1946 साली प्रकाशित झालेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या आपल्या ग्रंथात जवाहरलाल नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द वापरला. नेहरु त्या वेळेस असोसिएशन ऑफ सायंटिफिक वर्कस ऑफ इंडिया (एएसडब्लूआय)चे अध्यक्ष होते. ही संघटना कामगार संघटना म्हणून नोंदणीकृत होती. (एखादा पंतप्रधान कामगार संघटनेचा अध्यक्ष असण्याचे हे एकमेव उदाहरण असेल.) मी या संघटनेशी 1940 पासून 1950च्या प्रारंभापर्यंत जवळून संबंधित होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे हे एएसडब्लूआयचे एक उद्दिष्ट होते. त्या संदर्भात सुरुवातीला संघटना खूपच सक्रीय होती. पण 1960च्या सुमारास परिस्थिती पालटू लागली. देशातील शास्त्रज्ञाचा एक मोठा गट जो अगदी मोक्याच्या स्थानांवर होता ज्याची बांधिलकी विवेक, चिकित्सा, चौकसपणा, अंधश्रद्धाना विरोध या मूल्याशी असायला हवी होती, तोच वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर होऊ लागला होता. ज्या आपल्या शास्त्रज्ञानी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासाची, प्रसाराची भूमिका पार पाडायला हवी होती तेच शास्त्रज्ञ वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर जात होते.
या आमच्या निष्कर्षाला बळकटी देणारी आणखी एक घटना घडली. 1964 मध्ये आम्ही म्हणजे सतीश धवन( जे पुढे अंतरिक्ष तंत्रज्ञान विभागाचे सचिव बनले), अब्दुर रेहमान (विज्ञानाच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक), आणि मी मिळून एक सोसायटी फॉर सायंटिफिक टेम्पर या नावाने संस्था स्थापन केली. या संस्थेच्या संस्थापक सभासदात नोबेल प्राईज विजेते फ्रांसिस क्रीक सारखे मान्यवर शास्त्रज्ञ होते. संस्थेच्या सभासदत्वासाठी मात्र एक अट होती, ज्यांना सभासद व्हावयाचे आहे त्यांनी एका निवेदनावर सही केली पाहिजे. त्या निवेदनात आम्ही म्हटले होते, “ज्ञान केवळ मानवी प्रयत्नानीच प्राप्त होऊ शकते साक्षात्काराने नव्हे आणि माणसाला सतावणार्या सर्व प्रश्नाना मानवी बुद्धीने आणि नैतिकतेनेच उत्तर मिळू शकते, कोणत्याही अमानवी शक्तीमुळे नव्हे. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
हे निवेदन घेऊन आम्ही एका मागोमाग एक अशा अनेक शास्त्रज्ञांना भेटलो. पण त्या सर्वांनी त्या निवेदनावर सही करण्यास नकार दिला. त्याना वैज्ञानिक दृष्टिकोनाशी वगैरे काही देणे घेणे नव्हते. आमचा चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यानंतर आम्ही त्यावेळचे शिक्षण मंत्री नुरुल हसन यांना भेटलो व वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलच्या भागाचा घटनेत समावेश करण्याबद्दल आग्रह धरला. त्यानंतर 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीच्या वेळेस नागरिकांची मुलभूत कर्तव्ये हा भाग घटनेत समाविष्ट करण्यात आला. विभाग 4अ कलम 51 अ मध्ये देण्यात आलेल्या कर्तव्यांच्या यादीत म्हटले आहे, “वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, मानवतावादी विचारांचा विकास करणे, चौकस बुद्धी वाढवणे व सुधारणांसाठी मनोवृत्ती सजग ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे प्रमुख कर्तव्य आहे.”
आपल्या वैज्ञानिकाना जागे करण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व स्वत: वापर करण्याबद्दलच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न होता पण मला नाही वाटत परिस्थितीत काही सुधारणा झाली आहे. अगदी आजही तीच 50-60 वर्षा पूर्वीचीच स्थिती आहे. त्यासाठी ही तीन उदाहरणे पहा,
या पूर्वीच्या भाजपच्या सरकारातील मानव संसाधारण मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाला फलज्योतिषाचा पदवी अभ्यासक्रम सर्व विद्यापीठातून सुरु व्हावा म्हणून परिपत्रक काढण्याचा आदेश दिला आणि त्यासाठी खास अनुदानही मंजूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मी आणि माझी सहकारी चंद्रा चक्रवर्ती या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो. प्रशांत भूषण आमचे वकील होते. न्यायालयाने आमचा दावा दाखल करून घेतला पण अपेक्षेप्रमाणे फेटाळला. फलज्योतिष पूर्णपणे अवैज्ञानिक, अविवेकी थोतांड असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे, तरीही न्याय देणार्याना त्याला प्रतिरोध करणे शक्य होत नाही. त्यावेळेस पाठिबा देण्यास एकही शात्रज्ञ पुढे आला नाही किंवा ज्या सहा राष्ट्रीय विज्ञान संस्था आहेत त्यापैकी कोणत्याही संस्थेने याबाबत काहीही केले नाही, ज्यांच्यावर दरवर्षी पुरेसा सार्वजनिक निधी खर्च केला जातो. ज्या लोकांनी आम्हाला पाठिबा दिला व आमचा खटला लढविण्यासाठी निधी गोळा करून पाठविला ते सर्व वैज्ञानिक क्षेत्राच्या बाहेरचे लोक होते. या विज्ञान अकादमींतील अपुरेपणा आणि विज्ञानाशी संबधित सामाजिक प्रश्नाबाबतची त्यांची असंवेदनशीलता यामुळे मी 1993 मध्ये यातील तीन अकादमीच्या सन्मानीय सभासदत्वाचा राजीनामा देऊन टाकला.
