Categories
पुस्तक परिचय

प्रश्न मनाचे

मे - २०१२

            ‘जागतिक आरोग्य संघटना’ असा इशारा देते की, 2020 साली जगातील पहिल्या पाच आजारात डिप्रेशन(औदासिन्य) व अ‍ॅडिक्शन(व्यसनाधीनता) हे आजार असतील. ‘प्रश्न मनाचे’ या दाभोलकर पिता-पुत्र लिखित पुस्तकातील या वाक्याने मी हादरलोच. 

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानसिक आरोग्याबाबतच्या या वास्तवाची गंभीर दखल घेऊन ‘मानसमित्र’ नावाचा प्रबोधन व कृतीकार्यक्रम हाती घेतला आहे. अंनिस चळवळीतील क्रियाशील असणारे डॉ.प्रदीप पाटकर, डॉ.प्रदीप जोशी, डॉ.प्रदीप पाटील ही मानसोपचार क्षेत्रातील मंडळी अंधश्रद्धेकडे लोक का वळतात, बुवाबाजीला का फसतात याबाबत प्रबोधन करीत होतीच. भ्रम कसे होतात, भूताने झपाटणे व देवी अंगात येणे मन व मनाचे आजार अशा विषयांवर अंनिसच्या शिबिरात चर्चा घडत होत्या. पण अंनिसच्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मानसिक आरोग्यावर प्रबोधन चालत होते.

            21 नोव्हेंबर 2011 रोजी मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा या विषयावरची राज्यव्यापी परिषद चाळीसगाव येथे झाली. डॉ.मोहन आगाशे, डॉ.प्रदीप जोशी, डॉ.प्रदीप पाटकर, डॉ.हमीद दाभोलकर व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी परिषदेत विचार मांडले. परिषदेला कारण घडले चाळीसगावच्या दर्ग्यात मनोरूग्णांना मिळणारा अमानुष उपचार. हा अमानुषपणा व असेच इतर अघोरी उपचार थांबावे म्हणून मानसमित्र ही कल्पना पुढे आली. मानसमित्र प्राथमिक स्वरूपाचे प्रबोधन व उपचार करू शकेल मात्र पुढच्या टप्प्यावरचे उपचार मानसोपचारतज्ञाच्या मदतीनेच होऊ शकतात. सरकारी पातळीवर कार्यान्वित होत असलेल्या मानसिक आरोग्य प्रकल्पामुळे मानसोपचार क्षेत्रात आशादायक कृती कार्यक्रम व प्रबोधन शक्य होईल; पण यासाठी मानसोपचारतज्ञ, सरकारी यंत्रणा व अंनिससारख्या समाजसेवी संघटना यांना हातात हात घालून काम करावे लागेल. या सर्व कार्याला मानसिक आरोग्य व उपचार या विषयावरील पायाभूत साहित्याची गरज मोठ्या प्रमाणात लागेल. डॉ.प्रदीप पाटकर व डॉ.प्रदीप पाटील यांनी याबाबत काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. इतरही लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. पायाभूत माहिती देणार्‍या सुबोध भाषेतील आणखी पुस्तकांची गरज वाढणार आहे. ही गरज मानसोपचार क्षेत्रात कार्यरत असणार्‍या तरूण डॉक्टर हमीद दाभोलकर व अंनिस चळवळीचे मार्गदर्शक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘प्रश्न मनाचे’ या पुस्तकाने पुरी केली आहे.

            मानसोपचार क्षेत्रात क्रियाशील असणारे मानसमित्र व सामान्य वाचक यांना पायाभूत माहिती देऊन, मानसोपचाराबाबतची समज वाढविण्यास या पुस्तकांची बहुमोल मदत होणार आहे.

            या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रश्नोत्तराचे स्वरूप व नेमके विवेचन. अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह व पूर्णविराम हे दाभोलकर-आर्डे लिखीत पुस्तक याच फॉममुळे लोकप्रिय झाले. हे ध्यानात घेऊन लेखकांनी वाचकांच्या मनात उठणारे नेमके प्रश्न व त्याची आटोपशीर पण नेमकी उत्तरे या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.

