प्रतीकला त्याच्या आईनं आज सकाळी सहा वाजताच उठवलं. एरवी आईनं तीनतीन वेळा हाका मारल्या की मग कुठं तो अंथरुणातून बाहेर पडायचा. पण आज मात्र आईनं एक हाक मारताच तो टुणकन उठून बसला. आज त्याच्या वर्गाची रायगडला सहल होती ना! आठ वाजता सगळ्यांना शाळेच्या मैदानावर जमायचं होतं. “सगळ्यांनी वेळेवर आपापले जेवणाचे डबे घेऊन हजर व्हायचंय. पाच मिनिटं सुद्धा उशीर चालणार नाही. बरोबर सव्वाआठला बस निघेल”, टीचरनी काल दम भरला होता. प्रतीक आणि त्याच्या मित्रांनी पावणेआठलाच शाळेपाशी जमायचं ठरवलं होतं.

गेले पंधरा दिवस तो या दिवसाची आतुरतेनं वाट बघत होता. रायगडावर जायचंय. शिवाजी महाराजांचा किल्ला. सहा जून सोळाशे चौर्याहत्तर रोजी इथंच राजांना राज्याभिषेक झाला होता. तो सगळा इतिहास त्यानं त्याच्या पुस्तकातून आधीच वाचला होता. ‘गुगल मॅप्स’वरुन रायगड किल्ल्याचा नकाशाही पाहून ठेवला होता. महाराजांचा पुतळा, गंगासागर तलाव, नगारखाना, राणीवसा, जगदीश्वराचं मंदिर, दारूगोळ्याचं कोठार, टकमक टोक, राजांची समाधी, कायकाय पाहायचं त्याची मनातल्या मनात उजळणी करत त्यानं पटकन दात घासले आणि दूध प्यायला तो डायनिंग टेबलाजवळ आला.
आईनं दूध तयारच ठेवलं होतं. त्यावर साय धरली होती. दुधावरची साय त्याला अजिबात आवडायची नाही. एरवी त्यानं दूध गाळून दे असा हट्ट केला असता. पण आज मात्र चमच्यानं वरच्यावर साय काढून टाकून त्यानं मुकाट्यानं ग्लास तोंडाला लावला. दूध पितापिता त्याचं लक्ष टेबलवरच्या वर्तमानपत्राकडे गेलं. आज इतक्या लवकर पेपर कसा आला असा विचार करत त्यानं त्याच्याकडे एक नजर टाकली. पहिल्या पानावरच्या बातम्यांत त्याला कधीच रस वाटत नसे. पेपर हातात आल्यावर तो आधी शेवटच्या पानावरच्या खेळांच्या बातम्या पाही. आजही त्यानं तेच केलं. पण काल कुठलीच मॅच नव्हती. ना क्रिकेटची, ना टेनिसची. मग त्यानं नाटकांच्या आणि सिनेमाच्या जाहिराती पाहायला सुरुवात केली. त्या पाहतापाहता त्याचं लक्ष कोपर्यातल्या राशिभविष्याकडे गेलं. त्याची रास सिंह. त्याचा त्याला फार अभिमान होता. त्याच्या दोन्ही जिवलग मित्रांची, रोहितची आणि सिद्धार्थची रास वृषभ. “बैल आहात तुम्ही दोघं”, तो त्यांना नेहमी चिडवायचा. “मी सिंह आहे, सिंहासारखा शूर. मोठा झालो की माझ्या मामासारखा पायलट होणार आहे. तुम्ही बसा, गोठ्यामध्ये गवत खात. नाहीतर नांगर ओढत!”
त्यानं आजच्या राशिभविष्यावरून एक नजर फिरवली.
“प्रवास टाळावा”, सिंह राशीचं भविष्य दोन शब्दात दिलं होतं.
तो दचकला. आपली काही चूक तर होत नाहीये ना ते बघायला त्यानं घाईघाईनं राशीचं नाव आणि भविष्य पुन्हा एकदा वाचलं. “प्रवास टाळावा”. त्यानं वाचलं ते बरोबर होतं. बापरे! आज तर मी ट्रिपला जाणार. म्हणजे प्रवास करणार. आणि तोच टाळावा असं आपल्या भविष्यात लिहिलंय. अरे देवा, आता काय करू? प्रतीकचं डोकं भंजाळून गेलं.
