Categories
सत्यशोधक विवाह

सत्यशोधकी/नोंदणी विवाहांचे प्रस्थ वाढते आहे

जानेवारी - २०१२

धार्मिक विधींना फाटा देत आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी आकाश चौगुले आणि गौरी ओऊळकर यांचा विवाह बेळगांव येथील गांधी भवनात झाला.आकाश हा अंनिस कार्यकर्ते शंकर चौगुले (रा. बेळगुंदी) यांचा पुत्र व गौरी ही सुभाष फोटोज्चे संचालक सुभाष ओऊळकर यांची कन्या आहे. वधू-वरांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी वैवाहिक जीवनाची शपथ दिली. या प्रसंगी पुरोगमी पुस्तकांच्या विक्रीच्या इस्लामपूर अंनिसने लावला होता. त्यावेळी वधू-वरानी आपल्या सहजीवनाची सुरुवात पुरोगामी पुस्तक खरेदीने केली.


उस्मानाबाद जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. देवीदास वडगांवकर यांची कन्या चि. मानसी हिचा विवाह मनीष तोरंबकर यांच्या सोबत दि. 18 डिसेंबर 2011 रोजी भारतीय विशेष विवाह कायदा 1954 अन्वये नोंदणी पद्धतीने उस्मानाबाद येथे संपन्न झाला. या विवाहाचे साक्षीदार म्हणून श्रीमती सुलभा किणीकर, रिपाई (गवई गट) नेते यशपाल सरवदे आणि पत्रकार बालाजी कुलकर्णी हे उपस्थित होते. या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अंनिसचे अहमदनगर येथील कार्यकर्ते नागेश कुसळे यांचे चिरंजीव सारंग आणि प्रियांका पवार (सातारा)यांचा नुकताच नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. सारंग हा मुंबई आयआयटीमधून देशात प्रथम आला होता. या प्रसंगी पुरोगमी पुस्तकांच्या विक्रीच्या इस्लामपूर अंनिसने लावला होता. त्यावेळी वधू-वरानी आपल्या सहजीवनाची सुरुवात पुरोगामी पुस्तक खरेदीने केली.


सांगली येथील येसाई मराठी परिवाराचे कार्यकर्ते शिवाजीराव पवार (गुरुजी) यांनी आपल्या नातीच्या विवाहात जाणीवपूर्वक कालबाह्य प्रथांना फाटा दिला. अक्षता न टाकता ते तांदूळ मुकबधीर शाळेला भेट दिले. विवाहात बँड, फवारे, फटाके वाजविले नाहीत. सामान्य व प्रतिष्ठित असा भेदभाव स्वागतात केला नाही. रुखवत व भेटवस्तूचे प्रदर्शन मांडले नाही.

पवार गुरुजी व येसाई मराठा परिवाराचे यानिमित्ताने अभिनंदन! हा कालोचित बदल सर्वांनी स्वीकारावा, याबाबत वार्तापत्राला अवश्य कळवा.

वरील सर्व नवादांमपत्यास सहजीवनाच्या अंनिस परिवाराच्यातीने हार्दिक सदिच्छा!

–संपादक