
मानवी जीवनाच्या सर्व अंगांवर आपली सत्ता प्रस्थापित करून आपली पोळी भाजण्याचा धर्मांध ठेकेदारांचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी ते आपली धार्मिक तत्वज्ञाने, इतिहास, समाजरूढी, परंपरा, दंतकथा, पुराणकथा, पारंपरिक ज्ञान याचा सर्रासपणे वापर करीत असतात. असा वापर करीत असताना ते विज्ञान, विवेक यांना बेधडकपणे धुडकावून लावतात. आपल्या देशात अशा मंडळींना आज मोठेच ‘महत्व’ प्राप्त झाले आहे. त्या संदर्भातील दोन उदाहरणांचा केलेला उहापोह…..
आपल्या शबरीनं रामाला दिलेली बोरं सेंद्रिय शेतीतून पिकवलेली होती की वैदिक शेतीतून?
तुम्हाला काय वाटतं? मोठा गमतीचा प्रश्न आहे ना हा?
अर्थात आपल्याला हा प्रश्न यापूर्वी कधी पडला नव्हता. आता तो पडला पाहिजे. कारण गेली काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रीखालील विचाराच्या संघटना भारतीय सेंद्रिय शेतीला वैदिक शेती, योगिक शेती म्हणावं असा आग्रह धरताना दिसत आहेत. हा आग्रह काही आताचा नाही. 4 एप्रिल 2004 मध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील अटलबिहारी वाजपेयी सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारा देशव्यापी प्रोजेक्ट राबवण्याची घोषणा केली हेती. जवळपास शंभर कोटी रूपये खर्चाच्या या प्रोजेक्टला वैदिक शेती हे नामकरण करून तो राबवायचा तेव्हा प्रयत्न झाला. त्यानंतर मध्ये दहा वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्याकाळात ही पावलं अडखळत पडत होती. आता नरेंद्र मोदी सरकार आलंय. या सरकारच्या नेतृत्वाखाली वैदिक शेती हे प्रकरण पुन्हा चर्चेत आणण्यात येतंय. पुढं रेटलं जातंय.
यापूर्वी नोव्हेंबर 2011 मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारीज या संस्थांच्या मार्फत नवी दिल्लीत शेतीवर एक चर्चासत्र झालं होतं. या चर्चासत्रात योगिक/वैदिक शेतीवाल्यांनी दावा केला की, सेंद्रिय शेतीला वैदिक शेती म्हणावं. वैदिक शेतीची हजारो वर्षांपासून भारतात परंपरा आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नात वाढ होते. त्यातून मिळणारे कृषी उत्पादन जास्त चवदार, रूचकर आणि चांगलं दर्जेदार असतं. हे प्रतिपादन करताना वैदिक शेतीवाल्यांनी कोणतीही आकडेवारी, संशोधन मात्र दिलं नव्हतं, मांडलं नव्हतं हे विशेष. आताही कुणी ते मांडत नाही. भारतातले कृषी शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमधील संशोधक आणि वैदिक शेतीचे आग्रही समर्थक यांच्या विविध चर्चा, वाद, संवाद आजपर्यंत झालेत. त्यात हे सिद्ध झालंय की, वैदिक शेतीवाले हवेत तलवारबाजी केल्यासारखी विधानं करतात. वैदिक शेतीतून येणार्या मालाची उत्पादकता, गुणवत्ता व उत्पादनाच्या टिकून राहण्याचा कालावधी याबाबत शास्त्रशुद्ध आकडेवारी न देता विधानं केली जातात. आंधळी समर्थनं पुढे केली जात आहेत. वैदिक शेतीबाबत शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करावं, त्यातून निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतरच याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं प्रयोगाची आखणी करणं, माहिती गोळा करणं, उपलब्ध सांख्यिकी माहितीचं सांख्यिकी पृथक्करण करणं, त्या आधारावर योग्य निष्कर्ष काढणं ही पद्धत अवलंबवावी असं तज्ज्ञ म्हणतात. वैदिक शेतीवाले मात्र या पद्धतीला डावलून सेंद्रिय शेतीला वैदिक शेती म्हणावं असा हट्ट धरत आहेत.
