाभाविक असले पाहिजे. यातूनच पूजा-प्रार्थना-स्तोत्रे-नवस हे प्रकार सुरू झाले असणार; हो ना? हा माणूस कधी गारांच्या भडिमारात सापडला तर लगेच हे सर्वशक्तीमान महानायका, मला या संकटातून वाचवण्यास केवळ तूच समर्थ आहेत, मी तुझी करूणा भाकतो’ अशी प्रार्थना करत असेल आणि समजा त्याचवेळी त्याला एखादी गुहा दिसली आणि त्यात आसरा घेऊन त्याचा बचाव झाला तर त्याची या महानायकावरची ‘श्रद्धा’ बळकट झाली असेल. त्याने हे सर्व इतर टोळी सभासदांना तिखट मीठ लावून(त्या काळी तिखट मीठ असेलच तर) सांगितले असणार. मग इतरांनीही त्याचे अनुकरण करून या ईश्वरी कृपेची प्रचिती घेतली असणार. आजही असेच घडते आणि नाहीच कुणाला प्रचिती वगैरे आली, तर तो ही आजच्या प्रमाणेच ‘साला किस्मत—- तो क्या करेगा पांडू’ असे म्हणून गप्प बसत असेल. होय ना?
आता त्या काळी तर माणसाला पदोपदी या ना त्या संकटाचा सामना करावा लागत असणार. आता इतक्या सर्व संकटांचे प्रसंगी आणि तेही इतक्या सार्या माणसांच्या मदतीला धावून जाणे कितीही सामर्थ्यवान असला तरी एका महानायकाला कसे जमणार? मग माणसाने कामे वाटून द्यायला सुरवात केली असणार. पावसाचा एक नायक, वार्याचा एक, असे वीज, समुद्र, झाडे, अग्नी इत्यादी नानाविध निसर्गाच्या आविष्कारांची एक एक देवता माणसाने कल्पिली असणार. सूर्य, चंद्र अशा मोठ्या आविष्कारांना थेट देवतास्वरूपच दिलेले दिसते.
आता या देवतांची स्तुतीस्तोत्रे! त्यात कोण जास्त अतिशयोक्ती करतो याची जणू स्पर्धाच!! वेद म्हणजे तरी काय आहेत? अरूण काय, वरूण काय, उषा काय, निशा काय, डझनावारी देवता आणि शेकड्यांनी त्यांची स्तोत्रे आणि प्रार्थना. आणि प्रार्थना कसल्या? तर आमची भरभराट होऊ दे आणि दुश्मनाचा नि:पात होऊ दे. सगळी सकाम भक्ती! पाऊस चांगला पडावा म्हणून बेडकांची स्तुती गायलेली! तरीही काही मंडळी वेदांना जगातील सर्व ज्ञानाचे भांडार मानतात!
या निराकार आणि कल्पित दैवतांचे स्थूल अशा देवामध्ये रूपांतर कसे आणि केव्हा झाले हे सांगणे अवघड आहे, पण चित्रकला, मूर्तिकला या विकसित झाल्यावरच हे रूपांतर झाले असणार. भारतातही सर्वात जुने देऊळ 1500 वर्षांपूर्वीचे सापडले आहे आणि तेही बौद्ध घुमटीच्या स्वरूपात. त्या आधी विटा, लाकूड यांचा उपयोग करून देवळे बांधतही असतील पण ती कालौघात नष्ट होत असावीत म्हणून त्यानंतरच्या काळात डोगरातील प्रचंड पाषाणात खोदलेली लेणी आणि त्यातील देवस्थाने मोठ्या कौशल्याने आणि परिश्रमाने निर्माण केली गेली.

