जगन्नाथपुरीच्या रथासाठी प्रचंड वृक्षतोड!
3 जुलैला ओरिसातील जगन्नाथपुरीची सुप्रसिद्ध यात्रा प्रचंड गाजावाजा करीत पार पडली. जगभर त्या प्रचंड रथयात्रेचे फोटो प्रसिद्ध झालेले आपण सर्वांनी पाहिले. परंतु या वर्षी रथयात्रेआधी ओरिसाच्या राज्य सरकारपुढे एक मोठा प्रश्न उभा ठाकला. रथयात्रेच्या आधी वर्तमानपत्रातून सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यात आवाहन केले की, लोकांनी फासी जातीच्या झाडाचे लाकुड रथयात्रेतील तीन रथांच्या बांधणीसाठी देणगी म्हणून द्यावे. देणगीदारास समारंभपूर्वक प्रमाणपत्र देण्यात येईल.
जगन्नाथाच्या देवालयाला हे तीन महाप्रचंड रथ बांधण्यासाठी दरवर्षी जवळ जवळ 400 क्युबिक मीटरचे 1135 ओंडके लागतात. त्यासाठी दरवर्षी 13 जातींची 1000 झाडे तोडावी लागतात. धार्मिक श्रद्धेनुसार रथासाठी वापरले जाणारे लाकुड या तेरा जातींच्या झाडांचेच असावयास हवे. दुसरे लाकुड या रथयात्रेसाठी चालत नाही. ओरिसातील नयागड आणि खुर्दा या जिल्ह्यांतील जंगलातून सरकार ही लाकडे पुरवित असते. रथयात्रा उत्सवाच्या नियमाप्रमाणे देवालयाला रथांसाठी विनामूल्य लाकुड पुरविण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारची आहे. रथयात्रेनंतर हे महाकाय रथ मोडले जातात व त्या लाकडांचा उपयोग देवळाच्या भटारखान्यात केला जातो. या भटारखान्यात दररोज जवळजवळ 35 ते 40 हजार लोक जेवत असतात. हे जगातील सर्वात मोठे सामुदायिक भोजनालय आहे. येथे दररोज 8.5 टन लाकडे जाळली जातात. रथयात्रेच्या दहा दिवसात तर दररोज 25 टन लाकडे अन्न शिजवण्यासाठी जाळली जातात. मोडीत काढलेल्या रथाची लाकडे नऊ महिने पुरतात. उरलेल्या तीन महिन्यांसाठी सरकार पुरवठा करते. परंतु दिवसेंदिवस लाकडाची टंचाई भासू लागलेली असल्याने हा प्रश्नही आता वादग्रस्त बनलेला आहे.
2000 साली सरकारने या 13 जातींच्या लागवडीसाठी जगन्नाथ वन प्रकल्प सुरू केलेला आहे. तो पाच जिल्ह्यांतील 2800 हेक्टरवर पसरलेला असून त्या प्रकल्पांतर्गत 4.5 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. पण त्याचे लाकुड उपयोगात येण्यासाठी आणखी तीस वर्षे जावी लागणार आहेत. फासी झाडाला वठण्यासाठीच साठ वर्षे लागतात. त्यानंतरच त्या झाडाच्या लाकडाचा उपयोग करता येतो. या झाडाच्या लाकडाचा उपयोग रथाच्या चाकांसाठी केला जातो. रथाच्या बांधणीत रथांची चाके हा फार महत्वाचा भाग असतो आणि त्यासाठी टणक लाकडाचीच गरज असते. हा प्रकल्पही आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेला आहे. फक्त एक जिल्हा वगळता बाकी सर्व ठिकाणी हा प्रकल्प रखडलेला आहे.
ओरिसातील नयागड जिल्ह्यातील महानदीच्या तीरावरील समुदायानी संरक्षित केलेल्या जंगलातून फासी जातीची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. सरकारची नजर आता त्यावर गेलेली आहे. परंतु त्या वृक्षतोडीला विरोध होण्याची चांगलीच शक्यता आहे. त्यामुळे ओरिसा सरकारपुढे जगन्नाथाच्या रथाला लाकूड कसे पुरवाचे हा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकलेला आहे. बेकारी, महागाई, टंचाई वगैरे सारखे महत्वाचे प्रश्न सरकारला सतावत आहेतच पण त्या प्रश्नांचा त्रास मानवाला. या लाकूड टंचाईचा फटका मात्र प्रत्यक्ष भगवंतांना. त्यामुळे इतर सर्व प्रश्न तसे या प्रश्नापुढे दुय्यमच!
