Categories
मंथन

तूच बये दार उघड!

जून – २०११

            कोल्हापूरकरांना आपल्या पुरोगामीत्वाचा तसा मोठा अभिमान आहे. राजर्षी शाहूंचा वारसा सातत्याने सांगितला जातो. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या स्नुषा राजाराम महाराज छत्रपतींच्या पनि महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरला छत्रपतींची गादी स्थापून औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाला पाणी पाजले होते. तेव्हा गवतालाही भाले फुटले होते.

            स्वातंत्र्यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ते अनेक सार्वजनिक लढे या कोल्हापूरातून चालवून आपले वेगळे पाणी राज्यकर्त्याना दाखविले आहे. अनेक वर्षे कोल्हापूरातून विरोधी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा कोल्हापूराने जपली होती. अलिकडे डावा विचार मागे ठेऊन अन्य विरोधीपक्षाला निवडून देण्याची किमया कोल्हापूरकरांनी तशी जपली आहे.

            सद्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या (महालक्ष्मीच्या) गाभार्‍यातील स्त्रियांच्या प्रवेशावरुन वाद तयार झाला आहे. नुकतेच चपळगावकर या एका जिल्हा निवृत्त न्यायाधिशांचे व्याख्यान झाले. त्यानी परंपरा मोडून चालणार नाही असे विधान केले. निवृत्त न्यायमूर्तीनी वास्तविक राज्यघटनेचा आदर करुन आपले विचार मांडणे गरजेचे होते. पण त्यानीच घटनाद्रोह केला आहे. घटनेच्या कलम 14 नुसार भारतीय स्त्रीपुरुष कायद्याने समान आहेत. तर 15.3 कलमानुसार स्त्रिया व मुले यांना विशेष हक्क दिले आहेत. त्यात कलम 14 चा त्यामुळे भंग होत नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कलम 16 नुसार सर्वाना समान संधी देण्यात आली आहे तर 16.2 कलमान्वये नोकरीत व अन्यत्र धर्म, वंश, जात, लिंग, घराणे, जन्मस्थान अशा कोणत्याही कारणाने भेदभाव करण्यास मनाई केली आहे. पण याचा त्यानी विचार न करता न्यायमूर्ती कशाच्या दबावाखाली बोलले हे कळावयास मार्ग नाही, पण त्यांचे विचार समानतेच्या तत्त्वाविरोधात होते हे स्पष्ट दिसते. शिवछत्रपतींनी आपला पुत्र राजाराम पालथा जन्माला आला म्हणून त्यांना भीती घालण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ‘मोंगलाना पालथे करण्यास आमच्या पुत्राचा जन्म झाला आहे‘ असे निःसंकोचपणे सांगणार्‍या छत्रपतींचा सुपुत्र संभाजी व नंतर राजारामाने व त्यांच्या पश्चात रणरागिणी ताराराणीने मोंगलाना आपला हिसका याच कोल्हापूरातून दाखविला होता. आता कोल्हापूरातील एक तरुण व तडफदार राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रवेशाचा वाद तयार होताच राज्यघटनेचा आदर करुन महिलांना न्याय देण्याच्या भूमिकेतून अंबाबाईच्या गाभार्‍यात प्रवेश देण्याचा प्रश्न सर्वांशी चर्चा करुन मार्गी लावला आहे. म्हणून काहीजणांचा आता पोटशूळ उठला आहे.

            कोल्हापुरातच पूर्वी खुद्द शाहूरायांनाच खुद्द धार्मिक विधी नाकरणार्‍यांना छत्रपती शाहूरायांनी वेगळ्या क्षात्रजगत गुरूंचे करवीर पीठ स्थापन करून त्या ब्रह्मवर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून आपले धार्मिक कार्य पार पाडलेच पण पुढे जाती व्यवस्था मोडण्यासाठी सामाजिक कार्य नेटाने केले. त्याच कोल्हापुरात आज राज्यघटनेने दिलेल्या स्त्री-पुरूष समानतेच्या हक्कावर गदा आणली जात आहे. यात तेथील पुजार्‍यांचा स्वार्थी डाव आहे.

