-सुभाष थोरात
भारतीय परिस्थितीच्या संदर्भात आपल्याला आपल्या प्रगतीशील परंपरांची ओळख होणे अतिशय गरजेचे आहे. विज्ञाननिष्ठता, अंधश्रद्धा विरोध, जनतेच्या हिताची बांधिलकी, या गोष्टी या परंपरेशी जैवपणे निगडित आहेत. मध्ययुगातील संतचळवळही याला अपवाद नाही. या संत चळवळीबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. तिच्या समाजाच्या प्रगतीच्या संदर्भातील योगदानाबद्दल अनेक मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर थोर विचारवंत आणि संत चळवळीचे अभ्यासक गं.बा.सरदार यांनी लिहिलेले ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ हे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे. या पुस्तकाची आपल्याला या सदराच्या आरंभी ओळख करून घ्यायची आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि समाज परिवर्तनाचे काम करणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
या पुस्तकात एकंदर 10 प्रकरणे आहेत. सुरवातीला पहिल्या आवृत्तीत ‘चोखामेळा संत भला’ हे प्रकरण नव्हते ते चौथ्या आवृत्तीत समाविष्ट केले गेले आहे. त्यामुळे या पुस्तकाला एक परिपूर्णता लाभली आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वस्तुवादी इतिहासमिमांसेच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाची मांडणी केली आहे. या दृष्टिकोनाबद्दल लिहिताना सरदार यांनी म्हटले आहे, “कार्ल मार्क्सने सामाजिक इतिहासाकडे पाहण्याचा जो एक विशिष्ट दृष्टिकोन बसवला आहे त्याला ‘वस्तुवादी इतिहासमिमांसा’ या नावाने संबोधणेच योग्य होईल. पण या ठिकाणी ‘वस्तू’ हा शब्द केवळ जडसृष्टीपुरताच मर्यादित नाही. भौतिक परिस्थितीशी सुसंगत असल्यामुळे जनमताशी पकड घेणार्या विचारप्रवाहांचाही त्यात अंतर्भाव होतो. हा दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही देशातील कोणत्याही ऐतिहासिक घटनांचा हुकमी अन्वयार्थ लावण्याचा सांप्रदायिक गुरूमंत्र नव्हे. इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अध्ययनाची ती सर्वसामान्य दिशा आहे. समाजजीवन हा निरनिराळ्या शक्तींच्या व प्रेरणांच्या संघर्षातून सिद्ध होणारा जिवंत प्रवाह आहे. त्याला एखाद्या ठराविक साच्यात चपखल बसविता येईल ही कल्पनाच मुळी भ्रामक आहे. सामाजिक जीवनातील कोणत्याही कालखंडाचे किंवा राजकारण, धर्म, तत्वज्ञान, साहित्य कला इत्यादी अंगोपांगाचे परिशिलन करताना त्या त्या क्षेत्रातील साधनसामग्रीची स्वतंत्रपणे व साकल्याने पाहणी करणे आवश्यक आहे. वस्तुवादी विचारसरणीप्रमाणे ‘आर्थिक हितसंबंध’ हीच सामाजिक परिवर्तनाशी मुलभूत व प्रबलतम प्रेरणा आहे यात अणुमात्र संशय नाही. परंतु याचा अर्थ समाज जीवनाची इतर अंगे पराभूत, प्रेरणाशून्य आहेत, त्यांचा परस्परांवर काहीच परिणाम होत नाही असा नव्हे.” या दृष्टिकोनामुळे सरदार यांनी संत चळवळीच्या आणि संत वाङ्मयाच्या अनुषंगाने त्या काळच्या संबंध जीवनाचे एक वास्तववादी चित्र आपल्या समोर उभे केले आहे. या चित्राच्या पार्श्वभूमीवरच आपल्याला संत चळवळीचे आणि संत वाङ्मयाचे महत्व स्पष्टपणे लक्षात येते.
