Categories
प्रासंगिक

वेध वर्तमानपत्रातील शेवटच्या अतिरंजीत पानाचा…

जानेवारी - २०१२

नासाला सापडले पृथ्वीच्या आकारमानाएवढे दोन ग्रह
(लोकसत्ता 22 डिसेंबर 2011)

नवीन वर्षात जगबुडी होणार ही केवळ अफवाच
(लोकसत्ता 22 डिसेंबर 2011)

केपलर-12 बी ग्रहावर वसाहत होणार ?
(सकाळ 07 डिसेंबर 2011)

बर्म्युडा टँगल : जो गेला तो परतलाच नाही!
(सकाळ 22 एप्रिल 2010)

तर अनेक शहरे होऊ शकतात नष्ट!
(पुढारी 25 फेब्रु. 2006)

जगाचा अंत 2060 मध्ये होणार!
(सकाळ 19 जून 2007)

पृथ्वीच्या जवळून आज उल्का जाणार!

मंगळ आज चंद्राएवढा दिसणार!

2012 ला जगबूडी होणार!

…. आज दोन सूर्य दिसणार

अशा एक ना अनेक बातम्या हल्ली जवळपास सर्व वर्तमानपत्रांच्या शेवटच्या पानावर झळकत असतात. काही बातम्या तर इतक्या कपोलकल्पीत असतात की खगोल अभ्यासक या नात्याने सदर बातम्यांची व त्या बातम्या छापणार्‍यांच्या बुध्दीची कीव कराविशी वाटते. सदर बातम्या छापताना ज्या विषयाशी संबधीत बातमी आहे त्या विषयातील आपल्या परिसरातील तज्ज्ञांचं मत घेऊन बातमी छापली तर त्या बातमीला वजन प्राप्त होतं. पण आज तज्ज्ञाची मदत घेतली जात नाही कारण तज्ज्ञाना विचारल की त्या बातमीतील अतिरंजीतता व गूढता निघ्ाून जाण्याचीच जास्त शक्यता असते. या बातम्यांचा बातमीदार कोण असतो हे बहुतेक करून दिलेलं नसतं. कारण या बातमीच्या सत्यतेबद्दल संबंधित साशंकच असतात, त्यामुळे जबाबदारीने लिहिण्याची तसदी घेतली जात नाही. अतिरंजीत, रहस्यमय, अशा बातम्या शेवटच्या पानावर देण्याची हल्ली वर्तमानपत्रांची प्रथाच पडली आहे. वाचक वर्गाचीही मानसिकता झालेली आहे. कारण खप वाढवणे हा एकमेव हेतू त्यातून दिसतो. इलेक्टॉनिक मिडीयासुध्दा यामध्ये मागे नाही. अनेक चॅनेल्सवरून एक तासाचे असे अतिरंजीत कार्यक्रम सुरू असतात. कारण समाजाला गूढ, चमत्कारीक, मनोरंजंक, रहस्यमय, गोष्टींमध्ये रस असतो.

खगोलीय अतिरंजीत बातम्यांचा वस्तुनिष्ठ वेध घेण्याचा हा एक प्रयत्न. चळवळीतील कार्यकर्त्यांना पूरक ठरेल या अपेक्षेने हे सदर सुरू केलेले आहे. आपणालाही आज बातम्या मिळाल्या तर अवश्य संपर्क साधा. बातमीतील तथ्य समोर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.

डिसेंबर 2012 या महिन्यातील काही बातम्यांचा वेध यानिमित्ताने घेऊया. केपलर 12 बी ग्रहावर वसाहत होणार? आणि नासाला सापडले पृथ्वीच्या आकारमानाएवढे दोन ग्रह या बातमीचा वेध घेताना काही बाबींचा उहापोह करण्याची गरज आहे.

