आध्यात्मिक केंद्र व आध्यात्मिक पुरूष किंवा गुरू यांना भक्तांनी वा शिष्यांनी प्रश्न विचारू नयेत अशी आपली परंपरा. पण इथेच सगळा घोळ आहे. कारण एका खर्या अध्यात्माबरोबर शंभर फसवी अध्यात्मे तयार होतात. म्हणून खरे अध्यात्म व फसवे अध्यात्म यातील फरक समजावून घेणे अनिवार्य होते. प्रतीवर्षी आमच्या विशेषांकात एका आध्यात्मिक केंद्राचा चिकित्सक लेखाजोखा घेतला जातो. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरू पीठाची माहिती घेण्यासाठी लातूरचे पत्रकार रामकुमार रायवाडीकर यांना विनंती केली. त्यांनी शोधलेला फसव्या अध्यात्माचा हा रिपोर्ट.
दिंडोरीचे अ.भा.श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग आणि श्री.त्रिंबकेश्वर येथील अ.भा.श्री.स्वामी समर्थ गुरूपीठ ही तथाकथित अध्यात्मिक केंद्रे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. येथील सेवा कार्य व आध्यात्मिक कार्य यांचा मोठा बोलबाला आहे. येथे नेमके कोणते कार्य चालते या कुतुहलापोटी पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरचे गुरूपीठ गाठले.
विस्तीर्ण अशा 21 एकर जागेपैकी 11 एकर जागेत त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ गुरूपीठाचे बांधकाम क्षेत्र आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच फोटो व फोन बंदीची सक्त सूचना आहे. खरं तर अध्यात्मिक सेवा व ज्ञान सर्वांना वाटण्याची मुक्त गोष्ट. इथं ही बंदी कशाला? अध्यात्मिक क्षेत्र अतिरेक्यांच्या घुसखोरीची जागा नव्हे. येथील कुठल्याही स्थानाचे वा निसर्ग ठिकाणाचे फोटो काढता येत नाहीत. तसेच फोन वापरता येत नाही. गुरूपीठातर्फे तिथल्या स्थानांचा फोटो उपलब्ध करून दिला जात नाही. भक्ताला, किंवा पर्यटकाला कोणत्याही स्वरूपाची लिखीत वा तोंडी माहिती दिली जात नाही. उलट तुम्ही सेवेकरी व्हा, तुम्हाला सगळं कळेल असा उपदेश केला जातो. सेवेकरी म्हणजे गुरूपीठ क्षेत्रात आपापले नेमून दिलेले काम करणारे लोक. ठराविक प्रकारचे काम ठराविक पद्धतीने करणारे हे सेवेकरी म्हणजे गुरूपीठातील सैनिकच. मात्र पर्यटनासाठी व दर्शनासाठी आलेल्या भक्तांची सतत आवक-जावक जाणवली. येथील स्टॉलवरील साहित्य खरेदी करता येते तसेच ठराविक वेळात महाप्रसादही मिळतो.

गुरूपीठातील वेगवेगळ्या विभागाच्या इमारती बांधून पूर्ण झाल्यात. भावी उपक्रमात 6500 चौ.मी.क्षेत्राचा अन्नछत्र विभाग, 625 चौ.मी.चे मातृतीर्थ, 900 चौ.मीटरची भव्य गोशाळा व निसर्गोपचार केंद्र यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. गुरूपीठात श्री.स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान आहे. तसेच सद्गुरू प.पू.मोरे दादा स्मृतीस्थान, सद्गुरू प.पू.पिटले महाराज स्थान, भव्य सभामंडप, वटवृक्ष, श्री.स्वामी समर्थ महाराज वेदअध्ययन, यशभूमी, सेवेकरी निवास, मुद्रणालय विभाग, आयुर्वेद विभाग, बालसंस्कार विभाग आणि वास्तुशास्त्र, ज्योतिष व तत्सम शास्त्रविभागाच्या प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था येथे पूर्ण झालेली आहे. या विभागातर्फे व्यक्तीमत्व विकासाचे समाज उपयोगी कार्य चालत असावे अशी अपेक्षा होती. पण येथे जे चालते ते पाहून भ्रमनिरासच झाला. येथे दृष्टीस पडला तो सगळा अंधश्रद्धांचा बाजार.
या तथाकथित अध्यात्मव्यवहाराची माहिती देणार्या पुस्तिका, सी.डी., डी.व्ही.डी. तसेच आयुर्वेदिय औषधे व नित्य वापरायच्या वस्तू, यंत्र-तंत्र साधने आदींच्या विक्रीची व्यवस्था असणारे स्टॉल्स येथे दिसले. प्रत्येक अध्यात्मिक गुरू हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैद्यकीय तज्ञ असल्याचा आव का आणतात ते कळत नाही. कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारे बाबा, गोमूत्राची महती सांगणारे बाबा, भारतभर थैमान घालीत आहेत. अध्यात्माच्या नावाखाली आरोग्य क्षेत्रात अव्यापारेषु व्यापाराची चलती आढळते. हे गुरूपीठही त्याला अपवाद नाही.
मुख्य दरबार – अंधश्रद्धांचा प्रचार
गुरूपीठाच्या मुख्य दरबारात श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या एका बाजूला प्रांगणात शिवाजी महाराज, भारतमामा व म.गांधी यांची भव्य तैलचित्रे मांडलेली आहेत तर दुसर्या बाजूला प्रांगणात संत तुकाराम, श्री.कृष्ण व ज्ञानेश्वर यांची तैलचित्रे आहेत. स्वामी समर्थांच्या मूर्ती शेजारी काही अंतरावर कालभैरव, रेणुकामाता इ. देवदेवता व पंचमुखी हनुमान यांच्या मूर्ती आहेत. खरं तर हनुमान हा शक्तीदेव तर कालीमाता शौर्याचे प्रतीक, गांधीजी सत्य हाच देव मानणारे आणि श्रीकृष्ण व ज्ञानेश्वर कर्मयोगाची महती सांगणारे पण त्यांच्या शेजारी गुरूपीठात विविध समस्यावरचे उतारे व दृष्ट काढण्याची नारळ, बाहुली, मोरपंख अशी साधने व सत्यनारायणासारख्या विविध पूजेची साधने मांडलेली दिसली. हीच साधने स्टॉलवरही उपलब्ध आहेत. म्हणजे शौर्य, धैर्य, ऊर्जा व अंधश्रद्धा एकाच रांगेत. हे कसले अध्यात्म? याच दरबारातील प्रकाशन विभागाची जाहिरात दिसली. ती अशी-1)“सेवा श्री.गायत्री मातोश्रीची” याच्या नित्य पठणाने आर्थिक भरभराट होते, विवाह जमतात, शिक्षणात प्रगती, रोजगार मिळतो इ. 2)‘श्री.ललित, सहस्त्रनाम स्तोत्र’ याच्या नित्य पठणाने सर्व व्याधींचे शमन होते. 3) ‘सवो श्री बटूक भैरवाची’च्या नित्य पठणाने शत्रू विनाश होतो. (भारत सरकारची आरोग्य व संरक्षण खाती आता बंद करायला हरकत नाही. सद्या देशात भ्रष्टाचाराचं गंभीर संकट उद्भवलं आहे. त्यासाठी अण्णा हजारे जीवाचं रान करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाची आता काहीच गरज नाही. गुरूपीठ सरळ दिल्लीला घेऊन जावं आणि मनमोहनसिंगाच्या टीमनं हिमालयात टुरला जावं. चिंता नाही.)