            आजचे चित्र म्हणजे हिंदू धर्माने आजवर जे अन्याय केले आहेत त्यातीलच भाग आहे.कारण हिंदू धर्माच्या अतिरेकातूनच अन्य धर्मांचा उदय झाला असा इतिहास आहे. धर्मकांड व भेदाभाव यामुळेच बौध्द धर्माचा उदय झाला व तो जगभर वाढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यामुळेच बौध्द धर्म स्विकारला होता. आंबेडकरांनी म्हटले होते की, ‘हिंदुधर्माने बौध्दिक पातळीवरुन कितीही उदात्त तत्त्वांचा घोष केला तरी त्याचा आचार हा वर्ण, जातपात,स्पृश्यास्पृश्यता असल्या विषमतेचाच असतो.’ स्त्रीयांना कमी लेखने व त्याना अपवित्र म्हणणे हेही त्याचाच भाग आहे. माधवराव बागलांनी म्हणूनच म्हटले होते की, राजा रवि वर्माची राधा-कृष्णाची, रासक्रिडेची स्त्रियांची वस्त्रे पळवणारी सारी चित्रे जप्त करुन टाकली पाहिजेत किंवा त्याचा निराळा अर्थ लावणारे प्रचारक नेमले पाहिजेत. महात्मा फुल्यांनीही हे ओळखूनच ‘निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एखादा मानव अथवा मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करु शकत नाही.’ म्हणूनच असेही म्हटले आहे की, समता स्थापन करायची तर ती एकाच बाबतीत, आणि इतर बाबतीत डोळेझाक करावी, असे करता येणार नाही. म्हणूनच आजचा बंटी पाटील यांनी शासनाच्यावतीने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण महात्मा फुल्यांनीच धार्मिक गुलामगिरी काढताना म्हटले आहे की, राजकीय सत्तेची मदत घेतली पाहिजे. कोणतीही सुधारणा घडवून आणायची तर त्यासाठी राजकीय सत्तेची मदत घेतली पाहिजे. पुण्याच्या स्वारगेटची रस्ताच्या मधे येणारी एक तुरबत काढली होती. त्यावर दुसर्‍या दिवशी रस्त्यावर फुले वाहणारा भेटला होता पण त्याला हुसकून देऊन अटक झाल्यावर सर्व शांत झाले. कोल्हापूरातही असे घडले आहे. अनेक देवळेही काढली गेली आहेत. कांहीही बिघडलेले नाही. नेताजी सुभाष चौक ( मिरजकर तिकटी) येथील एक मंदिरही हटवून दुसरीकडे उभारले आहे. खुद्द अंबाबाईच्या देवळातील अधेमधे असणारे सर्व देव व देवळे एका रांगेत आणण्याचे काम लोहिया व अन्यजणांनी केल्यावर ओरड झाली होती पण आता त्याचा लवलेशही नाही. अंबाबाईची मूर्तीही वादग्रस्त आहे. तिचे संरक्षण व पूजा एका मराठी भक्ताने करुनच तिचे संरक्षण केले आहे . तद्वतच अनेक मूर्त्या संरक्षणासाठी हलविल्याच्या ऐतिहासिक घटना आहेत.

            यातून देव मानता की नाही असाही एक अनाकलनीय प्रश्न तयार केला जातो. माधवराव बागलानी म्हटले होते की, या सामाजिक सुधारणा समाजसत्तावादाशिवाय होणार नाहीत.त्यानी रशिया व चीनची उदाहरणे दिली होती. त्यात देवाच्या नावावर अज्ञानी जनतेला फसविणार्‍या व स्त्रियांना भ्रष्ट करणार्‍या, दैवी शक्तीचा आभास निर्माण करणार्‍या धर्मगुरुंची व बोवांची गाढवावरून धिंड काढण्याची माहिती दिली होती.

            इतकेच काय येशू ख्रिस्त, महमंद पैगंबर सॉक्रेटिस अशा महान संत व धर्म संस्थापकांचा सुरुवातीला त्यावेळेच्या धर्माभिमान्यांनी धर्मद्रोही म्हणून छळच केला होता हे वास्तव आहे. मार्टिन ल्यूथर किंग सारख्यांनाही हा छळवाद सोसावा लागला होता. नव विचाराना वा सुधारणा करणार्‍यांना हे सोसावेच लागते.