हा हट्ट का धरला जातोय?
रासायनिक खतं, कीटकनाशकं, प्रतिजैविकं, उत्प्रेरकं, संजीवकं यांच्या भरमसाठ पिकांवरच्या मार्यामुळं आपली शेती बिघडत चालली आहे. हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढलं. अन्न धान्य भरपूर झालं. पण त्याचे दुष्परिणाम वाढले. दूषित अन्न, भाजीपाला, फळफळावळं शेतीतून भरपूर निघताहेत. त्याचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होतोय. रोगराई बळावलीय. मानवी जीवनावर नवं संकट येऊ घातलंय. कॅन्सरसारखे दुर्धर रोग बळावलेत. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आहेत हे लक्षात आल्यानं शेतीतज्ज्ञांनी आधुनिक रासायनिक शेतीकडे पाठ फिरवा, रसायनांचा वापर नसणारी सेंद्रिय शेती करा, त्यातली उत्पादनं खा म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल असं आवाहन केलंय. त्यातून सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू झालेत. त्या सेंद्रीय उत्पादनांचा बाजारात बोलबाला वाढला. नेमकं अशावेळी वैदिक शेतीवाल्यांनी सेंद्रिय शेतीचं महत्व ओळखून आपलं घोडं पुढं दामटलंय. वैदिक शेती हीच खरी सेंद्रिय शेती आहे. वेदकाळापासून ती आपल्याकडे परंपरेनं होतेय, असा हट्ट सुरू केलाय.
खरं म्हणजे सेंद्रिय शेतीचं धार्मिकीकरण, आध्यात्मिकरण करण्याचा हा एक चालाख प्रयत्न आहे.
भारतीय कृषी परंपरा समृद्ध आहे. त्यातलं प्राचीन ज्ञान व आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा मेळ घातला पाहिजे. त्यातून कृषीक्षेत्र, कृषी उत्पादन दर्जेदार, निरोगी होईल असा सर्वच कृषीतज्ज्ञ, शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. पण या प्रयत्नाला फाटे फोडून वैदिक शेतीचा झेंडा नाचवणं कितपत फायद्याचं आहे?
भारतीय कृषी परंपरा समृद्ध आहे हे म्हणताना ती समजून घेतली पाहिजे.
भारतीय शेतीचा विचार करताना शेतीच्या शोधापर्यंत जावं लागेल. मानव प्राणी टोळी अवस्थेत जगत होता. तेव्हा शिकार करून तो पोट भरी. अन्नासाठी वणवण भटकणं त्याला क्रमप्राप्त होतं. वणवण भटकून अन्न मिळवण्यापेक्षा एका जागीच अन्न मिळवावं ही मानवाची प्रेरणा बळावली. त्यातून शेतीचा शोध लागला. हा शेतीचा शोध स्त्रीने लावला. आपल्या अपत्यांना जगवण्यासाठी स्त्रीला स्थैर्याची गरज जास्त वाटली. तोपर्यंत अग्नीचा शोध व त्याचा उपयोग कळला होता. जंगलातली स्त्री, वणव्यातला पेटता अग्नी घेऊन झाडावरून उडी मारून गुहेत गेली. तिथं स्थिरावली. या स्थिर जीवनात स्त्रीने जमीनीवर बी पडलं की ते रूजतं हे बघितलं. बी रूजतं, त्यातून रोप उगवतं. त्याचं अन्न, फळ होतं. ते खायला गोड लागतं. त्यातून पोट भरतं, आनंद मिळतो. फळं खाऊन बिया उरतात. त्या बिया मातीत गाडल्या की, त्यातून रोप तयार होतं, हे तिनं बघितलं.