स्थापत्यकला, मूर्तीकला आणि शिल्पकला यात प्रगती होऊ लागल्यावर मात्र भारतात एकसे बढकर एक देवळे बांधण्याची लाटच पसरली. कन्याकुमारी, मदुराई, कुंभकोणम, रामेश्वर, बृहदेश्वर, लिंगराज, कोणार्क इथली मंदिरे सुंदर, भव्य आणि प्रमाणबद्ध आहेत. त्यावरील शिल्पकाम आणि मूर्तीकाम अप्रतिम आहे. आता अशा प्रासादतुल्य देवालयात राहणारा देवही राजेशाही पद्धतीनेच राहणारा आणि वागणारा असला पाहिजे. मग काय विचारता? इंग्लंडच्या राणीची काय असेल अशी पंचतारांकित दिनचर्या आमच्या एखाद्या किरकोळ देवाची असते. त्याला सकाळी उठवण्याकरता भूपाळ्या, मग, ‘काकडा झाला हरीजे मुख प्रक्षाला’ असे गात त्याचे तोंड धुणे, मग त्याची सोळा उपचारांनी पूजा, त्याचे वस्त्र बदलणे, मुगुट, दागिने वगैरे चढवणे, मग साहेब ड्युटीवर हजर होणार! मग भोजन, वामकुक्षी, नंतर सेकंड शिफ्ट अखेर शेजारती आणि रात्रीकरता तयार केलेल्या शय्येवर निद्रा! महानायक म्हटल्यावर एवढ्या सुखसोयी पाहिजेतच!!
हा महानायक सर्वशक्तीमान असतो अशी कल्पना केल्यावर तो सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळा दाखवणे ओघानेच आले. मग कुणाला तीन तोंडे, कुणाला चार तर कुणाला पाच! कुणाला चार हात, कुणाला आठ तर आणखी कुणाला दहा! कुणाच्या डोक्यावर नाग, कुणाच्या गळ्याभोवती तर कुणाच्या कमरेला गुंडाळलेला! एक देव तर चक्क नागावर झोपलेला. शत्रूच्या छातीत धडकी भरेल अशी देवी हवी असेल तर कालीमातेचे चित्र पहा. कमरेभोवती तोडलेल्या हातांचा स्कर्ट तर गळ्यात छाटलेल्या मुंडक्यांची माळ.
यात पुन्हा काही देव जागृत, काही नवसाला पावणारे, काही एकदम कडक स्वभावाचे, तर काही अगदी भोळसट. साहजिक आहे; जशी माणसे तसे त्यांचे देव!
या देवांना केलेले आणि फेडले जाणारे नवस म्हणजे आमचा देव लाचखाऊ आहे याची सरळ सरळ दिलेली कबुली. पूर्वी बरीच वर्षे प्रस्थापित झालेले देवच नवसाला पावण्यात माहीर होते; आता तर दहा दिवसांपुरते आलेले पाहुणे कलाकारही नवसाला पाहून त्यांच्या प्रायोजकांना कोट्यावधीची मालमत्ता मिळवून देतात.
मी एकदा लक्ष्मणशास्त्री जोशींना विचारले होते की, अद्वैत सिद्धांत श्रेष्ठ मानणारे हिंदू धर्मीय ईश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याची पूजाअर्चा, आरत्या, जन्मदिवस, मिरवणुका, नवस, विवाह, प्रसाद, प्रयोजने अशा सर्वस्वी द्वैतवादी गोष्टी म्हणजेच खरी ईश्वर भक्ती असे कसे काय मानतात? त्यावर त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘माणूस जसा पत्त्यात रमतो, नाटकात रमतो, तसा तो देवात रमतो.’
ईश्वराच्या विविध मूर्ती, त्यांची देवळे, उत्सव, प्रार्थना यामुळे काही फायदे झाले आणि बरेच तोटेही झाले. ते आता पाहू या.
सर्वशक्तीमान देव आपण पापाचरण केले तर आपला नि:पात करेल या भीतीपोटी लोक बहुतांश सदाचरणी राहू लागले. आपण सद्वर्तनी राहिलो तर ईश्वर आपणास बरकत देईल, दीर्घायुष्य देईल, संसारसुख देईल, या लोभापोटीही अनेकजण सदाचारी बनले.
