Categories
चळवळ

सांगली येथे म.अं.नि.स. च्या विस्तारीत राज्यकार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न

जुलै - २०११

            सांगली शहरात प्रथमच अं.नि.स.च्या विस्तारीत राज्यकार्यकारिणीचे आयोजन दि. 3 व 4 जून रोजी ‘अनंतगंगा भवन’ येथे करण्यात आले होते. या बैठकीसाठी 22 जिल्ह्यांतून 120 कार्यकर्ते उपस्थित होते. या दोन दिवसाच्या बैठकीचे उत्कृष्ट संयोजन सांगली जिल्हा अं.नि.स.ने केले हेते.

            दि.3 जून 2011 रोजी सकाळी 11 वाजता कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन अं.नि.वा.चे माजी संपादक व अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.प्रदीप पाटील यांनी रोपट्याला पाणी घालून केले. यावेळी अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्यसचिव सुशिला मुंडे व मिलिंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉ.प्रदीप पाटील म्हणाले,

            “समाजमानस विवेकी, विज्ञाननिष्ठ होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी वैचारिक प्रगल्भता वाढविली पाहिजे. सामाजिक चळवळीत घडलेल्या कार्यकर्त्यांना विवेकी आत्मभान येते, त्याचे जीवन आनंददायी बनते. समर्पित कार्यकर्त्यांची आपल्या देशाला गरज आहे.” यावेळी डॉ.पाटील म्हणाले, अं.नि.स.च्या कार्याचा विस्तार वाढत आहे, त्याचबरोबर कार्य करण्याच्या पद्धती आधुनिक व कालसुसंगत हवी. ज्या भावनेने कार्यकर्ते काम करतात त्याला मानसशास्त्रीय विचाराची गरज आहे. संघर्षाच्या पुढचा टप्पा गाठला पाहिजे.”

            अविनाश पाटील म्हणाले, “चिंतनशील कार्यकर्ते वाढविले पाहिजेत. क्षमता असणारे व वेळ देणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याला या पुढील काळात अं.नि.स. प्रयत्न करणार. अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबरोबरच समाजाला उपयुक्त असणारे कार्य केले पाहिजे.” यावेळी अ‍ॅड.के.डी.शिंदे, प्रा.प.रा.आर्डे, नामदेव करगणे आदींनी मनोगते व्यक्त केली. स्वागत अंकुश चव्हाण यांनी केले. प्रा.विजयकुमार जोखे यांनी आभार मानले.

            राज्याचे कार्यवाह मिलिंद देशमुख, सुशिला मुंडे यांनी संघटनात्मक सक्षमीकरण, संघटना बांधणी, संघटनात्मक शिस्त याबाबत मार्गदर्शन केले. अं.नि.स.च्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा अविनाश पाटील यांनी घेतला.

            दि. 4 जून रोजी दुसर्‍या दिवसाच्या बैठकीची सुरवात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाली. यावेळी बोलताना डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणाले की, “पावसाळी अधिवेशनात ‘नरबळी, अमानवी व अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम 2011’ हा कायदा व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहे. राज्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची चांगली अनुकूलता आहे. या कायद्याबद्दल अफवा पसरविणार्‍या व्यक्ती व संस्थांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.” राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री सदरचा कायदा व्हावा यासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहेत. 16 वर्षांपूर्वी युतीच्या काळात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करण्यात आला होता. पुरोगामी महाराष्ट्रात असा कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. कायदा व्हावा यासाठी लोकशाही मार्गांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. कायदा संघर्षाचा 16 वर्षांचा आढावा डॉ.दाभोलकर यांनी घेतला.

            पुस्तक प्रकाशने विभागाची सविस्तर चर्चा झाली. समितीच्या वतीने किमान तीन ते चार पुस्तकांची प्रकाशने झाली पाहिजे. प्रकाशन व्यवसायाची नवीन टीम उभा करून हा विभाग अधिक सक्षम करावा. पुस्तके काढताना नफा-तोट्याकडे पाहू नका. वैचारिक समृद्धीसाठी, विचाराच्या प्रसारासाठी, वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी पुस्तक निर्मिती व विक्री केली पाहिजे. छोट्या पुस्तिका इंग्रजीतून तयार कराव्यात. आदी सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. प्राचार्या डॉ.सविता शेटे, प्रा.मच्छिंद्र मुंडे, संजय बनसोडे, अ‍ॅड.गोविंद पाटील, प्रशांत पोतदार, किरण सगर, विनायक सावळे, वंदना शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

