आजच्या काळात धार्मिक कर्मकांडांना फक्त धर्मग्रंथाचा आधार पुरेसा वाटत नाही. त्यासाठी कर्मकांडांना विज्ञानाचा आधार द्यावा लागतो. त्यातूनच अग्नीहोत्रामुळे पर्यावरणाला कसा फायदा होतो; किंवा फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे किंवा मग अगदी गायत्री मंत्राच्या उच्चारणामधून पवित्र लहरी कशा निर्माण होतात या सगळ्यांची गणिते मांडली जातात. आपण जे कर्मकांड करतो त्याला विज्ञानाचा आधार असल्याने सर्वसामान्य माणसांचे मन निर्धास्त तर होतेच परंतु आपल्या सनातन धर्माला विज्ञानाची जाण किती मोठ्या प्रमाणात होती या अभिमानाने उर देखील भरून येतो. अर्थात यामागे धर्माचे राजकारण करणार्यांचे हितसंबंध अप्रत्यक्षरित्या गुंतलेले असतात, हा आणखीन एक भाग! या सगळ्या गोंधळात उपवासाचे फायदे सांगितले न जातील तर नवलच! अगदी दैनिकांच्या आरोग्य पुरवणीचा मुख्य विषय ‘लंघन’(उपवासाला आणखी एक वजनदार प्रतिशब्द) असा घेऊन पानंच्या पानं भरली जातात.
मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी पोटाला एक दिवस तरी आराम देण्यासाठी, शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकून देण्यासाठी तर काही जण आध्यात्मिक उन्नयनासाठी उपवास करतात, खरोखरच उपवासाने शरीराला आराम मिळतो काय? या प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हटले तर प्रतिप्रश्न विचारायला लागेल की, “शरीराला किंवा पोटाला कशापासून आराम द्यायची गरज आहे?” शरीराची उपासमार करणे म्हणजे गाडीमध्ये इंधन न भरता तिला रस्त्यावर चालवणे आहे. खरं तर गाडीचीच काय पण एखाद्या यंत्राची आणि शरीराची तुलना करणे चुकीचे ठरेल. कारण यंत्र जेव्हा बंद करून ठेवलं जातं तेव्हा त्याची उर्जेची गरज शून्य असते; परंतु लौकिकार्थाने आपण आराम करतो तेव्हाही शरीराच्या पेशींचे काम सतत चालू असते आणि त्यासाठीची उर्जेची गरजही सातत्याने कायम असते. इतकंच कशाला कोमात(बेशुद्धावस्थेत) असणार्या व्यक्तीला देखील सातत्याने उर्जेची गरज असते. त्यामुळे शरीराला आरामाची गरज असते हे अर्धवट सत्य आहे. शरीरातील काही स्नायूपेशींना आरामाची गरज असते असं फार तर म्हणता येईल. परंतु हृदयाने आराम करायचं ठरवलं तर मेंदूपासून, सर्व अवयवांना कायमचा आराम करावा लागेल हेही तितकंच खरं!
बहुतांशी लोकांना उपवासाने आत्म्याची शुद्धी होते असे वाटते. आपल्या मनाच्या आरोग्यासाठी उपवासाचा फायदा होतो असं प्रचलित मत असलं तरी शरीराला उपवासाचा फायदा होत नाही. एक दिवसाच्या उपवासाने साखरेचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी होते. शरीरासाठी हा मोठा ताण ठरतो. दहा ते बारा तासांच्या उपवासानंतर शरीर साठवलेल्या साखरेचा वापर करायला सुरवात करतं आणि त्यानंतर प्रथिनांचा वापर उर्जेसाठी व्हायला लागतो. अर्थात असे होणे शरीराला हानीकारक आहे.
किशोर वयात उपवास हानीकारक!