भव्य देवालयांमुळे स्थापत्य, शिल्प, मूर्ती, चित्र, रंग या कलांना वाव मिळाला. गायन, वादन, नृत्य या कलांनाही आश्रय मिळाला. स्तोत्रे, आरत्या, पुराणकथा यामुळे साहित्यिक प्रतिभा फुलण्यास मदत झाली. धर्मचर्चा, पाठशाला, मंगलकार्ये, संकटसमयी आसरा, अशा विविध समजोपयोगी उपक्रमांना देवालयांचे आश्रयस्थान लाभले.
पण हे फायदे नगण्य म्हणावे लागतील असे नुकसान या देवालयांनी आणि देवांनी मानवी समाजाचे केले. पहिला दुष्परिणाम असा झाला की, या देवांना खुश ठेवण्याकरता जे सोपस्कार करावे लागत आणि जी शिस्तबद्ध नियमावली स्वीकारावी लागे, (त्यालाच आपण धर्म म्हणतो) असे विविध धर्म निर्माण झाले. तुझा देव म्हणजे धर्म श्रेष्ठ की माझा या वादापायी अनेक आक्रमणे, लढाया, जाळपोळी, रक्तपात, विध्वंस, बलात्कार, सक्तीची धर्मांतरे असे प्रकार झाले. ते पहिला देव निपजल्यापासून आजपर्यंत चालू आहेत.
लोकांच्या धार्मिक समजुतींचा गैरफायदा राजकारणी मंडळी लिलया उठवतात. ब्रिटीश भारताची फाळणी घडवून आणतात, इस्राईल पॅलेस्टाईनी वाद मिटू दिला जात नाही, आणि कडक धर्मनिष्ठा शेकड्यांनी अतिरेक्यांना जन्म देते. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्या नेत्याला विठ्ठलापेक्षा आपल्या मतदारांची काळजी असते.
देवस्थानामुळे उत्तेजन मिळणार्या शेकडो कामचुकार भिकार्यांच्या झुंडी हा आणखी एक तोटा.
दुसरा वरच्यापेक्षाही अपायकारक परिणाम म्हणजे देवाच्या आहारी गेलेला समाज आपला आत्मविश्वास गमावून बसला. देव सर्वसामर्थ्यवान आणि दयाळू असल्यामुळे तो आपल्या मदतीला येईलच आणि शत्रूचा नि:पात करेलच, आपण का उगाच तसदी घ्या अशा विचाराने समाज निष्क्रीय झाला. सर्व काही परमेश्वरच घडवून आणतो या कल्पनेपायी दुष्काळ, रोगराई, दारिद्य्र अशा अनेक आपत्तीत प्रयत्नवादी लोकांनी अनेक शास्त्रीय शोध लावून त्यातून मार्ग काढला, याउलट देवभक्त मंडळी यज्ञ याग, अनुष्ठाने, देव कोंडणे असले प्रकार करत राहिली.
परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालणार नाही अशी कल्पना मनात भिनविण्यात आल्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे हेसुद्धा परमेश्वरी इच्छेविरूद्ध कृत्य मानले जाई. युरोप आणि अमेरिकेत पावसापासून बचाव करणारी छत्री आणि इमारतीवर वीज पडू नये म्हणून लावला जाणारा विद्युन्निवारक यांनाही धर्मशास्त्र्यांनी विरोध केला होता.
परमेश्वर पापी लोकांना शिक्षा करेलच, आज नाही तर पुढच्या जन्मात करेल या अंधविश्वासामुळे अनेक पापी लोक मजेत जगतात, तर अनेक सज्जन हालअपेष्टात आयुष्य घालवत.
परमेश्वराजवळ पोचण्याचा मार्ग म्हणजे धर्म, पण या धर्मानुसार वागण्याचे यम नियम इतके किचकट होत गेले की, त्यानुसार अचूक वर्तणूक होण्याकरता त्या विषयातील जाणकार माणसाची गरज पडू लागली. यातून पुरोहित वर्ग उदयाला आला आणि सर्वच धर्मात पुरोहितशाही हा नवा सामान्य माणसाला छळणारा वर्ग अस्तित्वात आला. या पुरोहितशाहीने सर्वच धर्मात अनेक शतके धुमाकूळ घातला.