            दुपारच्या सत्रामध्ये सुशिला मुंडे आणि अविनाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीरे, प्रशिक्षणे याबाबत चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात वैज्ञानिक जाणिवा शिबीरे घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांची शिबीरे झाली पाहिजेत. आधुनिक तंत्रे वापरून अधिक प्रभावी शिबीरे व्हावीत यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. महसूल, पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांची शिबीरे पुढील तीन महिन्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा विकास करणारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारी शिबीरे झाली पाहिजेत. विवेकसाथींना संपर्क करून त्यांना प्रवाहात सामील करून घ्यावे. वारसा समाजसुधारकांचा शैक्षणिक सनदेच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा. फिरते नभांगण प्रशिक्षणाचे जिल्हावार नियोजन करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या कार्याध्यक्षांनी जिल्ह्याच्या कार्याचा आढावा घेतला. नरबळींच्या घटनांबाबत मुख्यमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात यावी. विदर्भात चमत्कार सत्यशोधन यात्रा नोव्हेंबरमध्ये आयोजित केली जाईल अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

            संध्याकाळी 7 वाजता ‘अध्यात्मिक बुवाबाजी’ या विषयावर डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे सांगलीकरांसाठी जाहीर व्याखानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धनेसाहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.आनंदा डावरे हे उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी वर्धनेसाहेब म्हणाले की, ‘सांगली जिल्ह्यातून अंधश्रद्धांना हद्दपार करण्यासाठी मी ‘मिशन परिवर्तन’ या नावाने अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांची बैठक घेऊन जिल्ह्यात सुरू असणार्‍या अंधश्रद्धांचा, बुवाबाबांचा सर्व्हे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. सांगली जिल्ह्यात मुलांना मंदिरावरून फेकण्याच्या प्रथा बंद केल्या आहेत. अं.नि.स. चळवळीचे काम हे पथदर्शक कार्य आहे. त्यामुळे चळवळीच्या सोबत जिल्हा प्रशासन नेहमीच राहील.

            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आनंदा डावरेसाहेब म्हणाले की, ‘मी आज डॉ.दाभोलकरांचे विचार ऐकण्यासाठी आलो आहे. चळवळीच्या कामाची माहिती मला प्रसारमाध्यमातून मिळतच असते. अं.नि.स.चा कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आयोजित करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.’

            यानंतर ‘आध्यात्मिक बुवाबाजी’ या विषयावर डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी ते म्हणाले की, देशातील एकाही बुवाने आतापर्यंत चमत्कार घडवला नसल्याचे स्पष्ट करून दाभोलकर म्हणाले, माणूस या बुवांकडे का आकर्षित होतोय याची कारणे समाजाच्या मानसिकतेत आहेत. अवतार वादातून बुवा, गुरू, परमेश्वरच असल्याची कल्पना आपण करतो. ब्रह्म, परब्रह्म, आत्मा, परमात्मा, मोक्ष, प्रारब्ध, माया हे शब्द समाजात रूजले आहेत. याबरोबरच आधुनिक विज्ञानाचा वापर करत आध्यात्मिक बुवाबाजी फैलावली आहे. या बुवांच्या प्रवचनावर आपला आक्षेप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणालाही बोलण्याचा अधिकार असला तरी आजपर्यंत एकाही बाबाने आपल्या प्रवचनात व्यवस्था परिवर्तनाचा शब्ददेखील उच्चारला नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर, गुजरातच्या दंग्यांनंतर एकतेचे  आणि तर खैरलांजीच्या अत्याचारानंतरही या आध्यात्मिक बुवांनी तोंडे उघडली नाहीत. केवळ पुत्रप्राप्ती, कर्जापासून मुक्ती, मानसिक ताणतणावापासून मुक्ती, सुख, शांती, समाधान यासाठीची आश्वासने बाबा देतात. इतकेच नाही तर प्रारब्ध बदलण्याची व जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून वाचवण्याचे आश्वासन देण्यात हे बाबा मागे पुढे बघत नाहीत. हे सर्व पुरावा न मागण्याच्या अटीवर करतात. अशा अध्यात्मिक बुवाबाजीला आपला विरोध आहे; मात्र दुसरीकडे आणखी एक आध्यात्म आहे. भौतिक सुखाच्या पलिकडे जाऊन जीवनाचे एक श्रेयस आहे, हे अनंतपरिने मोलाचे आहे. त्यामुळे जीवनात साधेपणा येतो व गुणाचे कल्याण होते. संत गाडगेबाबा, विनोबा भावे व महात्मा गांधींनी हे अध्यात्म सांगितले. मात्र या अध्यात्मातील नैतिकतेचा लवलेशही बुवाबाजी करणार्‍यांच्या अध्यात्मात दिसत नाही. म्हणूनच ही अध्यात्मिक बुवाबाजी समाजासाठी अधिक घातक आहे. याला आपला विरोध अधिक सक्षमपणे सुरू राहणार असून भारताचे संविधानही आपल्या बाजूने असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.