दुसरे उदाहरण आहे, आपले पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मुंबईत वैज्ञानिकांच्या एका गटासमोर बोलताना असा दावा केला कि, प्राचीन भारताला अवयवांचे अदलाबदल करण्याचे शास्त्र अवगत होते. त्यासाठी त्यांनी हत्तीचे मुंडके गणेशाच्या शरीरावर बसवले गेल्याचे उदाहरण दिले.
तिसरे उदाहरण आहे नुकत्याच झालेल्या 102 व्या मुंबईतील इंडियन सायन्स कॉग्रेसच्या अधिवेशनातील संस्कृतमधील प्राचीन विज्ञान या बहुचर्चित चर्चा सत्राचे. यात भारतात जम्बो विमाने (60 बाय 60फूटाची, काही तर 200 फुट लांबीची विमाने) होती आणि नऊ हजार वर्षापूर्वी (हरप्पा आणि मोहोन्जो-दरो च्या 4500 वर्षापूर्वी ) ती या खंडातून त्या खंडात एवढेच नव्हे तर दुसर्या ग्रहांवरही उड्डाणे करीत असत. त्याही पुढे जाऊन, प्रत्येक सजीव अथवा निर्जीव वस्तु सर्व काळ उर्जा उत्सर्जित करत असते या तत्वावर आधरित असलेली त्यावेळची रडार व्यवस्था आजच्यापेक्षाही प्रगत होती. तसेच असेही म्हटले गेले कि 21व्या शतकात विज्ञान आणि अध्यात्म यांचा एकरूपतेच्या सिद्धांतानुसार एकमेकात विलय होऊन जाईल. मला शंका आहे कीज्या सिद्धांताला काहीही अर्थ नाही अशा या सिद्धांताबद्दल एकातरी अभ्यासकाने काही ऐकले असेल. या चर्चासत्रातील असे केले गेलेले अनेक अधांतरी दावे म्हणजे खरेतर प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील खर्याखुर्या वैज्ञानिक यशाला फासलेला काळीमाच आहे.
पण आपल्या देशातील काही मोजके अपवाद वगळता कोणत्याही तथाकथित वैज्ञानिकानी या दाव्याविरोधात आवाज उठवला नाही. सायन्स कॉग्रेस आयोजित करणार्या मान्यवरांना चर्चा सत्रात काय मांडले जाणार हे माहीत असणारच. तरीही त्यांनी ते ठेवले याचा अर्थ एकतर त्यांना हे सर्व दावे मान्य होते किंवा त्याच्यावर प्रचंड राजकीय दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे ही वार्षिक इंडियन सायन्स कॉग्रेसची अधिवेशने बंदच करून टाकायला हवीत. मी 30 सप्टे. 1997 लाच ‘द हिंदू’ मध्ये ‘इंडियन सायन्स कॉग्रेसची अधिवेशने का बंद करावीत’ यावर लेख लिहिला होता. नाहीतर या इंडियन सायन्स कॉग्रेसचे नाव बदलून ‘इंडियन अंटी – सायन्स कॉग्रेस’ असे ठेवायला हवे.
त्याच प्रमाणे या विज्ञान अकादमी आहेत त्या सुध्दा गुंडाळून ठेवल्या गेल्या तरी विज्ञानाचे काहीही वाटोळे होणार नाही. गेल्या 85 वर्षात भारतात विज्ञानातील एकही नोबेलचा विजेता झालेला नाही. याला कारण वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या वैज्ञानिक वातावरणाचा मुख्य गाभा आहे असे वैज्ञानिक वातावरणच देशात नाही.
– पुष्पा एम. भार्गव
(पुष्पा एम. भार्गव हे हैद्राबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मोलेक्यूलर बायोलोजी’ आणि ‘सदर्न रिजनल सेंटर ऑफ कौन्सिल फोर सोशल डेव्हलपमेंट’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या ‘द हिंदू’ मध्ये आलेल्या लेखाचा अनुवाद )
अनुवाद: राजीव देशपांडे
संपर्क : 9969024039