महाराष्ट्र अंनिस ‘मानसमित्रां’मार्फत मानसिक आधार प्रकल्प राबविणार तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करणार
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह लगतच्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीत बाधित झालेल्या हजारो कुटुंबांच्या पाठीशी आपण समाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संघटना म्हणून यथाशक्ती योगदान द्यायचे ठरविले आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केलेले आहे. त्यामध्ये पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि पूरस्थितीमुळे झालेल्या जीवित व वित्त हानीमुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता असणार्यांना आधार देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. ‘मअंनिस’चे त्या-त्या जिल्ह्यांतील सहकारी आपापल्या ठिकाणी व्यक्तिश: व छोट्या गटांसह यापूर्वीच कामाला देखील लागलेले आहेत. त्यांना आपापल्या परीने शक्य ती मदत मिळवून पूरग्रस्त बाधितांना पुरवायचा प्रयत्न संघटनेतर्फे सुरू केलेला आहे. त्यासाठी पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन आम्ही महाराष्ट्र अंनिसच्या संघटनेतील सहकार्यांमार्फत प्रसारित केलेले आहे. त्याला काही चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. नजीकच्या काळात त्याला जास्त मदत, सहभाग व सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. अशी उपलब्ध झालेली मदत अधिकाधिक योग्य व गरजू व्यक्ती, कुटुंबीयांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पूरग्रस्त स्थितीची पाहणी करून जवळपास व लांबच्याही पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्यामधून माहिती घेण्याचा प्रयत्न अंनिसचे कार्यकर्ते इतर सहकार्यांच्या व यंत्रणांच्या मदतीने करीत आहेत.
आम्ही महाराष्ट्र अंनिसतर्फे प्राधान्याने दात्यांकडून शैक्षणिक साहित्य मिळवून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये दप्तर, वह्या व कंपास पेटी या साहित्याचा समावेश असेल. त्याप्रमाणे आतापर्यंत सरासरी प्रत्येकी 400 रुपयांप्रमाणे जवळपास 2 हजार संच तयार करून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना वाटणे सुरू केले आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अंनिस कार्यकर्ते, हितचिंतकांकडून मोठा सहभाग मिळत आहे.
तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत आम्ही जिल्हा व राज्य प्रशासनातील संबंधित अधिकार्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून आवश्यक सेवांच्या अपेक्षा समजून घेत आहोत व त्याप्रमाणे आम्हाला शक्य होईल तेवढे सहकार्य देण्याची भूमिका घेत आहोत.
त्यामधील प्रामुख्याने आमचा अनुभव व काही प्रमाणात तज्ज्ञता असणार्या कामांमधील पूरग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या मानसिक आरोग्य प्रकल्पांतर्गत ‘मानस मित्रां’व्दारे मानसिक आधार मोहीम राबविण्याबाबत नियोजन करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र अंनिसने यापूर्वीही लातूर जिल्ह्यात झालेल्या प्रलंयकारी किल्लारी भूकंपामध्ये लोकांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक आधार प्रकल्प राबविला होता. तसाच प्रकल्प आता सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात राबविण्याचा ‘मअंनिस’चा मानस आहे. तसेच पूरग्रस्त व्यक्तींना मानसिक आधार देण्यासाठी शासनयंत्रणेतील संबंधित घटकांचे प्रशिक्षण करून प्रचार-प्रसारासाठी पुस्तिका, पोस्टर, व्याख्याने आयोजित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात येईल.