इतके सर्व अपप्रकार उघड उघड दिसत असतानाही देव आणि धर्माचे हे जोखड हजारो वर्षे मानवी समाजाने सहन तरी कसे केले? त्याचे कारण मानसशास्त्रीय आहे. मी इतका श्रेष्ठ आहे की, एक अत्यंत महान अशी परमेश्वर नामे शक्ती माझ्यावर लक्ष ठेवून असते, संकटात मला मदत करायला धावून येते, माझ्या पाप पुण्याचा हिशेब ठेवते, त्यानुसार मला स्वर्ग वा नरक बहाल करते, पुढचा याहून चांगला जन्म देते ही कल्पनाच किती रम्य आहे ना? माणसाचा आत्माभिमान(Ego) कुरवाळायला इतके सामर्थ्यवान साधन सहजगत्या उपलब्ध असताना कोण ते सोडून देईल? फारच थोडे लोक नास्तिक वा बुद्धिप्रामाण्यवादी असतात याचे हेच कारण होय.
देव आणि धर्म पुसून टाकणे जवळ जवळ अशक्य असले तरी अनेक विचारवंतांनी आपल्या अनुयायांना मूर्तीपूजेच्या आणि शेकडो देवतांच्या जाचातून मात्र सोडवले. महावीर जैन, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहंमद पैगंबर, गुरू नानक ही यातली ठळक उदाहरणे. हिंदू धर्मियांना मात्र ते अद्याप साध्य झालेले नाही आणि पुढची पाच दहा हजार वर्षे तरी जमेल का नाही मला शंकाच आहे.

मूर्तीपूजा करणार्यांच्यामध्येसुद्धा अनेकांना या कर्मकांडातील वैय्यर्थ लक्षात येत असे, पण परंपरा, कुलधर्म, कुलाचार, लहानपणापासून झालेले संस्कारांचे घणाघात, देव किंवा धर्माच्या बाबतीत तर्कसंगत विचार करायला वाटणारी भीती, रूढी, शरणता अशा अनेक कारणांमुळे ते हे सोपस्कार चालूच ठेवत असतात. कोणी अगदीच स्पष्टपणे विचारलेच तर अशा किंवा मूर्तीपूजा योग्यच आहे असे पक्के मत असणार्यांचे दोन युक्तीवाद असतात.
1. ‘आम्हालाही ठाऊक आहे हो की, मूर्तीत देव नसतो, पण ते एक प्रतिक आहे. राष्ट्रध्वज म्हणजे खरे तर एक रंगीत कापड असते, पण त्याला मान देताच ना तुम्ही?’
2. ‘अहो सामान्य लोकांना तो निर्गुण निराकार परमेश्वर कसा समजणार? त्यांचेकरता मूर्तीपूजा ही पायरी आहे. हळूहळू जातील वरच्या पायरीवर, एका पायरीत तिसर्या मजल्यावर जाऊ शकाल का तुम्ही?’
हे दोन्ही युक्तीवाद अगदीच तकलादू आहेत. राष्ट्रध्वज हे एक ओळख चिन्ह असते. शासकीय कचेर्या, शासकीय वाहने ओळखण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू, जहाजे, वगैरेंचा देश ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपण या विषयात फार संवेदनशील आहोत. अमेरिकेत सौंदर्य स्पर्धेत भाग घेणार्या युवतींनी राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या आणि काचोळ्या ल्यालेल्या मी पाहिल्या आहेत.
निर्गुण, निराकार परमेश्वर अडाणी अरबाला समजू शकतो, ख्रिश्चन कोळ्याला समजू शकतो, जपानी टॅक्सीवाल्याला समजू शकतो, पण काही हजार वर्षे अगदी शंकराचार्य पदाला पोचलेले हिंदू मात्र आपली पायरी सोडायला तयार होत नाहीत हा दोष कुणाचा?
