‘स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर’चे संस्थापक संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे पंढरपूर येथे गेले असताना त्यांना एक अनाथ मुलगा गाडीजवळ येऊन याचना करताना भेटला. बापूजींनी त्याला आपल्यासोबत घेऊन आले त्याच्या रहाण्या-जेवण्याची, शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या विद्यार्थ्यांचे बापूजींनीच नामकरण केले-अशोक शंकर गोसावी आई, वडील, गाव, जात, धर्म, गोत्र काहीही माहीत नाही. तो होता फक्त एक अनाथ. ज्याचं समाजामध्ये कोणीही नव्हतं.
त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच त्याला घरच्यांचे प्रेमही साळुंखे कुटुंबीयांनी दिले. बुद्धीला पेलेल इतके शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या आयुष्यभराची भाकरीची सोयही संस्थेमध्येच करण्यात आली. त्याला संस्थेमध्ये शिपाई पदावर रूजू करून घेतले.
अशोक शंकर गोसावी-श्री.ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, वडणगे-निगवे या शाळेचे शिपाई. पण शाळेतील सर्व घटक तसेच पंचक्रोशीतीचे ते अशोकमामा. शाळा हेच घर, विद्यार्थी, शिक्षक हाच परिवार. जेमतेम शिक्षण घेतलेले मामा शाळेशी, संस्थेशी अत्यंत निष्ठा बाळगून होते. स्वत:च्या कामाबरोबरच सर्व परिसर, सर्व मालमत्ता, शाळेची बाग याचीही जबाबदारी माझीच असे ते मानत. सर्व स्टाफ वडिलकीच्या नात्याने त्यांच्याशी वागे.
संस्थेने त्यांना त्यांच्या निष्ठेची पावतीम्हणून शाळेच्या आवारामध्येच घर दिले होते. निवृत्तीनंतरही ‘शाळा माझी, मी शाळेचा’ हे तत्त्व त्यांनी नेहमीच अखेरपर्यंत जपले.
या अशोकमामांचे निधन 10 जानेवारी 2012 रोजी झाले. जात-पात, धर्म-गोत्र या कोणत्याही ओळखीशिवाय जगलेला एक ‘माणूस’ त्या ओळखीशिवायच निघून गेला. शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक मा.आर.डी.पाटील, पर्यवेक्षक जे.डी.पाटील सर, संस्थेचे सहसचिव मा.चव्हाण सर तसेच बापूजी साळुंखेचे नातू श्रीराम साळुंखे हे अंत्ययात्रेमध्ये सामील होते. विधी पार पडल्यानंतर तिसर्या दिवशी रक्षाविसर्जनाचा व एकूणच सर्व विधी पूर्ण करण्याचे ठरताना साळुंखे सरांनी सुचविल्यानुसार ‘मूठभर रक्षा श्रद्धेसाठी’ या उपक्रमातून मूठभर रक्षा नदीमध्ये अर्पण करून उरलेली रक्षा शाळेची जी बाग त्यांना प्राणाहून प्रिय होती त्या बागेमध्ये टाकण्याचे ठरले. त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे त्यांचे बंधू डॉ.शरदचंद्र साळुंखे या उपक्रमासाठी मंजुरी देऊन शाळेतील परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांना पाठबळ दिले. अंतेष्टीला आलेला जनसमुदाय ‘मनुष्य कोठे जन्मला यापेक्षा तो कसे जगला? हे महत्त्वाचे असल्याची साक्ष होता. स्वामी विवेकानंदांच्या नावाने कार्यरत असणारी ही शिक्षण संस्था-“शाळा केवळ नसे इमारत देई जीवनमूल्ये शाश्वत” या उक्तीचे मूर्तीमंत उदाहरण ठरली आहे याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
– सुजाता म्हेत्रे