आपल्या समाजात वयात यायच्या अगोदरपासूनच मुली चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करायला सुरवात करतात. वयाच्या अठरा ते वीस वर्षांपर्यंत शरीरांतर्गत हाडे, स्नायू आणि मेंदूचा विकास होत असतो. या वेळेपर्यंत शरीराला सातत्याने पोषण द्रव्यांची गरज असते. अशा वयात उपवास केल्यास शरीरातील कॅल्शियमचा र्हास होतो. ‘द जर्नल ऑफ न्युट्रीशन’मध्ये अशा अर्थाचं संशोधन झालेलं आहे. वीस वर्षांअगोदर कॅल्शियमचा र्हास कायमस्वरूपी टिकतो. म्हातारपणी सांधेदुखी आणि कमरेची दुखणी बळावण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे.
उपवास आणि शरीराची शुद्धता
आपल्या पोटाला आराम द्यायचा म्हणून उपवासाचे समर्थन केले जाते. परंतु हा शुद्ध वेडगळपणा म्हणायला हवा. कारण जेवण पचवण्यासाठी लागणारी पाचकद्रव्ये त्या-त्या वेळेस निर्माण केली जात असतातच. त्याचा उपयोग न होणे शरीराला जास्त अपायकारक असते.
शरीराची शुद्धता राखण्यासाठी उपवास करणार्यांनी शाळेत शिकलेल्या मूलभूत मुद्द्यांकडेच दुर्लक्ष केलेले असते. शरीराची रचनाच मुळी खाण्यात आलेल्या विषद्रव्यांचा निचरा करण्यासाठी बनलेली असते. यकृताद्वारे निर्माण होणारी द्रव्ये आणि आतड्यांमध्ये असलेल्या प्रतिद्रव्यांच्या मार्फत शरीर स्वत:च खाण्यात आलेली विषद्रव्ये(दारूचा उल्लेख इथे करायला हवाच) रोगजंतू, विषाणू यांच्यापासून वेगवेगळ्या मार्गांनी निचरा करत असतेच. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा या सगळ्या प्रक्रियेसाठी लागणार्या पोषण मूल्यांची कमतरता निर्माण करत असतो. यकृताच्या या शुद्धीकरण मोहीमेत लसूण-कांदा यासारखे पदार्थ मदत करत असतात. आणि आपल्याकडे चार-चार महिने कांदा-लसूण वर्ज्य केले जाते. काहीजण तर आयुष्यभर कांदा-लसूण बंद करत असतात.
उपवास केल्यानंतर बरं वाटणं किंवा आनंद वाटणं हा खरं तर स्वयंसूचनेचा प्रकार आहे त्याचा आध्यात्माशी किंवा शरीराच्या आरोग्याशी काही संबंध नाही.
वजन घटवण्यासाठी उपवास
वजन घटवणे हा आणखीन एका फॅडचा प्रकार. वाढलेले वजन शरीराला अपायकारक आहे यात वादच नाही. परंतु केवळ वजन घटवण्यासाठी म्हणून उपवास करणं हा शरीरासाठी चुकीचा मार्ग आहे. आपण समजतो त्यापेक्षा शरीर वेगळ्या पद्धतीने काम करत असतं. प्रदीर्घ उपवासाच्या सवयीने शरीर बिथरतं आणि त्याचा कल चरबीच्या स्वरूपात साखर जमा करण्यावर भर वाढतो. अधिक काळ उपाशी राहिल्यास शरीर अनेक मार्गांनी उर्जेची गरज भरून काढायचा प्रयत्न करतं. या सगळ्या प्रक्रियेत किटोनसारख्या हानीकारक द्रव्यांची निर्मिती होते. प्रथिनांचा वापर शरीराच्या पेशींच्या संरक्षणासाठी न होता उर्जेसाठी व्हायला लागतो. त्यातून आपली जीवजंतूपासून संरक्षण करणारी यंत्रणा विस्कळीत होते. या सगळ्यांचा विचार करता वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योग्य प्रकारचा आहार घेणे आणि जंकफूड. कोल्ड्रींक यांना हद्दपार करणे हाच असायला हवा.
