Categories
पर्दाफाश

 साई अवतार डांगे बाबाचा पर्दाफाश

जानेवारी - २०१२

मी साईबाबाचा अवतार आहे. साईबाबाने मला तसा दृष्टांत दिला आहे. मी आंधळ्यांना दृष्टी देतो, मुक्याला वाचा देतो, कोणताही असाध्यरोग मी बरा करतो. असा दावा करणार्‍या, शिर्डी विमानतळ (नियोजित) जवळील काकडी येथील रमेश सखाहरी डांगे या भोंदूबाबाबद्दल माहिती मिळालेवर मी व नाशिक शाखेचे चांदगुडे व संगमनेरचे रावसाहेब पराड काकडी येथे जाऊन तेथील पहाणी करून आलो.

डांगे बाबाने आश्रमाचे परिसरात त्याचे 30-40 प्रचारक पेरले होते. ते आल्या-गेल्या व्यक्तीवर बारीक नजर ठेवत. आलेल्या लोकांना, बाबा साईबाबांचा अवतार आहेत ते कोणताही असाध्य रोग बरा करतात असे सांगून बाबाचे विविध चमत्कार सांगत. अन्न संपले, बाबांचे कृपेने आपोआप पातेलेभर शिरा तयार!’ मूल विहिरीत पडले, परंतु बाबांचे ताईतामुळे पाण्यावर तरंगले, बाबांचे उदीमुळे कॅन्सर बरा झाला, असे अनेक तथाकथित चमत्कार सांगून ते बाबाचा प्रचार व प्रसार करीत. बाबा काहीही घेत नाहीत. उलट ते तुम्हाला नारळ, उदी, लिंबू, दोरा देतात. ते आपली एवढी सेवा करतात तेव्हा तुम्ही पेटीत जास्तीत जास्त पैसे टाका, हीच बाबांची सेवा आहे, त्यातून आपल्याला पुण्य मिळेल. आलेल्या भाविकांना जेवण द्या, तुम्ही आमच्याकडे फक्त पैसे द्या. आम्ही पंगतीची व्यवस्था करू. अशाप्रकारे अप्रत्यक्षरित्या पैशांची मागणी करीत.

दि. 9-11-11 रोजी जि. अ.नगर, ता. संगमनेर पैकी हिवरगाव पावसा येथील कल्पना कर्डक या महिलेस घेऊन तिचे नातेवाईक संगमनेर शाखेत आले. त्यांनी कल्पना हीस बाबाने केलेली अमानुष मारहाण व घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला व तसा लेखी अर्ज समितीकडे दिला. कल्पना कर्डक हिला दि. 7-11-11 रोजी तिचे पती बाबाकडे उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचाराच्या नावाखाली बाबाने सदर दलित महिलेस वेताच्या काठीने अतिशय अमानुष मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या, तिच्या तोंडात राख कोंबली व जिवे मारणेची धमकी दिली.

दि. 10-11-11 रोजी संगमनेर शाखेचे शामराव गुंजाळ, रावासाहेब पराड, सुखदेव इस्टे, बाळासाहेब पिंगळे, हरीभाऊ उगळे व मी स्वत: तसेच नेवाश्याहून मच्छिंद्र वाघ, लोणीचे फ्रान्सीस पाळंदे, संतोष ब्राह्मणे व नाशिक शाखेचे कृष्णा चांदुगडे असे आम्ही सर्व कार्यकर्ते, कल्पना कर्डक, तिचे नातेवाईकांसह रहाता पोलिस स्टेशनात गेलो. पोलिस स्टेशनला बाबाची भांडाफोड करणेसाठी मदत मिळणेबाबत अर्ज दिला. त्याप्रमाणे संबंधित पोलिस स्टेशनमधून साध्या वेशातील तीन पोलीस कॉन्स्टेबल आमचेसोबत दुपारी 3-30 वाजता बाबाच्या दरबारात गेलो.

