Categories
शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात

ऑक्टोबर - २०१२

पुरोगामी महाराष्ट्र अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला होत असलेला विरोध हा दुर्दैवी आहे. केवळ हिंदुत्ववादी नव्हे तर काँग्रेसचेही नेते जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध करीत आहेत, असे परखड मत माजी आमदार शरद पाटील यांनी व्यक्त केले.

            अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित वैज्ञानिक जाणिवा शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी महिलांच्या हस्ते कुंडलीचे दहन करून अनोख्या पद्धतीने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजीराव पवार गुरूजी होते.

            पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील समाज शतकानुशतकापासून अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडला आहे. संतांनी समाज प्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणात केले. चुकीच्या प्रथा परंपरांवर कोरडे ओढले. तरीही अंधश्रद्धा अजून संपलेली नाही. आजही राज्यात बुवाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला सुशिक्षित लोकही फसत आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करणे काळाची गरज बनली आहे.’

            ते पुढे म्हणाले, त्यासाठी नरेंद्र दाभोलकर व अंनिसने सुरू ठेवलेले काम कौतुकास्पद आहे. जादूटोणा विरोधी कायद्यासाठी समिती व कार्यकर्त्यांचे चाललेले प्रयत्न निश्चितच वाखणण्यासारखे आहेत. परंतु या कायद्याला होत असलेला  लोकप्रतिनिधींचा विरोध ही दुर्दैवाची बाब आहे. हिंदुत्ववादी नेत्यांबरोबर काँग्रेसचे लोकप्रतिनिधीही याला विरोध करीत आहेत, हे चुकीचे आहे. शाहू महाराजांचे नाव घेत पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असलेली ही बाब अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे ही लढाई आता आणखी तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरूण-तरूणींना अंधश्रद्धेचा फोलपणा समजून सांगितला पाहिजे. समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर जोर द्यायला हवा.

            स्वागत प्रास्ताविकात समितीचे शहराध्यक्ष अ‍ॅड.के.डी.शिंदे म्हणाले, समाजात अजूनही अघोरीप्रथा व फसवणूक सुरू आहे. देव, धर्माच्या नावाखाली अनेकजणांनी याचा धंदा मांडला आहे. काहीजण तर सरकारी खर्चाने अवैज्ञानिक धंदे करून लोकांन फसवित आहेत. पण समिती प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक निकषावर तपासून पाहत अंधश्रद्धेच्या लाभार्थ्यांना उघडे पाडत आहे. समिती कोणत्याही धर्माविरोधात नाही. आम्ही संताच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे अंधश्रद्धेविरोधात लढत आहोत. समाजातील सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे, तसेच समितीला साथ द्यावी.

            शिबीराच्या दुसर्‍या सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर प्रा.प.रा.आर्डे, ‘मनाचे आजार आणि अंधश्रद्धा’ या विषयी गणेश कांबळे, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी?’ याबाबत संजय बनसोडे, तर ‘चमत्कार सादरीकरण व बुवाबाजी’ या विषयी भास्कर सदाकळे यांची व्याख्याने झाली. संयोजन सचिव राहुल थोरात, अंकुश चव्हाण, अ‍ॅड.अमित शिंदे, यांनी केले. कार्यक्रमास नामदेव करगणे, भाई गुलाब इनामदार, प्रा.नितीन शिंदे, जनार्दन गोंधळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

-अ‍ॅड. के. डी. शिंदे, सांगली