आध्यात्मिक दहशतवाद
मुख्य दरबारासह संपूर्ण गुरूपीठ परिसरात एक सूचना ठळकपणे अधोरेखित केलेली दिसली. महाराजांना त्रिवार मुजरा करावा; हार, नारळ, प्रसाद ट्रेमध्ये ठेवावा, पुण्यांजलीसाठी दिलेले फूल खाली पडल्यास ते पुन्हा उचलू नये. प्रत्येक सेवेकर्याने 11 माळी श्री.स्वामी समर्थ जप व श्री.स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमश: 3 किंवा 7 अध्यायाचे वाचन केलेच पाहिजे!” अशी आहे गुरूपीठातील व्यक्तीपूजा व आध्यात्मिक हुकुमशाही!

गुरूपरंपरेचे दैवतीकरण व उदात्तीकरण
त्र्यंबकेश्वर व दिंडोरीप्रणित गुरूपीठाचे माहितीपत्रक मिळाले. त्यात विष्णू, कृष्ण व दत्तगुरू आणि त्यांचे तथाकथित मानवी अवतार यांचे उदात्तीकरणाचा अतिरेक वाचायला मिळतो. पत्रकात मध्यभागी श्री.स्वामी समर्थ तर उजव्या बाजूस प.पू.मोरे दादा तर डाव्या बाजूस प.पू.गुरूमाऊली आण्णा मोरे यांचे फोटो आहेत. समर्थांच्या पाठीशी नृसिंह सरस्वती, त्यांच्या पाठीशी श्रीपाद वल्लभ, त्यांच्या पाठीशी श्री.गुरूदत्त. शिरोभागी विष्णू, कृष्ण व शंकर अशी ही चित्ररचना अवतार महती दर्शविते. देवाने मानव अवतार धारण केल्यावर पुढचा क्रम असा- स्वामी समर्थ सलग 229 वर्षे भारताच्या पूर्वेकडे व भारतात भ्रमण करून 1378 मध्ये आंध्र प्रदेशात आले व श्रीपात वल्लभ नावाने पुढे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करत राहिले. 1528 मध्ये विदर्भात येऊन तेथे 100 वर्षे नृसिंह अवतारात कार्य केले. नंतर 1678 मध्ये परत स्वामी समर्थ हा मूळ अवतार धारण केला. 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले. तेथील अवतार कार्यात भक्तांच्या दु:खाचे निवारण करीत राहिले. मात्र कोणालाही खेटे किंवा वार्या करायला लावल्या नाहीत. त्यांनीच पुढे पिटले महाराजांना व पिटले महाराजांनी प.पू.मोरे यांना दिक्षा देऊन स्वामी समर्थांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. प.पू.मोरे महाराजांनी प.पू.आण्णा मोरे यांना दिक्षा दिली. त्यांनी दिंडोरी व त्र्यंबकेश्वर गुरूपीठाचा विकास केला व संपूर्ण भारतात व जगात स्वामी समर्थांचे अध्यात्म कार्य पोचविले. काय आहे या अध्यात्माचे स्वरूप? गुरूपीठाच्या मुद्रणालयातून प्रसिद्ध झालेला समर्थ प्रकाशनचा ‘ज्ञानदान’ हा 300 पानाचा ग्रंथ वाचला. या ग्रंथाचे 3 भाग असून प्रत्येकाचे देणगीमूल्य 100 रू. आहे. भाग 1 मध्ये स्वतंत्र अशी 53 प्रकरणे आहेत.
ज्ञानदानमधील अज्ञानदान
हा ग्रंथ तपशिलात वाचला आणि त्यातील विपर्यस्त ज्ञान व अंधश्रद्धांचे समर्थन वाचून धक्काच बसला. काय लिहिलंय या ग्रंथात?
वेदमाता श्री.गायीत्री व अशाच इतर लेखांमध्ये गायत्री मंत्रसाधनेचे महत्व विशद करणारी मान्यवरांची मते दिली आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मदनमोहन मालवीय व डॉ.राधाकृष्ण यांनी या मंत्राचे समर्थन केल्याचा उल्लेख आहे. ‘मुस्लिमांनी एका हातात कुराण व दुसर्या हातात तलवार घेऊनच मानवतेला काळीमा फासला जाईल एवढ्या क्रूरतेने, जबरदस्तीने धर्मांधतेनेच धर्मप्रचार केला. ख्रिश्चनांनी परोपकाराचे नाटक करून, अमिष दाखवून, आदिवासी, अज्ञानी जनतेला फसवून बुद्धीभेद करून व अनेक ठिकाणी जबरदस्तीने धर्मप्रचार केला. बौद्ध तर अहिंसामार्गीच होते पण त्यामुळे भारत गुलामगिरीत गेला. संसार त्याज्य आहे या बुद्ध विचाराने समाजात अनाचार व व्याभिचार बोकाळला असे लिहिले आहे. शंकराचार्याची मात्र या ग्रंथात भलावण केली आहे. इतर धर्मियांचा द्वेष व हिंदू धर्माची भलावण हा विचार भारतीय घटनेचा अव्हेर करतो. म्हणून तो गंभीर आहे.
मनोवांछित संतती?
या ग्रंथात ‘मनोवांछित संतती’ या शिर्षकाचा लेख आहे. त्यात मुलगा होणार की मुलगी याची लक्षणे दिली आहेत. रजोदर्शनात रज बलवान असेल तर मुलगी, वीर्य बलवान असेल तर मुलगा होतो असे म्हटले आहे. सोमवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवार या दिवशी समागम करावा. इतर दिवशी समागम केल्यास संतती दरिद्री निपजते. गर्भ स्थापनेच्या वेळी पुरूषाने अंर्तकुंभक केल्यास मुलगा व बाईने ते केल्यास मुलगी पण दोघांनीही बर्हिंकुंभक केल्यास मुलगी होते. समागमात डोके पूर्वेकडे व पाय पश्चिमेकडे केल्यास मुलगा व उलट स्थितीत मुलगी होते. दक्षिणेकडे डोके व उत्तरेकडे पाय केल्यास मुलगा, उलट स्थितीत मुलगी होते.