बाबाकडे खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात त्या दिवशीही आठशे ते नऊशे लोक तिथे उपस्थित होते. नोंदणीनुसार बाबा नंबरप्रमाणे उपचार करीत असे. परंतु आम्ही पूर्वी जाऊन आलेलो असल्यामुळे एखाद्याच्या अचानक अंगात आले तर बाबा मधेच उपचार करतो हे लक्षात आले होते त्यामुळे बाबांचे खोलीत साईबाबांचे दर्शन घ्यायचे असे निमित्त करून मच्छिंद्र वाघ व मी असा दोघांनी प्रवेश केला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता आप-आपल्या जागी उभा होता. प्रवेश केल्यानंतर ठरल्यानुसार वाघांनी अंगात आल्याचे नाटक केले. तेव्हा बाबाने त्यांना दोन काठ्या मारल्या परंतु पाहिजे तसा परिणाम साधला गेला नाही म्हणून मी स्वत: अंगात येण्याचे नाटक केले व जोर-जोरात घुमायला सुरवात केल्यावर बाबा आम्हाला पाहिजे तसा रिअ‍ॅक्ट झाला व त्याने मला काठीने मारण्यास सुरुवात केली तेव्हा मग आम्ही दिलेले सुचनेप्रमाणे पोलिसांनी हस्तक्षेप केला व बाबाला पोलिस स्टेशनला आमचेबरोबर चल असे सांगितले. बाबाने पोलिस स्टेशनला येण्यास नकार दिला. परंतु मी संबंधित पोलिस स्टेशनचे पी. आय. ला फोन केला. पी. आय. ने फोनवरूनच बाबाला समज दिलेने तो पोलिस स्टेशनला येणेस तयार झाला. परंतु आलेल्या भक्तगणांत कोल्हे नावाचे एक नायब तहसिलदार होता. त्याने बाबाला पुन्हा त्याचे खोलीत घेतले. त्यांचेसोबत बाबाचे साथीदारही होते. खोलीत गेल्यावर त्याने काही पुढार्‍यांना व अन्य लोकांना फोन केले व त्यानंतर ते खोलीच्या बाहेर आले. ते सर्व बाहेर आल्यावर जमाव आक्रमक बनला. नायब तहसिलदाराने सूचना दिलेप्रमाणे जमावाने मला घेरले. त्यात स्त्रिया पुढे होत्या. जमाव हाणामाराची भाषा वापरत होता. वातावरण अतिशय तापले होते. परिस्थिती लक्षात घेऊन मी जमावाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. ‘आम्ही तुमच्या भावनेचा आदर करतो परंतु आम्ही येथे का आलो हे समजावून घ्या व नंतर काय करायचे ते करा’ असे म्हणून जमावाशी बोलत राहिले व बोलता बोलता बोलण्याकडे जमावाचे लक्ष खिळवून फोन आल्याचे निमित्त साधून तेथून बाहेर पडले. त्यानंतर पोलिस इन्स्पेक्टर वरादे (रहाता पोलिस स्टेशन) तेथे आले व त्यांनी जमावावर काबू मिळवून बाबाला ताब्यात घेतले. तोपर्यंत तेथे काही राजकीय पुढारी व पत्रकारही जमा झाले होते. पोलिस स्टेशनला आल्यावर पोलिस स्टेशनमध्येही बाबाचे समर्थक, पत्रकार, राजकीय पुढारी जमा झाले होते. त्या सर्वांचे समक्ष बाबाने माफी मागितली व अशा प्रकारे लोकांवर उपचार करणार नाही, लोकांची दिशाभूल करणार नाही, कोणालाही ऊदी, गंडा, दोरा देणार नाही, दैवी शक्तीचा दावा करणार नाही असे लेखी लिहून दिले तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. त्यानंतर कल्पना कर्डक हिची केस नोंदवून आम्ही पोलिस स्टेशनमधून निघालो. दुसर्‍या दिवशी पोलिस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी ही संपूर्ण घटना समजलेवर आम्हाला भेटीसाठी बोलवले. मी कल्पना कर्डक हिला घेऊन एस. पी. साहेबांचे भेटीसाठी गेलो. तिथे कल्पना कर्डक हिला झालेली मारहाण व तिचेवर झालेला अत्याचार याबाबीमुळे एस. पी. साहेबही हेलावले. एस. पी. साहेबांना इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकारांनी पाठविलेले क्लिपींग पाठविले होते. ते पाहून एस. पी. साहेबांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. एस. पी. साहेबांशी चर्चा झालेनंतर दि. 14-11-11 रोजी कल्पना कर्डक हिला घेऊन मी रहाता पोलिस स्टेशनात आले. सोबत रामराव गुंजाळ व कृष्णा चांदुगडे हेही होते. रहाता पोलिस स्टेशनमध्ये भोंदू रमेश डांगे व त्याचे साथीदारांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यानचे काळात म्हणजेच दि. 10-11-11 रोजी रमेश डांगे याने लेखी आश्वासन देऊनही, रात्री आश्रमावर जाताच त्यांचे समर्थकांनी व साथीदारांनी फटाके फोडून बाबाचे स्वागत केले व बाबांने त्यांची दुकानदारी पुन्हा सुरु केली. काही कार्यकर्ते गुप्तपणे पाळत ठेऊन होते.

