केरळमधील प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी व अंधश्रद्धा विरोधी लढ्यातील अग्रणी दिवंगत बी.प्रेमानंद यांनी एका भुताटकीच्या विलक्षण प्रकारामागचा बनाव जीव धोक्यात घालून कसा उघडकीस आणला त्याची ही हकीकत.
भोंदूबाबांच्या चमत्कारांचे प्रात्यक्षिकांसहित स्पष्टीकरण या विषयावर अंधश्रद्धाविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळा हैदराबाद येथे मी आयोजित केली होती. त्यावेळी अनंतपूर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी मला भेटावयास आले. या जिल्ह्यातील उर्वाकोंडा या गावात भुताटकीच्या प्रकाराने लोक भयभीत झाले होते. रात्रीच्या वेळी एक भूत झोपलेल्या माणसांचा त्याला न कळेल अशा प्रकारे चावा घेऊन रक्त शोषून घेते अशा विचित्र घटना घडत होत्या. शंभरच्या जवळपास पोलीस या भूताला पकडण्यासाठी तैनात केले होते. पण भूत सापडत नव्हते. त्याच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या. रोज नवीन माणसांचे रक्त हे भूत शोषून घेई. या विचित्र प्रकाराचा मी छडा लावावा व या प्रकारामागे काय रहस्य आहे ते शोधण्यास पोलिसांना मदत व मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी मला केली.
अनंतपूरमधील माझ्या काही मित्रांना बरोबर घेऊन पोलीस संरक्षणाखाली मी उर्वाकोंडा गावात गेलो व माझ्या पद्धतीने भुताटकीच्या घटनांना तपास सुरू केला.
पहिल्यांदा भूताने चावा घेतला तो एका मुलीचा. लोक माहिती देत असतानाच त्या मुलीच्या अंगावरील चाव्याचा व्रण मी नीट निरखला. असह्य उकाड्यामुळे लोक अंगणात झोपत तशी ही मुलगीही त्या रात्री अंगणात झोपली होती. मुलीच्या अंगावरील व्रण उंदराच्या चाव्याशी मिळता जुळता असल्याचे मला दिसून आले.
दुसरी घटना ज्या घरात घडली तेथे आम्ही पोहोचलो. एका बाईच्या पाठीवर ओरखडा होता. हे भुताचेच काम असे लोक ठामपणे समजत होते. ही घटना घडली तेव्हा दुपार होती. मुले शाळेला व पुरूष मंडळी आपापल्या कामासाठी बाहेर पडलेली. घरात बाई एकटीच. स्वयंपाक, धुणे, भांडी आवरल्यावर बाई आंघोळीसाठी बाहेरच्या न्हाणीघरात गेल्या. न्हाणी घराला छप्पर नव्हते. कपडे उतरवून आंघोळीस बसण्याच्या बेतात असतानाच पाठीवर तिला कुणीतरी ओरबाडले. तिने मागे वळून पाहिले तर कोणीच दिसेना. गावात भूत आल्याची व त्याच्या पराक्रमाची रसभरीत वर्णने बाईनेपण ऐकली होती. या भुतानेच आपला चावा घेतला अशी तिची समजूत झाली. भयाने ती ‘भूत! भूत!’ असे ओरडू लागली. आजूबाजूचे लोक आवाजाच्या दिशेने पाहू लागले. त्याचवेळी एक मांजर न्हाणीघरातून उडी मारून पळून जाताना काहींना दिसले. ‘हे मांजर म्हणजे भुताने घेतलेले रूप’ लोक सांगत होते. मी हसत सर्व ऐकत होतो.
आता तर भुताच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. एवढ्यात आणखी एकाला भुताने चावल्याची बातमी गावात पसरली. ज्या माणसाला भुताने जखम केली होती त्यास आम्ही तपासले. त्याच्या अंगावरची जखम कापल्याची नव्हती तर तो खाजवलेला नायटा होता.
मुलीच्या अंगावरील व्रण, बाईच्या पाठीवरील ओरखडा व तिसर्या माणसाचा नायटा. भुताच्या चावण्यात हे वेगळेपण कसे? ‘काहीतरी पाणी मुरतंय’ माझी चिकित्सक वृत्ती मला बजावत होती. ‘हे भुताचे काम नव्हे.’