गर्भात कन्या की पुत्र?
ज्ञानदान ग्रंथात गर्भ मुलाचा की मुलीचा याची पण लक्षणे सांगितलीत. मुलगा असेल तर स्त्रीचा उजवा डोळा डाव्या डोळ्यापेक्षा जड व मोठा वाटतो. मुलगी असल्यास दोन्ही डोळे सारखे दिसतात. स्तनाग्रे निळसर दिसणे पुत्रदर्शक व काळसर दिसणे कन्यादर्शक. उजवा स्तन मोठा दिसणे व दाबल्यास त्यातून पांढरा व पातळ चीक निघणे व तो चकाकणे आणि पाण्यात टाकल्यास तळाशी जाणे हे पुत्र दर्शक तर डाव्या स्तनातून पिवळा व चिकट द्रव निघणे, तो सुकल्यावर न चकाकणे व पाण्यात टाकल्यास तरंगणे हे कन्यादर्शक समजावे. असे आहे ‘ज्ञानदान’ गर्भशास्त्र.
विविध समस्या व संकटावर उपाय
पती-पत्नी घटस्फोटापर्यंत प्रसंग आल्यास रोज एक या प्रमाणे 108 पारायणे रूक्मिणी स्वयंवर व 108 पारायणे नल दमयंती भाग-दोन ही करावी. चार दिवस पाळीचे सोडावे, त्याचबरोबर श्री.स्वामी सेवा चालू ठेवावी. हृदयविकारावर सूर्याची व ललितादेवीची उपासना हमखास फलप्रद ठरते, असेही या लेखाअंती सुचविले आहे. “डोळस श्रद्धा व अंधश्रद्धा या लेखात, ज्ञानेश्वरी, श्री.गुरूचरित्र, श्री.मनुस्मृती अशा अनेक महत्वाच्या ग्रंथात तथाकथित पंडितांनी अनेक प्रकारची अनुचित घुसडखोरी केली म्हणून, काही ते ग्रंथ त्याज्य ठरत नाहीत! अशी घुसडखोरी करणार्या पंडितांना, मानवी मूल्यांचे मारेकरी-सैतान म्हणणेच योग्य ठरेल असे सांगून, अस्पृश्यतेची पराकोटी सांगून, ती नाहीशी करण्यासाठी भगवंताला ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, चोखामेळा, गाडगेबाबा इ.अनेक रूपात जन्म घ्यावे लागले, तेव्हा कुठे ती अस्पृश्यता आता जाण्याच्या मार्गावर आहे. असे म्हटले आहे. यातील… ‘समर्थ ध्यास-अनुसंधान’ या लेखामध्ये श्री.समर्थ अखंड मानसिक जप, ध्यास, अनुसंधान नियमित सुरू झाले की, मग महाराज परमश्रद्धावान सेवेकर्यांच्या कुटुंबाला कधी घरात, कधी उपासनेच्या वेळी, कधी स्वप्नात, कधी जागृतीत, कधी दु:खाच्या वेळी, कधी शून्य अवस्थेत, कधी रात्री, कधी दिवसा, कुठल्याही रूपात दर्शन देत राहतात. चित्त श्री.स्वामी समर्थमय नसल्यास मुलांच्या काळजीत दोन-तीन वर्षे माता पिता बसतात. अनुसंधानात मनाचा पूर्ण लय असेल तर, मुलींचे लग्न लवकर जमून, अनपेक्षितपणे चांगले स्थळ मिळून, कमी खर्चात कार्य आटोपते, असे सांगितले आहे. “ऋग्विधान” या लेखातील 101 ऋचा देऊन, त्याच्या पठनानंतर फलप्राप्ती सांगितली आहे. यातील पृष्ठ 149 वरील 57 वे सुक्त रोज एकवेळ नियमित प्रात:काळी पठण केल्यास, 6 महिन्यानंतर रत्ने, सोने, वस्त्र, धन यांचा लाभ सुरू होतो. अर्थातच या सर्व माहितीचा विनियोग भगवान श्री.समर्थ महाराजांच्या कृपा हवाल्याचा दिला आहे. तसेच, 61 व्या सुक्तामध्ये वंध्या स्त्रीने सदर सुक्ताचे 1 लक्ष पाठ शिव मंदिरात केल्यास, तिलाही भाग्यवंत व आयुष्यमान अपत्याचा लाभ होतो.
या “ज्ञानदाना”मधील पृष्ठ 169 वरील एका लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण 20 समस्यांवर उपाय सांगितलेत. जप, माळी, पारायणे, नामस्तोत्र आदी 11, 108 ते 12 लाखापर्यंत असे 120 दिवसांपर्यंतचे विधी सुचविले आहेत. अशा समस्यामध्ये शिक्षण, संतती, विवाह, कोर्ट दावे, कर्ज धनप्राप्ती व परदेश गमन आदींचा समावेश आहे. या ग्रंथात सेवक-भक्तांसाठी या मार्गाच्या, आचारसंहितेचा एक स्वतंत्र लेख आहे. तो 51 नियम-अटीमध्ये आहे. यातील 12 व्या क्रमांकात, या सेवा मार्गात येताना मुळचे सर्व सोडून यावे. एकदा या मार्गात आल्यावर, पुन्हा कोणाच्याही पायावर डोके टेकवू नये! संहितेत प्रत्येक सेवेकर्यांने दर 10 वर्षाने, श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली हा विधी आपल्या पितरांच्या मोक्षांसाठी करावा. तसेच, तिथीनुसार न जमल्यास भाद्रपदात पित्तरांचे श्राद्ध करावे. आणि 30 व्या संहितेत सेवेकर्यांनी आपल्याला मिळणार्या उत्पन्नाचा काही भाग महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमितपणे आपल्या केंद्रात जमा करावा. तर 32 व्या क्रमांकात सेवेकर्यांनी केंद्रातील 11 उत्सवात तन, मन, धनांसह सक्रिय सहभागी व्हावे आणि दरमहा 11 तरी नवीन सेवेकरी घडवावेत. (हे म्हणजे सेवेचे मल्टी मार्केटिंग झालं.)