चळवळीत प्रत्यक्ष संघर्ष करत असताना कार्यकर्त्यांवर अनेक वेळा जीवघेणे प्रसंग गुदरत होते. अशा प्रसंगात दाभोलकर या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपली व संघटनेची संपूर्ण ताकत सर्व पातळीवर उभी करत. अशाच काही जीवघेण्या प्रसंगात सापडलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत.
सत्यसाईबाबाच्या विरोधात लातूर अंनिसने फार मोठा सलग संघर्ष उभा केला. त्यात खूप बडी राजकीय मंडळी, वकील व उच्च पदस्थ खूप मोठ्या प्रमाणात साईबाबाच्या बाजूने होते परंतु काही बोटावर मोजता येतील असे कार्यकर्ते वास्तववादी भूमिका घेऊन सत्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा माझ्यासह कुटुंबियांना खूप मोठ्या प्रमाणात धमक्या यायच्या. परिस्थिती खुपच अटीतटीची होती. प्रशासन व्यवस्थाही राजकीय दबावाखाली आमच्याविरूद्ध होती. अशावेळी मानसिक ताण खूप मोठ्या प्रमाणावर असायचा पण त्यातही डॉक्टर दाभोलकर सतत संपर्कात असायचे, मानसिक पाठबळ व आधार द्यायचे त्यामुळे लढण्यास बळ मिळायचे.
अंनिसच्या कार्यातील एक महिला कार्यकर्ती जिला कुणाचाही आधार नव्हता. तिची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न त्यांच्या भावकीतील लोक करीत होते. तिला जगणे मुश्कील करून टाकले होते. तेव्हा अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्तीच्या पाठीशी संघटनेचे बळ उभा केले. त्यात पुढाकार माझा होता त्यामुळे त्यांच्या विरोधी पार्टीने गुंडाकडून मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची सुपारी व धमक्या देऊन 4 डिसेंबर 2003 च्या रात्री दीड वाजता माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. चारही दरवाज्यावर पेट्रोल टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा डॉ. दाभोलकरांनी भाई वैद्य, सुभाष वारेसह सर्व उच्च पदस्थ मंत्रीगट, जिल्हा प्रशासन व विश्वास नांगरे पाटील यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देऊन आरोपींना जेरबंद करून माझ्या व कुटुंबियांच्या मागे मानसिक आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न केला. लातूरातील पुरोगामी परिवर्तनवादी सर्व पक्ष, सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी माझ्या व डॉ. दाभोलकरांच्या आणि चळवळीच्या प्रेमापोटी 500 लोकांचा मोर्चा काढून पाळबळ उभं केलं. अन्यथा मानसिक दृष्ट्या कोलमडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांनी हल्ला केला त्यांच्या बहिणीचे आंतरजातीय लग्न आम्ही लावले होते.
अशाच एका आंतरजातीय विवाहाच्या उपक्रमामुळे अनेक प्रसंगी धमक्या, जीवावर बेतणारे प्रसंग माझ्यावर आले. जोडप्यावरही बरेच प्रसंग आले. तेव्हा तेव्हा डॉक्टर सतत संपर्कात राहून खबरदारी घ्यायचे योग्य मार्गदर्शन करायचे त्यामुळे पुढे पुढे अशा बाबी अंगवळणी पडत गेल्या. जादूटोणा विरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात पारित करावा या मागणीसाठी दि.6/12/2006 ते 15/12/2006 या दरम्यान लातूर येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर व मी असे दोघांनी सलग 10 दिवस उपोषण केले. मी दिवसातून तीन वेळा जेवणारा कार्यकर्ता पण डॉक्टरांच्या सोबत उपोषण करताना एक वेगळा अनुभव आला, डॉ.म्हणायचे पहिले दोन दिवस त्रास वाटेल नंतर काही होणार नाही. जास्त बोलायचे नाही पण पाणी भरपूर प्यायचे आणि पडून रहायचे. हे ऐकून आणि सोबत डॉक्टर असल्याने उपोषणाची भीती पळाली. तरी परंतु डॉक्टरांची बरोबरी मी करू शकलो नाही. सातव्या दिवशी माझी प्रकृती बिघडली. मला बळजबरीने पोलिसांनी सरकारी दवाखान्यात दाखल केले. रात्रभर दवाखान्यात राहून सकाळी परत उपोषणस्थळी उपस्थित राहून 10 दिवस उपोषणाचा एक वेगळा अनुभव घेतला.