शेती ज्ञान म्हणजे पेरणी, उगवणी, लागवड, पाणी सिंचन, जमिनीची वापसा, सुकणं, फुलणं, फळणं, झाडांचे कोंब, पानं, फुलं, कंदमुळं यांचं निरीक्षण. स्त्रीला हे ज्ञान झालं. पुढे उपयुक्त वनस्पती, भाजीपाला, पशुपालन, दगडाऐवजी पशुंच्या टोकदार हाडांचा जमीन उकरण्यासाठीचा उपयोग, त्यातून औजारं तयार होणं हे झालं.
जगात साधारण दहा हजार वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेत शेतीचा शोध लागला. आताच्या इस्त्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरिया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील सुपीक प्रदेशात तो लागला. सुरवातीला स्त्रीया हाताने शेती करत. दगडाची औजारं वापरत. मशागत, पेरणी करत. पुढे गुरंढोरांच्या मदतीने शेती व्हायला लागली.

गहू आणि जव हे धान्यप्रकार पहिल्यांदा मानवाने शेतीतून पिकवले. नंतर मसुरीची डाळ, जवस, वटाणे पिकवले जाऊ लागले. मध्यपूर्वेतून शेतीचा प्रसार हळूहळू उत्तर आफ्रिकेत इजिप्त, भूमध्य सागरी प्रदेशातील देश, आशिया खंडातील इतर देश आणि युरोपात झाला. शेतीच्या शोधानंतर भारतात जवळपास 3500 वर्षांनंतर शेती पद्धत पोचली. म्हणजे आपल्या देशात शेती परंपरेला 6500 वर्षांचा इतिहास आहे.
भारतात तांदूळ, तूर, मूग, उडीद, हरभरा, चवळी ही तृणवर्गीय कडधान्य, वांगी, मुळा, काकडी या भाज्या, आंबा, चिंच, संत्री, लिंबू ही फळं ऊस, कापूस, तीळ, करडई, ज्यूट, ताग, काळे जिरे, दालचिनी, नीळ ही महत्वाची पिकं होऊ लागली.
आपल्या देशात पुरातन शेतीचं स्वरूप कसं होतं?
1.स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा काटक बियाणांचा वापर.
2. शेतीतील पिक विविधता ठेवणं.
या भक्कम पायावर 6500 हजार वर्षे भारतीय शेती समृद्ध होत गेली.
पाणी, माती, जंगलं याचंं संवर्धन करणं, गाव पातळीवर पाण्याच्या तलावांची निर्मिती, त्यातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाई. कोरडवाहू शेतीत शेताभोवती झाडांच्या भिंती उभारणं, त्यातून हवेतील आर्द्रता वाढवणं, जमिनीत ओलावा टिकवणं, कमी पावसाच्या क्षेत्रात योग्य पिकं घेणं, पिकांचा फेरपालट, मिश्रपिकं पद्धतीचा वापर हे ज्ञान भारतीय शेतकर्यांना चांगलं होतं. म्हणून इंग्रजी राजवटीतही इंग्रज राज्यकर्त्यांनी शेतकर्यांच्या शेती पद्धतीत ढवळाढवळ केली नाही. त्यापूर्वीच्या कुणा राज्यकर्त्यांनी शेतकर्यांना काही शिकवण्याचा उद्योग केला नव्हता.
हे शेती ज्ञान 6500 वर्षांत विकसित होत असताना कोणत्याही धर्माचा भारतात त्याच्याशी काही संबंध नव्हता. कृषीजीवन हे स्वतंत्र होतं. जगात ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, बौद्ध या कुठल्याही धर्माचा, त्यांच्या ग्रंथांचा शेतीजीवनाशी कधी संघर्ष आला नाही. धर्मजीवन वेगळं, शेतीजीवन वेगळं होतं. पण धर्म संस्थात्मक होऊ लागले. मग संस्थात्मक धर्मवाल्यांना मानवी जीवनाच्या सर्व अंगावर आपला पगडा, सत्ता, वर्चस्व असावं हा वाद लागला. त्यातून शेतीपद्धती, शेतीजीवनही सुटलं नाही. शेतकर्यांच्या अनेक परंपरांना धार्मिक चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न झाला. त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन त्यांचं आध्यात्मिककीकरण करणं, कर्मकांडात रूपांतर करणं, देव, देवता, नवस, पूजा या चक्रात अडकवण्याचा प्रयत्न झाला. या चक्राचं रूपांतर पुढे अंधश्रद्धा, बुवाबाजी यांना जन्म देते.