या वस्तुवादी इतिहासमिमांसेतून मांडणी करताना सरदार यांनी पुढील शब्दात तिची ओळख करून दिली आहे. “ऐतिहासिक संस्थांचे मुल्यमापन करताना भावनावशतेने त्यांचा गौरव किंवा अधिक्षेप करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे प्रवाही स्वरूप ध्यानात घेऊन त्यांच्या निरनिराळ्या अवस्थांचे समाजावर काय परिणाम झाले ते स्पष्ट करणे हेच इतिहासकाराचे आद्य कर्तव्य आहे. युरोपातील मठसंस्था ही मध्ययुगाच्या अखेरीस कितीही जाचक प्रतिगामी बनली असली तरी तिने आरंभीच्या काळात शिक्षणप्रसाराचे, संस्कृतीसंवर्धनाचे व शेतकी सुधारणेचे फार मोठे कार्य केले आहे. तिकडे डोळेझाक करून त्या संस्थेवर सरसकट ताशेरे ओढणे अन्यायाचे होईल. गुलामगिरीसारख्या संस्थेची चर्चा करतानाही एंगल्सने जुन्या रानटी काळाच्या मानाने तिचा उदय हा प्रगतीकारकच होय असे आपले स्पष्ट मत प्रकट केले आहे. ज्या संस्था आज आपणास तापदायक व हानीकारक वाटतात, त्या पूर्वीही तशाच असतील असे मानून चालणार नाही. त्या त्या काळची परिस्थिती पाहून आपणास याचा निर्णय करावा लागेल. ब्राम्हणशाहीची चिकित्सा करतानाही हीच गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे….. तसे न करता सगळ्या समाजाच्या अध:पाताचे खापर एकट्या ब्राम्हणशाहीच्या माथी फोडल्यास आपणास जुना इतिहास तर कळणार नाहीच पण नवे प्रश्न सोडविण्याची मदत होणार नाही.”
सरदार यांनी अंगीकारलेल्या या वस्तुवादी इतिहासमिमांसेमुळे एकाच वेळी संत चळवळीचे कार्य आणि त्यांच्या मर्यादा यांचे योग्य आकलन होण्यास मदत होते. संत चळवळीबद्दल आजपर्यंत अनेक विचारवंतांनी लिखाण केले आहे. सरदार यांच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1950 साली प्रसिद्ध झाली आहे. त्यावेळी न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, राजारामशास्त्री भागवत, राजवाडे, प्रो.रानडे, पोतदार, फाटक या मंडळींचे संत चळवळीबद्दलचे विचार त्यांना उपलब्ध होते. फुले आणि आंबेडकरांनी संत चळवळीबद्दल फार विस्ताराने लिहिले नाही परंतु त्यांची मते व्यक्त केली आहे. सरदार यांनी त्याचा उल्लेख केलेला दिसत नाही. परंतु सरदारांच्या या पुस्तकानंतर फुले-आंबेडकरी दृष्टीतून “संत साहित्याची” चिकित्सा झालेली आहे. थोड्याफार फरकाने सरदार यांनी जे निष्कर्ष काढले आहेत तेच निष्कर्ष या चिकित्सेतून पुढे आलेले आहेत. सरदार यांना न्यायमुर्ती रानडे यांनी त्यांच्या(मराठी सत्तेचा उदय) ‘ठळीश ेष ढहश चरीरींहर झेुशी’ या ग्रंथात केलेली संत चळवळी बद्दलची त्यांची मांडणी समतोल वाटते. असे असले तरी सरदार यांनी त्यावर टीका करताना म्हटले आहे, “शिवकालीन राजकीय आंदोलनाची वैचारिक व भावनात्मक पार्श्वभूमी संत मंडळाच्या कार्यातून तयार झाली असा