Categories
प्रतिसाद

वार्षिक 2012 च्या मुखपृष्ठाविषयी…

जानेवारी - २०१३

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक 2012 च्या मुखपृष्ठावर केशवसुतांच्या ‘स्फूर्ती’ कवितेतील ओळी व देवाचा कलता मुखवटा आहे. केशवसुतांच्या ‘स्फूर्ती’ कवितेचा परिचय व्हावा हा या लेखामागचा प्रपंच! केशवसुत मराठी कवितेतील ‘क्रांतीकवी’, ‘युगप्रवर्तक कवी’ मानले जातात. तेजाचा बाणा मिरवणारे, बंडाचा झेंडा उभारणारे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’, ‘देव दानवां नरे निर्मिले’ असे ठणकावणारे केशवसुत साहसी, आक्रमक, पुरोगामी कवी मानले जातात. मराठीत सर्वप्रथम सामाजिक, देशभक्तीपर, आत्मपर, निसर्गवर्णनपर कविता केशवसुतांनी लिहिली. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा जन्म रत्नागिरीजवळील मालगुंड येथे झाला. इ.स.1866 ते 1905 हा त्यांचा कालखंड आहे. या काळात मराठी कविता पौराणिक, काल्पनिक होती. केशवसुतांनी मराठी कवितेत वैचारिक गुढी उभारली. समाजात आमुलाग्र क्रांती करणारे सामाजिक तत्वज्ञान त्यांनी सर्वप्रथम मराठी कवितेत मांडले. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘स्फुर्ती’ या कवितांतून त्यांनी काव्यप्रांतात नवता आणली. म्हणून केशवसुत बंडखोर कवी, युगप्रवर्तक कवी मानले जातात. त्यांनी कवितेचा वापर समाजक्रांतीसाठी तरफ म्हणून वापरला.

“नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे”

“जुने जाऊ द्या मरणालागुनी”

“धर्माचे माजवुनी उंबर, नीतीला आणिती अडथळे”

“रूढी जुलूम यांची भेसूर सैताने राक्षसी”

“देव दानवा नरे निर्मिले, हे मत लोकां कवळू द्या.”

            या ओळींतून त्यांनी मांडलेले प्रखर सामाजिक विचार लक्षात येतात.

            स्फूर्ती’ ही केशवसुतांची 1896 साली लिहिलेली कविता आहे. ही स्फूर्ती नवविचारांची आहे. क्रांतीचा संदेश देणारी ही कविता आहे. जग उलथून देण्याची भाषा कवीने या कवितेत केली आहे.

“काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर उसळू द्या.
प्राशन करता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या.”

            कवीने येथे वैचारिक परिवर्तनाचे मद्य प्राशन केले आहे. स्वर्ग आणि पृथ्वी यातील अंतर कवीला मिटवून टाकायचे आहे. वैचारिक परिवर्तन करणार्‍या स्फूर्तीदायक मद्यप्राशनानंतर “रूढींचे दास झणी ते खवळू द्या” असे ते म्हणतात. देवाचे वैभव असणार्‍या तारकांना उखडून जमिनीवर फेकून त्यांना देवांचा माज उतरवायचा आहे. या कामात देवांनी अडथळा आणला तर आम्ही देवांशीही चार हात करू असे केशवसुत म्हणतात.

            “देव दानवां नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या” या ओळीतून देव-दानव ही मानवनिर्मित कल्पना आहे. विश्व, चराचर, सजीव यांची निर्मिती देवाने केली ही कल्पना कवीला अमान्य आहे. देव विश्वनिर्माता, नियंता, शास्ता, कर्ता-करविता, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वशक्तीमान या कल्पनेला कवीने सुरूंग लावला आहे. देव-दानव, स्वर्ग-नरक या कल्पना लबाडांनी निर्माण केल्या आहेत. काल्पनिक देव निर्माण करून स्वत:ची तुंबडी भरण्याचा उद्योग काही लोकांनी केला आहे म्हणून हा काळ कठीण आहे. उठा जागे व्हा. “निजती ते ठारचि मरती!” असे केशवसुत म्हणतात. “उठा! उठा! बांधा कमरा! मारा किंवा लढत मरा!” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. काल्पनिक व निरूपयोगी अशा देवाची हकालपट्टी हे आपले आद्य कर्तव्य आहे. जाचक रूढी, अन्याय्य चालीरीती व प्रथा यांच्याशी संघर्ष करा. हा संघर्ष उभारताना आपल्याला देवांबरोबर “झगडा” करावा लागणार आहे.

            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक 2012 च्या मुखपृष्ठावर केशवसुतांच्या ‘स्फुर्ती’ कवितेतील ओळी देऊन संपादकांनी वैचारिक क्रांतीची तुतारी फुंकली आहे. मुखपृष्ठ डिझायनर मिलिंद जोशी यांनी केशवसुतांच्या ओळी व कललेली देवाची मूर्ती यातून फार मोठी सूचकता निर्माण केली आहे. 116 वर्षांपूर्वीची “स्फूर्ती” कविता व त्यातील केशवसुतांची विज्ञानसुसंगत भूमिका आजच्या विज्ञान युगातील मानवाने विचारात घ्यावी.

-प्रा.विजयकुमार जोखे, शिराळा, जि. सांगली