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेनंतर भोंदू रमेश डांगे, त्यांचे कुटुंबिय व साथीदार सुमारे 15 दिवस फरार होते. अटकपूर्व जामीन मिळविल्यानंतर ते हजर झाले. दरम्यानचे काळात आम्ही प्रांत अधिकारी संगमनेर यांचेकडे, चिथावणी देणार्‍या नायब तहसिलदार कोल्हे यांचे विरुद्ध कार्यवाही व्हावी म्हणून निवेदन दिले. त्यांच्या प्रती एस. पी. अहमदनगर व कलेक्टर अ.नगर यांनाही पाठविल्या तसेच भोंदू रमेश डांगे हा शिर्डी संस्थानमध्ये सुरक्षा विभागात नोकरीस आहे असे असतांनाही शिर्डी संस्थानने त्याचे विरुद्ध काहीही कार्यवाही केली नाही, आक्षेप घेतला नाही म्हणून कार्यवाही केली का? केली नसेलस का केली नाही? किंवा करणार का? अशी विचारणा करणारे पत्र शिर्डी संस्थानला दिले. आमचे पत्रावरून शिर्डी संस्थानने भोंदू डांगे विरुद्ध कार्यवाही सुरू केली आहे व ते त्याला नोकरीतून काढणार असलेचे समजते.

अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करून, लोकांवर उपचाराच्या नावाखाली त्यांचेवर अमानुष मारहाण, आर्थिक शोषण, गंडा-दोरा देणारे असे प्रकार भोंदू रमेश डांगे करीत होता. वास्तविक रमेश डांगे याला स्वत:ला मुलगा नसल्याने त्याने स्वत:च्या पत्नीचा 3 वेळा, मुलीचा गर्भ असलेने गर्भपात करवून घेतल्याची माहिती, त्याचे गावातील लोकांकडून समजली असे असतांनाही अनेक स्त्रिया बाबाकडे ‘मुलगा व्हावा’ म्हणून जात होत्या. बाबा स्वत: काही वर्षापूर्वी टी. बी. पेशंट होता. त्याने शिर्डी संस्थानचे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत.

होऊ घातलेले शिर्डी विमानतळाचे परिसरात बाबांचे प्रस्थ उभे करण्यात, त्या परिसरात जमिनी विकत घेणार्‍या अनेक राजकीय पुढारी व धनदांडग्यांचा हात आहे. त्यांना बाबाचे प्रस्थ वाढवून, गर्दी जमवून तेथे प्रति शिर्डी निर्माण करून स्वत:चे भले करून घेण्याचा डाव आहे व हे सर्व लोक मिळून अज्ञानी व गरीब, पिडलेल्या जनतेच्या असहाय्यतेचा फायदा उठवून, बाबाच्या माध्यमातून जनतेचे शोषण करीत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक बाबाकडे उपचार करवून घेण्यासाठी का जातात? यात लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्य्र कारणीभूत आहे व इथे शासन कुठेतरी अपुरे पडते असे वाटते. ही खर्‍या अर्थाने शासनाची हार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे झालीत परंतु अजुनही लोकांमध्ये अज्ञान, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. दर्जेदार मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध नसणे हेही भोंदू डांगे सारख्यांकडे गर्दी जमण्याचे कारण आहे.

भोंदू डांगे विरुद्धचा लढा अद्याप संपला नाही. तो सुरु राहील.

-अ‍ॅड. रंजना गवांदे