Categories
अंधश्रद्धा

शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर जळगाव अंनिसने उतरवले नागरिकांच्या मनातील ‘भूत’

ऑक्टोबर - २०१९

भूतबाधा झाल्याच्या संशयावरून कजगाव (ता. भडगाव) येथील 14 वर्षीय शाळकरी मुलीस कनाशी येथील एका मंदिरात उपचारासाठी नेले होते. याच परिसरात संबंधित मुलीने विजेच्या खांबावर चढून उडी घेतल्याने तिचा जीव गेला. मुलीच्या अंगात असलेल्या भुताने जीव घेतल्याचा समाज नागरिकांनी करून घेतला होता. दरम्यान, या घटनेची चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी कजगाव येथील शाळेत, गावात नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्या मनातील ‘भूत’ उतरवले.

अंनिसचे कार्याध्यक्ष डी. एस. कट्यारे, डोंबिवलीत राहणारे मूळचे कजगाव येथील मंगलसिंग राजपूत, या शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. मोरे या तिघांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रबोधन करण्याचे ठरवले होते. संबंधित मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने बडबड करीत होती. तिच्या अशा वागण्याचा गैरअर्थ नागरिकांनी काढला. तिला भूतबाधा झाल्याचा समज नागरिकांसह तिच्या कुटुंबीयांनी करून घेतला होता. यानंतर तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार न करता कनाशी येथील मंदिरात नेण्यात आले. तेथे देखील तिच्या वागण्यात काही फरक पडला नाही. अखेर 23 ऑगस्ट रोजी या मुलीने विजेच्या खांबावर चढून खाली उडी घेतल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. ही घटना घडल्यानंतर मंगलसिंग राजपूत, कट्यारे यांनी सखोल चौकशी केली. कजगाव या गावातील प्रत्येक नागरिकांच्या मनात भुताने घर केले असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या मनातील भूत उतरवण्यासाठी राजपूत, कट्यारे यांनी शनिवारी थेट कजगाव गाठले. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी गावातील सुमारे 150 महिलांनाही बोलावून आणले. कट्यारे सर यांनी मानसिक आजार, मेंदू व मेंदूचे विकार, अंगात येणे या विषयांवर मार्गदर्शन करताना काही चमत्कारांचे सादरीकरण करून दाखवले. मानसिकदृष्ट्या आजारी असलेला माणूस बडबड करतो, विचित्रपणे वागतो, अशावेळी त्यांना मांत्रिक नव्हे, तर मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावे, असे कट्यारे यांनी सांगितले. प्रबोधन सुरू असताना नागरिकांच्या मनात आलेल्या अनेक शंकांचे निरसन कट्यारे यांनी केले. आधीच लक्षात असते, तर संबंधित मुलीचा जीव गेला नसता, असे सांगत नागरिकांनी कट्यारेंसह राजपूत यांचे आभार मानले.