जमिनीचं फळणं, फुलणं म्हणजे अन्न वाढवणं. स्त्रीचं फळणं-फुलणं म्हणजे वंश वाढवणं. असा संबंध जोडला गेल्यानं शेती, पाऊस आणि शेतात जाऊन पावसात नृत्य करणं, नांगर धरणं असे सुफलीकरणाचे विधी बाणभट्टाने ‘हर्ष चरित्रात’ दिलेत.
शेती हंगाम म्हणजे आषाढ ते आश्विन या चार महिन्याचा पाऊसकाळ. या काळातच विविध सण, व्रत, स्त्रियांचे गौरवदिन, विजयदिन, स्त्री कुलदेवतांची आठवण, मातृदेवतांचा आदर व्यक्त करणारे दिवस, उत्सव साजरे होतात.
आषाढ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून येते. पती सत्यवानाला वाचवणार्या सावित्रीच्या वैद्यकीय ज्ञानाची आठवण ठेवण्यासाठीचा हा दिवस आहे. श्रावणात नागपंचमी येते. नांगर शोधामुळे मातृकुळे उद्ध्वस्त झाली. स्त्रीया नागिणीच्या संतापाने जाग्या झाल्याचा इतिहास सांगणारा हा दिवस. राखी पौर्णिमा म्हणजे मातृसंस्कृतीत भावाचं स्थान महत्वाचं हे सांगणारा धागा.
भाद्रपद पंचमीला कृषी पंचमी. या पंचमीला नांगराद्वारे पिकलेलं धान्य वर्ज्य. फक्त भाजी व कंद खाऊन स्त्रीचं प्राचीन काळातलं शेतीविषयक योगदान स्मरण करणारा दिवस. ती आज ऋषीपंचमी म्हणून साजरी होतेय. त्याचं धार्मिकीकरण झालंय. नवरात्र हा शेती व स्त्रीचं अतूट नातं सांगणारा महत्वाचा उत्सव. घट हे स्त्री गर्भाशयाचं प्रतिक. नवरात्राचा घट धान्य, लतावेली, पानं, सुपार्या, फळं यांनी भरून पुजतात. स्त्री आणि जमीन यांच्या जननक्षमतेला हे अभिवादन करणं. महालक्ष्मी, अंबाबाई, रेणुका, एकवीरा, तुळजाई, म्हाळसाई, यमाई वगैरे शूर शेतकरी मातांच्या विजयाच्या आठवणी, यात्रा, उत्सवातून जागवल्या जातात. दसर्याला सरस्वती मातेच्या ज्ञानाचं स्मरण, पूजन करतात. दसर्याचंही हिंस्त्र धार्मिकीकरण झालंय. मातृप्रधान व्यवस्थेतले हे गौरवदिन, स्मरण दिन धर्मचक्रात कसे अडकलेत. त्यातून व्रतवैकल्ये, कर्मकांडांची गुलामी कशी चौफेर धरून आपल्या पुढे नाचतेय हे आपण बघतोय.