दिंडोरी प्रणित साहित्य, लुंगी, केस, कुंकू, सौभाग्य अलंकार, काचेच्या बांगड्या आदी येथेच खरेदी करावे. या ग्रंथांच्या शेवटी “यंत्र विभाग” नावाचे एक स्वतंत्र दीर्घ प्रकरण दिले आहे. यामध्ये प्रयोगाला धूप-दिप चालू असणे आवश्यक आहे. यंत्र लेखन गुडघ्याचा आधार घेऊन केव्हाही लिहू नये. बेंबीपासून, खालील भाग निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. यामध्ये स्वतंत्र 26 यंत्रांचा समावेश असून, त्याचे विश्लेषण अंक-आकडे, अक्षर अशा स्वरूपातील संमिश्र कृतिचित्रही दिलेली आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे सुलभ प्रसुतीकारक चक्रव्यूह यंत्र आहे. प्रसवासन्न स्त्रीस प्रसुतीकष्ट न होता, या यंत्रामुळे सुखकारकता येणारे हे अत्यंत प्रभावशाली यंत्र सांगितले आहे. त्याचबरोबर या ज्ञानदान ग्रंथामध्ये, काही स्वतंत्र चौकटी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये मद्यपान, व्यसनमुक्ती विषयी कारल्याच्या 11 बिया, कडक वाळलेल्या आंब्याच्या एकाकाईचा गर, 10 ग्रॅम खसखस, 7 लवंगा, थोडा कात एकत्र करून बारीक वाटून दुधात घट्ट भिजवून, वाटाण्याच्या आकाराच्या त्याच्या 50 गोळ्या करून, रोज 3-3 तासांनी एक याप्रमाणे त्या गोळ्या पाण्याबरोबर घेणे. रोज 5 गोळ्या हे 10 दिवसांचे औषध झाले. त्याचबरोबर, रोज एक लिंबाचे सरबत प्यावे आणि न चुकता रोज धुमावती तिर्थ घ्यावे असे सुचविले आहे. याचबरोबर परिक्षेत यश प्राप्तीची एक चौकट दिली असून, परिक्षेच्या अगोदर 3 दिवस जेवढे पेपर असतील तेवढ्या दुर्वा उजव्या हातात घेऊन, 21 वेळा श्री.गणपती अथर्व शीर्ष म्हणावे, असे सुचविले आहे. तसेच, पुत्रप्राप्ती तंत्राच्या अशाच काही विधी सुचवून गर्भ धारणेची खात्री दिली आहे. अशा या ज्ञानदान ग्रंथामध्ये श्रीकृष्ण, शिवाजी महाराज या लेखासह दिंडोरीप्रणित 67 उत्सव-वृत्तांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर, नारद पृथ्वीवर आहे की नाही? हे पाहण्याचे वार्षिक कोष्टक स्वतंत्रपणे दिले आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची स्वतंत्र माहिती चिंतनिका, सेवा केंद्राची स्वतंत्र संहिता, सचेल स्नान, स्त्रोत्र उपासना, गुरूचरित्र, कालभैरवाचा महिमा, मृत्यूनंतरचे जीवन, देवी उपासना, संख्याशास्त्र, प्रतयोनी असे स्वतंत्र लेख आहेत. सेवा वाङ्मय प्रकरणामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड भाषेतील शेकडो ग्रंथांच्या परिचयासह भूकंप शांती, यंत्रपूजन पुस्तिकेचाही समावेश करण्यात आला आहे.

“श्री.स्वामी सेवा” मधील दावे
गुरूपीठातर्फे “श्री.स्वामी सेवा” या शिर्षकाचे मासिक प्रकाशित होते. रंगीबेरंगी अशा मुखपृष्ठाच्या या नियतकालिकाचे 1 लाख वर्गणीदार असल्याचे सांगण्यात आले. याची दशकपूर्ती वाटचाल असून 100 रू. वार्षिक वर्गणी आहे. संस्थापक मोरे दादा व संवर्धक गुरूमाऊली तर संपादक म्हणून भाऊसाहेब आवटे अशी नामावली आहे. या मासिकाच्या चालू सप्टेंबरच्या अंकामध्ये एका चौकटीमध्ये, गुरूमाऊली कोणत्या वारी, कुठल्या दैनिकांमधून नियमितपणे मार्गदर्शन करतात? याची माहिती दिली आहे. तसेच, श्री.गुरूपीठावरील मासिक सत्संगात गुरूमाऊली जे अमृततुल्य हितगुज करतात, त्या अनमोल मार्गदर्शनाची व्ही.सी.डी.त्याच दिवशी आता आपल्याला उपलब्ध करून दिले जाते, अशीही एक चौकट आहे. या मासिकामध्ये “वेद विज्ञान मंत्र विज्ञान” असे एक निनावी सदर असून, त्यात वेगवेगळ्या रोग, व्याधी व संकट समस्यावर उपाय सुचविलेले आहेत, मुलीचे लग्न जमविण्यासाठी मंगळवारी गाईला गूळ व बिना मिठाची पोळी खाऊ घालावी. पुढे सव्वाच्या संख्येतील काही वस्तू सांगून, तुपाचे दोन दिवे प्रत्येक रविवारी असे सव्वा महिना जाळावे, या प्रकारच्या विधी सांगितल्या आहेत. मुलाचे लग्न होण्यासाठी रविवारी बैलांना बिना मिठाची पोळी व गूळ खाऊ घालावा, बाकी सर्व तोच प्रकार सांगितला आहे. व्यसनमुक्तीसाठी 40 दिवस क्रमाने गाईला पोळी व गूळ खाऊ घालावा. रोज संध्याकाळी 2 ते 3 चमचे गोमूत्र प्राशन करावे. यामुळे, व्यसनाची इच्छा मरून जाते असे सांगितले आहे. वेडेपणा, मनोविकार, पागलपण घालविण्यासाठी, शुक्लपक्ष ते पौर्णिमा या 15 दिवसांत रोज गोवर्या पेटवून, त्यात मध, गाईचे तूप व गुगुळ यांचे हवन करावे. रात्री 5 दिवे तेलाचे वेड्या व्यक्तीवरून, 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने उतरावेत व अंगणात जळत ठेवावेत. अशा काही बाबी सुचवून त्या क्रमाने याच पौर्णिमा कराव्यात, असे सांगितले आहे. अर्थातच पिता-पुत्र प्रेम राहण्यासाठी, अभ्यासात एकाग्र होण्यासाठी आणि संतती होण्यासाठी तोडगे सुचविलेले आहेत. या अंकात ‘वृत्तविशेष श्री गुरूपीठ’ असे एक सदर असून, त्यामध्ये गुरूमाऊलींचे 15 जुलैला दिंडोरीत गुरूपौर्णिमेस, झालेले अमृत तुल्य प्रवचन दिले आहे. त्यामध्ये, 150 कोटी या अमाप लोकसंख्येच्या देशात 150 कोटी अंत:करणात स्वामी महाराज वसविले तर कुठेही बॉम्ब हल्ले, दहशतवाद माजणार नाही व इतर कुकर्मे टळतील, असे अध्यात्मिक गुरू शक्तीचे महत्व सांगितले आहे. पुढे गुरू माऊलींनी म.