            यावेळी डॉ.नितीन शिंदे लिखीत ‘सफर विश्वाची’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्याम वर्धने, जि.प.अध्यक्ष आनंदा डावरे यांचे हस्ते झाले. यानंतर संध्याकाळी 8 वाजता सांगली जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास जिल्ह्यातील 70 कार्यकर्ते उपस्थित होते. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद वाढला पाहिजे. नव्या तंत्राचा वापर करून चळवळी गतीमान कराव्यात. वैचारिक मतभेद बाजूला सारून किमान पातळीवर परिवर्तनवाद्यांनी एकत्र यावे. समाजबदलाच्या प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे’, असा सूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात उमटला.

            संजय बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल अस्वस्थता वाटणार्‍यांनी सतत एकत्र आले पाहिजे. कार्यकर्त्यांना व्यापक समाजबदलाचे भान असावे.’ रेशनिंग कृती समितीचे शाहीन शेख म्हणाले, ‘पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी किमान महिन्यातून एकदा एकत्र यावे, किमान काही मुद्यांवर एकत्र यावे. पुरोगामी चळवळीत नवीन नेतृत्व तयार झाले पाहिजे.’ ‘जनशक्ती वाढवून आपली कामे वाढविली पाहिजेत’ असे मत राष्ट्र सेवा दलाचे सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केले. रविंद्र फडके म्हणाले, ‘एकमेकांना पूरक काम करून परिवर्तनाची लढाई करावी.’ ‘पुरोगामी कार्यकर्त्यांच्यात एकी नाही म्हणून समाजविघातकशक्ती वाढत आहे, धर्मांधशक्ती मोठी होत असल्याची खंत संपत मोरेे यांनी व्यक्त केली. ‘असंघटित कष्टकरी महिलांना चळवळीत स्थान मिळावे त्यांच्या कार्यात पाठबळ द्यावे.’ पुरोगामी चळवळीत काम करणार्‍यांची सूची तयार करून त्यांना संपर्कात ठेवावे. कार्यकर्त्यांनी हाक दिल्यावर प्राधान्यांने हजर रहावे’, अशी सूचना राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मगदूम यांनी केली. फास्टाचे प्रा.सुभाष दगडे म्हणाले, ‘आपल्या देशातील महामानवांनी पुरोगामी वारसा दिला आहे. सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी काही उपक्रम एकत्रित करावेत. माणसांची दु:खे कमी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविरत प्रयत्न करावेत.’ अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख म्हणाले, ‘आपापल्या चळवळी अधिक भक्कम कराव्यात. प्रासंगिकपणे एकत्र येणे याला पर्याय नाही. किमान समान कार्यक्रम राबविण्याला प्राधान्य द्यावे.’ पत्रकार महेश खराडे म्हणाले, ‘नवीन तंत्रे कार्यकर्त्यांनी आत्मसात करावीत. चांगले काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीशी माध्यमे नेहमीच उभी राहतात.’ ‘कार्यकर्त्यांची अराजकीय भूमिका समाजाला अराजकतेकडे घेऊन जाते. वेगवेगळ्या संघटनात काम करावे मात्र एकमेकांना सतत प्रोत्साहन द्यावे’, असे मत डॉ.नामदेव कस्तुरे यांनी यावेळी व्यक्त केले. ‘समाजकारण करत असताना तत्वनिष्ठा जपली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया सौ.लिलाताई जाधव यांनी व्यक्त केली. स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणाले, ‘कार्यकर्त्यांकडे वैचारिक अधिष्ठान हवे. विवेकनिष्ठ जीवन कार्यकर्त्यांना उन्नत करते. प्रामाणिक कार्यकर्तेच चळवळीचे आधारस्तंभ असतात.

            यावेळी रणधीर नाईक(शिराळा), प्रा.डॉ.बाबूराव गुरव(तासगाव), नामदेव करगणे(कवठेमहांकाळ), वसंत भोसले(पत्रकार), गुलाब इनामदार, प्रकाश चव्हाण, तानाजीराव मोरे, डॉ.संजय पाटील, अ‍ॅड.राजाभाऊ पद्माळकर, प्रा.एल.डी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल थोरात यांनी आभार मानले. फारूक गवंडी यांनी सूत्रसंचालन केले.  समीर कोळी, अंकुश चव्हाण, प्रा.काशिलिंग गावडे, सुनिल भिंगे, भास्कर सदाकळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यानंतर सर्वांना अंनिसच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.

