वार्तापत्रासाठी वार्तापत्राचे वाचक नियमितपणे आपले लेख पाठवत असतात. परंतु त्या सर्वच साहित्याला जागेअभावी प्रसिद्धी देणे अशक्य असते. तरीही लेखातील विचारांचा गोषवारा आम्ही वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतो. अशा काही निवडक लेखांचा गोषवारा.
अनेक महान व्यक्तींच्या स्मृतीदिनानिमित्त, जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे मूल्यमापन करणारे, त्यांच्या विचारांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, त्यांचे महानपण अधोरेखित करणारे अनेक लेख वाचक लिहित असतात. यात चिकित्सा किंवा विश्लेषण यापेक्षा भावनिकतेचाच प्रभाव जास्त असणे साहजिकच आहे; नागपूरच्या सेवासदन हायस्कूलचे श्याम निकोसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला, कार्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, बुद्धीनिष्ठतेचा कसा आधार होता याबद्दल एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अधिष्ठान असलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार करतानाही आपली बुद्धीप्रामाण्यवादी, नैतिक मानवतावादी दृष्टीच कशी वापरली याचे विवेचन केलेले आहे. हल्ली बुद्ध धम्मातील या बुद्धिप्रामाण्यवादी, नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष करीत धम्मात नंतर घुसडलेल्या विपश्यना, समाधी, ध्यान अशासारख्या अध्यात्मिक गोष्टींना महत्व दिले जात आहे. बुद्ध धम्माचे जणू हेच वैशिष्ट्य आहे असे भासवले जात आहे. याबाबतची डॉ.आंबेडकरांची मते उद्धृत करीत श्याम निकोसे आपल्या लेखात लिहीतात, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रंगून येथे 1954 साली विपश्यनेला विरोध केला असून डोळे मिटणे हा भ्रमिष्टाचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. ह्याचाच अर्थ त्यांनी आपल्याला डोळे मिटण्याचा नव्हे तर डोळस होण्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले आहे. योग, हटयोग, समाधी या सर्वच गोष्टीनी मध्ययुगीन भारतीय समाजाचे वाटोळे केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कधी ध्यानधारणा करीत नसत; ते गहन विचार करीत, त्यांच्या विचारप्रक्रियेत एकाग्रता होती. डॉ.आंबेडकर म्हणत असत, ध्यान, समाधी यातून कार्यकर्ता निष्क्रीय बनतो. मी कधी ध्यान समाधी लावून बसत नाही. मी एकाग्र चित्ताने जे लिहितो, वाचतो व कार्य करतो तेच माझे ध्यान व समाधी आहे.
दुसरा लेख आहे क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्यासंदर्भात. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त धुळ्याच्या अमरदीप दगडू पवार यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी ज्योतिबांच्या सत्यशोधकी कार्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. ज्योतिबांनी मनुवाद्यांवर केलेला प्रहार व ब्राम्हणी धर्माच्या स्वार्थी तत्वांवर केलेला हल्लाबोल याचे विवेचन केलेले आहे. आजही जातीय भेदभाव डोके वर काढत आहे, अंधश्रद्धांचे प्रस्थ वाढत आहे. अशा काळात ज्योतिबांच्या मानवतावादी विचारांचे महत्व असल्याचे प्रतिपादन करीत लेखकाने आपल्या लेखाचा शेवट ज्योतिबांच्या ‘सर्वांचा निर्मीक आहे एक निर्मीक ईश’ या अखंडाने केलेला आहे.
तिसरा लेख आहे गाडगेबाबांवर, विज्ञानवादी लोकसंत-गाडगेबाबा. गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त हा लेख लिहिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत येथील प्रा.प्रवीण बनसोड यांनी. या लेखात त्यांनी गाडगेबाबांनी अठरापगड जातीच्या बहुजन समाजाला जागे करण्यासाठी त्याच्याच बोलीभाषेत किर्तनाच्या माध्यमातून तत्वज्ञान, विज्ञान, मानवतावाद सांगत बहुजन समाजाला परंपरेतून, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी आपले सारे आयुष्य कसे पणाला लावले याबद्दल लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे, देव-दैवाच्या कल्पना घट्ट उराशी कवटाळणारा माणूस गाडगेबाबाना अभिप्रेत नव्हता तर बुद्धिनिष्ठ माणसांचा समानतेवर आधारीत समाज त्यांना अभिप्रेत होता.