उपवासाचे पदार्थ
हिंदू धर्मीय सर्वसामान्यपणे जो उपवास करतात. त्याला उपवास म्हणायचे का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ अशा अर्थाची म्हण त्यातूनच आली आहे. स्वत: उपवास करणार्यांना पण आपण उपवास करताना भरपूर खातो याची जाणिव असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची आधीपासूनच बेगमी करायला सुरवात होते. या उपवासाच्या पदार्थांत साबुदाणा, बटाटा यांचे खास स्थान आहे. उपवासामध्ये दारू टाळली जाते. पण तंबाखू आणि चहा मार्त्र वर्ज्य केला जात नाही. उपवास करायचा म्हणून आदल्या दिवशी जास्त खाल्ले जातेच. उपवास सोडताना देखील चविष्ट खाणे आग्रहाने बनवले जाते. त्यात उपवासाच्या काळात खाल्ल्या जाणार्या पदार्थांचा समावेश केल्यानंतर खर्या अर्थाने ‘उपवास’ या शब्दाला अर्थ उरत नाही. परंतु वेगळ्या अर्थाने उपवास घडत असतोच. शरीराला सातत्याने योग्य पोषक द्रव्यांची गरज असते. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारी अमायनो अॅसिडस् शरीरात काही तासांकरताच साठवली जातात. उपवासाचे साबुदाणा, बटाटा यासारख्या पदार्थात टार्चचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते पचायला जड असतात. ते खाण्यामुळे पोटाला आराम मिळण्याऐवजी त्रासच होतो. उपवासाचे पदार्थ म्हणून ज्याला मान्यता आहे त्या साबूदाणा आणि बटाट्याचे मूळ परकीय आहे. कर्मकाडांची माहिती सांगणार्या ग्रंथात त्यांचा उल्लेख नाही. कारण हे पदार्थ त्यानंतर भारतात आले. केवळ याच कारणाने त्यांचा समावेश उपवासाला चालणार्या पदार्थात झाला. अगदी चहा, तंबाखू उपवासाला चालतो पण दारू चालत नाही. यामागेही हेच कारण आहे.
उपवास आणि धर्म
उपवासाच्या समथर्कांचा असा दावा असतो की, जवळ-जवळ सर्वच धर्मांत उपवासाला खास स्थान आहे. परंतु उपवासाचा अर्थ धर्माप्रमाणे बदलतो. जैन लोक पर्यूषण काळात फक्त पाणी पिऊन राहतात तर ख्रिस्ती धर्मात विशिष्ट दिवसांत मांस न खाणे म्हणजे उपवास मानला जातो, मुस्लिमांच्या रमजान महिन्यामध्ये पूर्ण दिवसभर उपास केला जातो. त्यामुळे आरोग्यासाठी उपकारक म्हणून उपवासाचा अर्थ कोणत्याही धर्माला मंजूर नव्हता.
धर्माने ज्या ज्या नैसर्गिक गरजा असतात त्यांना अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अन्नाबरोबरच लैंगिक इच्छेवर नियंत्रण मिळवण्याचा उपदेश सातत्याने धर्माने केलेला आढळतो. प्रत्यक्षात असे करणे अवघड बाब आहे. त्यामुळे निर्माण होणारी अपराधीपणाची भावना माणसाला पुन्हा कर्मकांडाकडे ओढते. त्यामुळे उपवासाचे प्रयोजन धर्माची पकड घट्ट करण्यासाठीच आहे असा निष्कर्ष काढला पाहीजे. राजकीय कारणांसाठी उपोषण करतानादेखील स्वत:च्या शरीराला त्रास देऊन हृदयपरिवर्तन असाच हेतू स्पष्टपणे आढळतो. एकूण मतितार्थ हाच उपवासाचा आपल्याला कोणताही फायदा होत नसून कोणत्याही कृत्रिम धर्मापेक्षा निसर्गाचा धर्म पाळावा आणि योग्य ते योग्यवेळी खावे. हाच आपल्या शरीरस्वास्थ्याचा आणि मन:स्वास्थ्याचा मार्ग आहे. शेवटी मन हा देखील शरीराचा भाग आहे हे सगळ्यांनी मान्य करायलाच हवे.
–संजय सावरकर