‘प्रवास टाळावा’ असं भविष्यात का बरं लिहिलं असेल? काय होणार असेल? आपल्या बसला अपघात तर होणार नसेल? हो, तसंच असणार. कारण आज आपण प्रवास फक्त बसनंच करणार होतो. दुसरं काही होणार असतं तर ‘प्रवास टाळावा’ असं लिहिलं नसतं. म्हणजे बसला नक्कीच अपघात होणार. बापरे! तो सटपटून गेला. काय करावं बरं? समजा, आपण नाही गेलो सहलीला, तर? तर मग आपल्यालाही काही होणार नाही आणि बसला अपघातही होणार नाही. बस्स, आपण असंच करूया.
सहलीला जायचं नाही या कल्पनेनं प्रतीकच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात आई आली. म्हणाली, “चल, आटप लवकर. दूध पिऊन झालं ना? साडेसहा वाजलेत. भराभरा तयारी करायला हवी.”
मग तिचं लक्ष त्याच्या हिरमुसलेल्या चेहर्याकडे गेलं, “अरे, काय झालं? असा का बसलायस, अं?”
“आई, माझं पोट दुखतंय गं”, तो म्हणाला.
“अरेच्या, हो का?”, ती पटकन त्याच्या जवळ आली आणि त्याच्या कपाळावर हात ठेऊन म्हणाली, “ताप आहे की काय? बघू? टॉयलेटला झालं व्यवस्थित?”
“लुज मोशन्स पण होतायत” त्यानं रडवेल्या चेहर्यानं सांगितलं.
“अरे, देवा!”, ती काळजीनं म्हणाली, “आता सहलीला कसा जाशील रे?”
“नाही जात”, तो रडत रडत म्हणाला.
“बिचारा”, आई त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. “नको वाईट वाटून घेऊ. दिवाळीच्या सुट्टीत आपण सगळे जाऊ. तुझ्या मित्रांनाही बरोबर घेऊन जाऊ”
“हं!” तो कसनुशा आवाजात म्हणाला. त्याच्या सगळ्या आनंदावर, उत्साहावर आता पाणी पडलं होतं.
“बरं, असुदे आता. विश्रांती घे जरा. तुला मी पाण्यात इलेक्ट्रॉल घालून आणून देते. ते पीत रहा मधून मधून. झोप पाहिजे तर थोडा. दुपारपर्यन्त पोट दुखणं कमी नाही झालं तर संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊया”, आई मायेनं त्याला जवळ घेऊन म्हणाली.

प्रतीक त्याच्या खोलीत जाऊन पडला. पण त्याला झोप येईना. रोहित आणि सिद्धार्थ तयार होत असतील. सव्वासात वाजता निघताना आपल्याला हाक मारतील. त्यांना पाहून आपल्याला रडू येईल. म्हणून त्यानं त्यांच्या घरी फोन करून आपण येत नसल्याचं सांगितलं. त्याला वाटलं होतं आपण येत नाही म्हटलं की ते तेही जायचं रद्द करतील. निदान रोहित तरी ‘तू येत नसलास तर मीसुद्धा जात नाही’, असं म्हणेल. पण तो आपल्याच नादात होता. ‘बरं. ठीक आहे’, असं म्हणून त्यानं फोन ठेऊन दिला. वैताग आहे नुसता! प्रतीक हिरमुसला.