गांधी व लो.टिळक यांच्या देशभक्ती व देशसेवेचे दाखले देत, गीतेतील 14 व्या अध्यायातील ब्रह्मसुत्रानुसार कायद्याची निर्मिती केली आहे. परंतु, आज अत्यंत खेदाने सांगावेसे वाटते की, आजच्या वकीलांना कायद्याची त्रोटक माहिती असते. फक्त पोट भरण्याचे साधन म्हणून ते कायद्याकडे बघतात, असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर माऊली पुढे असेही म्हणतात की, 108 समस्यावर विजयसुक्त रामबाण उपाय आहे. दुर्गासप्तीच्या उवाचास विजयसुक्त लावून, 114 दिवसांत 14 पाठ वाचल्यास, संरक्षण निश्चित मिळेल. हातात शस्त्र-अस्त्र न घेता या प्रभावी शास्त्राच्या वाचनाने, म.गांधींनी इंग्रजी सत्ता पिटाळून लावली होती, असेही गुरू माऊली म्हणतात. या मासिकामध्ये सण, व्रते, उत्सव असे एक सदर आहे. त्यामध्ये, चालू 6 ऑक्टोबरच्या विजयादशमी दसर्याचे महत्व विषद करून, त्यांच्या पूजा व प्राप्तीच्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये शाळकरी मुलाच्या वडिलांनी, आपल्या मुलाच्या जिभेवर सोन्याच्या अथवा दर्भाच्या काडीने “ऐं” काढावा व त्यास एका तांब्याच्या ताम्हणांमध्ये तांदूळ पसरून बोटाने, त्यांनी दिलेला एक मंत्र लिहावा. म्हणजे त्यास ज्ञान गुण वृद्धी होते. इतकेच नव्हे तर, त्यांनी यातील काही प्रकारांना त्यांचाच कार्यकारणभाव दिला असून, तो पौराणिक कथामधील प्रसंगाचा दाखला दिला आहे. सदर अंकात अंतरंगातील ‘स्वानुभावात’ असे एक सदर आहे, यामध्ये 10 वी परीक्षेत 99.9 टक्के गुण घेऊन राज्यातून प्रथम आलेल्या, अहमदपूर, जि.लातूर येथील कु.प्रतिक्षा दत्तात्रय बिरादार हिने, श्री.स्वामी सेवा केंद्रातून सेवेप्रमाणे परीक्षा काळात, सोबत जाताना स्वत:जवळ पांढरी कवडी, सरस्वती यंत्र ठेवल्यामुळे परिक्षेत घवघवीत यश लाभले. ते मी माऊलींच्या चरणी समर्पित करते असे लिहून, पुढे कंसात(सदर विद्यार्थिनीची गुणपत्रिका श्री.गुरूपीठात उपलब्ध आहे, असे सांगितले आहे.) असाच एक अनुभव, दत्तात्रय भागवत गिते, जेल रोड, नाशिक यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वरच्या 12 एकर शेतीतील 40 फूट विहीरीच्या 37 फुटावरील लागलेल्या पाण्याचे महात्म्य सेवा मार्ग व गुरू माऊली कृपादृष्टीत मानले आहे. समीर महादू शेळके, ठाणे यांनी म्हटले आहे की, दि.13/07/2011 च्या मुंबई येथील झवेरी बाजारातील बॉम्ब स्फोटामधून, समर्थ महाराज व गुरू माऊलींच्या आशिर्वादामुळे, मी मृत्यूच्या दारामधून परत आल्याचे म्हटले आहे.
ज्ञानदान व श्री.स्वामी सेवा या प्रकाशनातील अगाध ज्ञानाने मी ठार वेडा होण्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर सोडले व सावध चित्ताने दिंडोरीकडे प्रयाण केले.
दिंडोरी गुरूपीठाचा महिमार
दिंडोरी हा आदिवासी बहुल व पूर्वीचा अवर्षणग्रस्त तालुका. या ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणी अगदी शहराला लागूनच, मुख्य रोड शेजारी, हे अ.भा.श्री.स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग मुख्यस्थान आहे. या नावाचा एक कमानी बोर्ड रस्त्यालगतच आहे. प्रवेशद्वारावरच योग्य त्या खबरदारीत वॉचमन उभा असतो. सदर रोडच्या डाव्या बाजूस भव्य संकुल असून, त्यात सदर मार्गाच्या उत्पादित सर्व प्रकारच्या अध्यात्मिक व पूजा पाठ साहित्य विक्रीची दुकाने आहेत. सेवेकरी निवासासह, स्नान व प्रसाधनाची सोय केलेली आहे. अर्थातच, या सर्व परिसरात श्री.गुरूपीठाप्रमाणेच, फोन व मोबाईल बंदी अत्यंत कठोर-कडक व अनिवार्य आहे. येथेही सेवा व विकास मार्गाच्या अध्यात्मिकतेची रचना सारखीच आहे. तेथील भव्य अशा सभा मंडपामध्ये प.पू.