त्यांच्या विवेचनाचा इत्यर्थ आहे. रानड्यांच्या वृत्तीत श्रद्धा व चिकित्सा, राष्ट्राभिमान व सत्यनिष्ठा यांचा बेमालूम मिलाप झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाची चर्चा करताना त्याच्या विधायक बाजूवरच ते नेहमी जास्त भर देतात. संतांच्या कार्याची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली. परंतु त्यांच्या कर्तृत्वातील उणीवा दाखविल्या नाहीत. भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म यांचा समन्वय त्यांनी साधला, पण त्यातील विरोधाची मिमांसा मात्र केली नाही. राजवाडे, भावेप्रभुती ‘राष्ट्रवादी’ लेखकांना हा उदार दृष्टिकोन मानवला नाही. संताळ्यांचा भक्तीपंथ त्यांना निष्क्रीयतेचा व नेभळटपणाचा वाटला.” इथे सरदार यांनी भागवत धर्म आणि महाराष्ट्रीय धर्म असा शब्दप्रयोग केला आहे. आणि रानडे यांनी या दोघांमधील विरोधाची मिमांसा केली नाही असे म्हटले आहे. शिवाय राजवाडे आणि भावे प्रभूती लेखकांना संताळ्यांचा भक्तीपंथ निष्क्रीयतेचा व नेभळटपणाचा वाटला असेही म्हटले आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे भागवत धर्माचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते ढोबळमानाने जातीभेदाविरोधी आहे. त्यामुळेच ते वैश्विक आणि मानवतावादी आहे. संत रामदासांसारखे ते ब्राम्हण्यवादी नाही. ज्ञानेश्वर ते तुकारामापर्यंत या भक्तीपंथातील सर्व संत अवघ्या संसाराची(मानवजातीची) काळजी वाहणारे होते. राजवाडे आणि भावेप्रभूती लेखक ब्राम्हण्यवादी होते. आणि त्यांनी त्याकाळी जो राष्ट्रवाद पुढे आणला तोही ब्राम्हणवर्णवर्चस्ववादी असा होता. त्यामुळे त्यांना भागवत-धर्म परंपरा मानवणारी नव्हतीच. शिवाय या सर्व संतांचा छळ त्यावेळच्या ज्या सनातन्यांनी केला त्यांचेच राजवाडे, भावेप्रभूती लेखक वैचारिक वारसदार होते. त्यामुळेच त्यांना संत रामदास जास्त भावले. कारण रामदासांच्या दृष्टीत हा मानवतावाद तर नाहीच. शिवाय ते कट्टर ब्राम्हण्यवादी होते. खरे तर ‘संत’ या पदवीला ते बसत नाहीत. त्याचा दृष्टिकोन “मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा॥ असा मर्यादित होता. त्यामुळेच आधी गाजवावे तडाके। मग भूमंडळ घाके किंवा देवद्रोही तितुके कुते। मारूनी घालावे परते अशी हिंसेची शिकवण ते देतात; ज्याला प्रतिकाराची किंवा पराक्रमाची शिकवण म्हणून गौरविले जाते. अर्थात ‘राष्ट्रवादी’ भावनेसाठी त्याचा त्यावेळच्या ब्राम्हण्यवादी, पुनरूज्जीवनशील राष्ट्रवाद्यांनी उपयोग करून घेणे स्वाभाविक आहे. दलित, बहुजनाचा राष्ट्रवाद अजून उदयाला यायचा होता. कारण त्यावेळी मध्यमवर्गीय-सुशिक्षित म्हणवली जाणारी मंडळी ब्राम्हण जातीतून पुढे आली होती. जातीरचनेमुळे ते स्वाभाविक होते.