आणखी काही जणांचा तपास केला. या सर्वांच्या अंगावर एकाच प्रकारचे ओरखडे दिसून आले. ब्लेडने कापल्याप्रमाणे हे बारीक ओरखडे दिसत होते. भूत असते, अशा भ्रमाने भयभीत झाल्यावर हे ओरखडे दुसर्या कशामुळे असणार? हे भुताचेच काम! रक्तपिपासू भुतांचे हे चावे! लोकांना शंकाच नव्हती. ब्लेडचे ओरखडे हे माणसाचेच काम. कोणी लपून कौशल्याने तर हा प्रकार करीत नसावा? अधिक माहिती घेऊ लागलो तसे या प्रकारांचे रहस्य मला उलगडू लागले.
उर्वाकोंडा गावात दोन मांत्रिक होते. एक थिमप्पा व दुसरा नागराजू. या दोघात स्पर्धा होती. भुताखेतावर व तंत्रमंत्रावर विश्वास ठेवणार्या भोळसट लोकांना लुबाडून नागराजूने भरपूर कमाई केली होती. या कमाईतून त्याने मोठा बंगला बांधला होता. नागराजू आपला धंदा वाढू देत नाही या मत्सरापोटी थिमप्पाच्या मनात दुष्ट विचार येऊ लागले. नागराजूची बेअब्रू करून त्याला गावातून पळवून लावायचा. हे माझ्या लक्षात कसे आले? लोकांनीच दिलेल्या माहितीवरून. डोके गहाण न ठेवता तर्काचा वापर केला तर गूढ घटनांची खरी कारणे शोधणे अवघड नाही.
थिमप्पाने गावात हूल उठविली. तो लोकांना सांगू लागला. याच गावातील एका दुष्ट माणसाने गावात भूत सोडले आहे जे लोकांचे रक्त मागतंय! गावच्या देवीला कौल लावून विचारले पाहिजे की हे कुणाचे काम? देवीच्या पुजार्याला थिमप्पाने वश केले. आपल्या गुंड मित्रांना काय करायचे त्याची नीट कल्पना दिली. देवीच्या देवळात सर्व जमले. पुजार्याने आज्ञा केली ‘देवीची मिरवणूक गावातून जाईल. ज्या घराजवळ देवी थांबेल तेथील माणूसच भुताला गावात सोडतोय.
देवीची मिरवणूक सुरू झाली आणि गावातून फिरत फिरत नागराजूच्या घराजवळ थांबली. देवी पुढे जाईच ना! कौल मिळाला. देवीने सांगितले की नागराजूच भूत सोडतोय!
थिमप्पाच्या माणसांनी देवीची पालखी नागराजूच्या घराजवळ मुद्दामहून थांबविण्याचा कट अगोदरच शिजला असला पाहीजे. खांद्यावरची पालखी देवी पुढे जाऊ देईना असे ढोंग करून देवीने कौल दिल्याचे हे बेमालूम नाटक होते तर!
पुजारी ओरडला, ‘ओढा नागराजूला बाहेर!’ जमावातील काहीजण नागराजूच्या घरात घुसले. त्यांनी बंगल्यातील सामानाची नासधूस केली. नागराजू मात्र तेथून निसटला. या गोंधळात नागराजूच्या घरताील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात दोन लोक ठार झाले.
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नागराजूला गावातून हद्दपार करण्यासाठी थिमप्पाने व त्याच्या साथीदारांनी भुताची अफवा गावात पसरविली. ज्यांच्या अंगावर कापल्याच्या खुणा होत्या त्यांच्यावर थिमप्पाने रात्रीच्या वेळी कौशल्याने ब्लेडचा वापर केला असेल काय? पण ब्लेडने कापताना वेदना होणारच. मी विचार केला. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. त्या रात्री मी नव्या ब्लेडने स्वत:वरच प्रयोग केला. मी हातावर ब्लेड हलक्या हाताने फिरवले. ओरखडा निघाला पण वेदना जाणवली नाही. जेथे कापले तेथे स्नायूवर दाब दिला. कापलेल्या ओरखड्यातून रक्त गळू लागले. झोपेत असा ब्लेडचा ओरखडा काढला व हालचालीमुळे त्याच्यावर दाब पडला तर रक्त गळेल व थोड्या वेळाने गोठून ओरखड्याजवळ डाग दिसतील. कपड्यावर थोडे रक्ताचे डाग दिसतील. थिमप्पाच्या विश्वासातील लोक स्वत:च हे प्रयोग करून भुताचे नाव घेत असावेत किंवा इतरांच्या नकळत ब्लेडचा वापर त्यांच्या शरीरावर करीत असावेत. सराईत खिसेकापू करतात तसेच.
