Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

 वैज्ञानिक मनोभावाची महता

फेब्रुवारी – २०१२

            प्रत्येक मानवाच्या अंतर्यामी वैचारिक जडतेच्या(Donga) विरोधात बंडाची भावना जागृत असतेच. चौफेर नजरेने शोध घेणे ही आपली मूलगामी जैविक प्रेरणा आहे जिचा विसर पडता कामा नये. अनेक कारणांनी ही प्रेरणा दडपली जाऊ शकते. तिला जागृत करण्यासाठी वैज्ञानिक मनोभावाची मशाल पेटवायला हवी. याची सुरवात ज्ञानाबद्दल आशंका घेऊन व्हायला हवी.

            शंका घेणे हा आपल्या संस्कृतीत मनाचा कमकुवतपणा समजला जातो; परंतु श्रद्धेला जेवढे धैर्य लागते त्यापेक्षाही मोठे धैर्य शंका घेण्यास लागते. आणि त्यासाठी मोठी मानसिक ताकदही लागते. श्रद्धा हे विश्रांतीस्थान आहे तर शंका वृत्तीला विश्रांती नाही. ती अनंताकडे धावणारी आहे आणि हेच तिचे सामर्थ्य आहे. ज्ञानाचा शोध अज्ञानाच्या जाणिवेपासून सुरू होतो आणि अज्ञानाची जाणीव शंकेपासून उगम पावते.

            वैज्ञानिक मनोभावाचा अंगिकार करावा यासाठी भारताचे थोर सुपुत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतवासियांना हाक दिली. ती त्यांच्या अंतरीची प्रेरणा होती ही प्रेरणा म्हणजेच साशंक बाब. सत्याचा स्वीकार करण्यापूर्वी पुरेसा प्रामाणिकपणा जो समाज दाखवत नाही आणि ज्ञानाच्या तुलनेत आपले अज्ञान अमर्याद आहे हे मान्य करीत नाही त्या समाजाचा  विनाश अटळ आहे.

            एकविसाव्या शतकाच्या या दुसर्‍या दशकाच्या आरंभकाळी भारतवासियांनी हे नीट समजून घ्यायला हवे की, विश्वसनीय ज्ञानाचा प्रवास हा अज्ञानाच्या प्रवेशद्वारातूनच पुढे जात असतो. अगदी विज्ञान क्षेत्रातील मंडळींनीसुद्धा सजग राहून एका कटू सत्याला सामोरे जायला हवे. ते सत्य म्हणजे पुरेशी चिकित्सा न करता स्वीकारलेल्या वैज्ञानिक ज्ञानावरील श्रद्धेने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेत जे सर्व प्राणी जगताच्या संकटात भर टाकू शकतील व पृथ्वीचा विनाश करू शकतील. आपला वैज्ञानिक ज्ञानावरचा घाऊक अवाजवी विश्वास चुकीचा व कोत्या मानसिकतेचा परिणाम आहे.

            मानवी संस्कृतीच्या आरंभकालापासून दृष्ट्या लोकांनी वेळोवेळी मांडलेल्या सत्यात एक मजेशीर विरोधाभास आढळतो. हे सत्य परिपूर्ण नसते पण जगाबद्दलचा अज्ञानमूलक दृष्टिकोन स्वीकारणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये दृष्ट्यांनी मांडलेले विचार पटकन रूजतात व ते पक्के होतात.( Become dogma) अशा विचारांचा साचेबंद पॅटर्न तयार होतो व तो फसवा असतो. पण प्रत्येक नवा पॅटर्न हा वैचारिक खळबळ माजवणारा असतो जो पूर्वीच्या सर्व गोष्टीचे नव्याने मूल्यमापन करणारा असतो. झाडाची कोणतीही दोन पाने एकसारखी नसतात किंवा हिमवर्षावातील हिमकण एकसारखे नसतात. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणाचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा एकमात्र(Unique) असतो हे जेव्हा आपणास उमगते तेव्हा या सृष्टीच्या आश्चर्यकारक स्वरूपाचा प्रत्यय येतो.

            पण माझा अनुभव हाच खरा हा एकांगी दृष्टिकोन आपण घट्ट धरून बसतो व त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो हीच मोठी अडचण आहे आणि तो अनुभव आपल्या कृतीत प्रभावी ठरतो हे सुद्धा आपणास कळत नाही. फुलणार्‍या रोपट्याकडे जरा लक्षपूर्वक पहा ते वाढत असताना त्याची पाने व फुले एकामागून एक आकाराला येतात त्याच वेळी तळाची पाने व फुले गळून पडतात. आपले विचार, संकल्पना व श्रद्धा या देखील या फुलणार्‍या रोपट्याप्रमाणे असावयास हव्या. वृक्ष हे, आपण आपल्या विचाराबाबत वा कृतीबाबत अनाग्रही(Undogmatic) असावयास हवे हे शिकवितात. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर जीवन विकासात आपण गतीमान व परिवर्तनशील रहायला हवे. हाच वैज्ञानिक मनोभावाचा संदेश आहे.