सव्वा आठ वाजले. आता बस सुटत असेल. मुलं मोठ्यामोठ्यांनी ओरडत असतील. शाळेच्या नावच्या घोषणा देत असतील. पोचवायला आलेल्या आई-बाबांना हात करत असतील. आता बस रस्त्याला लागली असेल. आता सगळेजण गाणी म्हणत असतील. सिद्धार्थ त्याचा माऊथ ऑर्गन घेऊन येणार होता. चांगला वाजवतो. पण जाम भाव खातो. आपण गेलो असतो तर मग सगळ्यांनी आपल्याला नकला करायला लावल्या असत्या. परेश रावळच्या, नाना पाटेकरच्या, मकरंद अनासपूरेच्या आवाजात तो त्यांच्या पिक्चर्सचे डायलॉग्स म्हणत असे तेव्हा मित्रांची हसता हसता मुरकुंडी वळे. “आता आदेश बांदेकरची नक्कल कर”, “आता भाऊ कदम”, पोरं त्याला फर्माईश करत. तोही त्यांच्या हुबेहूब नकला करून सगळ्यांना खुश करून टाके. पण आज…
दहा वाजले. बस आता रायगडच्या पायथ्याला पोचली असेल. सगळेजण बसमधून उतरून रांगेनं गडाकडे निघाले असतील. साडेदहा वाजले. आता सगळेजण रोप-वेमधून वर जात असतील. तो याआधी कधी रोप-वेमध्ये बसला नव्हता. किती गम्मत असेल! विमानात बसल्यासारखं वाटत असेल. किती दिवस प्रतीक रोप-वेनं जायचं स्वप्न बघत असे. अगदी काल रात्रीसुद्धा त्याला हेच स्वप्न पडलं होतं. त्याचे डोळे त्याच्या नकळत पाण्यानं भरून आले.
वेळ जाता जात नव्हता. भूक पण लागली होती. आज सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा झाला नव्हता. इलेक्ट्रॉल घातलेलं पाणी, ग्लुकोजची बिस्किटं आणि एक मोसंब खाऊन काय भूक भागते?
“आई”, त्यानं हाक मारली. “जाम भूक लागलीय”
“हो, राजा”, आई खोलीच्या दाराशी येत म्हणाली, “देते हं जेवायला. तुझ्यासाठी मऊ भात केलाय. गरम गरम भात, मेतकूट आणि तूप. लिंबाचं लोणचं पण देते. चव येईल तोंडाला”
“मेतकूट भात? नको मला मेतकूट भात. मला नाही आवडत. मला डब्यात देण्यासाठी पुरीभाजी केली होतीस ना? तीच दे”
“पुरीभाजी? वेडा आहेस का? तुझं पोट बिघडलंय आणि पोट बिघडलं असताना पुरीभाजी खातं का कुणी?”
“पण आई, थांबलं माझं पोट दुखायचं. आणि सकाळपासनं जावंही नाही लागलं”
“तरीपण आज फक्त मऊ भात खायचा”, आईनं दटावलं.
प्रतिकनं मुकाट्यानं मेतकूटभात खाल्ला. आता सगळेजण रायगडावर अंगतपंगत करून बसले असतील. एकमेकाच्या डब्यातलं शेअर करत असतील. सिद्धार्थची आई झुणका मस्त बनवते. आज आपल्यासाठी तो झुणका घेऊन येणार होता. आणि रोहित वांग्याचं भरीत. काय धमाल चालली असेल आत्ता तिथं. आणि आपण बसलोय इथं मेतकूटभात खात! श्शी!
जेवल्यावर प्रतीकनं अभ्यासाचं पुस्तक वाचायला घेतलं. पण त्याचं मन लागत नव्हतं. मग तो टीव्हीवर विडिओ गेम खेळत बसला. त्यातही त्याचं मन रमेना. काय करावं? कुणा मित्राकडे जावं तर सगळेजण सहलीला गेलेले. श्शी. वैताग नुसता! मग त्यानं मनात आणलं, नाही तर नाही, सहलीला जायला नाही मिळालं तर नाही. पण गेलो असतो आणि आपल्या भविष्यात लिहिलं होतं तसं झालं असतं तर? बसला अपघात झालं असता तर? त्यापेक्षा घरी बसलो ते काही वाईट नाही. उलट आपण न जाऊन बाकीच्या सगळ्यांना अपघातातून वाचवलं नाही का? त्यानं स्वतःचीच समजूत काढली.
चार वाजता आई येऊन पुन्हा एकदा बरं आहे ना ते विचारून गेली. पोट दुखायचं आता पूर्ण थांबलंय, डॉक्टरांकडे जायची अजिबात गरज नाही, असं पुन्हापुन्हा सांगितल्यावर कुठं तिची समजूत पटली.
