Categories
व्यक्तिविशेष

सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे

ऑक्टोबर - २०१२

            सावित्रीबाई रोडे यांचा  जन्म, बालपण, शिक्षण, विवाह,  माहेर – सासरकडील नातेवाईक आणि अंतकाळ याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही.  रामोशी समाजात जन्मलेल्या या स्त्रीने सत्यशोधक  समाज परिषदा आणि अधिवेशन आयोजनात भाग घेतला आहे. त्यांनी सहा रामोशी शिक्षण परिषदा भरवून, त्या समाजात शिक्षणविषयक जागृती केली आहे. त्यांनी गुन्हेगारीचे उद्योग बंद करून मुख्य सामाजिक प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. या कार्याबद्दल त्यांना मे, 1920 मध्ये चिंचवड, पुणे येथे भरलेल्या दुसर्‍या प्रांतिक  रामोशी परिषदेत जातगंगेने ‘विद्यादेवी’ ही गौरवाची आणि समर्पक पदवी दिली.  या परिषदेच्या त्या सचिव होत्या.

            प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर, सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड 1, पृ. 555 वर लिहितात, म. फुले यांना मारण्यासाठी गेलेले आणि नंतर हृदयपरिवर्तन होऊन  स्वत: म. फुले यांचे अंगरक्षक आणि सत्यशोधक समाजाचे अनुयायी झालेले धोंडिबा रोडे  हे सावित्रीबाई रोडे यांचे सासरे  आहेत.  धोंडिबा रोडे यांचा मुलगा तात्यासाहेब रोडे हे सावित्रीबाईचे पती आहेत. त्यांना पोलीस खात्यात नोकरी होती.

            सावित्रीबाई रोडे  या इ.स. 1873 नंतर सत्यशोधक समाजाच्या एका परिषदेच्या अध्यक्ष होत्या एवढाच उल्लेख सापडतो. इ.स. 1914 मध्ये सासवड येथे भरलेल्या चौथ्या  अधिवेशनात त्या उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यांनी शिक्षण नावाचा निबंध सादर केला. त्याचे वाचन, परिषदेचे अध्यक्ष एन.जी. पवार यांच्या पत्नीने केले. इ.स. 1915 च्या दरम्यान पुणे सत्यशोधक समाजाच्या त्या सहसचिव होत्या  तर इ.स. 1925 च्या दरम्यान म. फुले यांनी स्थापना केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मूळ शाखेच्या (फुलेवाडी, भवानीपेठ, पुणे) सचिव होत्या. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे काम चांगले सुरू होते. जेधे, जवळकर, श्रीपतराव शिंदे, मुकुंदराव पाटील ही मंडळी अग्रेसर होती. म. फुले यांच्या पुतळ्याचा वाद गाजत होता. सावित्रीबाई रोडे काही मुलांना स्वत: धार्मिक विधी शिकवीत आणि उपदेशकाचे काम करीत होत्या. इ.स. 1915 मध्ये अहमदनगर येथे पाचवे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात सावित्रीबाई रोडे यांनी ‘विद्या शिकल्याचे फायदे’ हा निबंध सादर केला.

            रामोशी समाजात जन्मलेल्या सावित्रीबाई रोडे स्वखर्चाने  सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनांना उपस्थित राहिल्या. त्यांचे पती  तात्यासाहेब त्यांना प्रोत्साहन देत होते आणि सासरे धोंडिबा  यांची प्रेरणा होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे या कुटुंबाशी  घरोब्याचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे सावित्रीबाई रोडे यांनी उत्स्फूर्तपणे सत्यशोधक समाजकार्य केले. त्यांनी सहा रामोशी परिषदा भरविल्या असा उल्लेख अगोदरच झाला आहे. पहिली रामोशी शिक्षण परिषद 15 एप्रिल  1919 देवराष्ट्रे,  ता. खानापूर, जि. सातारा  येथे नानाभाऊ नाईक, सालरु नाईक यांच्या सहकार्याने भरविली.  या परिषदेचे अध्यक्ष आनाजी कुशाबा मोकाशी (उरुळी देवाची) हे होते. त्यांचे भाषण पोलीस जमादार आणि सावित्रीबाईंचे पती तात्यासाहेब रोडे यांनी वाचले.  ‘इतर जात बांधवांनी ज्याप्रमाणे शिक्षणाबाबत उचल खाल्ली आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांच्याप्रमाणेच रामोशी समाजाने जागृत व्हावे. आपण क्षत्रिय कुळातील आहोत. पण दुर्गुण आणि कुकर्मामुळे आपण अस्पृश्य व बहिष्कृत झालो.  आता सामाजिक, धार्मिक, नैतिक सुधारणा केल्या पाहिजेत.  त्यासाठी अगोदर विद्या ग्रहण केली पाहिजे.  आई-वडिलांनी मुलांना विद्येची गोडी लावावी.  मुलगा-मुलगी असा भेदभाव करु नये’.  असे मौलिक विचार मांडले आहेत.  दुसरीही प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद, चिंचवड येथे मे 1920 मध्ये भरली.  भाऊसाहेब गणपतराव चव्हाण हे अध्यक्ष तर गंगाराम काळुजी धनवटे हे स्वागताध्यक्ष होते.  तिसर्‍या परिषदेविषयी माहिती उपलब्ध होत नाही.  चौथी रामोशी शिक्षण परिषद 18 व 19 नोव्हेंबर 1921 रोजी पुणे येथे भरली.  या परिषदेचे स्वागताध्यक्ष गंगाराम काळुजी धनवटे, रा.पिंपळे हे होते.  या परिषदेत ‘रामोशी’ समाजासंदर्भात सावित्रीबाई रोडे यांनी निबंध वाचला.  या परिषदेला सोलापूर, सातारा, अहमदनगर, पुणे तसेच भोर व फलटण संस्थानातील 470 मंडळी जमली होती. रामोशांव्यतिरिक्त 600 मंडळी होती.  या परिषदेत 19 ठराव संमत झाले.

