अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर हे आगळं वेगळं गाव. अशियातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना येथेच निर्माण झाला. पुण्यानंतर एकाच खेड्यात सर्वच प्रकारचे शिक्षण मिळणारं हे एक छोटं खेडं. माजी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं गाव. अशा या विद्यानगरीत 15 सप्टेंबर रोजी मोठा चमत्कार घडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन कर्मचारी पायी चालत शिर्डीला गेले. शिर्डी येथून अवघं 15 किलोमीटर अंतरावर. शिर्डी संस्थानचा कारभार बर्याच वर्षांपासून माननीय विखे पाटील व त्यांच्या सहकार्यांकडे आहे. मागीलवर्षी मात्र संस्थानची एक एक प्रकरणे बाहेर आली. परिणामी आज प्रशासकीय अधिकारी व्यवस्था सांभाळत आहे. गुजरात राज्यातील भाविक शिर्डीला पायी चालत येतात. त्यांचं बघून उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही गावात ही फॅशन सुरू झाली आहे.
सदरच्या महाविद्यालयातील दोन कर्मचारी शिर्डीवरून येताना पुष्पहार घेऊन आले. प्राचार्य भाटे हे निस्सीम साईभक्त असल्यामुळे त्यांच्या दालनात साईबाबांचा फोटो आहे. खरं तर शासकीय कार्यालयात कोणत्याही देव-देवतांची प्रतिमा न लावण्याचा नियम आहे. परंतु सर्वत्र त्याची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. प्राचार्यांचे साईप्रेम बघूनच ह्या कर्मचार्यांनी तो पुष्पहार दालनातील साईबाबाच्या फोटोस लावला. काही वेळेनंतर मात्र दोन फुटांचा हार साडेपाच फूट झाल्याची चर्चा परिसरात पसरली. प्राचार्यांच्या दालनाला यात्रेचे स्वरूप आले. प्राचार्य स्वत: प्रसाद वाटत होते. व या चमत्काराची महती येणार्यांना सांगत होते. गर्दी वाढतच होती. यात कुणालाही काही चुकीचे वाटत नव्हते. मात्र अंनिसचे हितचिंतक कार्यकर्ते कमलेश गायकवाड ह्यांच्या मनाला ही बाब खटकली. त्यांनी मला ह्या घटनेची माहिती दिली. मी लगेचच स्थानिक कार्यकर्ते संतोष ब्राम्हणे यांच्याशी चर्चा केली. अर्थातच संभाषण केले. सुरवातीला प्राचार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. अर्धा तास संभाषण केले. सुरवातीला प्राचार्यांनी हा श्रद्धेचा भाग असून त्यात अंनिसने हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली. परंतु अंनिसची भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली.
खरे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे ह्याची शिक्षणाच्या गाभा घटकात नोंद आहे. परवाच नवीन राष्ट्रपतींनी नेमके हेच आवाहन केले आहे. मात्र प्राचार्य भाटे सरांना याचा सोईस्कररित्या विसर पडला. स्वत:च्या सर्व श्रद्धा वैयक्तिक पातळीवर जोपासण्यास हव्या. शिक्षण क्षेत्राचं दैवीकरण करण्यात अशीच मानसिकता कारणीभूत ठरते.
हार खरोखर मोठा झाला असेल. प्राचार्य खरेच बोलतात. मात्र तो का मोठा झाला याचे कारण शोधता त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी चमत्कार झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरविली. आश्चर्याची बाब अशी की, ह्याच संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आहेत. आता इतर ठिकाणाबद्दल काय बोलावे? नेमका हाच धागा पकडून मी त्यांच्याशी चर्चा केली. तोपर्यंत ब्राम्हणे यांनी ह्या घटनेमागचा कार्यकारणभाव शोधून काढला.
सदरचा हार हा चमेलीच्या फुलांचा होता. मग मी वनस्पतीशास्त्राच्या शिक्षकांशी बोलून काही उकल होते का याचा शोध घेतला. परंतु ब्राम्हणे स्वत: प्राचार्यांच्या दालनात जाऊन आल्यामुळे आम्हा सर्वांना याचा उलगडा झाला. आपण नेहमी सुईने झेंडूच्या फुलांचा हार बनवितो तशा पद्धतीचा हा हार नव्हता. प्रत्येक फुलाच्या देठाला दोर्याने तीन-चार वेढे(गाठण नव्हे) दिलेले होते. स्त्रियांच्या वेणीसाठी मोगर्याचा गजरा बनवतात त्या पद्धतीचा हा हार होता. हा हार फोटोला लावल्यानंतर वजनाने हळूहळू वेढे उलगडत गेले. परिणामी काही इंच हार मोठा होऊ शकतो. प्राचार्यांनी मात्र ‘वितभराचं हातभर’ अशी सोईस्करपणे समजूत करून घेतली. अंनिसने मात्र स्पष्ट भूमिका घेतली.
अॅड.रंजना गवांदे व डॉ.मच्छिंद्र वाघ यांच्याशी चर्चा करून मी परत प्राचार्यांशी बोललो. आता मात्र प्राचार्यांनी पवित्रा बदलला. ह्या वादावर पडदा टाकण्याची विनंती केली. माजी शिक्षणमंत्र्यांना यामुळे अडचण येऊ शकते याविषयी चिंता व्यक्त केली. परंतु अंनिस मात्र या कथित चमत्काराची उकल करून सत्य जनतेसमोर आणणार असल्याचे सांगितले. तसेच ह्याच महाविद्यालयात प्राचार्यांसमवेत अंनिस चमत्कार सादरीकरणासह व्याख्यान देईल. प्राचार्यांनी यात तोंडी परवानगी देऊन एकप्रकारे पश्चात्ताप व्यक्त केला. आणि तात्काळ दालन बंद केले.
वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेत सत्य जनतेपर्यंत पोहोचविले. सर्वांनीच शिक्षकांस त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्राचार्यांचा खरपूस समाचार घेतला.
-कृष्णा चांदगुडे