रात्रीच्या वेळी आकाशात नजर टाकल्यास विहंगम असे चांदण्यांनी बहरलेले द़ृश्य दिसते. ज्या असंख्य चांदण्या दिसतात त्यापैकी जास्तीत जास्त पाच चांदण्या हे आपल्या सूर्यमालेतील ग्रह बुध, शुक्र, मंगळ, गुरू, अथवा शनी असतात तर बाकीच्या सर्व चांदण्या सूर्यासारख्या किंबहूना सूर्यापेक्षाही तेजस्वी अशा तारका असतात. त्यांना दुसरे सूर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. चांदणी कितीही अंधूक दिसत असली तरी ती आपल्या सूर्यासारखीच किंबहुना सूर्यापेक्षाही तेजस्वी असते. आपल्या सुर्यमालेमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, त्याप्रमाणेच आकाशात रात्रीच्या वेळी दिसणार्‍या इतर सूर्यांचीही सूर्यमाला असणार व तिथेही जीवसृष्टी असणारा पृथ्वीसारखा ग्रह असणार हे निश्चित. या इतर सूर्यांच्या ग्रहांचा वेध घेण्यासाठी नासा या अमेरीकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात पाठवलेल यान ‘केपलर‘. सतराव्या शतकातील जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहानस केपलर ज्याने ग्रहांच्या गतीचे तीन नियम सांगीतले, त्याच्या नावाने पाठवलेली अंतराळातील आपल्या आकाशगंगेतील पृथ्वीसद़ृश्य वास्तव्यासाठी पोषक असणार्‍या इतर तार्‍यांच्या ग्रहांचा वेध घेणारी प्रयोगशाळा.

आपला सूर्य फारच जवळ म्हणजे पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. प्रकाश सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने जातो. या वेगाने सूर्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 8.25 मिनिटे लागतात. याचा अर्थ आपण जो आपला सूर्य पाहात असतो तो 8.25 मिनिटापूर्वीचा असतो. रात्रीच्या वेळी आपण पाहात असलेले इतर सूर्य प्रचंड अंतरावर आहेत. प्रकाशाच्या वेगाच्या हिाोबाने विचार केला तर फार वर्षापूर्वीचे आहेत. ध्रुव तारा 375 वर्षापूर्वीचा, व्याधचा तारा 86 वर्षापूर्वीचा आहे तर इतर सूर्य हे 500 अथवा 1500 वर्षापूर्वीचे आहेत. हे सर्व सूर्य आपण रात्री उघडया डोळयाने पाहात असतो. फक्त त्यांचे ग्रह आपणाला दिसत नाहीत त्यांचा वेध घेण्यासाठी नासाने मार्च 2009 रोजी ‘केपलर‘ या अवकाश यानाला इतर सूर्यांच्या ग्रहांचा वेध घेण्यासाठी पाठवलेल आहे. अर्थात हे यान इतर सूर्यावर जाऊ शकत नाही फक्त त्यांच्यापासून येणार्‍या प्रकाशाच्या तिव्रतेमध्ये पडणारा फरक ‘फोटोमिटर‘ च्या सहायाने नोंद करून शास्त्रज्ञ मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्या प्रकाशाच्या वाटेमध्ये आलेल्या ग्रहाचे आकारमान, तेथील तापमान, त्या ग्रहाचा भ्रमणाचा कालावधी यांचा निष्कर्ष काढतात. हे यान पृथ्वीपासून 15 कोटी किलोमिटर अंतरावरून (1 खगोलीय एकक) 372 दिवसामध्ये पृथ्वीप्रदक्षिणा करत आहे. हे यान अंदाजे साडेतीन वर्षे माहिती पुरवेल अशी अपेक्षा आहे. या यानाचा उद्देश खालीलप्रमाणे निश्चित केलेला आहे.

1. पृथ्वीएवढया व त्यापेक्षा मोठया आकारमानाच्या इतर सूर्यामालिकेतील ग्रहांचा शोध घेणे.

2. सदर ग्रहांच्या कक्षा ठरवणे.

