Categories
प्रासंगिक

तुमची दुखावते ती ‘धार्मिक भावना’, आमचे काय?….

मार्च - २०११

‘सत्यनारायण पूजेनंतर विद्यापीठात तीर्थप्राशन’ ही महाराष्ट्र टाईम्सच्या 24 जानेवारी 2011 च्या अंकात अगदी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागात घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेच्याच ठिकाणी केलेले मद्यप्राशन, पत्त्यांचे डाव टाकून त्याला दिलेले गुत्त्याचे स्वरूप आणि सोबतीला डी.जे.चा धांगडधिंगा हा सर्व ओंगळवाणा प्रकार वाचल्यानंतर धर्माच्या नावावर चाललेला हा निरर्थक पूजापाठ आणि कर्मकांडांचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने जातो आहे हे सहजपणे लक्षात येते. सर्वात चीड आणणारी बाब ही की हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही कुठल्याही स्वयंघोषित धर्मरक्षकांनी, संस्थांनी किंवा व्यक्तींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही. समाजात अशा अनेक घटना पूजापाठ-कर्मकांडांच्या नावावर सतत घडतात, तेव्हा ही मंडळी कायमच गप्प बसलेली असते. त्यात गप्प बसण्यामागे त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. अशा पूजा कोठेही, कशाही, कोठल्याही स्वरूपात घालत रहा, जोपर्यंत या धर्मरक्षकांच्या हिताला बाधा पोहोचत नाही, तोपर्यंत यांच्या धार्मिक भावना दुखावत नाही. परंतु जरा कुठे यांच्या हितसंबंधाला आडकाठी आली की, धर्म बुडालाच म्हणून समजा.

            या घटनांची आठवण होण्याचे कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गणेशमूर्ती संदर्भात दिलेला निर्णय आणि त्यावरून हेच स्वयंघोषित धर्मरक्षक व धर्मठेकेदार आता उठवित असलेले आरोप-प्रत्यारोपांचे रान होय.

            धार्मिक, राजकीय, व्यक्तिगत, संस्थात्मक या सर्वच पातळीवर या निर्णयाची धग बसू शकते आणि आता आपल्या हितसंबंधांनाच सुरूंग लागू शकतो हीच भीती या आरोपा-प्रत्यारोपांच्या मागे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाचे महत्त्व किंवा एक गाव एक गणपती संकल्पना असो, या मागची भावना कधीच लोप पावलेली आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या सदरात चालणार्‍या अनेक कार्यक्रमांप्रमाणेच गणेशोत्सवाने स्वरूप धारण केलेले आहे. त्यामागे असलेल्या प्रचंड आर्थिक उलाढालींमुळे राजकीय पक्षांना व पुढार्‍यांना असे उत्सव म्हणजे स्वत:च्या फायद्यासाठीची एक पर्वणीच ठरते. तर दुसर्‍या बाजूला सामाजिक व्यवस्थेच्या उतरंडीला स्वत:ला कायम उच्च म्हणून मिरविणार्‍या व पूजापाठ करण्याचा मक्ता मिळालेल्या धर्ममार्तंडांना एक दिवसाच्या गणपतीपासून अकरा दिवसांच्या गणपती पूजनाच्या माध्यमातून हक्काचे भरघोस उत्पन्न मिळत राहते. पी.ओ.पी.ची मूर्ती स्वस्त आणि सहज उपलब्ध झाली तर संख्या वाढणार, त्याबरोबर पूजापाठ वाढणार आणि आर्थिक कमाई वाढणार असे सरळ सरळ गणित यामागे आहे. तर त्याचबरोबर स्वयंघोषित धर्मपंडितांचे या काळात विविध ठिकाणी होणारे सत्कार सोहळे, भेटीपोटी मिळणार्‍या बिदाग्या यांच्या रकमा पाहिल्या तर त्यांचाही उत्सवाच्या अशा स्वरूपाला पाठींबा देण्यामागची भूमिका सहज स्पष्ट होते.