गुरूमाऊलींचे प्रवचन चालू होते. अंदाजे 200 च्या आसपास स्त्री-पुरूष ते ऐकत होते. एक तासाच्या प्रवचनानंतर, स्वामी समर्थ सामुहिक नाम गजरात, सदर ठिकाणी त्याच जागेत पुरूषांच्या दोन-तीन वर्तुळाकार पाऊलांचे रिंगण करण्यात आले. तर तेथील शेजारच्या स्वतंत्र जागेतील, एका मंदिरात व एका औदुंबराच्या वृक्षास असे अन्य महिलांचे दोन रिंगण करण्यात आले होते. या 15-20 मिनिटांच्या कृतीनंतर प.पू.माऊलींच्या दर्शनास सदर सेवेकरी भक्तांची रांग लागली. त्यापूर्वी, माऊलींनी तेथील सेवेकर्यांना त्यांच्या वर्गवारीप्रमाणे, परिचय द्यावा असे उच्चारले. त्याप्रमाणे प्रश्न विभागासह कृषी, वास्तुशास्त्र, विधी आदी अनेक विभागांचे चार-पाच सेवेकरी उठून, नेहमीप्रमाणे आपल्या जागेवर जाऊन बसले. स्वत: गुरूमाऊली सदर सेवेकर्यांत, त्या-त्या तज्ञ व्यक्तींसह वकील, जज्ज वगैरे असल्याचा, मोघम उल्लेख करतात. बाकी सोईप्रमाणे येणार्या-जाणार्या सेवेकरी भक्ताची वर्दळ दिवसभर वेगळीच असते. बाकी एकूण एक मार्ग व कार्यक्रम उरतो तो, तेथील साहित्य-वस्तू सांगण्याचा व खरेदी करण्याचाच. या प्रवचन व सेवेकर्यांच्या सामूहिक नामघोषादरम्यान, सदर सभा मंडपामध्ये, प्रत्यक्ष गुरूमाऊलींच्या पुढ्यात, एक अंदाजे 7 ते 8 वर्षांची लहान मुलगी टाकून, आई वडील अतिशय विपिन्न अवस्थेत, तिच्या उशा-पायथ्याला बसले होते. सदर, मुलीच्या एका हाताला सलाईनची बाटली चालू होती, तर तिच्या नाकासही नळ्या लावलेल्या होत्या. तरीही, सर्व दरबार नित्य आपल्या सेवा कार्यात, तर गुरूमाऊली दर्शन देण्यात व्यस्त होते. ती कोण? ती कशी काय? कुठून आली? आणि येथे का आणले व तिचे पुढे काय झाले? हे केवळ त्यांना ठाऊक! इथल्या प्रवचनातील अनेक दावे तरी, असाध्य आजार बरे करतात असेच होते. त्यामध्ये, आईने पहिलीपासून ते अंतिम शिक्षणापर्यंत आपल्या विद्यार्थी मुलाच्या जिभेवर, त्यांच्या विशिष्ट विधीप्रमाणे ‘ऐं’ असे अक्षर लिहिले तर तो, अगदी आय.ए.एस.ही होऊ शकतो! तसेच, सदर दरबारात साखर व कर्करोगाच्या बिमारीतील अगदी टाटामधून परत आलेले, चौथ्या स्टेजमधील काही रूग्ण येथे बरे झाले, असेही माऊलींनी सांगितले. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या सर्व वस्तू तोड-फोड न करता शास्त्रशुद्ध करून घ्याव्यात, कारण देशाचा कारभार नीट चालावा. देशातील कोणत्याही सरकारी कार्यालयाची वास्तुशांती झालेली व केलेली नाही आणि करत नाहीत! अशी खंतही माऊलींनी व्यक्त केली. आपल्या अशा रसाळ, अमोघ, अमृतवाणी मार्गदर्शनाअंती, प.पू.गुरूमाऊलींनी, उपस्थित सेवेकर्यांनी हे ज्ञान घेऊन जाऊन, ते सर्वत्र वाटप करावे असे आवाहनही केले. सदर ठिकाणी काळ्या बोर्डावर खडूने हस्ताक्षरात, सदाफुलीच्या पानापासून मधुमेह व कर्करोगावरील हुकमी उपचाराची प्रक्रिया लिहिली होती.
चक्रावून टाकणारे अज्ञानदान
दिंडोरीचे अ.भा.श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील अ.भा.श्री.स्वामी गुरूपीठ यांचे अध्यात्म चक्रावून टाकणारे आहे. समाजाच्या एका मोठ्या स्तरामध्ये असहाय्य अशी एक कमालीची सामुहिक कळकटता निर्माण झाली आहे. आणि त्यांचे सर्वत्र बेमालूमपणे शोषण व लूट होत आहे. पुरूषार्थाला व खर्या मूल्य संस्काराला न भिडवता हे कसले उपचार? आणि कसले यांचे अध्यात्म?
व्यक्तीची जिज्ञासा व विचारप्रणाली मंद करणे, संकुचित करणे व त्यास कायम अंकित करणे हाच येथील, केंद्राचा मुख्य उद्देश संभवतो. त्याचबरोबर, मानवतावादी अध्यात्म, ध्येयनिष्ठ शूर-विचारांना दूषित करणे, राष्ट्रीय महापुरूषांच्या कर्तृत्वाचे सोईने अन्यायी व चुकीचे दर्शन करणे, लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य, संविधान व समता मूल्य अव्हेरणे, स्वातंत्र्याच्या सामूहिक राष्ट्रीय लोकलढ्यांना दुय्यम करत, अहिंसावादी मूल्यांना व त्यांच्या निर्मात्याप्रती अनादर नोंदवून, त्यांची असभ्य भाषेत निर्भत्सना करणे. एवढेच नव्हे तर दलित, आदिवास, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त व स्त्री वर्गासह, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध धर्म वा समाजाप्रती, इतर बहुसंख्यांक समाजामध्ये जाणीवपूर्वक द्वेष, सूड व हिणकस असूया बिंबविण्याची काळजी येथे घेतली जात आहे. सातत्याने विवेकवादी, विज्ञानवादी, धर्मनिरपेक्षता व मानवतावादी मूल्यांना छेद देण्याची येथे, सर्व प्रकारे काळजी घेतली जात आहे.