संध्याकाळ झाली तसा तो आणखीनच कंटाळून गेला. रोहितच्या घरी त्यानं दोनतीनदा फोन केला. तो सहलीवरून परत आला का ते विचारायला. त्याला रोहितच्या तोंडून सहलीच्या गमती ऐकायच्या होत्या. शेवटी एकदाचा साडेसात वाजता तो आला. पण फोनवर बोलायची त्याची अजिबात तयारी नव्हती. “मी खूप दमलोय. आपण उद्या बोलू”, असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला.
प्रतीक आता अगदी रडकुंडीला आला. काय करावे तेच त्याला सुचेना. त्याचा दिवस तर कंटाळवाणा गेलाच होता आता रात्रही तशीच जाणार होती. वैताग नुसता! एकदम त्याच्या मनात आलं, रात्री आईबाबांबरोबर सिनेमाला जावं. तो पटकन स्वैपाकघरात जाऊन आईला म्हणाला, “आई, रात्री आपण सिनेमाला जाऊया?”
आईनं आश्चर्यनं त्याच्याकडे पहिलं. “अरे, तुला बरं नव्हतं ना दिवसभर? पोट दुखतं म्हणून सहलीला गेला नाहीस. आणि आता सिनेमाला?
“आई, पण आता बरं आहे ना! आणि दिवसभरात अजिबात पोट दुखलं नाही. आता एकदम ठीक आहे मी. पण खूप कंटाळा आलाय गं. जाऊयाना गं! प्लीज?”
आई हसली. तिच्या मनात आलं, अगदी कंटाळून गेलंय पोर, घरी बसून बसून. होऊ दे त्याच्या मनासारखं. “ठीक आहे. जाऊया. कुठला सिनेमा बघायचा? आपण ठरवून ठेऊ. बाबा आले की त्यांना विचारू. त्यांची तयारी असली तर जाऊ सगळेच जण. चालेल?”
“हो, चालेल!”, तो आनंदानं म्हणाला. पळत पळत जाऊन त्यानं वर्तमानपत्र आणलं. “मेरी कोमला जाऊया? आपल्या जवळच लागलाय. स्टारसिटीला”, त्यानं विचारलं.
“मेरी कोम? अरे तो कसा असेल अजून? इतके दिवस थोडाच राहतो? तो तर कधीच गेला”, आई म्हणाली.
“नाही. आहे ना. स्टारसिटीला आहे. ही बघ ना जाहिरात”
“कुठला पेपर पाहतोयस तू? बघू?”, त्याच्या जवळ येत ती म्हणाली. “अरे, हा तर गेल्या महिन्यातला पेपर आहे. कुठं सापडला तुला?”
प्रतीक दचकला. त्याच्या लक्षात आलं, हाच पेपर पाहिला असणार आपण सकाळी. त्यानं तारीख बघितली. ती गेल्या महिन्यातली होती.
“आई, पण – हा तर – सकाळी टेबलावर होता”, तो पुटपुटला.
“अरे तो मी सकाळी कणीक चाळायला काढला होता. रद्दीतून. तो तू घेऊन गेला होतास की काय? तरी मी म्हणत होते, कुठं गायब झाला तो अचानक?”
प्रतीकनं घाईघाईनं राशिभविष्याचं पान काढलं. हो. तोच पेपर होता. त्यानं सकाळी बघितलेला. सिंह राशीचं भविष्य ‘प्रवास टाळा’ असं लिहिलं होतं तोच पेपर. म्हणजे? म्हणजे? म्हणजे हे भविष्य आजचं नव्हतंच? गेल्या महिन्यातलं होतं? आपण उगीचच प्रवास टाळण्यासाठी सहलीला गेलो नाही? निष्कारण दिवसभर कंटाळत घरी बसून राहिलो? प्रतीकला हुंदका फुटला.
“अरे, काय झालं राजा? रडतोयस का?”, आई त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत प्रेमानं म्हणाली.
