Categories
पर्दाफाश

पवनी येथील ताज मेहंदीबाबाचा भांडाफोड

जून – २०१२

            भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावात काही वर्षांपूर्वी ‘ताज मेहंदी’ या नावाने मुस्लीम व्यक्ती दरबार भरवित असे. या ताजमेहंदीबाबाला ऐन दिवाळीच्या दिवशी अंनिसचे कार्यकर्ते विष्णूदास लोणारे यांनी आव्हान देऊन भक्तांच्या समुहासमोर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नंतर हा ताजमेहंदी बीड सीतेपारला फिरकला सुद्धा नाही. पण त्याच्या भक्तांनी या ताजमेहंदी बाबाला त्याच्या मृत्यूनंतर दैवी अवताराचे स्थान देऊन त्याचा भव्यदिव्य दरबार बांधला. सध्या भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, छत्तीसगड या भागात ‘ताजमेहंदी’चे भक्त आहेत.

            याचाच आधार घेऊन भंडारा जिल्ह्यातील पवनी या शहरात 6 वर्षांपासून नूरशहाँ फकरूशहाँ दिवान हा ताजमेहंदीच्या नावाने दरबार भरवित होता. ताजमेहंदी सोबतच त्याच्या अंगात गिरडवाले बाबासुद्धा येत होते.

            पवनी परिसरातील पावरफुल बाबा म्हणून नूरशहाँ फकरूशहाँ दिवान यांचा दरबार परिचित होता. या बाबाची विशेषता अशी होती की, हा गावातील करणी करणार्‍यांची नावे सांगायचा त्यामुळे जिल्ह्यातील वैदांचा(करणी करणारा पुरूष मांत्रिक) बंदोबस्त करणारा बाबा म्हणून त्यांचा नावलौकीक होता.

वईदम्हणून महिनाभर हनुमान मंदिरात रवानगी

            विदर्भात करणी व जादूटोणा करणार्‍या पुरूषाला ‘वईद’ या नावाने संबोधले जाते. प्रत्येक गावात असा पाणी करून देणारा, मंत्राने वाईट करणारा वईद असतो. लाखांदूर तालुक्यातील हरदोली या गावातील टेकराम मेंढे हा वईद आहे व तो गावात जादू करतो म्हणून गावातील काही जणांनी त्यांचे जगणे मुश्किल केले होते. हरदोली या गावातील अशोक चुटे व सुरेश मटाले याच्या घरातील सदस्यांच्या तब्येती वारंवार बिघडत होत्या त्यातच त्यांचा ट्रॅक्टर बिघडला म्हणून हे ‘भाग’ पाहण्यासाठी(करणी कुणी केली हे पाहणे म्हणजे भाग पाहणे) पवनी येथे आले. तिथे ताजमेहंदी व गिरडवाले बाबाचा दरबार लावणार्‍या नूरशहाँकडे आले. या बाबाने गावातील टेकराम मेंढे हाच या सर्व करणीसाठी कारणीभूत आहे असे सांगितले. टेकराम मेंढे याचा बंदोबस्त केल्यास तुमच्या घरावरील संकट दूर होईल असे सांगितले. बाबाकडून टेकराम मेंढेचे नाव निघाल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अशोक चुटे व सुरेश मटाले हे दररोज टेकराम मेंढेशी भांडण करीत असत. त्याच्या जीवाला बरेवाईट होऊ नये व ताजमेहंदी बाबाने सांगितले म्हणून तब्बल एक महिना टेकराम मेंढेला गावाबाहेरील हनुमान मंदिरात ठेवण्यात आले. गावाबाहेर काढूनही गावातील लोकांचे समाधान झाले नाही. मग यासाठी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे टेकराम मेंढेच्या भावाने तक्रारी नोंदविल्या. काही महिन्यांपूर्वी पालांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने म.अं.नि.स. शाखा भंडाराच्या वतीने जादूटोणा प्रात्यक्षिक व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालांदूर पोलिसांना महाराष्ट्र अंनिसच्या भंडारा शाखेचा पत्ता सांगितला त्यामुळे जीवाच्या भीतीने टेकराम मेंढे, विजय मेंढे हे भंडारा येथे आले. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा सचिव विष्णूदास लोणारे यांनी सदर प्रकरणी व्यक्तीश: लक्ष घातले. या प्रकरणात गावातील लोकांमध्ये करणीचे भूत भरविणारा ‘बाबा’ ताजमेहंदी याचा बंदोबस्त करायचे ठरविले. त्यासाठी सापळा लावण्यात आला.

