Categories
वेचक-वेधक

वेधक – वेचक

जून – २०११

हसूरचंपूकरांची धार्मिकतेला मुरड!

            वेगळे उपक्रम राबवून सतत चर्चेत असलेल्या हसूरचंपू(ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) ग्रामस्थांनी यंदा महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारानिमित्त आपल्या धार्मिकतेलाच मुरड घातली. महालक्ष्मी यात्रेत हजारावर बोकडांचा बळी देण्याची इथली दीडशे वर्षांची परंपरा यंदा ग्रामस्थांनी खंडित करून शाकाहारी यात्रा केली. यामुळे गावचे 25 ते 30 लाखांच्या खर्चाची बचत झाली आहे. या विधायक उपक्रमाची चर्चा सुरू आहे.


लैंगिक शोषणाबद्दल स्वामीला कारावास

            ह्यूस्टन येथे दोन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी एका स्वामीस अमेरिकी न्यायालयाने 14 वर्षांचा कारावास ठोठावला. स्वामीजी नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रकाशानंद सरस्वती(वय 82) याला वीस प्रकरणांत शिक्षा ठोठावली असून, दहा हजार अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावला. टेक्सास राज्यात दोन एकर जागेत स्वामीजीचा आश्रम आहे. सुनावणीच्या वेळी स्वामीजी न्यायालयात हजर नव्हता. त्याच्या गैरहजेरीत शिक्षा जाहीर करण्यात आली. लैंगिक शोषणप्रकरणात स्वामीजी दोषी असल्याचे आढळले होते.

            भारतातील अशा स्वामीजींना अमेरिकेत सोडून यावे फार बरे होईल.


शनिवार वाईट…. पेपरला बसू नको…!

            सध्या तो दहावीची परीक्षा देतोय. केवळ सोमवार ते शुक्रवार या रोजी येणार्‍या पेपर्सना ‘तो’ हजर झाला. परंतु शनिवारी येणारे पेपर्स त्याने दिलेले नाहीत. हिंदी, गणित व भूगोलला तो चक्क गैरहजर राहिला आहे. कारण त्याच्या आईच्या मते सॅटर्डे इज बॅड फॉर हीम. राज जॉन असे त्या विद्यार्थ्याचे नाव. तो आळते(ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) येथील सेव्हन्थ डे शाळेत शिकतो. मांजर आडवे जाणे, घुबड दिसणे, एखाद्याचा चेहरा अशुभ मानणे, उंबरठ्यावर शिंकणे या बरोबरच शुभ-अशुभ कल्पना कालबाह्य होत असताना इंटरनेटच्या युगामध्ये एखादा दिवस अशुभ मानून त्या दिवशी परीक्षेलाच न बसण्याच्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘माता न तू वैरिणी’ एवढेच म्हणावेसे वाटते. भविष्यकाळात शनिवारी येणार्‍या कोणकोणत्या परीक्षा जॉन टाळतो हे पाहूया.


बालकांना फेकण्याचे अघोरी कृत्य करणार्‍यांवर खटले दाखल करावेत

            नवस फेडण्याच्या नावाखाली धुळोबादेव यात्रेत लहान मुलांना छतावरून खाली फेकण्याची अनिष्ट प्रथा नाडोली(ता.पाटण, जि.सातारा) येथे जोपासली जाते ती अत्यंत अघोरी असून, लहान मुलांचा एकप्रकारे छळ केला जात आहे. या प्रथेचा शासनाने गांभीर्याने विचार करून अशा अनिष्ट प्रथेला पायबंद घालावा, अशी मागणी परिवर्तन चळवळीचे अध्यक्ष अरूण जावळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार यांनी जिल्हाधिकारी संभाजी कडू-पाटील व जिल्हा पोलीसप्रमुख विठ्ठल जाधव यांना निवेदन सादर करून संबंधितांवर खटले दाखल करण्याची मागणी केली आहे.

व्यापक प्रबोधन व प्रशासनाचे सहकार्य याद्वारे ही अनिष्ट प्रथा दूर करता येईल.


दुखवटा, हळदीसह विविध रूढी, प्रथांना तिलांजली

वासुदेव-जोशी-गोंधळी समाजाच्या राष्ट्रीय बैठकीत निर्णय

            दुखवट्यावेळी देण्यात येणारे कपडे, हळदीनिमित्त वधू-वर मंडळीचा होणारा अतिरिक्त खर्च व जाणारा वेळ यासह विविध जुन्या रूढी, प्रथांना आजपासून तिलांजली देण्याचा निर्णय वासुदेव-जोशी-गोंधळी समाज सेवा संघाच्या राष्ट्रीय बैठकीत जळगाव येथे घेण्यात आला.

            जैन हिल्सवर अखिल भारतीय वासुदेव-जोशी-गोंधळी समाज सेवा संघाची राष्ट्रीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

            वैचारिक गोंधळ संपवून गोंधळी समाजाने टाकलेले हे पुरोगामी पाऊल आहे. अभिनंदनीय व अनुकरणीयही आहे.

भावना कुलकर्णी