            वरील सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण हानीचा धोका ओढवून घेणार्‍या पी.ओ.पी.ऐवजी गणेशमूर्ती ह्या यापुढे मातीच्यात असाव्यात हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आग्रह मान्य करीत पी.ओ.पी.च्या वापराला प्राथमिक पातळीवर रोखता यावे यासाठीची सूचना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला दिली आणि त्यावर समाजात सर्वत्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील सर्वच नामांकित व मोठ्या वृत्तपत्रांनी समाजपरिवर्तनाच्या या हितकारी निर्णयाचे स्वागत केले आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांनीसुद्धा हा निर्णय उत्सवाच्याच आणि समाजाच्या हिताचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. असे असले तरी काही समाज घटकांनी त्यांच्या परंपरेला साजेशा अशाच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामध्ये धर्माचे स्वयंघोषित रक्षक, धर्माचा वापर राजकीय फायद्यासाठी करणारे पक्ष, आम्ही म्हणू तो खरा धर्म असा दावा करणारे धर्मांध, या समाजाला कर्मकांडात गुंतवून ठेवण्यासाठी आणि ‘दैवी साम्राज्याच्या’ निर्मितीची अवैज्ञानिक संकल्पना राबविण्यासाठी खोटा अपप्रचार व उचापत्या करणार्‍या संस्था व संघटना, ज्योतिष, पंचांग, कॅलेंडर यांच्या धंद्यातून गब्बर झालेले धर्मपंडित यांनी नेहमीप्रमाणेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आगपाखड करीत तोंडसुख घेण्याचा सपाटा लावलेला आहे. एका राजकीय पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्याने तर नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस कोर्टाच्या निर्णयाचा आपल्या सोईचा अर्थ लावत आहेत, आणि समाजाची दिशाभूल करीत आहेत असाही आरोप केला.

            खरेतर विद्येचे प्रतिक मानल्या गेलेल्या बुद्धीच्या देवतेच्या मूर्तीमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेला आदेश द्यावा लागावा यातच या उत्सवाच्या स्वरूपाची निरर्थकता स्पष्ट होते. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती शाडूच्या मूर्तीप्रमाणे पाण्यात विरघळत नाही. त्यावरील रासायनिक रंगात पारा, शिसे, कॅडमियमसारखे आरोग्याला घातक पदार्थ असतात. शिवाय पी.ओ.पी.च्या मूर्ती पाण्याच्या संपर्कात आल्यावर अधिक घट्ट होतात आणि त्यामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे येऊ शकतात. रासायनिक प्रदुषके आणि प्रवाही पाण्यातील अडथळे यामुळे जलजीवनावरही दुष्परिणाम होतात हे न्यायालयाने मान्य केले.