परंतु आज गाडगेबाबांच्या या स्वप्नाची काय परिस्थिती आहे? याबाबत आपली खंत व्यक्त करताना लेखक लिहितो, अशिक्षित असलेल्या गाडगेबाबांच्या नावाने आज विद्यापीठ आहे. त्यांच्यावर पी.एच.डी.चे प्रबंध लिहिले गेले आहेत. त्यांची जयंती, स्मृतीदिनाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. फोटो प्रतिमेस हार अर्पण केले जात आहेत. पण ज्या विज्ञानवादी माणसाची निर्मिती शिक्षणाच्या प्रयोगशाळेत व्हावी असे गाडगेबाबांना वाटत होते त्या माणसाची निर्मिती मात्र आपण करू शकलेलो नाही याची खंत वाटते. ज्या ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या विरोधात गाडगेबाबांनी संघर्ष केला ती व्यवस्था टिकवण्यासाठी आजची शिक्षणप्रणाली वापरली जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. खुद्द गाडगेबाबांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या विद्यापीठातच जर दैववाद जोपासला जात असेल तर इतर ठिकाणचे चित्र कसे असेल?
शेवटी लेखकाने म्हटले आहे, लोकसंत गाडगेबाबा म्हणजे भारतातील विषमतेच्या विरोधात आवाज उठवणारे क्रांतीदूतच होत. अस्पृश्यता हा हिंदुस्थानाला लागलेला डागच आहे, असे ते म्हणत. त्यांची दशसूत्री म्हणजे, सामान्य माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्याचा जाहिरनामाच आहे. हा जाहिरनामा प्रत्यक्षात रूजविण्यासाठी शिक्षित वर्गाने पुढाकर घेणे गरजेचे आहे. त्यांच्या जयंतीदिनी हीच सर्वात मोठी आदरांजली ठरेल.
मध्यंतरी पुणे येथील थेऊरला धनदांडग्यांच्या पुण्यात शिकणार्या पोरांनी फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली दारू पिऊन, अंमली पदार्थांचे सेवन करून बराच धिंगाणा घातला होता. त्या संदर्भातील लेख संगमनेरच्या कार्यकर्त्या अॅड.रंजना पगार-गवांदे यांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी समाजसुधारकांचा वारसा, शिक्षणाचा प्रसार, भारतीय संस्कृतीतील सण उत्सवांची आनंदी परंपरा, भारतीय कायदा यांना या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या व्यसनी पार्ट्या उधळून लावत आहेत असे मत मांडले आहे. या परिस्थितीला आज समाजात बोकाळलेला चंगळवाद व त्या चंगळवादाला बळी पडलेला धनदांडगा पालकवर्ग कसा जबाबदार आहे हे सांगताना त्यांनी लिहिले आहे, रात्री नऊच्या सुमारास फ्रेशर्स पार्टीला सुरवात झाली. पार्टीतील गोंगाट, कर्कश आवाज यामुळे फार्म हाऊसच्या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी छापा टाकला. सुमारे 88 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. ही सर्व मुले श्रीमंत पालकांची होती. या पूर्वीही झालेल्या अशा प्रकारच्या रेव्ह पार्टीत सामील झालेली मुलेही श्रीमंताचीच होती. त्यावेळीही या श्रीमंत आईबापानी आपल्या मुलांना जामीनावर सोडवून आणले होते. आज आपल्या समाजात चंगळवादाकडे झुकणारा चंगळवादी जीवन जगणारा पैसा म्हणजेच सर्वस्व असे मानणारा वर्ग निर्माण झालेला आहे. एनकेन प्रकाराने पैसा कमवायचा स्वत:ही पैशाच्या धुंदीत चंगळवादी जीवन जगायचे आणि त्या प्रचंड पैशाच्या आधारे मुलांना श्रीमंत शैक्षणिक संस्थांतून प्रवेश मिळवून द्यायचा की, आपले कर्तव्य संपले. खरेतर पालकांनी आपल्या मुलांच्या वाटचालीवर लक्ष ठेवावयास हवे, आपण देत असलेल्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग होत आहे की, नाही यावर लक्ष ठेवावयास हवे, मुलांच्या मित्रमैत्रिणी, गु्रप याबद्दल माहिती द्यावयास हवी, आपले छोटेमोठे गुन्हे आपले आईबाप पैशाच्या साहाय्याने निस्तरतात अशी भावना मुलांच्या मनात येऊ देता कामा नये. हे जर पालकांनी केले नाही तर मुलांबरोबर तेही तेवढेच गुन्हेगार आहेत असे मानले जाईल. आपण संयमित जीवन जगून पालकांनी आपल्या पाल्यासमोर आदर्श निर्माण करायला हवा. मुलांवर संस्कार, संस्कार वर्गाला पाठवून होत नसतात तर ते आपल्या वागण्या बोलण्यातून व आपल्या कृतीतून होत असतात व करायचे असतात.