राजवाडे, भावेप्रभूतींच्या या दृष्टिकोनावर टिका करताना सरदारांनी म्हटले आहे, “कोणत्याही विचार सरणीच्या तात्कालिक प्रचारासाठी इतिहास राबवणे हे अशास्त्रीयतेचे व अदूरदर्शीपणाचे द्योतक आहे. ऐतिहासिक घटनांचे वस्तुनिष्ठ आकलन हे केव्हाही हितावहच होणार या भावनेने इतिहासाचे संशोधन व समीक्षण झाले पाहिजे. आपणास इतिहासाचे पुनर्मुल्यमापन करायचे आहे. पुर्नरचना करावयाची नाही. ही गोष्ट इतिहासकाराने कधी विसरता कामा नये.” पण हीच गोष्ट आपल्या तथाकथित उच्चवर्णीय, ब्राम्हण्यवादी इतिहासकारांनी विसरल्यामुळेच खूप चुकीचे निष्कर्ष आणि इतिहास आपल्या समोर मांडला जातो. उदा.छ.शिवाजी महाराज हे मुस्लीमद्वेषी होते. त्यांची ‘स्वराज्याची’ स्थापना म्हणजे ‘स्वातंत्र्याचा’ लढा म्हणून पुढे आणला जातो. किंवा रामदास हे म्हणजे राष्ट्रवादाचे प्रवक्ते म्हणून पुढे येतात. जे वास्तवात तसे नाही. तुकारामांनी संताची व्याख्या स्पष्ट शब्दात नोंदवलेली आहे. “तुका म्हणे तोची संत। सोसी जगाचे आघात. तुका म्हणे कढे करावी शितल। ऐसे चंदनाचे. म्हणजे चंदनासारखा जनहितासाठी-मानवहितासाठी झिजणार्यालाच संत म्हणावे.
“संतकालीन महाराष्ट्राच्या” सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचे थोडक्यात विवेचन करून सरदार यांनी संत चळवळीतील सामाजिक संघर्षाबद्दल खूप मूलगामी मांडणी केली आहे. ते लिहितात, “भौतिक दुरवस्था व मानसिक गुलामगिरी यामुळे सामान्य जनता जडमुढ व अगतिक बनलेली होती. या केविलवाण्या स्थितीतून तिला मुक्त करण्यासाठी संत चळवळ जन्माला आली. या चळवळीचे कार्यक्षेत्र बर्याच अंशी धार्मिक व सांस्कृतिक होते. सामाजिक जीवनातील मुलभूत प्रश्नांना तिने हात घातला नाही. युरोपप्रमाणे आर्थिक झगड्याची तिला साथ मिळाली नाही. शास्त्रप्रामाण्यांना व जातीव्यवस्थेला धक्का न लावता वारकरी पंथाने स्त्रीशुद्रादिकांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेल्या बाह्य परिस्थितीत आपणास यत्किंचितही बदल करता आला नाही. तरी हताश होण्याचे कारण नाही. कोणत्याही जातीच्या मनुष्याला भक्तीपंथाच्या द्वारा आध्यात्मिक उन्नती साधता येईल. नैतिक सामर्थ्य वाढवतायेईल, प्रापंचिक दु:खावर मात करता येईल असा अगदी खालच्या थरातील लोकांतही या चळवळीने विश्वास निर्माण केला.” असा विश्वास निर्माण झाल्यामुळेच प्रत्येक जातीतून अगदी अस्पृश्य जातीतूनही ‘संत’ निर्माण झाल्याचे दिसून येते. असे असले तरी या जाती भावनेचा स्पष्ट परिणाम आपल्याला संतवाङ्मयात आणि संताच्या वृत्तीत दिसून येतो. सरदारांनी ते नेमकेपणाने सांगितले आहे ते म्हणतात, “वारकरी पंथातील बरेचसे भक्त ग्रामसंस्थेतील अलुते-बलुतेदार होते. मात्र या पंथाला तात्विक अधिष्ठान मिळवून देण्याचे कार्य ज्ञानेश्वर-एकनाथांच्या ग्रंथांनी केले आहे. त्यांनी वैदीक परंपरेचा बोज राखूनच या नव्या प्रवृत्तींना वळण लावले. त्यामुळे आपले संतवाङ्मय संमिश्र स्वरूपाचे बनले आहे. ज्ञानेश्वर-एकनाथांच्या व नामदेव तुकारामांच्या वाङ्मयाचा घाट अगदी निराळा आहे. ज्ञानेश्वर-एकनाथांच्या वाङ्मयात सहानुभूतीचा ओलावा आहे, दलितोद्धाराची तळमळ आहे. मानवतेचा अविष्कार आहे. पण त्याचा प्रवाह एकमुखी व शांत आहे. उलट इतर संताच्या अभंगवाणीत आत्मप्रकटीकरणाची