फेब्रुवारी 2012. एक बातमी. मला आव्हान देणारी. एप्रिल 2012 मध्ये आंबेवाडीची लक्ष्मी यात्रा. माझ्या गावी यात्रा? गेली 37 वर्षे जेथे बेळगाव अंनिस कार्यरत आहे तेथे जत्रा? मी अंनिसचा पूर्णवेळ कार्यकर्ता. याच गावचा; ज्यानं अंनिससाठी अनेक संकल्प केले; अनेक अभियाने राबविली. अडीच हजारांवर व्याख्याने दिली. शेकडो चमत्कार प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम सादर केले. 50 वर पुस्तके लिहली. चाळीस पुरस्कार मिळविले असा मी! आणि माझ्या गावी गरीबांना गरीब करणारी जत्रा होणार! माझ्यापुढे हे एक मोठं आव्हानच.
जानेवारी, फेब्रुवारी 2012 च्या दरम्यान आंबेवाडी गावाची लक्ष्मीदेवीची यात्रा एप्रिल महिन्यात होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेकांनी कुत्सीतपणे विचारलं, ‘काय गुरूजी, आता कसं? आता कसं?
मी काही नागरिकांच्या भेटी घेतल्या. आता गाव 100% शिक्षित झालं असल्याने जत्रा बंद पाडण्याचं काम सोपं जाईल असं मला वाटलं होतं. पण झालं उलटं प्रत्येकजण म्हणू लागला, ‘गुरूजी, करणारे करेनात जत्रा! मी नाही करणार! आणि गुरूजी सांगतो, पन्नास टक्के कुटुंबं याच्यात भाग घेणार नाहीत एवढं मात्र नक्की!
तरीपण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे जत्रेच्या तयारीच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. 1965 ला एकट्याने टक्कर दिली. जत्रा बंद पाडली. पण आज ते माझ्याच्याने शक्य होईल असे वाटेना. कारण वय वर्षे आहे एक्याऐंशी. आता मन खंबीर आहे पण शरीर साथ देत नाहीय. थोडसं अधिक टेन्शन घेतलं तर मेंदू थकतो. गावाशी विरोध कशाला म्हणून जत्रा नको म्हणणारेही मला साथ देण्यास तयार नाहीत.
‘बहुतेक जत्रा होणार. काय करावे बरे!’ विचार केला आणि एक अनोखा उपाय शोधला. बेळगावचे थोर समाजसुधारक कै.बहिर्जी शिरोळकर यांनी स्वातंत्र्यापूर्वी अंधश्रद्धेवर पोवाडे लिहून व गाऊन जनजागर करून तीनशे शाळा काढल्या, गावागावातील लक्ष्मी यात्रा बंद पाडल्या. ते पोवाडे हस्तलिखीतातच होते. त्याचं मी पुस्तक काढलं होतं. दोन हजार प्रतींपैकी पंधराशे प्रतींची विक्री झाली होती. निर्मिती खर्च जाऊन थोडा नफाही झाला होता. पाचशे प्रती शिल्लक होत्या. विचार केला सदरहू पुस्तकाच्या तीन चारशे प्रती गावात वाटून टाकायच्या मोफत. विचार पक्का झाला आणि हायस्कूल विद्यार्थ्यांमार्फत तसेच युवकामार्फत प्रती वाटल्या. आणि प्रत्येकाला एवढंच सांगितलं ‘वाचा आणि विचार करा’ त्याचा योग्य तो उपयोग झाला. गावात दवंडी पिटली गेली. ‘ही जत्रा नव्हे हा एक उत्सव आहे. जे लक्ष्मी देवीचे नवीन मंदिर उभारलं आहे त्या मंदिरात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची आहे. त्यानिमित्त चार दिवभ भजन, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तेव्हा जत्रा म्हणून पाहुण्या-रावळ्यांना बोलावून आहेर, माहेर, जेवणावळी करून कर्जबाजारी होऊ नये होऽऽऽ!’
दवंडी ऐकून मला खूप बरं वाटलं. त्यातील कर्जबाजारी होऊन हा शब्दप्रयोग मला खूप आवडला. त्याबद्दल मी पंचांना धन्यवादपर पत्रंही लिहिली. हे पुस्तक वाटल्यामुळे झालेलं परिवर्तन. मला मिळालेलं हे अर्धवट का होईना फार मोठं यश. आणि तेही दुसर्यांदा मिळणारं यश; तेही माझ्या गावी. 25 मार्चला मी माझी ऐपत नसतांना रू.दहा हजारांची पुस्तके वाटली. तीही मोफत. ते पाहून माझे काही मित्र म्हणाले, ‘तुमच्यातला अव्यवहारीपणा जात नाही गुरूजी!’
‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. तेव्हा मी मेल्यानंतर जाईल ही खोड!’ मी हसत उत्तर दिले. 25 मार्चला मी मोफत पुस्तकं वाटली आणि 4 एप्रिलला एक धडाकेबाज बातमी प्रसारीत झाली, ‘मराठीच्या विकासासाठी महाराष्ट्राचा निधी जाहीर. दीड कोटीसाठी लाभार्थींची निवड. ‘सीमा भागातील ग्रंथालये, साहित्य संघ, शाळा’ ना मदत. त्यात व्यक्तीगत मदत केवळ मलाच जाहीर झालेली. ‘नारायण अतिवाडकर अंनिस बेळगाव एक लाख रूपये.’ लक्ष्मीदेवीच्या यात्रेचं स्वरूप भयंकर असतं. रेडा बळी देणे, बकरी बळी देणं. सात दिवस केवळ देवी देवी देवी. या सात दिवसांत पाहुण्या राऊळ्यांची गर्दी झालेली असते. एकेका कुटुंबाला दोन-तीन लग्नांना येणारा खर्च या जत्रेसाठी करावा लागतो. 50% कुटुंब कर्जबाजारी होतात. तसा प्रकार या उत्सवात झाला नाही. या काळात मी शंभर एक व्यक्तींची लघुमुलाखत घेतली. त्यातील 75% व्यक्तींनी जत्रेत सहभाग घेतलाच नव्हता. 25% च कुटुंबे यात सहभागी झाल्याचे आढळले. म्हणजे ही जत्रा झाली तरी फार मोठी हानी झाली नाही.
असो सूर्यास्ताकडे वाटचाल चालू असताना मला मिळालेलं हे फार मोठं समाधान देणारं यश आहे.
– नारायण अतिवाडकर