Categories
वेचक-वेधक

तीर्थक्षेत्रे की कत्तलखाने?

मे - २०११

भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही विशिष्ट दिवसांना कमालीचे धार्मिक महत्व असते. त्या दिवशी अक्षरश: लाखो लोक त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जमतात. हल्ली तर दळणवळणांच्या सुलभ सोयीमुळे या तीर्थक्षेत्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र त्या प्रमाणात त्या तीर्थक्षेत्रांवरील सुविधा अत्यंत अपुर्‍या असतात. त्यामुळे तेथील त्रोटक सुविधांवर प्रचंड ताण पडून विविध अपघात, रोगराई पसरते. पण त्यापेक्षाही तेथील गर्दीमुळे होणार्‍या चेंगराचेंगरीत हजारो सामान्य माणसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन वर्षांतील अशा काही ठळक अपघातांत मृत्यू पावलेल्यांच्या संख्येकडे नुसती नजर टाकली तरी या अपघातातील भक्तांनी चुकविलेली भक्तीच्या भयानक किंमतीची कल्पना येईल.

            15 जानेवारी 2010 ला शबरीमला मंदिर 102 मृत्यूमुखी, मार्च 2009 कृपालू महाराजांच्या आश्रमातील चेंगराचेंगरीत 63 लोकांचा मृत्यू, 30 सप्टेंबर 2008 जोधपूर येथील चामुंडा मंदिर 200 जणांचा मृत्यू, 3 ऑगस्ट 2008 नैनादेवी मंदिरातील चेंगराचेंगरीत 150 भक्तांचा मृत्यू, 27 मार्च 2009 मध्य प्रदेशातील केराला गावात 8 लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील मांढरदेवी जत्रेवेळेस 340 जणांचा मृत्यू, ऑक्टोबर 2007 मध्ये गुजराथमधील पावागढ येथे 11 लोकांचा मृत्यू, जगन्नाथ पुरीच्या यात्रेच्या वेळेस जुलै 2008 मध्ये 6 लोकांचा मृत्यू, जुलै 2008 मध्ये दुर्गा मलेश्वर मंदिर(आंध्र प्रदेश) येथे 6 लोक मारले गेले. त्याचबरोबर या देवस्थानांना, जत्रा-यात्रांना, बुवा-बाबांच्या दर्शन-प्रवचनांना जाताना होणार्‍या रस्त्यावरील वाहनांच्या अपघातांच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. या अपघातातूनही प्रचंड जीवितहानी होत आहे, याचीही नोंद घेतली पाहिजे.

            भक्तीमार्गावरील या जीवघेण्या खाचखळग्यांची जाणीव प्रशासनाला आणि भक्तांना होवो हीच सदिच्छा!

राजीव देशपांडे