Categories
संपादकीय

उंबराचे फूल

जून – २०१२

सांगली शहराचा विश्रामबाग परिसर. याच परिसरात सावरकर कॉलनी आहे. या कॉलनीशेजारीच असणार्‍या एका घराच्या अंगणातील उंबराला फूल आले अशी अफवा पसरवली गेली. या निमित्ताने ज्या घटना घडल्या त्याचा पंचनामा करायलाच हवा. एका ज्योतिषाने लिलीचे फूल उंबराला चिकटवून हा उद्योग केला.

            उंबराच्या फुलाच्या बनवेगिरीचा पर्दाफाश झाल्यावर, तेथील गर्दी ओसरायला लागली. पण मोबाईलने चमत्काराची बातमी झपाट्याने पसरली होती व लोक विशेषत: स्त्रिया संबंधित स्थळाकडे येतच होत्या. मी दुपारी तीन वाजता संबंधित स्थळी पोहोचलो. दोन बायका व काही पुरूष तेथे चर्चा करीत होते. उंबराला शंभर वर्षातून एकदाच फूल येते, अशी माहिती एकजण दुसर्‍यांना सांगत होता. उंबराचे फुलाचे दर्शन होणे भाग्याचे असे दुसरा सांगत होता. जे पुण्यवान त्यानाच फूल दिसते तिसरा सांगत होता. एकूण काय स्वत: फूल(मूर्ख) असल्याने ते इतरांना पण फूल बनवत होते. सकाळपासून दुपारपर्यंत अंदाजे पाचशे व्यक्तींना लिलीच्या फुलाने एप्रिल फूल केले.

            उंबर या झाडाला धार्मिक वलय आहे. त्यामुळे या झाडाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रचलित आहेत. बुध(जि.सातारा) येथे एका शेताच्या बांधावर उंबराच्या फांदीतून पाणी गळू लागले. जवळच पुसेगाव नावाचे धार्मिक केंद्र आहे. तिथल्या महाराजांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सांगितले की, उंबरात गंगा अवतरली आणि मग या गंगेच्या दर्शनासाठी गर्दी लोटू लागली. उंबराच्या खोडातून फांद्याकडे पाणी वाहून नेले जात असताना या पाण्याच्या काही वाहिन्या खोडाच्या सालीलगत उघडल्या तर त्यातून पाणी गळणारच. पण हे नैसर्गिक कारण कोण लक्षात घेते? आणि महाराजांनी गंगा अवतरली असे म्हटल्यावर शंकाच नको. ही आहे आपली मानसिकता.

            बोकड दूध कसा देतो? खरा कार्यकारणभाव कोणता? दूध येण्यास कारण असणारा एक विशिष्ट हार्मोन असतो. हा हार्मोन फक्त मादीच्या शरीरात निर्माण होण्याची निसर्गाची व्यवस्था असते. पण काही वनस्पतीत ह्या हार्मोनचे द्रव्य असेल व ती वनस्पती बोकडाने खाल्ली तर थोडे दूध त्याच्या स्तनातून येऊ शकते.

            काही वेळा जंगलातील वनस्पती पेट घेतल्यासारख्या दिसतात. अब्राहम कोवूर या प्रख्यात विवेकवादी वैज्ञानिकाने अशा झाडांबाबत धिटाईने माहिती घेतली. झाडांच्या सालीवर साचलेल्या बुरशीतून प्रकाश बाहेर पडत होता. याला जैविक प्रकाश असे नाव आहे. काही किडे असा प्रकाश बाहेर फेकतात. काही जंतुपण सौम्य प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्र पृष्ठभाग पेटल्याच्या घटना खलाशी सांगतात. अशा ठिकाणी जैविक प्रकाश बाहेर टाकणारे जंतु मोठ्या प्रमाणात एकत्रित आल्याने असे घडते.

            असे संशोधन माहीत करून घेण्यासाठी हवी वैज्ञानिक दृष्टी. चमत्काराला नैसर्गिक कार्यकारणभाव असतो ह्याची जाणीव असेल तरच चमत्कार सदृश्य घटनांचा उलगडा होईल. पण अतिनैसर्गिक कारणावर विश्वास असेल तर मग उंबराला फूल आले यावर विश्वास बसतो. भारतीय समाजमनावर अतिनैसर्गिक कार्यकारणभावाचा एवढा पगडा आहे की, समाजातील लुच्चे याचा फायदा न उठवतील तरच नवल. दर चार वर्षांनी माझ्या घरी चमत्कार घडतो अशी दर्पोक्ती उंबराला लिलीचे फूल चिकटवणारा महाभाग काढत होता. आणि त्याच्या घराच्या परिसरातील तथाकथीत सुशिक्षित, राजकारणी, विद्वान व सावरकरवादी त्या फुलाचे दर्शन घेत होते.

            वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत समाजात अजून किती प्रबोधन करावे लागणार आहे याची कल्पना यानिमित्ताने आपणास यावी. यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सर्वदूर अधिकाधिक प्रसारीत करायला हवी.