धुळे येथील प्राचार्य व्ही.के.भदाणे यांनी लग्नपत्रिका(कुंडली) म्हणजे ठगबाजी असा लेख लिहिला असून त्यात त्यांनी मुद्देसुपणे लग्नाच्या कुंडलीबाबतची ज्योतिषांची ठगबाजी उघडकीस आणली आहे. कुंडली म्हणजे काय आणि ती कशी तयार करतात याचे अगदी थोडक्यात विवेचन करून त्यांनी ज्योतिषांसमोर रवी(सूर्य) हा स्वयंप्रकाशित तारा आहे तर त्याला ग्रह का म्हणायचे? चंद्र हा ग्रह नाही तर पृथ्वीचा उपग्रह आहे त्याला ग्रह का म्हणायचे? राहू-केतुंचे अस्तित्व आहे कोठे? पृथ्वीला कुंडलीत स्थान का नाही? जन्मवेळ निश्चित कोणती धरावी? असे काही बिनतोड प्रश्न निर्माण केले आहेत.
बत्तीस शिराळ्याचे राहुल तानाजी गायकवाड यांनी निसर्ग, माणूस आणि श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयावर लेख लिहीला आहे. त्यात त्यांनी माणूस आपल्या हव्यासापोटी, धार्मिक रूढी परंपरा पाळण्यासाठी, आपल्या विकासासाठी निसर्गाचा कसा नाश करीत आहे याची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यांनी लिहीले आहे, आपण निसर्गाकडून सर्व काही घ्यायला शिकतो. पण आपण त्याची परतफेड करीत नाही. दुभती जनावरे गवत खातात आणि निसर्गाला शेणाच्या रूपाने खत देतात. तसेच इतरही प्राणी निसर्गाला या ना त्या मार्गाने परतफेड करीतच असतात. त्यामुळे आपली प्रगती साधता साधता माणसाने निसर्गाचे पोषणही केले पाहिजे. निसर्ग हाच देव आहे म्हणून आपण न दिसणार्या देवासाठी निसर्गाचा नाश करू नये. असे सांगत आपल्या लेखाच्या शेवटी त्यांनी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते जगवावे, पाणी वाचवावे असे सर्व वाचकांना आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण येथील कमलेश य.ठाकूर यांनी 21 वे शतक-विज्ञानतंत्रज्ञान-आणि पर्यावरणावरील ताण या विषयावर लिहीले आहे. या लेखात त्यांनी 20 व्या व 21 व्या शतकातील झालेल्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानवी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणावर पडत असलेल्या ताणामुळे मानवी विकासाच्या आड गंभीर समस्या उभी राहिली असल्याचे प्रतिपादन केले आहे. यासाठी सुचविलेले उपाय सांगताना ते लिहितात, माहिती तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरण संबंधातील माहिती जगात पोहोचविणे आणि प्रसारमाध्यमांद्वारे होणार्या दुष्परिणामांची माहिती जगापुढे पोहोचविणे. लोकसंख्यावाढ रोकणे. जंगलतोड थांबविणे. सेंद्रीय शेतीवर भर देत शेतीचे उत्पादनात वाढ करणे. मातीचा कस वाढवणारे सुक्ष्मजीव, गांडुळशेती अशा रसायनविरहीत साधनांचा वापर वाढवायला हवा.
संकलन – राजीव देशपांडे