26जून शाहू जयंतीनिमत्त विशेष लेख
राजर्षी शाहू महाराजांवरचं एक छोटेखानी पुस्तक नुकतंच वाचलं. वाचायला हातात घेतलं आणि वाचून संपलं, तेव्हाच खाली ठेवलं. आतापर्यंत शाहू महाराजांबद्दल फारच थोडी माहिती होती. पुस्तक वाचल्यावर शाहू महाराज कसे होते, अतिशय आदरानं त्यांचं नाव का घेतलं जातं, हे छान समजलं. शाहू महाराजांबद्दल आणखी तपशीलवार वाचायला हवं, अशी तीव्र इच्छा आता मनात निर्माण झाली आहे.
इतिहासामध्ये आपली ठळक छाप निर्माण केलेल्या अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची आपल्याला फक्त नावे ठाऊक असतात. या व्यक्ती असा खोलवर ठसा कशा उमटवू शकल्या, याच्या अधिक तपशिलात जाण्याचा आपण फारसा प्रयत्न करत नाही.
आणि अशी मुद्देसूद, सोप्या भाषेत इतिहास उलगडून सांगणारी पुस्तके जेव्हा वाचनात येतात, तेव्हा आपलाच इतिहास आणि आपलाच भूगोल आपल्याला नीटसा माहीत नाहीये याची प्रकर्षाने जाणीव होते. म्हणूनच विलक्षण कर्तृत्वाने आपल्या आयुष्याचे सार्थक करणार्या, आयुष्याला एक अर्थ निर्माण करणार्या, अशा थोर व्यक्तींच्या कामगिरीचा किमान परिचय आपण सर्वांनी करून द्यायला हवा.
परिस्थिती बदलण्याची ताकद असलेल्या अशा व्यक्तींचे गुणविशेष आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. आपले मनोबल वाढवू शकतात.
उमेश सूर्यवंशींचे ‘राजर्षी’ हे असेच शाहूराजांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवे. उत्तम आर्ट पेपर, नेहमीपेक्षा थोड्या मोठ्या अक्षरातली छपाई, जवळपास 90 चित्रे, पुस्तकाची साईजही ए-4, 106 पानांचे अतिशय देखणे पुस्तक, लेखकाचे मनोगत वाचता-वाचता पुस्तक वाचनाला आपण कधी सुरुवात करतो, लक्षातही येत नाही.
शाहू राजांचा जन्म, राजघराण्यात त्यांचे दत्तक जाणे, स्टुअर्ट फ्रेझर या इंग्रज अधिकार्याने त्यांचा शिक्षक, पालक, मार्गदर्शक होणे, शाहूंना एक उत्तम राज्यकर्ता घडवण्याची जबाबदारी घेणे, हे असे मुद्दे वाचता-वाचता आपण शाहूराजे राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतात इथपर्यंत येतो.
शाहूंची दूरदृष्टी, धाडस, मुत्सद्दीपणा, विचारांचा खंबीरपणा, विविध कलांची आवड आणि सर्वांत महत्त्वाचे ‘हे राज्य लोकांचे आहे’ ही भावना सतत मनात जपत त्यांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी केलेली अविरत धडपड, त्या काळातील पिढीसाठीच नव्हे, तर पुढील अनेक पिढ्यांसाठीही त्यांनी निर्माण केलेले प्रगतीचे मार्ग हे सर्व वाचता-वाचता आपण थक्क होऊन जातो.
जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य. अवघ्या 20 व्या वर्षी राज्यकारभार हाती घेतलेल्या शाहू राजांनी आपल्या कारकिर्दीत लोककल्याणाची अनेक कामे केली.
महात्मा फुलेंनी घातलेला शिक्षणाचा पाया त्यांनी विस्तारला. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत, लष्करी शिक्षणापासून तांत्रिक शिक्षण देणार्या संस्थांपर्यंत (Institute) सर्वांगीण विकासाच्या वाटा शाहूराजांनी खुल्या करून दिल्या. संस्थानच्या महसुलाचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च केला. कोल्हापूरला ‘शिक्षणकाशी’ अशी वेगळी शैक्षणिक ओळख प्राप्त करून दिली.
‘मल्लविद्येचा पोशिंदा’ हे प्रकरण शाहू महाराजांनी मल्लविद्येला कशी ऊर्जितावस्था आणली हे स्पष्ट करणारे, ‘पैलवान तयार होत नसतो, त्याला तयार करावा लागतो’, हे त्यांना पक्के ठाऊक होते. ‘बुरुजबंद पैलवान’ तयार करण्यासाठी राजांनी विशेष मेहनत घेतली. एवढेच नाही, तर त्यांच्या भविष्याचा देखील त्यांनी विचार केला. अंगात रग आहे, तोवर पैलवान कुस्ती खेळेल; पण नंतर काय? यासाठी शाहू महाराजांनी मल्लांना पेन्शनची, नोकरी, घर, दुकानासाठी जागा, धान्यासाठी जमीन देण्यासाठीही व्यवस्था केली.
‘पैलवानांना जपावे कसे?’ याचा वस्तुपाठ घालून देणार्या शाहूराजांनी विविध कलवंंतांनाही आश्रय दिला. शास्त्रीय संगीतातील दर्दी कलावंत अल्लादिया खाँ, चित्रकार आबालाल रहिमान, संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व, स्वदेशी बनावटीचा देशातील पहिला कॅमेरा बनवणारे कलामहर्षी बाबूराव पेंटर अशा दिग्गज कलाकारांनी आपल्या कलेत फार मोठी उंची गाठली. कारण या प्रत्येकाला शाहूराजांचा वरदहस्त लाभला होता. कोल्हापूरचे ‘कलापूर’ झाले ते दूरदृष्टीच्या, उदार आणि कलाप्रिय शाहू राजांमुळे.
