विज्ञानाचा वारसा आणि आरसा लेख आवडला.
आपला फेबु्रवारी 2013 चा अंक वाचला. विज्ञानाचा वारसा आणि आरसा हा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पुस्तक परिचय सदरातील रिचर्ड फेनमनचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व हे पुस्तक वाचावेसे वाटले.
विज्ञानाचा वारसा आणि आरसा अशा सारखे लेख आपल्या मासिकातून प्रसिद्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे मासिक फक्त अंधश्रद्धेवर टीका करते असे नसून विज्ञानाबाबत जागृती निर्माण करते. हेही समाजाला व सरकारला कळणे आवश्यक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा विरोध कमी होणार आहे. आपला वाचक वर्ग व वर्गणीदार वाढले पाहिजेत यासाठी टीकात्मक लिखाणासोबत असे मार्गदर्शनपर लिखाण होणे आवश्यक आहे. हा लेख अतिशय चांगला आहे. रूढी परंपरेतील वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाच्या निदर्शनास येणे आवश्यक आहे. समाजास कर्मकांडापासून परावृत्त करण्याचे काम असे लेखच करणार आहेत.
-म. न. ढोकळे, डोंबिवली, जि.ठाणे
यज्ञाला महिलांचा विरोध अभिनंदनीय
मुंबईतील दिंडोशी येथील म्हाडाच्या मैदानावर यज्ञाचे आयोजन करणार्या राजकीय लागेबांधे असलेल्या धार्मिक संस्थेला शिवधाम संकुलातील महिला योग्य रितीने आणि धैर्याने विरोध करीत आहेत. ही गोष्टच अभिमानाची आहे. विज्ञानाच्या झालेल्या प्रगतीचे फायदे आपण घेतो, पण त्याचवेळी असे अवैज्ञानिक यज्ञ करून शेकडो किलो तूप, धान्य, अन्न अग्नीत स्वाहा करतो. आज महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. यज्ञाच्या अग्नीत धान्याची आहुती देणार्या धार्मिक भावनांना गरीबांची उपाशी तोंडे कशी दिसत नाहीत? भक्तांनी दिलेले पैसे, दागिने हे घेणार्या यज्ञ आयोजकांकडे भक्ती आहे की, फक्त धंदा? यज्ञामुळे आसपासच्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना त्रास होतो तसेच यज्ञकाळात विविध प्रकारचे प्रदूषण व अस्वच्छता वाढत असते. अशा तक्रारींमध्ये राजकीय पुढार्यांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे पण ते मतांचे राजकारण खेळतात व सामान्य माणसाला वेठीला धरतात.
एवढे असूनही आवाज उठवणार्या या रणरागिनी महिलांना सलाम! मागे हटू नका, आमचा तुम्हाला नैतिक पाठींबा आहे…. ढोंगी बुवाबाबांच्या आत्मदहनाच्या धमकीचा मुळीच विचार करू नका, आपल्या निर्णयावर ठाम राहा.
-अलका चाफेकर, गोरेगाव, मुंबई
दुसर्याच्या चुका काढताना वास्तव नीट समजून घ्या.
‘हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही’ हे शुभा परांजपे यांचे पत्र(दै.लोकसत्ता 12 फेबु्र.) हा एक वैचारिक अपघात वाटला! ‘महामार्गाच्या कडेला असलेली दारूची दुकाने हलवली तर अपघातांचे प्रमाण कमी होईल’ हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे म्हणणे पत्रलेखिकेला पटले नाही, हे त्यांचे वैयक्तिक मत झाले. मात्र ते व्यक्त करताना त्यांची शाब्दिक गाडी डॉ.दाभोलकरांवर इतक्या तीव्रतेने का घसरावी हे समजत नाही.
केंद्रीय स्तरावर केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, 97 टक्के वाहन अपघात मद्यपान व अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे होत असतात. महामार्गांवर सहजासहजी मिळणारी दारू मिळेनाशी झाली तर अनेकांचे नाहक जाणारे प्राण वाचतील, या म्हणण्यामागे विज्ञानापेक्षा इतरांबद्दलची काळजी, आपुलकी असू शकत नाही का? एकवेळ महामार्गांवरील अपघात योग्य खबरदारी घेतली तर टाळले जातील पण दुसर्याच्या चुका काढताना केलेले असे शाब्दिक अपघातही टाळायला हवेत.
-सूर्यकांत भोसले, मुलुंड(पूर्व), मुंबई
कर्मकांडाशिवाय अंत्यसंस्कार
माझे वडील पी. डी. बाळेकुंद्री रा. बेळगाव हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे गेले पंधरा वर्षे वाचक होते. त्यांचे नुकतेच वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. ते आपले वाचक व हितचिंतक असल्यामुळे सतत अंधश्रद्धा निर्मूलनसाठी कार्य करीत असत. त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांच्या निधनानंतर कोणतेही कर्मकांड, दिवसकार्य व पिंडदान न करता फक्त अंत्यविधी केला. अंत्याविधीसाठी लाकूड न वापरता शेणींचा वापर केला. तरी हे कळविण्यासाठी हे पत्र आपणास पाठवित आहे.
– गिरीष पी. बाळेकुंद्री, बेळगाव
आर्डे व मंडपे सरांचे अभिनंदन
मअंनिसचा जीवन गौरव पुरस्कार प. रा. आर्डे व कुमार मंडपे यांना मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्यासारखे जिद्दी, अभ्यासू लेखक/कार्यकर्ते समितीस लाभले. वय वाढणारच आहे. शरीराची बंधने टाळता येत नाहीत. तरीही या वयात आपला उत्साह व चिकाटी यास दाद द्यावीशी वाटते.
– मधू जाधव, सोलापूर