            अंनिस चळवळीतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अनुभव असं सांगत होता की, लोक आपले प्रश्न घेऊन बुवाकडे जातात यांचे कारण त्यांना पर्याय उपलब्ध नसतो. असा पर्याय म्हणजे मानसोपचार. बुवाकडे जाण्याऐवजी मानसोपचार तज्ञाकडे जाण्यामुळे प्रभावी उपचार होऊन आजाराच्या मुळापर्यंत पोचता येते व आजार बरा करता येतो हे लोकांना दाखवून द्यायला हवे. यासाठी विवेकनिष्ठ मानसिक आरोग्याची चळवळ उभी रहायला हवी. अशा चळवळीची व विविध उपचारांच्या माहितीचे प्रसारण गतीने व्हायला हवे. ही गरज ‘प्रश्न मनाचे’ व तत्सम इतर ग्रंथ यांच्यामार्फत पुरी होईल.

            ‘प्रश्न मनाचे’ या पुस्तकाची शैली अतिशय सुबोध व प्रासादिक आहे. मनाच्या आरोग्याची व आजाराची उकल करणारे 14 पाठ या पुस्तकात समाविष्ट आहेत. पहिल्या पाठात मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखीत केलंय. लॅन्सेट या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये मानसिग रूग्णाचे मोठ्या प्रमाणावर उपचाराविना राहणे म्हणजे ‘माणुसकीचा पराभव’ असे म्हटले आहे. त्याची प्रचिती या पुस्तकातील माहिती वाचल्याशिवाय कळणार नाही.

            पुढच्या भागात सौम्य व तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांची लक्षणे व त्यावर उपलब्ध प्रभावी उपचारांची माहिती प्रश्नोत्तरे स्वरूपात देण्यात आली आहेत. अशा उपचारांबाबतचे गैरसमजही लेखकांनी दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.  व्यसन हा मनाचा आजार आहे हे किती जणांना माहीत आहे. पण ते सत्य आहे. व्यसन आणि व्यसनमुक्ती याबाबतची माहिती अभ्यासपूर्ण व अतिशय उपयुक्त आहे. वर्तमानपत्रात व टी.व्ही.वर येणार्‍या फसव्या जाहिरातींपासून सावध रहाण्याची किती गरज आहे हे लेखकांनी पटवून दिले आहे. लेखक डॉ.हमीद दाभोलकर स्वत: व्यसनमुक्तीच्या कार्यात योगदान देतात.

            पुढच्या पाठातून मन:कायिक आजार व फिटेच्या आजाराची व त्यावरील उपचाराची माहिती दिली आहे.

            वयोगटाप्रमाणे मनाचे आजार उपटतात. लहान मुले, वृद्ध, स्त्रिया यांचे खास मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. त्याची चर्चा उद्बोधक आहे.

            मनावरच्या औषधोपचाराच्या बाबतीत लोकांचे अज्ञान व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकात यशस्वीपणे झाला आहे. मानसिक आजार बरा करण्याचे प्रभावी मार्ग आता उपलब्ध आहेत. दुष्परिणाम कमीत कमी असणारी प्रभावी औषधे उपलब्ध होत आहेत हे आपण माहीत करून घ्यायलाच हवे.

            मनाचे आजार व अंधश्रद्धा यांचा कसा निकटचा संबंध आहे हे एका मोठ्या पाठात अतिशय प्रभावीपणे स्पष्ट केले आहे. भास व भ्रम यांचा व्यवस्थित उलगडा करून देव किंवा भूत नसेल तर ते दिसतात कसे याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण या पाठात मिळते. स्वभावाला औषध नाही अशी एक म्हण आहे. पण लेखक म्हणतात. स्वभावाला औषध आहे. स्वभाव मानसोपचाराने बदलता येणे शक्य आहे. कसे ते कळण्यासाठी  ‘प्रश्न मनाचे’ वाचायलाच हवे.

            राजहंसने प्रकाशित केलेल्या या देखण्या पुस्तकात व्याकरणाच्या अनेक चुका राहून गेल्या याचे आश्चर्य वाटते. पुढत्या आवृत्तीत त्या दुरूस्त होतील अशी आशा करू या.

प्रा.प.रा.आर्डे