महाराष्ट्र अंनिसच्या वतीने महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘वारसा समाजसुधारकांचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, विवेकाचा” ही महाराष्ट्रव्यापी यात्रा काढली होती. ती उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात प्रवेश करतांना किल्लारी येथे या मोहिमेचा स्वागत व प्रबोधनाचा कार्यक्रम होता. त्याचं किल्लारीत चार दिवसांनी एका स्वयंघोषित धर्माच्या ठेकेदार महाराजाचा कार्यक्रम होणार होता. बहुतांश लोकांच्या खिशाला तथाकथित महाराजाचे बिल्ले होते. तेथे बुवाबाजीचे वास्तवाचे भान लोकांच्या लक्षात आणून देताना स्वत:ला संत म्हणवून घेणार्या महाराजाच्या भक्तांनी दि.11/12/2010 रोजी किल्लारी येथे एकदम आमच्यावर अचानक हल्ला चढवला. गाडीतील व बाहेरील संत समाजसुधारकांचे डिजीटल बॅनर व साहित्य जाळून टाकले व 200 लोकांच्या समुहाने माझ्यासह अविनाश पाटील व शहाजी भोसले, उत्तरेश्वर बिराजदार यांना काठ्या, सळई व दगडांनी मारहाण केली. माझं डोकंही फुटलं होतं. तरीही आम्ही प्रतिहल्ला केला नाही कारण डॉ. दाभोलकरांचा आदर्श आमच्या पुढे होता व संत समाजसुधारकांच्या विचाराचा विवेकी वारसा आमच्या सोबत होता. आणि तथाकथित संत म्हणवून घेणार्याच्या चिथावणीवरून त्यांच्या भक्तांनी तो संत समाज सुधारकांचा विवेकी वारसा पायदळी तुडवून जाळला होता. असाच प्रकार काही प्रमाणात अनुराधाताई देशमुख, मल्लीनाथ महाराज यांच्याही बाबतीत घडून आला होता. या प्रत्येक प्रसंगात डॉक्टर खंबीरपणे पाठीशी रहायचे; कार्यकर्त्यांची जवळीकतेने विचारपूस करायचे.
अंबाजोगाईला शिक्षकांचे शिबीर चालू होते. तेही शासनाच्या परिपत्रकानुसार. त्यात एका खाजगी डी.एड.कॉलेजच्या प्राचार्य प्रशिक्षणार्थी नसताना तेथे येऊन शिबीरात थांबल्या व नंतर नसलेल्या भावलेल्या दुखावल्या म्हणून पूर्वनियोजित कट रचून बीड एस. पी. कार्यालयात धर्मांध शक्तींना सोबत घेऊन तक्रार दाखल केली. त्यामुळे अंबाजोगाईच्या 5-6 कार्यकर्त्यांना भूमिगत ठेवावे लागले. तपासांती लक्षात आले त्या प्राचार्य धर्मांधाच्या सक्रीय कार्यकर्त्या, त्यांनी डायटच्या प्रशासनाला हाताशी धरून ही कार्यवाही घडवून आणली. प्राचार्या सविता शेटे यांच्या बीड येथील घरावर हल्ला झाला. त्यांच्या कारची मोडतोड झाली. धार्मिक अपप्रवृत्तींची ही जुनी खोड. नसलेल्या खोट्या तक्रारी दाखल करायच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणार्या लोकांना त्रास द्यायचा. तेव्हा डॉक्टर दाभोलकरांनी तातडीने बीड, अंबाजोगाई गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ.दाभोलकरांना तेथील पोलीस प्रशासनाने बीड जिल्हा प्रवेशबंदी आदेश जारी केला. तेव्हा डॉक्टरांना नाईलाजाने लातूरला यावे लागले. डॉक्टरांना बीड व अंबाजोगाई येथे जाऊन कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यायचा होता. मात्र डॉक्टरांनी स्वतंत्र गाडी अंबाजोगाईला पाठवून कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना लातूरला माझ्या घरी आणून त्यांची आत्म्यितेने विचारपूस करून कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सोबत आहोत असे सांगून परत त्याच गाडीने अंबाजोगाईला पोचवले व भूमिगत कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, “तुम्ही काही गुन्हा केलेला नाही, उलट तुम्ही खरे क्रांतीकारी आहात, भिण्याचे कारण नाही आपण न्यायासाठी लढू या.” असा विश्वास दिला. शेवटी अटकपूर्व जामीन मिळाला. केस चालली व कार्यकर्ते निर्दोष सुटले. पण एका कार्यकर्त्याला अडकवायचा प्रयत्न त्यांनी केला शेवटी निकाल अंनिसच्या बाजूने लागला. या अगोदरही डॉक्टरांवर अनेक गुन्हे दाखल केले त्याचे जे निकाल लागले ते सर्व अंनिसच्या व डॉक्टरांच्या बाजूनेच. यातून तरी धर्मांधानी संबंधितांनी काही बोध घ्यायला हवा होता. पण सूडबुद्धीने पेटलेल्यांनी त्यांना मिळेल तिथे बदनामी करण्याचा चंग बांधला परंतु शेवटी त्या सर्वातून डॉक्टर तावून सुलाखून निघाले.
–माधव बावगे