धडपड आहे. त्यांच्या अंत:करणात सलणारी सामाजिक जीवनातील शल्ये त्यांच्या वाङ्मयात अधून मधून डोकावल्याशिवाय राहत नाहीत. भावनेच्या भरात ते सामाजिक विषमतेचा निषेध करतात. क्वचित बंडखोरपणाची भाषा बोलतात. परंतु ती तात्कालिक उर्मी ओसरताच पुन: रूढ विचारसरणीपुढे निमूटपणे मान तुकवतात. त्यांच्या वागण्यात वर्गभेदाची जाणीव आहे. पण वर्गलढ्याची तीव्रता मात्र कुठेच नाही. कारण या पंथाच्या प्रवर्तकांना फक्त धार्मिक जीवनातच समता स्थापावयाची होती. तत्कालीन समाजव्यवस्थेत ढवळाढवळ करण्याची त्यांना गरज भासली नाही. उलट व्यावहारीक व्यवसायभेद आध्यात्मिक उन्नतीच्या व धार्मिक ऐक्याच्या आड येत नाहीत अशी त्यांची खात्री होती. म्हणून त्यांनी सर्व जातींना निरहंकार बुद्धीने (व्यक्तीमत्वशून्य दृष्टीने?) स्वधर्माचे मन:पूर्वक परिपालन करण्याचा उपदेश केला आहे. जातीभेद हा नैसर्गिक व क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे स्वत:च्या काळे-गोरेपणाबद्दल कोणी तक्रार करीत नाही, त्याप्रमाणे विशिष्ट जातीत जन्मल्यामुळे पाळाव्या लागणार्या निर्बंधाबद्दल तक्रार करण्यात काही औचित्य नाही अशीच त्यांची शिकवण होती.” सरदारांनी यासाठी ज्ञानेश्वरांच्या दोन ओव्या उद्धृत केल्या आहेत. “सांधे शुद्रगृही आघवी। जरै पक्वान्ने अभिति बरवी। तिथे द्विजे केवी सेवावी। दुबळा जर्है।” (ज्ञानेश्वरी-3-216) दुसरी ओवी “तैसे वर्णाश्रय वशें। जे करणे आले असे। गोरे या आंगा जैसे। गोरेपण.” (ज्ञानेश्वरी-18-833) ज्ञानेश्वरांचे हे तत्वज्ञान एका अर्थाने जातीव्यवस्थेला नैसर्गिक मानणारे होते. आणि तत्कालीन उच्चवर्णीयांचे हितसंबंध राखणारे होते असेच म्हटले पाहीजे.
भक्तीपंथ ही एक भौतिक दु:खापासून, संघर्षापासून दूर नेणारी एक पळवाट होती असा आक्षेप संत चळवळीवर घेतला जातो. परंतु तो सरदारांना मान्य नाही. “मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेवर नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे ही गोष्ट त्यांनी पुन:पुन्हा आवर्जून सांगितली आहे. सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेला बहुजनसमाजातील न्यूनगंड नाहीसा करून त्याच्या प्रगतीला उपकारक होतील अशी नवी मूल्ये प्रचारात आणण्याची त्यांची खटपट होती. सनातनी पंडितांचा विरोध त्यांनी शांतपणे सहन केला. पण आपल्या मार्गापासून ते रेसभरही ढळले नाहीत. “विख खावे ग्रासोग्रासी” अशा बाण्याची संताची ही आत्मनिष्ठा व बुद्धीला बधिरता आणणारी पलायनवादी वृत्ती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. “एक तटस्थ मानसी। एक सहजच आळसी। दोन्ही दिसती सारखी। वर्म जाणे तो पारखी।” हे तुकारामांचे वचन या बाबतीत ध्यानात घेण्यासारखे आहे. तेव्हा संत चळवळ ही सामाजिक लढ्यापासून लोकांना परावृत्त करणारी प्रतिगामी शक्ती नसून धार्मिक जीवनाच्या कक्षेत त्यांच्या हक्कासाठी सनदशीरपणे झगडणारी सुधारणावादी प्रवृत्तीच होती.” सरदारांचा हा निष्कर्ष ढोबळमानाने बरोबर असला तरी मतभेदाचे अनेक मुद्दे या संदर्भात पुढे येऊ शकतात. आणि अजूनही “संत चळवळी”बद्दल आणखी अभ्यास पुढे येऊ शकतो. परंतु तो सरदारांनी अंगीकारलेल्या वस्तुवादी इतिहासमिमांसेवरच आधारलेला असला पाहीजे तरच सत्यापर्यंत पोहचणे शक्य होईल.