नेपच्युन ग्रहाच्या सूर्यभ्रमणाचा पहिला वाढदिवस
गडद निळ्या रंगाचा व सूर्यमालेतील आठवा ग्रह असलेल्या नेपच्युनची त्याचा शोध लागल्यानंतरची-सूर्याभोवतीची पहिली फेरी जुलै 13 रोजी सकाळी 8 वाजून 36 मिनिटांनी पूर्ण झाली म्हणून खगोलशास्त्रज्ञांच्या जगात वाढदिवस साजरा झाला. कारण त्या दिवशी नेपच्युन ग्रह 329 अक्षांशावर होता. 1846 साली प्रथम शोध लागल्यानंतर या ग्रहाला दुसर्यांदा सौरमालेत बघू शकत असल्यामुळे या दिवसाला प्रथम वाढदिवस म्हणावयास हरकत असू नये.
नेपच्युन ग्रहाला कोपर्निकस व अक्वेरिअस तारकापुंजात दुर्बिणीच्या सहाय्याने स्पष्टपणे बघता येईल. 22 ऑगस्ट 2011 रोजी हा ग्रह प्रतियुतीत असणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला उगवलेला नेपच्युन रात्रभर दिसू शकेल.
नेपच्युन हा एकमेव ग्रह असा आहे की, त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण न करता आकडेमोड करून शोधलेला हा ग्रह आहे. युरेनस या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी लागला होता. मात्र त्याची कक्षा कललेली होती. न्यूटनच्या बल नियमाप्रमाणे कक्षा कललेली असल्यास एखाद्या दुसर्या ग्रहाच्या गुरूत्वबलाचा परिणाम त्यावर होत असावा या गृहितकाचा शोध घेता घेता नव्या ग्रहगोलाची शक्यता अधोरेखित करण्यात आली. युरेनसच्या स्थितीचा गणितीय अभ्यास करून नेपच्युनचा प्रथम वेध घेतला. पुढे 23 सप्टेंबर 1846 मध्ये जॉन गॉल आणि हाइनरिच यांनी बर्लिन ऑब्झर्व्हेटरी येथून नेपच्युनचे निरीक्षण केले.
असा आहे नेपच्युन
निळ्या रंगाचा हा ग्रह सूर्यापासूनचा सर्वात दूरचा ग्रह आहे. या ग्रहाला तेरा उपग्रह असून शनी ग्रहाप्रमाणेच नेपच्युनलाही कडे आहेत. याच्या वातावरणात 80 टक्के हायड्रोजन, 19 टक्के हिलियम व अल्प प्रमाणात इथेन व मिथेन वायू आहेत. नेपच्युनचे सरासरी तापमान उणे 235 अंश सेल्सियस आहे. या ग्रहाचा व्यास 49500 कि.मी. असून पथ्वीएवढ्या चार पृथ्वी चिकटून लावण्याइतकी तिची लांबी आहे. या ग्रहाचे वजनसुद्धा पृथ्वीपेक्षा 17.1 पट जास्त आहे. आकारमानाने तो पृथ्वीपेक्षा 38.87 पटीने मोठा आहे.
रामदेवबाबांना राहूची बाधा
रामदेवबाबांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधात दिल्लीत केलेले आंदोलन हे अयशस्वी, फोल ठरले. या आंदोलनाच्या कालावधीत त्यांच्या राशीत राहूच्या संक्रमणाचा काळ सुरू होता. त्यामुळेच त्यांचे आंदोलन अयशस्वी झाल्याचा दावा उत्तर प्रदेशातल्या ज्योतिषांनी केलाय. योगगुरू रामदेवबाबांचे आंदोलन 4 जूनपासून सुरू होते. याच दिवसापासून बाबांच्या जीवनप्रवासात राहू ग्रहाने प्रवेश केला. रामदेवबाबांनी दिल्ली पोलीस यंत्रणेला प्रतिकार केला असता तरी त्यांना अपेक्षित यश आले नसते, असं ज्योतिषांनी म्हटलंय. आता यश प्राप्त करून देणारा ग्रह रामदेवबाबाच्या राशीत कधी येणार ते ज्योतिषांनी जाहीर करावे. त्याचवेळी दिल्लीतील पोलीस प्रमुखांच्या राशीत राहू शिरला तर बाबांचे यश पक्के होईल नाही का?