जातीभेद निर्मूलनासाठीही शाहू राजांनी अनेक प्रयत्न केले. मागासवर्गीयांना नोकर्यांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले. अस्पृश्य, महार, मांग उमेदवारांना सरकारी नोकर्या दिल्या. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी शाहू राजांनी व्यक्तिगत पातळीवर केलेले प्रयत्न मूळ पुस्तकातून सविस्तर वाचायला हवेत.
शाहूराजांनी प्रयोगशीलता वर्णन करणारे ‘शेतकर्यांचा वाली, कामगारांचा बंधू’ हे प्रकरण सद्य:स्थितीतही उपयुक्त ठरावे असे. आपल्या शेतकर्यांची परिस्थिती सुधारावी, तो आधुनिक बनावा याकरता शेती प्रदर्शनाबरोबरच ‘विज्ञान प्रदर्शन’ भरवणारा हा आगळावेगळा राजा.
स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आपल्याकडे 2005 साली केला गेला, तो शाहू राजांनी 100 वर्षांपूर्वीच त्यांच्या संस्थानात केला होता. त्या काळी संस्थानिक राजे म्हणजे ऐषोरामात राहणारे, भलामोठा जनानखाना बाळगणारे विलासी, चंगळवादी राजे, या पार्श्वभूमीवर शाहू राजे अगदीच निराळे ठरतात. स्त्रियांकरिता त्यांनी आणखीही काही विशेष कायदे केले व स्त्रियांचे अधिकार, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान जपण्याचा त्यांनी नेहमीच कसा प्रयत्न केला हे ‘स्त्रीवर्गाचा सच्चा कैवारी’ या प्रकरणात वाचायला मिळते.
स्त्रिया, भटक्या जमाती, मुस्लिम यांच्या प्रगतीचा विचार करणारा, कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानाला व न पेलणारा ‘राधानगरी धरण’ प्रकल्प हाती घेण्याचे धाडस करणारा व त्याद्वारे कोल्हापूरच्या हरितक्रांतीचा पाया रचणारा, मुंबईप्रमाणे कोल्हापुरातही उद्योग-व्यापाराची प्रगती होण्यासाठी रस्ते-रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दरबारचा खजिना मोकळा करणारा, पुढील अनेक पिढ्यांच्या कल्याणाची काळजी करणारा हा लोककल्याणकारी राजा.
करवीरनगरीचे संस्थापक असणार्या शाहू राजांना ऐषोरामात जीवन जगणे सहज शक्य होते; पण त्यांनी सतत लोकांच्या कल्याणाचाच विचार केला. लोकांचे, समाजाचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर दूरदृष्टीने उपाय योजले.
पण हे लोककल्याणाचे काम करणे त्यांना सहज शक्य झालेले नाही. अनेक वेळा त्यांना विरोध झाला, त्यांच्याविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली गेली. विषप्रयोग करण्याचा, त्यांना मारण्याचाही अनेकदा प्रयत्न झाला. अगदी त्यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले गेले; पण या सर्व प्रकारांना शरीराबरोबरच मन आणि मेंदू खंबीर ठेवणारे शाहू राजे पुरून उरले.
या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रकार विजय चोकाककर यांनी काढलेली तब्बल 90 चित्रे. त्या-त्या प्रकरणाशी संबंधित या चित्रांनी शाहू राजांचा इतिहास वाचकांपुढे जिवंत केला आहे. चित्रे आणि पुस्तकाचा कागद यांनी फार उत्तम परिणाम साधला आहे. उदा. शाहू राजांची उंची 8 फूट 4 इंच अशी भव्य होती. असे जेव्हा आपण वाचतो, तेव्हा पान क्र. 66 वरील त्यांचे चित्र त्यांचा धिप्पाडपणा आपल्या मनावर फार परिणामकारकपणे ठसवते. सर्वच चित्रे उत्तम.
पुस्तक वाचनीय तर आहेच; पण या चित्रांमुळे .पुस्तक फार देखणे झाले आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाला मा. शरद पवार साहेब आवर्जून उपस्थित राहिले. याप्रसंगी थोडीथोडकी नाही, 5 हजार माणसे जमली होती. पवारसाहेबांनी मुक्तकंठाने लेखकाचे, पुस्तकाचे कौतुक केले.
पहिली 5 हजार प्रतींची आवृत्ती अवघ्या दोन महिन्यांत संपली. प्रकाशनादिवशीच 1700 प्रती विकल्या गेल्या होत्या. 9 फेबु्रवारी 2019 ला दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्या 5 हजार प्रतींपैकी आता जेमतेम 300 प्रती शिल्लक आहेत. तिसरी आवृत्ती इंग्रजीमध्ये काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवणारे, मर्यादित अधिकारात प्रचंड मोठे कार्य करून दाखवणारे शाहू महाराज समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचयलाच हवे. अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून सारांशरुपाने लिहिलेले हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. शाहू महाराजांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची महती अवघ्या 100 पानांत आणि नेमक्या शब्दांत सांगणे हे फार कठीण काम; पण लेखकाने ही किमया अगदी सहजपणे करून दाखवली आहे.
इतिहासावर अमीट ठसा उमटवलेल्या आणखीही अनेक व्यक्तिमत्त्वांविषयी लेखकाने आवर्जून लिहायला हवे.
पुस्तकाचे नाव ः राजर्षी
लेखक ः उमेश सुर्यवंशी
प्रकाशक ः लोकराजा फोरम, कोल्हापूर
स्वागत मूल्य ः 100/-