Categories
चार्वाक कट्टा

रामदेवबाबा,  सरकार आणि आपण

जुलै - २०११

शरयू :  जवळ जवळ दोन महिन्यांनी भेटतो आहोत आपण, नाही का!

कल्पेश :  आणि नेमक्या या दोन महिन्यातच इतक्या घडामोडी घडल्या की, असं सारखं वाटत होतं की आपण भेटायला पाहिजे. सत्यसाईबाबा, रामदेवबाबाचं उपोषण, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि सगळ्यांवर कडी म्हणजे शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग. कितीतरी विषय निसटले हातून.

ज्योती : वर्ल्डकप विसरलास वाटतं!

शरयू : मला तर असं सारखं वाटत होतं की, या विषयावर ज्योती काय बोलली असती? आशिषने कशी प्रतिक्रिया दिली असती किंवा मग प्रतिक कसा भांडला असता वगैरे….

ज्योती : शरयूच्या बोलण्यावरून वाटतं की, आपल्याला प्रत्येकजण काय बोलणार याचा अंदाज आधीपासूनच येतो की काय? कारण माझ्या मनातही असंच काहीतरी चालू होतं.

समीर : हे खरं असावं. पण आणखीन एक मुद्दा तुमच्या  लक्षात आला का? कॉलेजमध्ये आपला ग्रुप बनत चालला आहे.

प्रतिक : पण यात वाईट काय?

ज्योती : अरे! त्याला पूर्ण बोलू दे तर खरं.

समीर : माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की,  आपण एकमेकांना भेटतो त्यामागचा उद्देश साध्य होत नाही.

प्रतिक : म्हणजे! एवढी चांगली चर्चा आपण करतो हाच तर खरा उद्देश आहे ना?

शरयू : समीरचं वाक्य मी पुरं करते. आपण भेटतो ते केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर आपण जे काही बोलतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं म्हणून. जर आपण कुठेही गेलो आणि एकमेकांसोबतच राहू लागलो तर समीर म्हणतो तसं खरोखरच आपण मूळ उद्देशापासून दूर राहू.

गौतम : समीरच्या म्हणण्यास तथ्य आहे. ही चूक आपण सुधारू. पण यावेळच्या विषयाचं काय?

ज्योती : कुठलाही विषय घेऊ; पण त्या सत्यसाईबाबाचा नको. मेल्यावर एखाद्या माणसाबद्दल वाईट बोलू नये.

कल्पेश : पण आपल्याला सत्यसाईबाबा या व्यक्तीबद्दल राग असायचं काहीच कारण नाही. त्याच्या कृतीबद्दल आपण बोलणार आहोत. कारण हाच तर्क लावायचा झाला तर हिटलर’बद्दल पण वाईट बोलायला नको.

प्रतिक :  तरी पण नकोच हा विषय…. कारण त्याबद्दल इतकं वाचलंय की, आपल्यात तरी त्याची चर्चा नको.

गौतम :  रामदेवबाबाच्या ढोंगीपणाबद्दल बोलायचं का?

शरयू :  प्रत्येक बाबा ढोंगीच असतो काय? आणि रामदेवबाबाने ज्यासाठी उपोषण केलं ते कारण योग्य आहे की नाही?

समीर : त्याहीपेक्षा मला सरकारचा ढोंगीपणा जास्त खुपतो. रामदेवबाबाच्या औषधांचा गोंधळ, त्यातील भेसळ जेव्हा उघडकीला आली तेव्हा खरं तर रामदेवबाबाला अटक करण्याला पुरेसे ठोस कारण होते. पण तेव्हा त्याला सोडून दिलं. परंतु त्याच्या उपोषणाचा आपल्याला त्रास होईल असे लक्षात आले तेव्हा त्याच्या अटकेचे नाटक केले.

प्रतिक :  त्यातून सरकारला असे तर सांगायचे नाही ना! की तुम्ही फसवणूक करा, लोकांना लुबाडा आम्ही   काही करणार नाही. पण त्यांच्या हक्काचं काही मागू नका.

गौतम :  या संदर्भात प्रसार माध्यमांची भूमिका मला संशयास्पद वाटते. अण्णा हजारे, रामदेवबाबा यांच्या उपोषणाला किंमत आहे हे मान्य. परंतु त्याचा परिणाम अमूर्त आहे. त्यातून काहीच ठोस घडणार नाही. परंतु ह्या सगळ्या प्रकाराला प्रसारमाध्यमे पूर्णपणे उचलून धरत आहेत. याच्या उलट ‘जैतापूर’ मध्ये खर्‍या अर्थाने जनआंदोलन चालू आहे. एकाचा पोलिसांच्या गोळीबारात बळी पण गेला परंतु ते आंदोलन प्रसार माध्यमांनी उचलून धरलं नाही. प्रसारमाध्यमे नि:पक्षपाती नाहीत. एवढाच त्याचा अर्थ होतो.