            आपल्या शेजारच्या अफगाणिस्तान, इराण येथेही स्त्रियांना कमी लेखण्याचे प्रकार घडले. पण तेथील पुरोगामी शक्तीनी त्यावर मात करुन तेथील स्त्रियांनी आपले हक्क मिळविले आहेत. आज जे स्त्रियांच्या प्रवेशाला विरोध करीत आहेत ते इंग्रजांची नीती बाळगत आहेत. भेदाभेद व फूट पाडा आणि सत्ता मिळवा हे आचरणात आणीत आहेत. आज कांही कठोर निर्णय घेऊन राजसत्तेने हे करणे गरजेचे आहे. पण इंदिरा गांधी वा वल्लभभाई पटेल यांच्या सारखा कणखर व लोकांच्या विश्वासातला नेता नसल्याने काही शक्ती आपली नखे बाहेर काढीत आहेत. त्यांचा अंत निर्णायक असला तरी वाट पहावी लागेल. आजच्या स्त्रियांच्या सुधारणा टप्प्याने आल्या आहेत. म्हणून आजही तशीच वाट पहा असे म्हणणे चुकीचे ठरेल. निर्णय घेतलेच पाहिजेत.

            आजच्या कांही घटना नैसर्गिक वा मुद्दाम घडवून मत्सराने पुरुष वर्गाने स्त्रियांना बांधण्याचा चालविलेला प्रयत्न घटनेच्या विरुध्दच आहे. यातूनच मग नवा केलेला चांदीचा रथ (ज्याच्या चांदीच्या शुध्दतेबद्दल शंका तयार केली आहे) त्याचा दांडा मोडला वा निसर्ग नियमाने परिसरातील मधमाशांना दुखावल्यावर त्या चावल्यावर जणू त्या कोप झाल्याने चावल्या असे भासवून अंधश्रद्धा पसरवून ‘काक तालीय’नियमाप्रमाणे ब्रह्मवर्ग नाराज झाला व स्त्रियांच्या प्रवेशाने हे घडले असा कांगावा करु लागले आहेत व अनेक नवे वाद तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.

            वास्तविक देव देवळात आहे की नाही हा वेगळा प्रश्न आहे. अनेक संतानी ते नाकारुन स्वतः ते देवळात जात नसत अशी उदाहरणे आहेत.पण ज्यांच्या भावना आहेत त्यानी आपल्या मार्गाने देवळात जावे व दर्शन घ्यावे हे ठीक आहे. पण आजही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात स्त्रियांना प्रवेश नाकारला तर ते न्यायाच्या द़ृष्टीने अन्यायकारक होईल. स्त्रियांना प्रवेश नाकारणारे घटनेचा अपमान करीत आहेत. त्यांच्यावर व देवळात जाऊन स्त्रियांना अटकाव करणार्‍यांवर खटले भरण्याची गरज आहे.

            आजवरचा इतिहास पाहता जेथे जेथे स्त्रियांना मज्जाव झाला तेथे तेथे स्त्रियांनी आपला हक्क मिळविला आहे. अनेक देवळातून पूर्वी हरिजनांनाही प्रवेश नव्हता. त्याबद्दल गांधीजी, सावरकर, साने गुरुजी, बापट अशा अनेकांनी सत्याग्रह करुन, स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही सत्याग्रह करुन त्याविरोधात सर्वाना प्रवेश मिळवून देण्याचा प्रश्न मार्गी लावला. आजवर कोठेही अपवित्र म्हणून काहीही विपरीत घडलेले नाही. आंबेडकरांच्या भाषेत सांगायचे तर, प्रश्न देव देवळात आहे की नाही हा नसून आम्हाला प्रवेश नाकारला जातो त्या मूलभूत हक्काचा आहे. आजही तेच सर्वांचे मत आहे. समानतेला नाकारणे हा अपराध आहे. म्हणून 21 व्या शतकात धर्माच्या नावावर स्त्रियांवर बंधने घातली तर त्यास प्रतिबंध हा झालाच पाहिजे.