अनेक लोक मान्य करतात की, मूर्तीपूजा वगैरे आम्ही मानत नाही, पण हे जग चालवणारी कोणीतरी अज्ञात शक्ती मात्र अवश्य मानतो. तिच्यापुढे नतमस्तक होणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. ही परमेश्वराच्या उत्क्रांतीची पुढली पायरी. हे लोक फक्त मूर्ती आणि तिची पूजा, नवस वगैरे करत नाहीत एवढेच. पण संकटात सापडले तर हे त्या शक्तीची करूणा भाकतात, यश मिळाले तर त्या शक्तीला अभिवादन करतात, तिची प्रार्थना करतात. मूर्तीपूजा करणार्यांचेपेक्षा आपण वैचारिक दृष्ट्या सरत आहोत अशी यांची खात्री असते.
आता आपण परमेश्वराच्या उत्क्रांतीच्या अखेरच्या पायरीवर पोचलो आहोत. ती म्हणजे अध्यात्म. सृष्टीच्या विविध बाह्य पंचज्ञानेंद्रियाद्वारे होणारे ज्ञान म्हणजे विज्ञान, तर माणसाच्या अंतरंगाचे किंवा अंतरात्म्याचे होणारे ज्ञान म्हणजे अध्यात्म. या करता ज्ञानेंद्रियांचा उपयोग शून्य. मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, स्टेथास्कोप यांना काहीही स्कोप नाही. साक्षात्कार, अंतर्ज्ञान, अंत:स्फूर्ती, अनुभूती, स्वप्न, दृष्टांत, मृतात्म्यांचे संदेश, इंद्रिय व्यतिरिक्त जाणीव(Extra Sensory Pereception), विचार संक्रमण(Telepathy) ही या क्षेत्रातील ज्ञानार्जनाची साधने असतात. कोणीही मानसशास्त्रज्ञ हे सर्व ‘मनोभ्रम’(Hallucination) या मनोविकृतीचे विविध प्रकार असतात हे सांगू शकेल. पण असे नुसते सुचवले तरी अध्यात्मवादी मंडळींना संताप येतो. त्यांच्या मतानुसार ही नुसतीच ज्ञानाची साधने नसतात तर श्रेष्ठतर साधने असतात. साहजिकच यांचेद्वारे होणारे ज्ञान सर्वश्रेष्ठ असते.
हे ज्ञान पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष असल्यामुळे वारंवारिता आणि विश्वात्मकता(Repeatability and Universality) या निकषावर ते सपशेल नापास होतात. पण याची या अध्यात्मवाद्यांना थोडीही फिकीर नसते, उलट ते मोठ्या फुशारकीने ‘तुमच्या य:कश्चित फिजिक्स, केमिस्ट्रीचे नियम आमच्या महान अध्यात्मशास्त्राला लागू पडत नाहीत. काय समजलात?’ असे बजावत असतात.
या शास्त्राचा पहिला नियम आहे ‘देह आणि आत्मा हे एक नव्हेत.’ ‘देह क्षुद्र, आत्मा श्रेष्ठ’ हा दुसरा नियम. ‘आत्मा अमर असतो’ हा तिसरा. मग देहाचे कार्य थांबल्यावर या आत्म्याच्या प्रवासाचे गलव्हिरच्या प्रवासापेक्षाही चित्त चक्षु चमत्कारिक वर्णन अध्यात्मावरील विविध ग्रंथात वाचायला मिळते. त्याला पुरावा काडीइतकाही नसतो. या शास्त्राला वैज्ञानिक पद्धती लागू नसल्यामुळे ‘याला पुरावा काय?’ असे विचारताही येत नाही.
अध्यात्माचे अंतिम ध्येय मोक्ष साध्य करणे हे असते. त्याकरता बरीच दीर्घ तपश्चर्या करावी लागते. त्याला साधना म्हणतात. प्रथम देहशुद्धी, चित्तशुद्धी ही आवश्यक. देहशुद्धीसाठी नाकातून नळी घालून तोंडातून बाहेर काढून श्वासमार्ग साफ करणे, पोटात लांब चिंधी घालून ती बाहेर काढून आमाशय साफ करणे, वारंवार बस्ती आणि विरेचन प्रयोग करणे आणि विक्षिप्त उपाय केले जातात. प्राणायाम, योगासने असे उपयुक्त मार्गही असतात. पण त्यांच्या उपयुक्ततेबद्दलही अवास्तव दावे केले जातात. योगासनांमुळे अनेक रोग बरे होतात असे ठामपणे सांगितले जाते. पण आयुर्वेदाच्या किंवा आधुनिक वैद्यक शास्त्राच्या कोणत्याही ग्रंथात या रोगाकरता ही आसने करावीत असे सांगितलेले नाही; आणि योगावरच्या कोणत्याही प्राचीन ग्रंथात या आसनांमुळे हे रोग बरे होतात असे दिलेले नाही.