अशा स्वहितकारी व आत्मकेंद्री लोकांकडून अमृतवाणी प्रवचनाच्या नावाखाली मूठभरांचा संकुचित वाद आणि त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी अशी वक्तव्ये करण्यात येतात. सद्या देशभर चर्चेत असलेले “व्होट के बदले नोट” चे कर्तेकरविते खा.अमरसिंग व सिनेअभिनेत्री खा.जयाप्रदा यांनी, सहपरिवार श्री.गुरूपीठात पूजन करून प.पू.गुरूमाऊलीकडून आशिर्वाद घेतल्याचे, छायाचित्रांसह मासिकात जाहीर कळविले आहे. (अमरसिंगांना हा आशिर्वाद फळाला आलाय. त्यांना खासदार लाच प्रकरणी अटक झाली. सद्या ते जामीनावर सुटले आहेत.) या सेवामार्गामध्ये केवळ 4 उद्घोष क्रमाने करण्यात येतात. त्यामध्ये पहिले श्री.स्वामी समर्थ दुसरे पिटले महाराज, तिसरे मोरे दादा आणि चौथे गुरूमाऊली आण्णा मोरे! स्वामी महाराजांच्या सेवा व अवतार कार्यात त्यांनी कोणासही खेट्या किंवा वार्या लावल्या नाहीत असे हे सांगतात. परंतु गुरूपीठात सेवेकरी व भक्ताच्या असंख्य वार्या घडतात, हे पद्धतशीरपणे येथे नजरेआड केले जाते. इतकेच काय तर, हिमालय ते नाशिक या महामार्गामध्ये पिटले महाराजांनी तब्बल सात दशके सर्व प्रकारच्या खडतर उपासना करून, मोरे दादासारखा एकमेव शिष्य या सेवा मार्गासाठी घडविला, असे वारसात्मक भावनिक श्रेष्ठत्व स्वत:च सांगतात विज्ञानाचे नाव घेऊन अध्यात्माची डोळस सांगड घालण्याची भाषा करणार्या गुरू माऊलींच्या ग्राम अभियानाचे महत्व सांगतात परंतु त्याचे तौलनिक व सिद्ध झालेले एकही उदाहरण, सुक्ष्म अभ्यासाचा दावा करणारे काही देत नाहीत. येथे गुरू दिक्षा पद्धत नसल्याचे वैशिष्ट्य सांगत, बुवाबाजीला आणि भक्त फसवणुकीला वाव नसल्याचे सांगतात मात्र समस्याग्रस्तांच्या पात्रतेची वर्गवारी करणे, त्याप्रमाणे त्यास कर्मकांडाचे विधी देणे, पूजा-अर्चेतील दोष सांगणे तसेच करणी व भानामतीचे अस्तित्व मान्य करून, त्याच्या उतार्याची तोडगे करणे सुचविणे, नाडीवर यंत्र-सूक्ते सुचविणे. ही डोळस अध्यात्माची चेष्टा नव्हे तर काय? सेवेकर्यांचे गुरूपद धारण करणारे स्वामी महाराज हे, थेट गुरू माऊलींच्या माध्यमातून स्वत: महाराज अदृश्य स्वरूपात सेवा करतात, असे ठासून सांगणारी मंडळी ज्ञान व विसंगतीतील नाते स्पष्ट करीत नाहीत. सेवेकर्यांनी तन-मन धनांसह, अत्यंत लीन-दीनपणे सर्वस्वी समर्पित व्हावे असे गोडपणे सांगण्याची अध्यात्मात आवश्यकता का भासावी? हे समजून दिले जात नाही. डॉ.राधाकृष्णन, लोकमान्य टिळक व म.गांधी यांचा एकूण राष्ट्रीय पुरूषार्थ, वेदमाता श्री.गायत्री मंत्राला जोडतात. इतकेच काय तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींचं लोकसत्याग्रह, शहीद व हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे समर्पण, सोईस्करपणे चक्क अडगळीला ठेवून, सदर मंत्राच्या खुंटीला सर्वस्वाने बांधतात.
मुस्लिमाकडे तलवार, ख्रिश्चनांकडे आमिष अशी धर्मांतर साधने सांगून त्यास चक्क यांनी बुद्धीभेदाची उपाधी दिली आहे. परंतु स्वत:च्या बुद्धीवादाची नाळ स्पष्ट करीत नाहीत. बौद्धांच्या अहिंसावादी तत्वज्ञानाने भारत नेभळा, शौर्यहिन व गुलाम झाला असे सांगताना, महावीर वर्धमान आणि म.गांधीजींच्या अहिंसावादाची ओळख ते, अगदी कोंबड्याप्रमाणे टोपल्याखाली सवडीनुसार डालतात. तसेच, सद्याच्या ज्ञान व विज्ञानाला तथाकथित व चक्क व्याभिचारी संबोधत असले तरी, नारायण नागबली व इतर यज्ञ करणारे हे लोक, आपल्या कर्मकांडांना अनुसंधान असे गोंडस नाव देऊन, कुठलाही यांचा एखादा प्रयोग जाहीर सिद्ध करण्याचे का टाळतात? या सेवा मार्गामध्ये गर्भलिंगाचेही ज्ञान पाजळले आहे. एवढचे नव्हे तर अपेक्षित लिंग प्राप्तीचे बाष्कळ विधीही सांगितले आहेत. एकीकडे स्त्री-पुरूषांचे समाजाची विषम प्रमाण लक्षात घेता, शासनाने डॉक्टरांकडील सोनोग्राफीसारख्या यंत्रावर कठोर निर्बंध लावून, लेक वाचविण्यासाठी आपला समाज, सरकार आणि प्रशासन जीवाचे रान करीत आहेत. मात्र लिंगभेदाची लक्षणे सांगणार्या या अध्यात्मकेंद्रावर खटला भरायला हवाच. ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र यातील घुसडखोरी निषिद्ध ठरवत, डोळस श्रद्धा व अंधश्रद्धांची सोईस्कर मांडणी करत, ज्ञानेश्वर ते चोखामेळा-गाडगेबाबा पर्यंत, समाजातील अस्पृश्यता घालविण्यासाठी जन्म घेतल्याचे सांगून, ती जाण्याच्या मार्गावर असल्याचे निरूपण करणार्या, गुरूमाऊलींच्या या अचाट ज्ञानात म.फुले, रा.शाहू, डॉ.आंबेडकर, महर्षी वि.रा.शिंदे व संविधान तरतुदीचा उल्लेखच नाही. स्त्रीच्या फलप्राप्तीसाठी 101 ऋचाचामंत्र देणारे या सेवा मार्गाचे ज्ञान, केवळ एकट्या स्त्रीला उघडपणे दोषी ठरवून, तिचा छळ आणि अस्तित्वच नष्ट करणारे नव्हे काय? शिवमंदिरातील तिच्या 1 लक्ष सूक्त पठणाने भाग्यशाली व दीर्घायुषी पुत्र लाभाची हमी दिली आहे. म्हणजे मुलगी कदापीच नको! असा या ज्ञानमार्गाचा लेखी दावा आहे. या सेवेच्या ज्ञानाचे प्रयोग प्रसृत करताना वेदाचे विज्ञान असे संबोधत मंत्राचे विज्ञान बिंबविण्यात आले. यामध्ये, मुलीचे लग्न जमविण्यासाठी मंगळवारी गाईला गूळ व पुरणपोळी खाऊ घालण्याचा शोध सांगितला आहे. तर मुलाच्या लग्नासाठी हीच क्रिया बैलावर सांगितली अहे. तर व्यसनमुक्तीसाठी तब्बल 40 दिवस गाईला पोळी व गुळाचे खाद्य द्यावे अशी निरीक्षणाशिवाय कृती दिली आहे. तर, मग कृषी शेतीविषयी विशेष अभ्यास व सेवा देणार्या, गुरू माऊलींना पशूधनास गैर