Categories
अंधश्रद्धा

प्राण्याबाबतच्या अंधश्रद्धा

सप्टेंबर - २०११

पाल

            पाल! भिंतीवर तिच्या सळसळत्या हालचालीने लक्ष वेधणारी थोडीशी भीतीदायक पाल. पालीची सळसळ पाहिली की अंगावर केस उभे राहतात. पालीबद्दल एक अनामिक भीती वर्षानुवर्षे समाजमनात असल्याने पाल हाताळण्याचे नुसते मनात आले तरी शिसारी येईल. स्वयंपाकाच्या कट्ट्याशेजारी पाल पाहिली तरी मन शंकेने भरून जाते. पालीचे चुकचुकणे अशुभ मानले जाते. ही सुद्धा एक अंधश्रद्धाच होय. खरेतर घरात झुरळे, डास, उपद्रवी कीटक यांना खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी पाल अत्यंत उपयोगी आहे. ‘होम क्लिनर’ अशी उपाधीही तिला शोभून दिसेल. ‘पालीची कारीका’ नावाचे पुस्तक पालीविषयी अत्यंत अज्ञान व गैरसमजुत पसरवणारे आहे.

            पाल विषारी आहे का? हा येथे मुख्य विषय आहे. कित्येक वेळा जेवणातून विशेषत: लग्न समारंभ, महाप्रसाद, समारंभ याप्रसंगी ‘अन्नातून विषबाधा’ झाली असे आपण ऐकतो. त्यासाठी बहुसंख्य ठिकाणी यासाठी पालीला जबाबदार धरले जाते. पाल जेवणात पडून तिच्या अंगातील विष जेवणात मिसळले व विषबाधा झाली असे सर्रास ऐकायला मिळते. पण सत्य काय आहे?

            मोठमोठ्या समारंभात महाप्रसादाच्या ठिकाणी जी मोठमोठी भांडी वापरतात ती तांब्याची किंवा पितळेची असतात. त्यांना व्यवस्थित कल्हई केलेली नसते. अशावेळी त्यामध्ये जेवण केल्यावर ती व्यवस्थित स्वच्छ केली नाहीत तर त्यावर हिरवट रंगाचा थर जमा होतो. या हिरवट रंगाच्या थरात ‘मर्क्युरीक ऑक्साईड’ सारखा विषारी घटक असतो. जो पोटात गेल्याने जुलाब व उलट्या होतात. प्रसंगी मृत्यू संभवतो. हे सारे आपले अज्ञान असते; पण ही आपली चूक पालीवर टाकून रिकामे होता येते. यामुळे पालीबद्दल एक अनामिक भीती व अंधश्रद्धांचे दाट वलय तयार होऊन पाल बदनाम होते. खरे तर पाल विषारी नसते. भारतातील पाली ह्या विषारी नाहीत. पालीबद्दल प्रचंड गैरसमज आहेत.

            लेखक जे.सी.डॅनियल यांच्या ‘इंडियन रेप्टाईल्स’ या पुस्तकात स्पष्टपणे व संशोधनाद्वारे सांगितले आहे की, भारतातील पाल अजिबात विषारी नाही. पालीच्या शरीराचे प्रयोगशाळेत विश्लेषण केल्यावर कोणताही विषारी घटक पालीच्या शरीरात आढळला नाही असा पुरावा उपलब्ध आहे.

            पाल किंवा तिचा अवयव खाण्याच्या पदार्थात आढळला तर तो पदार्थ ज्याने खाल्ला आहे त्याला पाल विषारी असते या अज्ञानमूलक भीतीपोटी उलट्या होतात. हा मनोशारीरिक परिणाम आहे. याबाबत प्रबोधन हाच उपाय आहे.

मुंगुस

            मुंगुस! सापाचा मुख्य शत्रू म्हणून प्रसिद्ध. मुंगुसाचे तोंड पाहणे म्हणजे शुभसंकेत मानला जातो. हिंदूधर्माचे वैशिष्ट्य असे की ज्या नागाला हिंदू परंपरेत देवतेचे स्थान आहे. त्याच नागाच्या मुख्य शत्रूला म्हणजे मुंगसाला शुभ मानणे ही विसंगती कशी काय? असा प्रश्न जनमानसाला पडत नाही. किंबहुना प्रश्न पडूच नयेत अशी सारी व्यवस्था इथे हजारो वर्षे बिनदिक्कतपणे नांदत आहे. पु.लं.नी या संस्कृतीला ‘गप्प बसा संस्कृती’ असे नाव दिले. नाग आणि मुंगुस यांचा लढा म्हणजे दोघांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो. एक कोण तरी संपल्याशिवाय हा लढा सहसा संपत नाही. पण या लढ्यामध्येही लोकांची एक गैरसमजूत म्हणजेच अंधश्रद्धा आहे, ती काय ते पाहू.

            मुंगुस व नाग यांच्या लढाईत मुंगुस जखमी झाल्यास ते विशिष्ट झाडाचे मूळ खाऊन स्वत:चा बचाव करतो अशी समजूत चालत आली आहे. पण खरे काय आहे? साप हे मुंगुसाचे भक्ष्य आहे. त्यामुळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी मुंगुस अतिशय चपळतेने हल्ला करते. प्रतिहल्ल्याच्या उद्देशाने नागही जोरदार हल्ला करतो. अशावेळी मुंगुस आपले शरीर ताट करते. त्यामुळे शरीरावरील दाट केस उभे राहतात. परिणामी हे केस दाट असलेले सापाचे विषारी दात मुंगुसाच्या शरीरापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे मुंगुसाला विषारी सर्पदंश होत नाही. या केसांची लांबी 1 ते 2 इंचापर्यंतही असते. प्रत्येकवेळी नाग दंश करताना मुंगुस आपले केस उभे करतो. या टोकदार केसाने नागाच्या जबड्याला टोचले जाते. परिणामी या लढाईत मुंगुस जिंकतो. पण मुंगुसाच्या अंगावरील केस ब्लेडने काढून टाकले आणि मग नागाने तेथे दंश केला तर मुंगुस निश्चितपणे मरते. या लढाईत मुंगुस जमिनीची माती आपल्या अंगावर घेतो जेणेकरून केस सतत उभे राहणेस मदत होते. या जोरावरच सापाबरोबरच्या लढाईत मुंगुस स्वत:चा बचाव करतो. प्रत्यक्षात माती उकरून तो अंगावर घेत असतो. हा प्रयोग घरातील केरसुणीबाबत पाहायला येतो. केरसुणी फुलावी म्हणून त्यात माती घातली जाते. मुंगुसाच्या अंगावरील केस काढून नागाशी लढण्याचा प्रयोग सर्पमित्र राजेश ठोंबरे (चाळीसगाव) यांनी घरी करून पाहिला आहे. यावेळी हे सत्य समोर आले.

उमेश सुर्यवंशी