Categories
कव्हर स्टोरी

उंबराला ‘लिली’चे फूल  बेमालूम बनवेगिरी

जून – २०१२

            गुरूवार दिनांक 26 एप्रिल 2012 रोजी सांगली शहरातील विश्रामबाग येथील एका जोशी गुरूजींनी अंधश्रद्धेचा फायदा उठवून सामान्य माणसांना दिवसाढवळ्या बेवकूफ बनविण्याचा धंदा केला. जोशी गुरूजी हे स्वत: या परिसरात ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण आपण बहुजनांवर टाकलेल्या जाळ्यात स्वत:च अलगदरित्या अडकणार आहे हे भविष्य त्यांना कळलं नव्हतं. याचाच स्पष्ट अर्थ असा की, त्यांना भविष्य-ज्योतिष वगैरे काहीही कळत नाही. त्यांनी उंबराच्या झाडाला फूल आलं. अशी बेमालूमपणे बनवेगिरी केली. उंबराच्या झाडाला औदुंबर म्हणतात. त्या झाडाचा थेट दत्ताशी संबंध जोडला आहे. गुरूवार हा दत्ताचा वार. त्या दिवशी भल्या पहाटे गुरूजी नेहमी प्रमाणे औदुंबराची पूजा करायला केले आणि त्या औंदुबरला एक टवटवीत फूल आल्याचे त्यांना दिसले. त्याची यथासांग पूजा केली. गुरूजींचे पगारी कार्यकर्ते तयार होतेच. ताबडतोब त्यांनी आपल्या आसपासच्या परिसरात “उंबराच्या झाडाला फूल आलेची” बातमी पद्धतशीरपणे पसरवली.

            गुरूजींच्या औदुंबराला लागलेले फूल बघायला बाया-बापड्या गोळा व्हायला लागल्या. गुरूजींनी सर्वांना लांबूनच दर्शन घ्यायची आज्ञा केली. त्या फुलाला हात लावायची कोणासही मुभा दिली नाही. गर्दी वाढायला लागली. रस्त्यावर तीन पानी जुगार खेळणारे जसे गर्दीत आपलीच माणसं उभी करून पैसे लावतात आणि मग त्याचं बघून इतर बघेही पैसे लावतात. नेमकी तीज स्ट्रॅटेजी गुरूजी आणि त्यांच्या शिष्यांनी अवलंबली. गुरूजींच्याच एका चेल्यानं औदुंबराच्या झाडाखाली भक्ती भावानं शंभराची नोट टाकली. लगेच गुरूजी म्हणाले असे पैसे टाकू नका. गुरूजींच्या आदेशानंतर दुसर्‍या एकानं पाचशेची नोट टाकली. गुरूजी उगी उगी नको म्हणायचे. पण त्यांचे पाळीव भक्त काय ऐकायचे नाहीत. परिणाम व्हायचा तोच झाला. मग सगळीच माणसं पैसे टाकायला लागली. मोबाईलवर चित्रीकरण सुरू झाले. जो तो उंबराच्या फुलाचे मोबाईलवर फोटो काढू लागला. बाया बापड्या औदुंबराच्या बुंध्याजवळ हळद, कुंकू वाहू लागल्या. कुणीतरी हिरवीगार साडी-चोळी आणून ती झाडालाच नेसवली. माणसं झाडाच्या पाया पडायला लागली. गुरूजींच्या पाया पडायला लागली. हळदी, कुंकू, खण, नारळ, पैसे यांचा ढीग पडायला लागला. गर्दी बरीच वाढली. पेपरवाले आले, टी.व्ही.चॅनेलवाले आले, रेडिओवाले आले, एफ.एम.वाले आले. गुरूजींच्या मुलाखती घ्यायला लागले. गुरूजींनी हा दैवी चमत्कार आहे. असं माझ्या घरी पाच-दहा वर्षांनी एकदा घडतंच असं ठासून सांगितलं. काही पुढारी, काही पोलीस अधिकारी आपापल्या बायका पोरांसह भेटून भक्तीभावाने उंबराच्या फुलाचं दर्शन घेऊन गेले. ही सर्व बनवाबनवी आहे असा संशय बहुजन समाजातील बुवाबाजीनं पोळलेल्या जयसिंग कुंभार या चाणाक्ष पत्रकाराला आला. मात्र त्यानं आपणहून काही वाच्यता न करता सांगलीतील एक वनस्पतीशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक सुरेश गायकवाड यांना फोन लावला. नेमके त्यावेळी प्रा.गायकवाड हे जिल्हाधिकार्‍यांच्या केबीनमध्ये पर्यावरणाच्या मिटींगमध्ये होते. त्यांनी उंबराच्या फळामध्येच फूल असते. त्याला वेगळे फूल लागूच शकत नाही असे सांगून मिटींग संपल्यावर येतो असे त्या पत्रकारास म्हणाले. पत्रकाराने मात्र त्यांचा पिच्छा सोडला नाही. तो एकसारखा त्यांना फोन करतच राहिला. परिणामत: प्रा.गायकवाड हे विश्रामबागला आले. त्यांनी त्या उंबराच्या फुलाचे निरीक्षण केले. त्याच परिसरात एक लिलीच्या फुलांचा ताटवा होता. गायकवाडांचे त्या ताटव्याकडे लक्ष गेले. उंबरास चिकटविलेले फूल लिलीचे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी भाविकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे कुणीही ऐकून घेतले नाही. तिथं जमलेली माणसं ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर गायकवाड हतबल होऊन तिथून निघून जाणार होते. त्या चाणाक्ष पत्रकाराने त्यांना थांबविले. जिल्हा पोलीस प्रमुखांना फोनवरून संपर्क केला. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली.