दुसर्या दिवशी पोलिसांनीच उर्वाकोंडा गावात माझे जाहीर व्याख्यान आयोजित केले. व्याख्यानाचा विषय होता, ‘गूढ घटना, चमत्कार व बुवाबाजी’ या व्याख्यानाचे वेळी चमत्काराच्या प्रात्यक्षिकासहित, बुवाबाजी व फसवणूक कशी केली जाते याचे मी जनसमुदायापुढे सोदाहरण विवेचन केले. गूढ वाटणार्या काही घटनांमध्ये मांत्रिक कशा क्लृप्त्या करतात हे पण स्पष्ट केले. व्याख्यानाच्या शेवटी श्रोत्यातील एकाला मी स्टेजवर बोलाविले व त्याला डोळे मिटून टेबलावर झोपावयास सांगितले. माझा हात मी त्याच्या अंगावरून अशा सफाईने फिरविला की, समोरील लोकांना व त्याला मी काय केलंय हे अजिबात कळू नये. आता त्या व्यक्तीला डोळे उघडावयास सांगून उठून उभे केले. उठताना हातावर पडलेल्या दाबाने मी त्याच्या हातावर ज्या ठिकाणी ब्लेडचा सफाईदार प्रयोग केला होता त्या ठिकाणी रक्त गळू लागले लोक आश्चर्यचकित होऊन पहात होते.
‘तुमच्या शरीरातील रक्त भूत शोषीत नव्हते.’ लोकांना मी सांगत होतो. ‘हे सर्व प्रकार तुमच्याच गावातील माणूस घडवीत होता. मी याबाबत पोलिसांना कल्पना दिली आहे. आजपासून तुमच्या गावातील रक्त पिणारे भूत गायब होईल. अशी भुते नसतातच.’ आश्चर्यचकित लोक आपापसात चर्चा करत घरी पसरले. थिमप्पा या प्रकाराला कसा जबाबदार आहे हे मी पोलिसांना पटवून दिले. त्यांनी थिमप्पाला अटक केली व त्याच्यावर खटला दाखल केला. हा खटला कोर्टात पडून आहे. मात्र उर्वाकोंडा गावातील भुताटकीचे प्रकार बंद होऊन लोक भयमुक्त झाले हे या शोधाचे मोठे यश आहे.
उर्वाकोंडा भूत प्रकरणातून, अशी प्रकरणे हाताळणार्या कार्यकर्त्यांनी काय काळजी घ्यावी हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. अशी काळजी मी घेतली नसती तर मला कदाचित प्राण गमवावा लागला असता. उर्वाकोंडा गावात भुताटकी सुरू झाली व पेपरमध्ये बातम्या झळकू लागल्या. एका पेपरमध्ये रक्त शोषणारे भूत कसे दिसते त्याचे चित्र छापले होते. चित्राखाली थिमप्पाचे नाव होते. हे चित्र माझ्यासारखे दिसत होते. थिमप्पाचा यामागे कुटील डाव होता.
मी अनंतपूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहे हे थिमप्पाला माहीत होते. मी सत्यसाईबाबासहीत सर्व बुवांचे बिंग फोडणारा कार्यकर्ता आहे हेही त्याला माहीत असावे. त्याची अशी अटकळ होती की, भुताच्या बातम्या वाचून मी लगेच उर्वाकोंडा गावात एकटाच तपासासाठी येईन. त्यावेळी पेपरमधील फोटोशी माझे साम्य आहे हे लोकांच्या नजरेस आणायचे व मलाच भूत समजून लोकांकरवी ठार करायचे. पण पोलीस संरक्षणाखाली मी गावात गेल्याने त्याला त्याचा डाव साधता आला नाही. मीच त्याचा डाव त्याच्याच अंगावर उलटवून बुवाबाजीच्या लढाईत नवा इतिहास घडविला.
–बी.प्रेमानंद
अनुवाद- प्रा. प. रा. आर्डे