“आई, मी – मी – आई, मी खोटं बोललो तुझाशी सकाळी”, तो रडत रडत म्हणाला. “माझं पोट दुखतच नव्हतं. मी खोटं सांगितलं तुला”
“पोट दुखत नव्हतं? अरे – मग तसं का सांगितलंस?”
“सहलीला जावं लागू नये म्हणून”,
“सहलीला जायचं नव्हतं तुला?”, तिनं आश्चर्यानं विचारलं. “अरे, तू तर किती आनंदात होतास सहलीला जायचं म्हणून. किती वाट बघत होतास सहलीची. मग आज असं काय झालं अचानक?”
“आई, अगं आज सकाळी मी पेपरात माझं राशिभविष्य वाचलं. त्यात लिहिलं होतं की ‘प्रवास टाळा’ म्हणून. म्हणून मी सहलीला जायचं नाही असं ठरवलं. म्हणून तुला खोटंच सांगितलं, पोट बिघडलंय म्हणून”
“काय सांगतोस? धन्य आहे तुझी!”
“हो, आई. मला वाटलं की आमच्या शाळेच्या बसला आज अपघात होईल, म्हणून… म्हणून…”, दुःखानं त्याच्या तोंडून शब्द फुटेना.
आईनं त्याला जवळ घेतलं. काही न बोलता ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. हळूहळू तो शांत झाला. मग ती त्याला म्हणाली, “वर्तमानपत्रात हे राशिभविष्य दिलेलं असतं ना, त्यात काही अर्थ नसतो. ते चुकीचं असतं. त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. आता कळलं ना तुला?”
“हो आई”, तो रडू आवरून म्हणाला, “पण ते चुकलेलं भविष्य गेल्या महिन्यातलं होतं. म्हणजे चूक मीच केली होती. मी नीट बघितलं नाही. मी तारीख पाहायला हवी होती”
“अरे मग आजचं तुझ्या राशीचं भविष्य काय आहे ते बघूया”, आजचं वर्तमानपत्र त्याच्यापुढे करत ती म्हणाली, “तूच बघ वाचून”
प्रतीकनं पेपर हातात घेऊन त्याच्या राशीचं आजचं भविष्य पहिलं. त्यात सिंह राशीचं भविष्य दिलं होतं, ‘तुमचा दिवस आनंदात जाईल’

त्याला एकदम हसूच आलं. आजचा दिवस आपल्याला इतका वाईट गेला होता की विचारायची सोय नाही. आणि हे ज्योतिषी महाराज म्हणताहेत की ‘दिवस आनंदात जाईल!’. मग त्यानं वृषभ राशीचं भविष्य पहिलं. ते होतं, ‘मनस्ताप होईल’. या राशीचे रोहितची आणि सिद्धार्थ दिवसभर धमाल करून आलेत आणि हे महाराज म्हणताहेत की त्यांना आज मनस्ताप होईल म्हणून! त्याला आणखीनच हसू आलं. त्याला हसताना पाहून आईलाही बरं वाटलं. “पटलं ना आता? हे भविष्य वगैरे सगळं बंडल असतं ते? हो ना?”
“हो आई, पटलं”, त्यानं मान डोलावली. “पण आई, सगळ्यांचंच दिलेलं भविष्य चुकीचं असतं?”
“हो, ना. सगळ्यांचंच चुकीचं असतं. आता तूच बघ ना, सहलीला जाणार्या तुमच्या बसला अपघात होणार असेल तर बसमधल्या सगळ्या मुलांचं भविष्य सारखं असायला हवं, नाही का? कारण बसमध्ये तर सगळ्या राशींची मुलं असणार. काही मीन राशीची, काही सिंह राशीची, काही मकर राशीची. हो ना? पण असं कधी तू पहिलंयस की सगळ्याच्या सगळ्या राशींचे भविष्य ‘प्रवास टाळा’ असंच आहे?”
“हो, आई, खरं आहे तुझं. पटलं मला”, त्यानं मान डोलावली. “आणि आई, तुला सांगू? रोहितची आणि सिद्धार्थ, दोघांचीही रास वृषभ आहे. पण गेल्या आठवड्यात युनिट टेस्टमध्ये रोहित वर्गात पहिला आला आणि सिद्धार्थ तर नापास झाला. मग त्या दोघंच भविष्य सारखंच कसं असेल? पण या आधी माझ्या कधी ते लक्षात आलं नव्हतं.”