            जिल्हा पोलीस प्रमुखांनी एक दोन पोलीस आणि एक अधिकारी जागेवर पाठविले. झालं, पोलीस गाडी आली. एक निरीक्षक आणि दोन पोलीस गाडीतनं उतरले. पोलिसांचं काम औरच असतं. गर्दी झाली की, एक तर ती हटवणे नाही तर त्यांच्या रांगा लावणे एवढंच त्यांना माहीत असतं. प्रश्नाच्या मुळाशी ते आपणहून कधीच जात नाहीत. जेवढा आदेश असेल तेवढंच ते करतात. त्याप्रमाणे पोलिसांनी औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन पुरूषांची वेगळी आणि स्त्रियांची वेगळी अशा रांगा लावायचं काम सुरू केलं. मग माणसं रांगेने दर्शनासाठी जावू लागली. प्रा.गायकवाडांनी एस.पीं.ना फोन करून पोलिसांची कामगिरी त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर एस.पीं.नी संबंधित अधिकार्‍याला खडसावून सांगितलं. त्यानंतर तो अधिकारी व प्रा.गायकवाड त्या उंबराच्या फुलाजवळ गेले. लोकांना शेजारी असणार्‍या लिलीच्या फुलांचा ताटवा दाखविला. ती फुलं मार्च महिन्यात उमलतात. म्हणून त्यास मार्च लिली असं म्हटलं जातं. प्रा.गायकवाड यांनी लिलीचं फूल उंबराला चिकटविल्याचं लोकांच्या निदर्शनास आणले. गुरूजींना पोलिसांनी गर्दीतून लांब बोलवलं. आणि जरा दरडावून विचारलं. गुरूजीने आपण लिलीचं फूल भल्या पहाटे कसं चिकटविलं हे अगदी सत्यनारायणाची पूजा सांगतात त्या सुरात पोलिसांना सांगितले. मग गुरूजींची शासकीय इतमामांत म्हणजे पोलिसांच्या सरकारी गाडीतून पोलीस स्टेशनला रवानगी केली.

            आपल्याला गुरूजींनी उल्लू बनवलं आहे हे लोकांच्या लक्षात आले. ज्यानं त्यानं आपल्या मुर्खपणावर हसत हसत तिथून काढता पाय घेतला. जर जयसिंग कुंभार हा चाणाक्ष पत्रकार नसता, जर वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा.गायकवाड नसते, तर मनोहर जोशी असतांना ‘गणपती दूध पितो’ अशा सरकारी अफवेची दुसरी आवृत्ती सांगलीतच निघाली असती. त्या प्रकाशनपूर्व आवृत्तीचा देठ खुडणार्‍या जयसिंग कुंभार, प्रा.गायकवाड यांचे अभिनंदन.

अ‍ॅड. के. डी. शिंदे

विशेष नोंदी

(1) मूर्खतेचे दर्शन
            जो तो आपल्या मोबाईलमधील कॅमेर्‍यात उंबराच्या फुलाची प्रतिमा साठवत होता. एक महिला कटोरी भरून पेढे आणून वाटत होत्या. लोक भक्तीभावाने पेढा खात गुरूजींच्या पाया पडत पैसे टाकत होते. कुणी फळांचा हार आणून औदुंबराला घालू लागला. तर एकाने चक्क साडी आणून औदुंबराच्या बुंध्याशी ठेवली.

(2) अंधश्रद्ध पोलीस
            विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सकाळीच फुलाचे दर्शन घेतले आणि गुरूजीच्या कुटुंबियाने दिलेला प्रसादरूपी पेढा प्राशन केला.