            ज्या काही परंपरा धर्माच्या नावावर लादल्या जातात, त्या अनिष्ट असतील तर बंद झाल्याच पाहिजेत किंवा समाज हिताच्या असतील तर त्यांचे आजचे स्वरूप लक्षात घेऊन काही बदल केले पाहिजेत, संस्कृतीच्या व धर्माच्या नावावर चालविलेला ओंगळवाणा प्रकार थांबविला पाहिजे असे या मंडळींना कधीच वाटत नाही. धर्माच्या नावावर चालविलेल्या अनेक अवैज्ञानिक गोष्टी व त्यांनी धारण केलेले समाज विघातक स्वरूप याविषयी धर्माच्या कोणत्याही ठेकेदाराला सोयरसुतक राहिलेले नाही. विद्येची देवता गणेशोत्सवाच्या अगदी मिरवणुकीपासून ते विसर्जनाच्या काळात किमान पावित्र्य राखण्याचे भान राखले जात नाही. डी.जे.वर धांगडधिंग्यापासून मद्य प्राशनापर्यंत अशा अनेक नको त्या गोष्टी या काळात घडत असतात. याविषयी कोणीही आवाज उठवत नाही. परंतु समाजोपयोगी परिवर्तनाची कोणत्याही गोष्टीची साधी चर्चा जरी केली तरी आमच्या धार्मिक भावना दुखाविल्याची आरोळी मारली जाते. हा समाज आहे तसाच रहावा, झापडबंद रहावा आपण हाकलू त्यादिशेने मेंढरागत चालत रहावा असाच हेतू या सर्व मंडळींचा असतो. त्यासाठी वाटेल ती कृती, मग ती धर्माच्या, नितीच्या आचरणाविरूद्ध असली तरीही आचरणात आणायला ही मंडळी मागेपुढे पहात नाही. थोडा जरी समाजहितार्थ त्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला की, ‘धर्म बुडाला’ म्हणून बोंबाबोंब करीत सुटतात. असे असले तरी कालांतराने समाजाला यातील फोलपणा लक्षात येतो आणि हळूहळू वस्तुस्थिती जाणून घेऊन झालेला बदल आत्मसात करून हा समाज मार्गक्रमण करीत राहतो. यामुळेच त्या काळातल्या कर्मठ सनातन्यांच्या प्रखर विरोधाला न जुमानता तुकाराम महाराजांपासून ते गाडगेमहाराजांपर्यंतच्या संतश्रेष्ठीनी असो किंवा लोकहितवादीपासून ते प्रबोधनकारांपर्यंत समाजसुधारकांचे प्रयत्न असो, समाज परिवर्तनाच्या नैसर्गिक चक्राला गतीमान ठेवण्यात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. कारण कालानुरूप बदलत राहणे हाच निसर्गाचा नियम आहे. सातासमुद्रापलिकडे जाणे, मुलींना शिकविणे ह्या आणि अशा धर्माच्या नावाखाली निषिद्ध ठरविल्या गेलेल्या अनेक गोष्टी कालांतराने समाजाने सहजपणे स्वीकारल्या. मात्र त्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले आणि यासारख्या अनेक समाजसुधारकांना आपले आयुष्य खर्ची घालावे लागले. धर्मावरील आपले वर्चस्व आपल्या हितासाठी राबविणारे स्वयंघोषित धर्मरक्षक, बाबा, बापू, महाराज, राजकीय पक्ष, धर्मांध संस्था यांची संख्या प्रचंड आहे. त्या तुलनेत परिवर्तनाची चळवळ राबवू पाहणारे, समाजसुधारकांचा वारसा पुढे नेणार्‍या व्यक्ती अथवा संस्था अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत आणि हाच मोठा विरोधाभास आहे. याचाच गैरफायदा या धर्मांधांना होतो आणि योग्य तो विचार समाजापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो.

            जे काही करायचे ते दुसर्‍या धर्मात जाऊन करा, असे सांगणार्‍या धर्मांधांना, राजकीय नेत्यांना, धर्माचा बाजार मांडणार्‍या व्यक्ती व संस्थांना एक प्रश्न परखडपणे विचारावासा वाटतो की, आमच्या धर्माचे चांगले वाईट ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आम्ही दुसर्‍यांच्या धर्माबाबत का बोलावं? दुसर्‍यांच्या धर्मांवर बोला असे सांगणारे तुम्ही कोण? हजारो वर्षं या समाजाची दिशाभूल करणार्‍यांनो, आमच्या धार्मिक भावनेशी खेळ करणार्‍यांनो तुमच्या कसल्या धार्मिक भावना? ‘धार्मिक भावना दुखावल्या’ असे गळे काढणे आता तरी बंद करा! हा धर्म आमचा आहे, आम्ही आमच्याच धर्माबाबत बोलणार व त्यातील चांगल्या वाईट गोष्टींची चर्चादेखील करणार आणि समाजाच्या हितार्थ लोकशाही पद्धतीने त्यातील बदलाकरिता प्रयत्न करीत राहणार कारण भारतात लोकशाही आहे हे आम्ही मन:पूर्वक व सर्वार्थाने मानतो. आपणही आता कुठलेही ‘फतवे’ काढण्यापूर्वी याच लोकशाहीत राहत आहात याचे भान ठेवाल. तुर्तास एवढीच अपेक्षा!

– प्रा. प्रविण देशमुख