“अगदी बरोबर. अरे हे ज्योतिषी सांगतात की ग्रहांचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो म्हणून. पण तू शाळेत शिकला आहेस ना, हे ग्रह आपल्यापासून किती दूर आहेत ते. आणि जर समजा, हे जर खरं असलं, तर सगळ्यात जवळच्या ग्रहाचा परिणाम आपल्यावर सगळ्यात जास्त व्हायला हवा. हो की नाही? आपल्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता सांग बरं?”
“शुक्र”, त्यानं सांगितलं. पण आईनं मान हलवली.
“मग कोणता? मंगळ?”, प्रतीकनं विचारलं.
“नाही. आपल्याला सगळ्यात जवळचा ग्रह शुक्रही नाही आणि मंगळही नाही. आपल्याला सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजे पृथ्वी!”
“हो की गं, आई. अगदी खरं. आपल्याला सगळ्यात जवळचा ग्रह पृथ्वी”
“जर ग्रहांचा आपल्या भविष्यावर परिणाम होत असेल तर आपल्यावर सगळ्यात जास्त परिणाम पृथ्वीचा व्हायला हवा, नाही का? पण भविष्य सांगताना पृथ्वी हा ग्रह विचारातच घेतला जात नाही”
प्रतीक विचारात पडला. “पण मग आई, कधीकधी भविष्य बरोबर आलं असं आपल्याला कुणीतरी सांगतं. ते कसं काय?”
“अरे हे ज्योतिषी बहुतेक वेळा भविष्य अशा गुळमुळीत भाषेत सांगतात की त्यात खरं खोटं करणं अशक्य व्हावं. जेव्हा जेव्हा स्पष्ट भाषेत भविष्य सांगण्यात आलं आहे तेव्हा तेव्हा ते चुकीचं ठरलंय”
“हो आई?”
“अरे तुला एक गम्मत सांगते. या वर्र्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्या ना, त्याच्या थोडं आधी महाराष्ट्रातल्या तीस ज्योतिषांनी काही भाकीतं केली होती. चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून! ती मात्र गुळमुळीत नव्हती. खरं खोटं करता येईल अशी होती. बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या अध्यक्षांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ही भाकीतं सांगितली होती. सगळ्या वर्तमानपत्रांनी तेव्हा त्यांना खूप प्रसिद्धी दिली होती. पुढे निवडणुकांचे निकाल आले. तेव्हा दिसलं की त्यातली दहातली नऊ चुकीची ठरली आहेत. सपशेल खोटी. तेव्हा मात्र एकाही वर्तमानपत्रांनं ती चुकीची ठरली हे छापलं नाही!”
‘खरं?’, प्रतीकनं विचारलं.
‘अगदी खरं.’, आई म्हणाली. “मी ती बातमी कापूनच ठेवली आहे. तू स्वतःच बघ”
‘म्हणजे मी आज उगीचच्या उगीच सहल बुडवली?‘, प्रतीकचे डोळे भरून आले.
‘अरे, उगीचच्या उगीच कसं? त्याच्यामुळेच तर तुला आज या राशिभविष्याचा फोलपणा कळला. नाही का? आणि रायगडचं म्हणशील तर आपण दिवाळीच्या सुट्टीत जाणारच आहोत की रायगडला. हो ना?‘
‘हो‘, प्रतीकनं मान डोलावली. ‘आता यापुढे मी कधीही राशिभविष्य वाचणार नाही‘
‘शाब्बास! आणि हे बघ, गम्मत म्हणून कधीतरी राशिभविष्य वाचायला हरकत नाही. पण फक्त आपल्या करमणुकीसाठी!‘, आई हसत हसत म्हणाली, ‘त्याच्यावर विश्वास ठेवला नाही की झालं!‘
प्रतीक खळखळून हसला.
-सुबोध जावडेकर
संपर्क: मोबा. 9870369372