3. सदर ग्रहांचे वस्तुमान, घनता, व प्रकाशाची तीव्रता ठरवणे.

आजअखेर ‘केपलर‘ ने जवळपास 2326 ग्रहांचा वेध घेतलेला आहे. त्यापैकी 207 ग्रहांचे आकारमान पृथ्वीएवढे, 1181 ग्रहांचे नेपच्यून एवढे, 203 जणाचे गुरूएवढे तर 55 जणांचे गुरूपेक्षा मोठे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ‘केपलर‘ च्या शास्त्रज्ञांच्या टीमने सदर माहिती डिसेंबर 2011 मध्ये प्रसिध्द केली. 20 डिसेंबर 2011 रोजी त्यांनी पृथ्वीएवढया आकाराच्या दोन ग्रहांचा शोध लागल्याचे जाहीर केले. त्यांना केपलर 20ई व केपलर 20 एफ असं संबोधले जाते. हे दोन ग्रह ज्या तार्‍यांचे आहेत त्या तार्‍याला (सूर्याला) नाव दिलंय केप्लर 20. ‘केपलर‘ या यानाने आज अखेर बावीस तार्‍यांना म्हणजे सूर्यांना नावे दिलेली आहेत. ती अशी केपलर 4, केपलर 5 …….. केपलर 21, केपलर 22.

‘केपलर 22‘ या ता-याभोवती (दुसर्‍या सूर्याभोवती) फिरणारा जो ग्रह सापडला त्याला नाव दिल ‘केपलर 22 बी’. या ग्रहावर वसाहत होणार अशी बातमी होती. मुळात हा ग्रह आहे 600 प्रकाशवर्ष दूर. म्हणजे त्या ग्रहापासून प्रकाश पोहोचायला 600 वर्षे लागणार. तिथे लगेच वसाहत शक्य तरी आहे का? बर अजून तो ग्रह प्रत्यक्षही पाहिलेला नाही. केवळ येणार्‍या प्रकाशावरून केलेला अंदाज. या सर्व गोष्टींचा विचार करून मगच वक्तव्य करण कधीही चांगलं. खगोलशास्त्राबद्दल अत्यंत अपूरी माहिती शालेय अथवा महाविद्यालयीन स्तरावर आहे. त्यामुळे खगोलाबद्दलची अतिरंजीत माहिती भाव खाऊन जाते व विनाकारण काही समस्या निर्माण करते. भारतीय समाजात खगोलशास्त्रापेक्षा फलज्योतिषाबद्दल जास्त आकर्षण आहे हे कारणही अशा बातम्यांच्या पाठीमागे आहे.

लगेच केपलर ग्रहावर वसाहत होणार अशा वल्गना करण्यात अर्थ नाही. मुळात माणूस चंद्राच्या पलीकडे प्रत्यक्षात पोहोचलेला नाही. त्याने चंद्रावर फक्त पाऊल टाकलेल आहे. अजूनही चंद्रावरील वसाहत लांबच आहे. राहीला प्रश्न सूर्यमालेतील इतर आठ ग्रहांचा. मंगळावर पाठवलेल पाथ फायंडर यान 1996 साली तब्बल सहा महिन्यानंतर पोहचल तर शनीवर पाठवलेले कॅसीनी यान पोहचायला सात वर्षे लागली. प्लुटोवर 2006 साली पाठवलेल न्यु होरायझन हे यान पोहचायला नऊ वर्षे लागणार आहेत. म्हणजे ते 2015 साली पोहोचणार. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवर पाठवायला लागणारा कालावधी एवढा आहे तर इतर सूर्यमालेतील ग्रहांवर यान पोहचण्यासाठीच्या कालावधीची अवस्था काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे लगेच दर्पोक्ती करून आम्हीच पहिली बातमी दिली असल्या पेड न्यूज पासून वाचकांनी सावध राहण्याची गरज आहे.

-डॉ. नितीन शिंदे