            हिंदू धर्माचा आव आणणार्‍याना धर्मच अद्याप कळाला नाही असे म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंद यांनीही यावर मतप्रदर्शन केले आहे. त्यापूर्वीही लॉर्ड बेंटिंगने सतीची चाल बंद केल्यावर धर्मपंडितांनी जशी कोल्हेकुई केली होती तशीच आज चालू आहे. आज सतीची चाल बंद पडल्यावर कांही बिघडलेले नाही. तर विधवा विवाह झाल्याने व बालविवाह बंद केल्यानेही कांही बिघडलेले नाही. महात्मा फुल्यांनी ज्यावेळेस स्त्रियांचे केशवपन न करण्यासाठी न्हाव्यांचा संप घडविला त्यावेळेसही धर्मात हस्तक्षेप म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला. त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा हक्कही नाकारला होता. शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्यावरही ब्रह्मवर्गाने आकांडतांडव केला होता. ज्या बाजीरावाने दिल्लीपर्यंत धडक मारुन उभा हिंदुस्थान पराक्रमाने गाजविला त्यालाही ह्या ब्रह्मवर्गाने मस्तानीशी विवाह केला म्हणून धर्माच्या नावावर त्रास दिला. जगभर कमी अधिक प्रमाणात अन्य धर्मातही अशा गोष्टी घडल्या आहेत. पोपने शेकडो वर्षानंतर माफी मागून निदान आपले चूकले हे मान्य तरी केले.पण भारतात तसे दिसत नाही. उलट आजही अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याला विरोध करुन समाजाला धर्मात अडकवून ठेवण्याचा व त्या आधारे आपला स्वार्थ साधण्याचे चालूच आहे. आज देश एकीकडे चांद्रमोहीम आखीत आहे आणि दुसरीकडे स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारला जात आहे.

            स्वातंत्र्याचा जप करणार्‍यानी हे लक्षात घेतले पाहिजे की,स्वातंत्र्यासाठीही अनेक स्त्रियांनी आपले योगदान दिले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही सुरुवातीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आज देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडीत आहेत. लोकसभेच्या सभापती मीरा कुमार ह्याही आपल्या जबाबदारी पार पाडीत आहेत. तर विद्यमान सरकारच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री व एक दलित कन्या मायावती कोणालाही दाद न देता आपले राज्य समर्थपणे सांभाळीत आहेत.

            जिजाऊंचा इतिहास सांगणार्‍या व शिवाजी पुन्हा जन्माला आला पाहिजे हे म्हणणार्‍यांनी ‘जिजाऊ’ होती व तिने घडविले म्हणून शिवाजी झाला ही गोष्ट का दुर्लक्षीत करावी हेच समजत नाही. विजापूरच्या आदिलशाहीचा कारभारही बडी बेगम करीत होती. कर्नाटकात राणी चन्नम्मा तसेच चांदबिबीनीही आपल्या पराक्रमाने राज्ये सांभळली होती. इंग्रजांना मुहतोड जबाब देणारी व ‘मेरी झाशी नही दूँगी’ म्हणणारी तांबे कुल रणरागिणी लक्ष्मीबाई आणि सुभाष बाबूंच्या स्त्री फलटणीची प्रमुख कॅप्टन लक्ष्मीच होत्या. आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर असताना,अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडीत असतांना क्षुल्लक अशा देवळातील त्यांच्या प्रवेशाला बंदी असावी असे म्हणणारे आज कोणत्या काळात स्वतःला समाजसेवक म्हणवून घेतात व धर्माचे ठेकेदार बनले आहेत ?

            ‘आम्ही तुमच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही.’ असे म्हणत ज्या व्हिक्टोरिया राणीने जाहिरनाम्यात 1857 साली वचन दिले त्या इंग्रजांनी मग पुढे भारतावर 150 वर्षे राज्य केले ते धर्माच्या नावावर. हिंदुस्थानी जनता धर्मात अडकवली आणि राज्य इंग्रजानी केले असा इतिहास असताना आज कशासाठी स्त्रियांना प्रवेश नाकारता? प्रवेश न दिल्याने त्यांचे कांही बिघडणार नाही. पण त्याना अपवित्र म्हणणार्‍यानी स्वतःला तपासावे. स्वतःचे पावित्र्य पहावे.

            संत गाडगेबाबा सुध्दा पुन्हा पंढरपुरात देवळात गेले नव्हते की संत तुकाराम रोज गेले नाहीत. संत सावता माळीही पंढरपुरला न जाता शेतीचा मळा फुलवित बसले होते. साने गुरुजीनी पंढरपुरात सत्याग्रह केला तो हक्कासाठी. आजही कोल्हापूरात तेच घडते आहे. प्रश्न देवळातील देवीचा नाही, तर स्त्रियांच्या हक्काचा आहे. तो कोणीही नाकारु नये. त्याना मुक्त प्रवेश मिळालाच पाहिजे. म्हणून म्हणावे लागत आहे ‘तूच बये दार उघड’

प्रभाकर आरडे