सरदार यांनी जे वर दिलेले निष्कर्ष काढले आहेत. ते त्यांनी तपशिलवारपणे प्रचंड व्यासंगीपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी या पुस्तकातील प्रकरणांना जी नावे दिली आहेत त्यावर त्यांच्या चौफेर व्यासंगाची कल्पना येईल. पहिले प्रकरण महाराष्ट्रीय “संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य” या पासून सुरू होते या प्रकरणातच सरदार यांनी त्यांना अभ्यासातून जाणवलेेले निष्कर्ष मांडले आहेत. दुसरे प्रकरण “भक्तीपंथ व महाराष्ट्र संस्कृती” या प्रकरणात “महानुभाव पंथाची आणि वारकरी पंथाची” तुलना केली आहे. तिसर्या प्रकरणात “जैन धर्म आणि महानुभाव पंथाची” महाराष्ट्राच्या संस्कृती विकासात असणार्या बहुमोल भूमिकेची चर्चा केली आहे. चौथ्या प्रकरणात पुन्हा एकदा सविस्तरपणे “वारकरी पंथ आणि महानुभाव पंथ” यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे आणि महानुभावपंथाच्या अपयशाची तसेच वारकरी पंथाच्या यशाची कारणमीमांसा केली आहे. त्यातून वारकरी पंथाचे कार्य सामाजिकदृष्ट्या अधिक व्यापक आणि मौलिक स्वरूपाचे होते असा निष्कर्ष काढला आहे. पाचव्या प्रकरणात ज्ञानेश्वरांच्या “धर्मकल्पनेची” चिकित्सा केली आहे. सहाव्या प्रकरणात “संत चोखामेळा” यांच्या वाङ्मयाची आणि त्या अनुषंगाने जाती व्यवस्थेची चिकित्सा केली आहे. चोखोबांच्या अभंगात वर्गदृष्टी कशी डोकावते हे मांडताना खुद्द पांडुरंगाला “न्याय नाही तुमच्या घरी” असे चोखोबा ठणकावून सांगतात तो अभंग सरदारांनी उद्धृत केला आहे.
