Categories
चळवळ

 पुणे जिल्हा प्रेरणा व संकल्प मेळावा

जून – २०१२

दि.1 मे 2012 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुणे जिल्हा प्रेरणा व संकल्प मेळावा पुणे येथे पार पडला. या मेळाव्यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड, चाकण, भोर, बारामती आदी शाखांचे सुमारे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.नरेंद्र दाभोलकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सचिव मिलिंद देशमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी भोसले यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

            समितीपुढील अडचणी कार्यकर्त्यांना कळाव्यात तसेच कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी अनुभवातून इतर कार्यकर्त्यांनी संघटना बांधणीचा संकल्प करावा असे प्रतिपादन देशमुख यांनी केले. या प्रसंगी दहा दिवसांत पाच भोंदू बाबांचा भांडाफोड केल्याबद्दल चाकण शाखेचा तर वार्तापत्रासाठी अधिकाधिक वर्गणीदार केल्याबद्दल भोर शाखेचा गौरव करण्यात आला. तसेच विशाल पोखरकर, हर्षल ओक, स्वप्नील वाळूंज, विवेक कामत या कार्यकर्त्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल खास सत्कार करण्यात आला. कुणाल शिरसाटे यांनी सूत्रसंचालन केले.

            कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन करताना या वर्षापासून दोन वर्षातून एकदा भटक्या विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या कार्यकर्त्यास विशेष पुरस्कार दिला जाईल, तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यास जीवन-गौरव पुरस्कार दिला जाईल असे जाहीर केले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात समितीतर्फे केल्या जाणार्‍या प्रयत्नांची माहिती दिली. संघटनेत सहमतीने निर्णय घेणे, उक्ती आणि कृतीत फरक नसणे, धर्म-जात विरहित संघटना, स्वायत्त अर्थकारण, लोकाधारावर आधारीत चळवळ हे समितीच्या गेल्या वीस वर्षांतील यशस्वी वाटचालीचे गमक असल्याचे डॉ.दाभोलकर यांनी सांगितले.

            अतुल सवाखंडे, अ‍ॅड.मनिषा महाजन व कुणाल शिरसाटे यांनी चळवळीत काम करत असताना आलेले अनुभव सांगितले. वैयक्तिक जीवनातही अन्यायाविरूद्ध लढण्याचे बळ समितीमुळे मिळावे, असे प्रतिपादन डॉ.कांकरिया यांनी केले. यानंतर प्रत्येक शाखेची गटवार चर्चा होऊन पुढील वर्षात कोणते कार्यक्रम घेण्याचा संकल्प प्रत्येक शाखेने केला आहे याचे जाहीर वाचन झाले. डॉ.रा.ग.जाधव आणि विनोद शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. कार्यकर्त्यांच्या अनुभव कथनापासून प्रेरणा घेऊन आणि संघटनेत जोमाने काम करण्याचा संकल्प करूनच कार्यकर्ते बाहेर पडले.

  • श्रीपाल कुं. ललवाणी, पुणे