‘साप मानव मित्र’ कसा आहे? या विषयावरील 24 बॅनरचे प्रदर्शन हा म.अं.नि.स.चा प्रकल्प पालघर शाखेने या वर्षीही राबवण्यास 28 जुलैपासून सुरूवात केली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृतीचे काम छान होतेय म्हणून समितीला खूप चांगला प्रतिसादही मिळतो पण गरज आहे कार्यकर्त्यांच्या चिकाटीची! माझा एका शाळेतील अनुभव आपणा सर्वांसाठी….
नाही हो करता एका शाळेत मुख्याध्यापकांनी सर्प प्रदर्शनाची परवानगी दिली. मी माझी ओळख करून देत त्यांना सापांची पोस्टर्स लावण्यासाठी जागा मागितली. साप म्हणजे सगळ्यांना माहीत आहे तुम्ही काय दाखवणार? असे म्हणून एखादे पोस्टर लावण्याची मुख्याध्यापकांनी परवानगी दिली. मी मनातून दचकलो पण सावरत म्हणालो, सर, ही माहिती विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे. आपण फार तर वर्गाबाहेर 4-4 पोस्टर बांधूया. यावर ते म्हणाले किती आहेत पोस्टर्स? मी म्हणालो 24 पोस्टर्स आहेत. ते म्हणाले, एक काम करा… 4-5 महत्वाची पोस्टर बांधा. बाकी ठेवा गुंडाळून! मीही आता इरेला पेटलो. काय झाले तरी सर्व पोस्टर्स लावायचीच असे ठरवले. सर, आपण पाहा तर खरं. असं म्हणत मी एक-एक पोस्टर उलगडून दोरीत अडकवण्यास सुरवात केली. 4-5 पोस्टर्स लावल्यावर सरांचे डोळे विस्फारू लागले.
मी शाळेतील व्हरांड्यात 10 पोस्टर्स बांधत असताना सरांचा मूड आणखी बदलत गेला. ते स्वत: आता मदतीला आले. फार छान काढलेत हो फोटो!… बांधून टाका सर्वच! 20 मिनिटात सगळी पोस्टर्स बांधून झाली. मग सरांनी माझ्यासाठी चहाची ऑर्डर दिली. आता चकित व्हायची बारी माझी होती… सरांनी मग आस्थेवाईकपणे चळवळीची चौकशी केली. जवळजवळ 1300 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम माहितीपूर्ण असल्याचा सुंदर अभिप्राय दिला. वर चमत्काराचा कार्यक्रम दिवाळीनंतर सादरीकरण करण्यास या हे आमंत्रणही दिले. चळवळीत चिकाटी व संयम ठेवून काम करण्याची शिस्त पटल्याची ही पावतीच दुसरे काय?….
–अण्णा कडलास्कर, पालघर