ज्योती : खरं तर प्रसारमाध्यमांनी बहुजनांच्या बाजूने पक्षपातीच असायला हवं.

शरयू : शिवशक्ती-भिमशक्ती प्रयोगाबद्दल तुला काय वाटतं गौतम!

गौतम : फक्त मला काय वाटतं एवढंच महत्वाचं आहे का? तुम्हाला काय वाटतं हे पण सांगा ना.

प्रतिक : स्पष्टपणे सांगायचं तर ही युती अनैसर्गिक आहे.

आशिष :  माझं पण असंच मत आहे.

गौतम :  कशाच्या आधारावर तुम्ही हे मत बनवलं आहे.

ज्योती :  माझे पण मत जवळजवळ प्रतिक आणि आशिष सारखंच आहे कारण शिवसेनेचा इतिहास वाचला तर दलितांबद्दल त्यांनी सातत्याने आकस दाखवला आहे. त्यामुळे नेते गेले तरी जनता मागे जाणार नाही.

गौतम :  मी स्वत: या युतीच्या विरोधात आहे; परंतु मला अजूनही शंका वाटते की, आपण करतो तो अंदाज खरा आहे का? खरोखरच काय घडेल याचा अंदाज निवडणुकीनंतरच येईल. परंतु एखादा नेता असा निर्णय घेतो तेव्हा त्याने या सर्व गोष्टीचा विचार केला असेलच ना!

प्रतिक :  गौतम, तू अशा पद्धतीने विचार करशील अशी अपेक्षा नव्हती.

गौतम :  मी एका विशिष्ट पद्धतीने बोलेन अशी अपेक्षा असल्याने, मला नेमकं काय म्हणायचं हेच तुला कळलं नाही. मी कुठल्याही अर्थाने त्या घटनेचं समर्थन केलेले नाही. माझं फक्त इतकं म्हणणं की, दलित समाज अमुक पद्धतीने वागणारच नाही असं गृहीत धरणं चुकीचं ठरेल. नेहमी दलित समाजाबद्दल बोलताना त्यांच्या अस्मितेचे प्रश्नच चर्चेसाठी घेतले जातात. पण समाज म्हणजे एकसंध असतोच असे नाही. तो अस्मितेच्या पातळीवर एकत्र येतो पण प्रत्यक्षात त्यांचे काही वेगवेगळे प्रश्न असू शकतात. मला वाटतं हा विषय इथेच थांबवूया.

शरयू :  गौतमंच म्हणणं मान्य करूया. कारण त्याच्या म्हणण्यात खरोखर तथ्य आहे. आणि विषयही तसा आपल्या आवाक्याबाहेरचा आहे.

आशिष : गौतमच्या बोलण्याचाच एक भाग म्हणून मला माझा अनुभव सांगावासा वाटतो. सुट्टीत गावावरून येताना एस.टी.त एक माणूस मला भेटला. साधारण चाळीशीमधला असेल. कंत्राटी पद्धतीने तो रूग्णांची घरी देखभाल करायचं काम  करतो. परंतु आपण हे काम करतो हे त्याने स्वत:च्या बायकोला देखील सांगितलेलं नाही. त्याच्या आगरी समाजात जर त्याचं हे काम कळलं तर छी-थू होईल याची भीती वाटते. एका क्षणाला त्याच्या समाजाबद्दल अधिक माहिती मिळवावी असं वाटत होतं. पण तसं न करता त्याच्या घराबद्दल विचारलं तेव्हा लक्षात आलं की, त्याची बरीचशी मिळकत मुलाच्या आजारपणावरच खर्च होत होती.

ज्योती : मला तर वाटतं गरिबीचे दारू आणि आजारपण हे प्रमुख शत्रू आहेत.

आशिष : त्याचे शत्रू कोण याची चर्चा नंतर करू पण आश्चर्य याचं वाटतं की, पाणी उकळून पीत जा. एवढाही सल्ला डॉक्टरांनी दिला नाही. अगदीच तेवढं नाही जमलं तर क्लोरीनची बाटली अत्यंत स्वस्तात औषधाच्या दुकानात मिळते हे पण त्याला माहीत नव्हतं. कुठेतरी असं वाचलं की, मोठे प्रश्न सोडवताना आपण छोटे-छोटे प्रश्न विसरून तर चाललो नाही ना?

शरयू : यावर उपाय एकच. ते म्हणजे आपण सतत इतर लोकांमध्ये मिसळत राहायला पाहिजे.

समीर : त्यासाठी इथून बाहेर तर पडायला पाहिजे.

ज्योती : फक्त लोकांमध्ये मिसळून चालणार नाही तर आपले पूर्वग्रह सोडून त्यांच्यात मिसळायला हवे. पण आपल्या मतांशी ठाम राहूनच…

संजय सावरकर