या गुलामीचा पुढचा टप्पा म्हणजे वैदिक शेतीचा फासा आहे. धर्म हे हत्यार वापरणार्यांचा एक अजेंडा असतो. मानवी जीवनावर जास्त प्रभाव टाकणार्या सर्व क्षेत्रांचा ताबा घ्यायचा, त्याला आपल्या तालावर नाचवायचं. हा तो अजेंडा होय. योग, विपश्यना या आरोग्य वर्धनाच्या पद्धती. त्यांना धर्माच्या चौकटीत डांबण्यात येतंय. आयुर्वेदाला धर्माच्या पिंजर्यात कैद करण्यात आलंय. प्राचीन शिक्षण व्यवस्थेला धर्म चिकटवला. सर्व प्राचीन ज्ञान हे धर्माच्या चौकटीत कोंडून मग ते हवं तसं वळवून लोकांना सांगण्याचा प्रयत्न झाला.
सेंद्रिय शेतीला वैदिक शेती म्हणावी असा ढोल त्यातूनच बडवला जातोय.
वास्तविक 1960 पर्यंत आपल्याकडं नैसर्गिक, सेंद्रिय पद्धतीने शेती होत होती. 1960 नंतर हरितक्रांती सुरू झाली. संकरित बियाणं, रासायनिक खतं किटकनाशकं यांच्या वापरातून अन्न, धान्य वाटलं. बैलांच्या जागी ट्रॅक्टर आला. पण जमीन, पाणी, दूषित झालं. अन्न दूषित झालं. शेतीचं चक्र बिघडलं.
रासायनिक शेतीनं जमिनीची धूप होते. पिकांवरच्या कीडींची प्रतिकारक्षमता वाढतेय. किटकनाशकांतली घातक रसायनं अन्नात उतरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊनही माणसांचे आजार वाढत आहेत. आरोग्याची नवी आव्हानं उभी ठाकली आहेत. जीवनशैलीचे म्हटले जाणारे आजार हे जेवणशैलीमुळे होत आहेत. कमतरताजन्य व र्हासजन्य आजार बळावलेत. दूषित अन्नामुळे ते होताहेत. मानवाचं स्वास्थ्य हे वनस्पती, पशुपक्षी, जीवंत जमीन यांच्या आरोग्याशी निगडीत आहेत. आता आपल्या शेतातली माती रोगट झालीय. तिच्या पोटातले जीवाणू, बुरशी, गांडुळं मरू लागलीत. त्यातून तिचा जिवंतपणा, सुपिकता लोप पावतीय. शेती म्हणजे निसर्गाचं मानवी रूप होय. ते रूप रासायनिक शेतीनं विरूप केलं म्हणून आता पुन्हा पूर्वी आपली जशी नैसर्गिक, सेंद्रिय शेती करत होतो तशी शेती करू या ही जाणीव शेती व्यवसायात वाढत आहे. युरोप, अमेरिकेतही सेंद्रिय शेतीचा बोलबाला आहे. आपल्या देशातही गेली पंधरा वर्षे सेंद्रिय शेती करा असं सरकारी, बिगर सरकारी मंचावरून सांगितलं जातंय. शेतकरी वर्गातही त्याविषयी जागृती आलीय. सेंद्रिय शेतीतून तयार होणार्या मालाला जास्त किंमत मिळतेय. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं त्यासाठी पुढाकार घेतलाय. कृषी खातं प्रयत्न करतंय. यापुढे सेंद्रिय शेती हा विषय शेतकरी जीवनावर प्रभाव टाकणारा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंतांनी हे हेरलंय. म्हणून त्यांनी सेंद्रिय शेतीला वैदिक शेती म्हणावं, असा घाट घातलाय. सेंद्रिय शेतीला धर्माच्या चौकटीत कोंबण्याचा हा डाव आहे. त्यातून धर्माच्या विद्रूप अजेंड्यात लोकांना राबवण्याचा कट आहे. खरं म्हणजे आपली भारतीय शेती सेंद्रीय, नैसर्गिक पद्धतीने साडे सहा हजार वर्षेसुरू होती. अनेक शूर, ज्ञानी मातांनी ती शेती पद्धत समृद्ध केलीय. अनेक प्राचीन कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी शेती विकासाला पूरक ज्ञान प्राप्त केलं त्याचा प्रसार केला. त्याचा धर्माशी काही संबंध नव्हता या शास्त्रज्ञांनी कृषीज्ञान प्रसारासाठी ग्रंथ लिहिले.