एकाशी कदान्न एकाशी मिष्टान्न। एका न मिळे कोरान्न मागतांची।
एकाशी वैभव राज्याची पदवी। एक गावोगावी भिक मागे॥
हाची न्याय तुमचे दिसतो की घरी। चोखा म्हणे हरीकर्म माझे॥
विठोबा का न कळे तुम्हा। सर्व जगाचा तू आत्मा॥
पुराण पुरूष परमात्मा। आम्हा दीना उपेक्षिसी॥
पहा न्याय नाही तुमचे घरी। एका दु:ख एक राज्य करी।
ऐसी नीत नव्हे बरी। साजे थोरी थोरपणें॥
सातव्या प्रकरणात “एकनाथ आणि रामदास” यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्यात आली आहे. आणि या दोघांच्या विचार सरणीतील विरूद्ध टोकाची तफावत का आली याचेही विवेचन केले आहे. तसेच आठव्या प्रकरणात “तुकाराम आणि रामदास” यांच्या विचारसरणीची चिकित्सा केली आहे. तुकाराम हे वैश्य शुद्राचे प्रतिनिधी आहेत तर रामदास हे ब्राह्मण-क्षत्रियांचे प्रतिनिधी आहेत असा निष्कर्ष सरदारांनी काढला आहे आणि बरोबर आहे. त्यासाठी दोघांच्या वाङ्मयातील अभंग उद्धृत केले आहे. नववे प्रकरण उपसंहाराचे आहे यात या पुस्तकाच्या सर्व निष्कर्षांची गोळाबेरीज करून एक ठोस निष्कर्ष आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न सरदारांनी केला आहे. अखेरच्या दहाव्या प्रकरणात धार्मिक प्रबोधनाची फलश्रुती नेमकी काय या संदर्भात टिका टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा शेवट सरदारांनी पुढील शब्दात केला आहे. “एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या अखेरीस येथे सुधारणावादाचा उदय झाला. तेव्हापासून महाराष्ट्रात निष्ठावंत समाजसुधारकांची एक उज्ज्वल परंपरा निर्माण झाली आहे. काही सुधारकांच्या मनावर ख्रिस्तप्रणित सेवाप्रवण मानवतावादाची छाप पडली होती. त्यापैकी जे समन्वयशील वृत्तीचे होते त्यांना साहजिकच ज्ञानेश्वर-तुकारामांचा अध्यात्मनिष्ठ मानवतावाद जवळचा वाटला. या काळातील पुनरूज्जीवनवादी समाजचिंतकांनी प्राचीन धर्मग्रंथ व अभिजात संस्कृतसाहित्य यांची थोरवी वर्णन करून लोकांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. उलट जुन्या नव्यांचा समन्वय करू पाहणार्या नेमस्त सुधारकांना संत वाङ्मयातील सहृदयता, औदार्य, अंतर्मुखता, लोकाभिमुखता आणि शुद्रातिशुद्राबद्दलची खोल सहानुभूती या गोष्टी अधिक स्फूर्तीदायक वाटल्या. डॉ.भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी शिंदे यांच्यासारख्या प्रार्थना समाजातील किती तरी ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजसेवकांना संत चळवळीबद्दल विलक्षण ममत्व होते.” याचा अर्थ संत वाङ्मयाचा महाराष्ट्रीय संस्कृतीच्या पुढच्या वाटचालीवर अगदी खोलवर सहज, सुंदर असा ठसा उमटला आहे. मराठी भाषा तुकारामांच्या अभंगांनी किती समृद्ध केली आहे हे कोणा ‘मराठी’ माणसास सांगावयास नको. इतका तो अभंगवाणीशी एकरूप झाला आहे.
एकंदरच गं.बा.सरदार यांचे हे पुस्तक विवेकशील, विज्ञाननिष्ठ, समतावादी, विषमताविरोधी राजकारण करू पाहणार्या आणि जाती-वर्ग विरहित भारताच्या निर्मितीसाठी झटणार्या प्रत्येक कार्यकर्त्यांने वाचणे गरजेचे आहे. आपला प्रगतीशील सामाजिक चळवळीचा वारसा किती समृद्ध आहे याची ठोस कल्पना या वाचनातून आपणास प्राप्त होऊन आपण तो वारसा आजच्या जागतिकीकरणाच्या चंगळवादी कालखंडात समर्थपणे पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा मिळेल.
पुस्तकाचे नाव : संत वाडःमयाची सामाजित फलश्रृती लेखक : गं. बा. सरदार प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, 250, शनिवार पेठ, पुणे 30 किंमत : 25/- (चौथी आवृत्ती सन 1982)
गं. बा. सरदार यांची प्रमुख ग्रंथ संपदा 1. अर्वाचिन मराठी गद्याची पूर्वपिठीका (इ.स.1800 ते 1874 ) 2. महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी 3. संत वाडःमयाची सामाजिक फलश्रृती 4. महात्मा फुले : विचार आणि कार्ये 5. आगरकरांचा सामाजिक तत्वविचार 6. धर्म आणि समाज परिवर्तन