(3) कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिकारी मा.शिसवे
            पत्रकार जयसिंग कुंभार व प्रा.सुरेश गायकवाड यांच्या तत्परतेमुळे जिल्हा पोलीस अधिकारी मा.शिसवे साहेब यांनी वाहतूक शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. ते फौजफाट्यासह घटनास्थळी आले. यावेळी त्यांना पाहून काही महिला साहेब दर्शनासाठी ‘वळ लावा’ अशी विनंती करू लागल्या. कुंभार यांनी गुरूजींना गर्दीतून बाहेर आणले. गायकवाड यांच्याशी त्यांचा थेट संवाद घडवून आणला. गुरूजींनी आज सकाळी फूल दिसले एवढेच पालुपद लावले. गायकवाड यांनी शेजारच्याच कुंडीतील लिलीचे फूल आणण्यास सांगितले. ते फूल गुरूजींच्या उंबराच्या फुलाप्रमाणेच होते हे लक्षात आणून देण्यात आले. त्याचवेळी गुरूजी त्यांना झालेल्या आणखी एका चमत्काराचा दाखला देऊ लागले. कुंभार यांनी ‘तुम्ही हे फूल चिकटवले आहे. त्यामुळे तुम्हीच ते काढून टाका’ असे बजावले. गुरूजींचा फूल काढण्यास विरोध होता. मात्र, पोलिसांनी योग्य तो संदेश दिल्यानंतर ते राजी झाले. त्यांनीच पुढे होत चिकटवलेले फूल पोलिसांच्या हवाली केले. आजूबाजूला जमा झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी निरीक्षक कुंभार यांनी शेजारचीच लिलीची आणखी काही फुले दाखवत फसगतीचा प्रकार सार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. जमावापुढे येत त्यांनी ‘उंबराचे फूल कुणाला हवे असल्यास तीस हजारांना घेऊन जा’ असे सांगताच लोकांची हसता पुरेवाट झाली. मा.शिसवे साहेब यांचे अभिनंदन! त्यांनी आता अंधश्रद्ध पोलिसांना शहाणे करण्याची मोहीम हाती घ्यावी.

(4) उंबराच्या फुलाचे विज्ञान
            “वड, अंजीर, उंबर अशा सुमारे 65 झाडांच्या जाती ‘फायकस’ फॅमिलीचे नेतृत्व करतात. या झाडांना लागणार्‍या फळातच फुले असतात. उंबर कापले तर आतमध्ये पुकेसर दिसतात. मार्च लिली या झाडाची फुले फिकट गुलाबी किंवा पांढरट असतात. मार्च महिन्यात ती फुलतात म्हणून मार्च लिली. लिलीचे फूल तोडल्यानंतर दोन-तीन दिवस ताजेतवाने राहते. जोशी गुरूजींनी याचा फायदा घेत लिलीचे फूल उंबराला चिकटवले. उंबराच्या फुलाबद्दल हिंदू धर्मात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्याचा फायदा जोशी गुरूजींनी घेतला.”     

 -प्रा. सुरेश गायकवाड(वनस्पतीशास्त्र अभ्यासक)

ज्योतिषांकडून बहुजनांना फसविण्याचे काम
            ज्योतिषांकडून बहुजन समाजाला फसविण्याचे काम सातत्याने सुरू असते. आपला धंदा वाढावा यासाठी असे उद्योग सुरू असतात. सांगलीत उंबराच्या झाडाला फूल लागल्याची अफवा या मानसिकतेतूनच पसरविण्यात आली. बहुजन समाजाने अशा प्रकरापासून सावध राहावे, असे आवाहन पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले.
            सांगली सत्यशोधक वाचनालयातर्फे सत्यशोधक वार्ताफलकाचे उद्घाटन अं.नि.वार्तापत्राचे संपादक प्रा.प.रा.आर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उंबराचे फूल लागलेल्या ज्योतिषाचे पितळ उघड पाडणार्‍या प्रा.सुरेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड.के.डी.शिंदे म्हणाले, वर्षानुवर्षे बहुजन समाजाचे खच्चीकरण करण्याचा खेळ समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून केला जात आहे. ज्योतिष यात आघाडीवर आहेत. श्रद्धाळू मानसिकतेचा गैरफायदा घेत लुबाडण्याचा धंदा मांडला आहे. सर्वच क्षेत्रात असा प्रकार सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुजनांना फसविणार्‍यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आता वार्ताफलकाचा उपक्रम सुरू केला आहे.

-अ‍ॅड.के.डी.शिंदे