सहदेव भाडळी हा ग्रंथ त्याचं उदाहरण आहे. हा ग्रंथ लोकभाषेत आहे. सहदेव, भाडळी ही बहीण भावंडाची जोडी. शेतीविषयी भाकितं सांगणारी म्हणून प्रसिद्ध आहे. पाऊस, पिकं, पशुपक्षी, निसर्ग यांच्याबद्दलचे आडाखे-अंदाज त्यात व्यक्त झालेत. त्यातल्या म्हणी बघा….. ‘न पडती चित्रा तर भात मिळेना पित्रा.’ ‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा.’ ‘न पडती मघा तर वरतीच बघा.’ या ग्रंथातली भाडळी ही विदुषी स्त्री आहे. ती जमीन व बाई यातलं द्वैत सांगत राहते. पोटी फळ असणं, पोटपाणी पिकणं, जमीन वांझ असणं, जमीन तापली की पाऊस हवा. बेंबीचं देठ, केळ व्यायली. पिकलं पान हे संदर्भ त्यात येतात. या ज्ञानाचा धर्म कोणता?
प्राचीन वंग देशात(बंगाल) ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात खन नावाचा कृषीशास्त्रज्ञ झाला. ‘कृषीप्रसाद’ हा प्रसिद्ध ग्रंथ त्याने लिहिला. तो सांगतोः मार्गशीर्षातला पाऊस राजालाही भिकेला लावील. मघातला पाऊस धान्य समृद्धी आणील. फाल्गुनातला पाऊस भरपूर धान्य देईल. सूर्यास्ताला आकाश निरभ्र राहिले तर शेतकर्याने नांगरायचे बैल विकायचे ठरवावे. कार्तिकात लोकरीवजा ढग दिसले तर हिवाळी पीक खूप येईल. मूळा पिकाला खोल, कापसाला थोडी, तर भाताला जमीन जास्त नांगरू नये हे तो सांगतो. थोर प्राचीन खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिराचं पंचांग शेती विकासाला पूरक ठरलं. सूर्ययंत्र, छायायंत्र, जलयंत्राचा वापर करून त्याने कालमापन मांडलं. नक्षत्रांचा उदयास्त मांडला. बृहसंहिता या ग्रंथात त्याने कृषीशास्त्रावर लेखन केलं. त्यात पेरणी, लावणी, हवामानाचा परिणाम यावर चर्चा केलीय. खन व राहमिहीराच्या ज्ञानाला धर्म कोणता चिटकवायचा? हे सर्व परंपरिक शेतीज्ञान धर्मसंस्थेच्या सहभागाशिवाय धर्माच्या उदयाच्याही अगोदरपासून विकसित होत आलंय. विविध स्त्रिया, पुरूष यांनी केलेल्या निरीक्षणातून भारतीय सेंद्रिय शेती पद्धत विकसित झालीय. तिला वेदाचा आधार देणं, धर्माच्या चौकटीत डांबणं फायद्याचं ठरणार नाही. ख्रिस्ती, इस्लामी या धर्मांनी कधी त्यांच्या देशात शेती व्यवस्थेत हस्तक्षेप करून तिचं धार्मिकीकरण केलेलं नाही. भारतातही ते होऊ नये. भारतीय शेती पद्धत पारंपरिक ज्ञान, निरीक्षण, प्रयोग, नैतिकता यातून समृद्ध होत प्रवाही राहत आली आहे. तिला वैदिक शेती ठरवून धर्माच्या बेडीत अडकवणं म्हणजे आपल्या शहाण्या पूर्वजांचा अपमान ठरेल. शेती पुढे जाण्यासाठी हे होणं घातक ठरल्याशिवाय राहणार नाही.
लेखक संपर्क: 9004315221