            रविवार दि.5 जून रोजी सकाळी 11 वाजता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी वर्गणीदार संकलन करणार्‍या कार्यकर्त्यांना ‘शतकवीर’ तर जाहिराती व देणगी संकलन करणार्‍या कार्यकर्त्यांना ‘आधारस्तंभ’ या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अं.नि.वा.चे संपादक प्रा.प.रा.आर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन सहसंपादक डॉ.आशुतोष मुळ्ये यांनी केले. या प्रसंगी 16 शतकवीर व 25 आधारस्तंभ पुरस्काराचे वितरण तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण अतिवाडकर, बेळगाव यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन भवाळकर यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भवाळकर म्हणाल्या की, महाराष्ट्रात वारकरी संतांनी अंधश्रद्धावर प्रहार केला आहे. त्यांच्या विचारांचा उपयोग कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यात करायला हवा. लोकपरंपरातूनही अंधश्रद्धाविरोधी साहित्य मिळते. या परंपरांचा आधार घेत परितर्वनाचे कार्य करता येईल. लोकांपासून दूर राहून तर त्यांच्यात मिसळून त्यांना बदलता येईल. अध्यक्षीय भाषणात डॉ. दाभोलकर म्हणाले, “विसरत चाललेल्या समाजाला प्रबोधित करण्याचे काम अंनिस करत आहे. या संधीकाळात आपण समाजनिर्मितीला नवा पाया देवू शकलो तर इतिहास आपल्या कामाची नोंद घेईल.” शतकवीरांचे कौतुक करताना समाधानी बनू नका, अधिक जोमाने कार्यरत रहा. असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात किरण सगर, उमरगा व नीता सामंत, चाळीसगाव यांनी मनोगते व्यक्त केली.

            या कार्यक्रमाचे आभार सहसंपादक संजय सावरकर यांनी मांडले. राजीव देशपांडे, राहुल थोरात, सुहास पवार, सुहास यरोडकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

            यानंतर सांगली जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवसांच्या बैठकीचे उत्कृष्ट संयोजन केले म्हणून सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार डॉ.दाभोलकर व अविनाश पाटील यांच्या हस्ते झाला.

            शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या गीताने राज्य कार्यकारिणीचा समारोप झाला. या तीन दिवसांच्या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली.

            राज्यकार्यकारिणीच्या तीन दिवसांच्या खर्चाची जबाबदारी माजी जिल्हाध्यक्ष आर.एस.कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष विजयकुमार जोखे, उपाध्यक्ष नामदेव करगणे, आर्कि.रविंद्र चव्हाण, सुभाष देशमुख, वैभवकाका नायकवडी, रणधीर नाईक, नितीन शहा, प्रकाश चव्हाण, अ‍ॅड. सर्जेराव खिलारी, रमेश माणगावे इ. कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्याबद्दल त्यांचे अं.नि.स.तर्फे जाहीर आभार!

राहुल थोरात

अं.नि.स. राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत झालेले महत्वाचे दहा निर्णय
1) अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये यापुढे ‘एक व्यक्ती-एक पद’ हे धोरण राबविण्याचे ठरले.
2) अं.नि.स.च्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नेत्रदान व देहदान’ करण्याचा संकल्प करावा.
3) समाजामध्ये वाढणार्‍या व्यसनाधिनतेला विरोध करण्यासाठी “बलशाली महाराष्ट्रासाठी, चला व्यसनाला बदनाम करू या!” या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर अभियान राबविणे.
4) 7 जुलै 2011 ला ‘जादूटोणा विरोधी कायदा करा’ म्हणून शासनाला निवेदन देणे. (7 जुलै 1995 ला पहिल्यांदा विधानपरिषदेमध्ये कायद्यास मंजुरी मिळाली होती.)
5) ‘तालुका तेथे अंनिस शाखा’ हे ध्येय ठेवून डिसेंबर 2011 अखेर अं.नि.स.चा शाखा विस्तार करणे.
6) अं.नि.स.च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या वर्षी पासून ‘जीवन गौरव पुरस्कार’ देणे.
7) भटक्या विमुक्तासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाही अं.नि.स.च्या वतीने गौरव करणे. यासाठीचा खर्च अण्णा कडलास्कर(पालघर) यांनी देण्याचे मान्य केले आहे.
8) अं.नि.वार्तापत्राची वर्गणी पुढे उधारीने स्वीकारायची नाही. वार्तापत्राकडे वर्गणी पाठविताना रोख/डी.डी.ने वर्गणी पाठवायची. फोन/एस.एम.एस.वर वर्गणी स्वीकारली जाणार नाही.
9) अं.नि.स.प्रकाशित करणार्‍या प्रत्येक नवीन पुस्तकांच्या 10 प्रतींची खरेदी रोखीने राज्यकार्यकारिणी सदस्यांनी करावी.
10) प्रत्येक जिल्ह्यांत किमान एक तरी माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांची ‘वैज्ञानिक जाणिवा’ शिबीरे झाली पाहिजेत.