            पाचवी रामोशी शिक्षण परिषद 17 मे 1922 रोजी पेठ, ता. वाळवा येथे सावित्रीबाई रोडे यांच्याच अध्यक्षतेखाली भरली. येथील भाषणात त्यांनी रामोशी समाजाचा पूर्वेतिहास, त्यांची कामगिरी, शिक्षण याविषयी माहिती दिली. सहावी परिषद रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे भरली.  सावित्रीबाई रोडे यांचे निबंध आज तरी उपलब्ध नाहीत.

            सत्यशोधक समाजात प्रारंभापासून सर्व वर्णजातींच्या लोकांचा सहभाग होता. रामोशासारखी गुन्हेगार ठरविलेली जात शिक्षणाच्या परिघात यावी यासाठी धोंडिबा रोडे, त्यांचे पुत्र तात्यासाहेब रोडे आणि तात्यासाहेबांची पत्नी सावित्रीबाई प्रयत्नशील होते.  म.फुले यांच्या काळात लष्करातील आणि पोलिस खात्यातील मंडळींचा सत्यशोधक समाजात लक्षणीय सहभाग होता.  लष्करातील आर.एस.घाडगे, लक्ष्मणराव देसाई, शिवाजीराव देसाई, सुभेदार मेजर दर्याजीराव थोरात प्रभृति यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग होता.  पोलीस खात्यातील देवराव ठोसर, तात्यासाहेब रोडे, श्रीपतराव शिंदे, डी.आर. भोसले, किर्तिवानराव निंबाळकर, कराळे, सावंत, राणे प्रभृती यांचाही सक्रिय सहभाग होता.  1910-15 नंतर शिक्षण खात्यातील अधिकारी आणि शिक्षकांचा सहभाग वाढलेला होता.  धोंडिबा रोडे यांच्यामुळे त्या कुटुंबाला शिक्षणाचा तृतीय नेत्र प्राप्त झाला.  धोंडिबा रोडे यांनी म.फुले यांच्याबरोबर हिंडून मुली-मुलांना शाळेत आणले.  या संस्कारांमुळे त्या काळात एक स्त्री रामोशांच्या सहा शिक्षण परिषदा घेऊ शकते, ही क्रांतिकारक घटना आहे.  पहिल्याच परिषदेला बाबुराव यादव, माधवराव पवार, बापुराव भोईटे, खंडेराव माधवराव पाटील (भिलवडी), गणपतराव दाजीबा पवार, रंगराव घुले, काशिनाथ बापुजी कुलकर्णी, विश्वनाथ नारायण कुंभार, नारायण विभूते,लक्ष्मण बाळकृष्ण चितळे (तासगाव), पोलीस सबइन्स्पेक्टर वामन गोपाळ मांढरे (खानापूर), जमादार सखाराम दाजी पाटणे, दौलतराव बाबाजी पाटील, अंतीबा आबा सोनार, बाबा पाटलू पाटील, आप्पा धोंडो कुलकर्णी (देवराष्ट्रे), बाळा बाबाजी मोकाशी (गापदेर), ज्ञानोबा लक्ष्मण नाईक (कामेरी), बापू बाळा (पेठ), श्रीपतराव नाईक (आदरकी), सालरू नाईक (देवराष्ट्रे), वगैरे सत्यशोधक मंडळी आणि रामोशी समाजाची प्रमुख मंडळी उपस्थित होती.  त्या काळात सामाजिक समता निर्माण करण्याची, शिक्षण प्रसाराची किती तळमळ होती हे स्पष्ट होते.  सावित्रीबाई रोडे यांचे निबंध आज उपलब्ध नसले तरी उद्या कधी तरी ते आपल्यासमोर येतील.  त्यातील सामाजिक जाणिवा व्यापक, उदार होत्या.  नीतिमूल्यांची, समाजोन्नतीची तळमळ शंभर नंबरी होती.  हेच वास्तव त्यातून स्पष्ट दिसते.  सत्यशोधकी साहित्य प्रवाहाचे हे फार मौलिक वैशिष्ट्य आहे.  म्हणून मराठी साहित्यिकांनी हा प्रवाह, त्यातील सामाजिक आणि साहित्यविषयक जाणिवा तरी समजून घेणे आवश्यक आहे.  नाही तर साहित्यातील वर्णजातिवाद आणि दहशतवादाचा प्रतिकार कसा, कोणी आणि केव्हा करावयाचा याची उत्तरे सापडणार नाहीत.  सावित्रीबाई रोडे यांच्यापासून भटक्यांचे, उपेक्षितांचे साहित्य निर्माण झाले.  त्यांच्या चळवळीत ब्राह्मणांपासून रामोशांपर्यंत सर्वांचे सक्रिय सहकार्य होते.  भेदाभेद नव्हते.  हा महान संदेश लोकांपर्यंत पोहोचत होता.

-गौतम निकम

संदर्भ -
1. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास, खंड 1 - प्रा.डॉ.श्रीराम गुंदेकर, सत्यशोधकी साहित्य प्रकाशन, लातूर.  प्र.आ. 2010.
2. दीनमित्र - विद्यादेवी सावित्रीबाई रोडे,  21 जुलै 1995.
3. विद्यादेवी सावित्रीबाई रोडे -  जी.ए. उगले, अ.भा. सत्यशोधक समाज प्रकाशन, सातारा.  प्र.आ. डिसेंबर 2006