नैसर्गिक कृत्रिम खाद्य असे नियमित व दीर्घकाळ चारल्यास, त्यास गंभीर आजार होतील याची माहिती माऊलींना कशी नाही? परंतु, शासन व त्यांच्या कृषी खात्याच्या तज्ञांनी, मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासंबंधी तरी आता या सेवा केंद्रात कायदेशीर हस्तक्षेप करावा. गांधी-टिळक यांच्या देशभक्ती व सेवेचे हवाले देत, गीतेतील 14 व्या अध्यायातील ब्रह्मसुत्रानुसार कायद्याची निर्मिती झाली असे सांगून, वकीलांना कायद्याची अपुरी माहिती असते अशी टीका केली आहे. त्याही पुढे जाऊन, यामार्गाने 108 सार्वजनिक समस्या संबंधी, त्यांनी विजय सुप्ताचा उपाय सांगितला आहे. याचाच अर्थ असा की, 300 घटना समिती सदस्य तज्ञाचा सहभाग असलेल्या, 7 सदस्यीय मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 17 दिवस लिहिलेली, स्वातंत्र्य भारताची राज्यघटना आणि या तमाम अभ्यासकांचे कष्ट हे, सदर प.पू.गुरूमाऊलीला मुळीच मान्य नाही. तसेच गुरू माऊलींच्या संदेशाप्रमाणे जिभेवर अक्षर गिरवून काही विधी केल्याने, जर विद्यार्थी आय.ए.एस.पर्यंत यशस्वी होणार असतील तर, शिक्षणावरील समाजाचा खर्च, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सरकारचे हे स्वतंत्र खाते याची आवश्यकता आहे की नाही? याचे, पंतप्रधान व शिक्षणमंत्र्यांनी जनतेला मार्गदर्शन करावे. या मार्गातील गुरूमाऊलींच्या मासिकात एका दहावीच्या विद्यार्थिनीने येथील सेवेनुसार सरस्वती यंत्र व पांढरी कवडी ठेवल्यामुळे तिला 99.9 टक्के गुण मिळाल्याचे सांगितले खरे. मात्र, तिचा संपर्क फोन वा पत्ता जरी टाळा असला तरी, यासंबंधी अहमदपूरच्या सदर शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित लातूर बोर्डाचेही मत घेणे, गुरूमाऊलींना महत्वाचे वाटत नाही का? प्रत्यक्ष दिंडोरी दरबारात स्वत: गुरूमाऊलींच्या समोर, एक लहान मुलगी मरणासन्न अवस्थेत अक्षरश: तडफडत असताना, गुरूमाऊली दोन तास केवळ असलेच प्रवचन आणि आपले दर्शन करून घेण्यात गुंग होते. ते का? व केवळ मुलगी म्हणूनच ना? सरकारने त्यांच्या कोणत्याही कार्यालय इमारतीची वास्तुशांती किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली नाही असे सांगून, त्याच्या सुधारणांचा सल्ला दिला आहे. याचाही शासनाने खुलासा करणे महत्वाचे वाटत नसले तरी, नागरिकांचा संभ्रम दूर करणे अपेक्षित आहे.
गुरूमाऊलींच्या या सेवामार्गात येणारा भक्त हा, समाजाच्या एका विशिष्ट स्तरातील असून, बहुतांशी सामान्य आर्थिक व बौद्धिक स्तर असलेला आणि जागतिकीकरण व खाजगीकरणामुळे सेवा-रोजगार गमावलेला व शासनाने यांच्या जगण्याचीच हमी नाकारून, दुष्काळ-टंचाईसह महागाईने पूर्णपणे भांबावून मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. यामध्ये सरासरीने 40 ते 60 वयागटामधील 40 टक्केपर्यंत स्त्री-पुरूषांचे प्रमाण आहे. तर 16 ते 35 वयातील 30 टक्के विद्याथी व तरूण-तरुणींचा समावेश जाणवतो. अर्थातच कर्तृत्व दुय्यम करून परावलंबी स्वप्नातून यश व सुखाची भावी आकांक्षा बाळगणारा हा एक भयाकुल वर्ग आहे. तर या सेवा मार्गात निराधार कर्मकांड व पाखंडत्वाला विज्ञानाचा शाब्दिक मुलामा देऊन, इतिहास आणि महापुरूषांचे कार्य सोईने आपल्या दांभिकतेत माळून, श्रद्धा व भावनिकतेच्या सामूहिक संमोहनामधून, केवळ व्यवहारी लूट नव्हे तर पिळवणुकीचाच प्रकार आहे. आर्थिक निकषावर सवलतीचे सरकारला मार्गदर्शन करणार्या प.पू.गुरूमाऊलींच्या, या सेवा केंद्रात केवळ देणगीची पावती देण्यात येत असल्याचे कळते. मात्र, अन्य कुठल्याही विक्री व्यवसायात कसलीही पावती मिळत नाही. त्यांनी आपल्या कोणत्याही केंद्राचा आर्थिक लेखा-जोखा जाहीर केलेला नाही. अशा अफाट संपत्ती व व्यवहाराचा वार्षिक अर्थ आलेखही स्पष्ट व खुला का असू नये? अध्यात्म व सेवा मार्गात हे गूढ व गुप्तता का म्हणून असावी? श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा मार्गाचे, आपल्या महाराष्ट्रात असे 2-3 स्वतंत्र व प्रा.लि.अध्यात्मिक उद्योग चालतात म्हणे? तर मग वारसा संस्कृती आणि सत्य सेवा कोणती? व प्रमाण कशी मानावी? याचे शंका निरसन व्हावे. त्यामुळे, अशा प्रकारातील सर्व बाबींची सविस्तर व स्वतंत्रपणे चौकशी वरिष्ठ स्तरावरून होणे गरजेचे. त्याचबरोबर यांच्या अंत:स्थ अशा विघातक व स्फोटक लिखित व प्रचारकी कारवायावर, शासनाने कायम लक्ष ठेवून, त्यांची सत्यता, स्वच्छता, पारदर्शकता सप्रमाण सनदशीर चौकटीत नियंत्रित करावी.
विवेक आणि सत्याला पायदळी तुडवून कालबाह्य गोष्टींना मनोकल्पित मेकअप करून, आमचे हे खरे! व आमचा बाजारही निर्धोक! असाच हा प्रकार आहे. पण तुमच्या या दरबारात संत तुकारामांच्या प्रतिमेसोबत त्यांचा…. ‘तो कळवळा’ आणि संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसोबत, ‘त्यांचे ते….. पसायदान’ व गांधींजीचा सत्य हाच परमेश्वर कोठे शोधूनही सापडत नाही! त्याचे काय? सर्वात भयंकर म्हणजे वैद्यक विज्ञानाची व शरीरशास्त्राची या दरबारात पुरती वाट लागलीय. आणि हे अधिक गंभीर आहे.
–रामकुमार रायवाडीकर
(या लेखासाठी प्रकाश कांबळे, नितीन गायकवाड, गणपतराव तेलंगे व माधव बावगे, अरूण गवळी, सुधाकररराव देशमुख, प्रा.दिनकर कांबळे, प्रा.पूजा बरूरे, संजीवनीताई चिकाटे आदींचे विशेष सहाय्य लाभले. या लेखातील काही फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.)