अखेर ताजमेहंदी व गिरडवाले बाबाला अटक

            पवनी शहरातील शिवाजी वार्डातील भाई तलावजवळ आपल्या मोठ्या घरात नूरशहाँ फकरूशहाँ दिवान वय 52 हा दरबार भरवित होता. आश्चर्याची बाब म्हणजे नूरशहाँ दिवान हा पाटबंधारे विभागात नोकरीला आहे. शासकीय नोकर असून असा दरबार भरविणारा हा बाबा सकाळी 7 ते 9 व रविवारी पूर्ण वेळ दरबार भरवित होता. करणी काढणे अशी स्पेशालिटी या ढोंगीबाबाची होती. महाराष्ट्र अंनिसच्या श्रीमती बायाबाई बनकर तसेच मार्कंड मटाले यांना 22 एप्रिल 2012 ला पवनी येथील या बाबाच्या दरबारात पाठविण्यात आले. बायाबाई बनकरने आपली प्रकृती बरी नाही, सारखी चक्कर येते, पोटात दुखते अशा अनेक तक्रारी सांगितल्या. बाबाने तंत्रमंत्र करून राख, लिंबू व रक्षा कवच म्हणून धागा दिला. बाबाने दक्षिणा घेतली. पुढील रविवारच्या दरबारात येण्यासाठी सांगितले.

            यावेळी पूर्ण तयारीनिशी म.अं.नि.स.चे जिल्हा सचिव विष्णूदास लोणारे यांच्या नेतृत्वाखाली मेहमूद खॉ पठाण, बायाबाई बनकर, विदर्भ संघटक गजेंद्र सुरकार, अंनिसचे सभासद बासप्पा फाये तसेच लिलाधर बन्सोड, गणेश कार हे सगळे पवनीला पोहोचले.

            सर्वप्रथम या बाबाच्या विरोधात पोलीस स्टेशन पवनी येथे तक्रार देण्यात आली. पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डेरे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक एस.पी.इंगळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दिला. ठरविल्याप्रमाणे सर्वजण नूरशहाँ फकरूशहाँ दिवान यांच्या दरबारात पोहोचले. बाबाच्या अंगात ताजमेहंदीबाबाचा संचार झाला होता. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या बायाबाई बनकर यांनी आपल्या व्यथा बाबाला सांगितल्या. बाबाने पुन्हा तंत्रमंत्र म्हणत राख, दोरा, लिंबू दिला. तेव्हा उपस्थित महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाबाला प्रश्न विचारले. बाबा आम्ही कोठून आलोत, सगळ्यांचे पत्ता दैवीशक्तीने जाणून सांगा तेव्हा बाबाने काहीच उत्तर दिले नाही.

            शेवटी म.अं.नि.स कार्यकर्त्यांसमोर या बाबाने स्वत:चा गुन्हा कबूल करून आतापर्यंत दिशाभूल करीत होतो. माझ्या अंगात कुठल्याही प्रकारचा बाबा येत नाही. मी ढोंग करीत होतो असे मान्य केले. याप्रकरणी म.अं.नि.स.चे जिल्हा सचिव विष्णूदास लोणारे यांचे तक्रारीवरून नूरशहाँ फकरूशहाँ दिवान वय 52 रा. शिवाजी वार्ड, पवनी यांचे विरूद्ध पवनी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम 420 तसेच ‘दि.ड्रग्ज मॅजिक रेमिडिज आब्जेक्शनेबल अडर्व्हटाईजमेंट 1954 कलम 2(ख) (1) (3) आणि 7 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या ताजमेहंदी गिरडवाले बाबा याच्या दरबारातील राख, दोरे, लिंबू, फोटो व इतर सामान पोलिसांनी जप्त केले. या भांडाफोडीमुळे पवनी शहरातील इतर बाबांचेही दरबार बंद झाले आहेत हे विशेष.

प्रा.नरेश आंबीलकर