चित्तशुद्धीकरता ध्यान, धारणा, जप, चिंतन, मनन, प्रार्थना, नामस्मरण असे बरेच मार्ग असतात. यातही कोणाची विपश्यना, कोणाचे भावातीत ध्यान, कोणाचा सिद्ध समाधी योग, तर कोणाचा सहजसमाधी योग, कोणाची सुदर्शन क्रिया असे नाना प्रकार असतात. नुकतीच एकाने गिनती केली तर असे 18 विविध प्रकार सापडले.
आता याच्या फायद्या तोट्याचे ऑडीट करूया. तंदुरुस्ती, आरोग्य, मन:शांती असे काही फायदे या अध्यात्मामुळे होतात, पण ते शरीर क्रिया विज्ञान आणि मानसशास्त्रानुसार होतात. त्यात गुढ, दैवी वा पॅरानॉर्मल काही नसते.
याबद्दल मुख्य आक्षेप असा की, हे अध्यात्म, इतर सर्व प्रकारच्या तत्वज्ञानाप्रमाणे भरल्या पोटाचे आणि रिकाम्या वेळेचे उद्योग आहेत. दिवसभर श्रम करून थकलेल्या आणि तरीही अर्धपोटी राहणार्या मजुराला तू अंतरात्म्यात डोकावून पहा, तुझ्या जीवनाचे सार्थक शोध, वगैरे काही सांगायला जाल तर तो म्हणेल की मी प्रथम माझ्या घरात काही अन्न आहे का? ते शोधतो, उद्या पुन्हा काही कामधंदा शोधतो, मग सावकाश मधल्या सुट्टीत जीवनाचा हेतू वगैरे सापडतो का ते पाहतो.
दुसरा आक्षेप असा की, यापैकी कुठल्याही तत्वज्ञानाने मानवी समाजाचा कोणताही प्रश्न सोडवलेला नाही. सर्व समस्या विज्ञान आणि तंत्रज्ञानानेच सोडवलेल्या आहेत. असे काही म्हटले की अध्यात्मवाले विज्ञानामुळे निर्माण झालेल्या समस्यांची यादी सादर करतात. पण या समस्या सोडवायलाही विज्ञानच समर्थ असते. अशी कोणतीही समस्या अध्यात्मामुळे दूर झालेली नाही.
असो. आपला विषय होता परमेश्वराची उत्क्रांती. तर भीतीपोटी निर्माण झालेल्या कल्पना, विविध दैवत, देव, ईश्वर, परमेश्वर, अज्ञात शक्ती, ते परमात्मा आणि या परमात्म्यात कायमचे विलीन होण्याकरता अध्यात्म, असा हा गेल्या 5 हजार वर्षाचा प्रवास आहे. या उत्क्रांतीची पुढची पायरी म्हणजे या सर्व कल्पनांचे वैफल्य पटणे आणि सर्वांनी नास्तिकवाद स्वीकारणे हा होय. देव, धर्म, दैव आणि अंधश्रद्धा यांचा त्याग करून विज्ञान आणि मानवतावाद यावर आधारित जीवनपद्धती अनुसरल्यास मानवजात निश्चित सुखी समाधानी आणि संपन्न होईल.
याला कदाचित 5 हजार वर्षे लागतील, पण मानवाचे या पृथ्वीवर आगमन झाल्यापासून प्रस्थापित धर्म निर्माण व्हायला सुमारे 3 कोटी वर्षे लागली; त्या तुलनेने हा काळ कमीच आहे.
–डॉ. शरद अभ्यंकर
(लेखक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत.)