11 फेब्रुवारी 2003. हा दिवस मराठी पत्रकारितेत सुवर्ण-अक्षरांनी नोंदवायला हवा. मराठी पत्रकारितेला एक वेगळं वळण या दिवशी लावण्यात आलं. ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाने या दिवशी आपल्या वृत्तपत्राच्या नावातच गणपतींचे फोटो रोज झळकवायला सुरवात केली. 11 फेब्रुवारी 2013 ला या उपक्रमाला तब्बल दहा वर्षं पूर्ण झाली. या दशकपूर्तीनिमित्त ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाचं करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे.
असा उपक्रम सुरू करणं हे संपादकांसाठी केवढं जिकिरीचं काम होतं, याची आपल्याला कल्पना येणार नाही. एक तर मटाची पूर्वीपासून प्रतिमा ही बुद्धिजीवी, विवेकनिष्ठ, तर्ककर्कश्श अशी होती. गोविंदराव तळवलकर संपादक असताना ‘बुद्धिमत्तेचा गड्डा’ अशा काहीशा भयमुक्त आदरानेच त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांनी मटाला बुद्धिवादी चेहरा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी कुमार केतकर आले. ते तर एके काळचे कम्युनिस्ट. त्यांची मूळची विवेकनिष्ठा त्यांना कधीच सोडून गेली नव्हती. त्यांनी गोविंदरावांचा वारसा तेवढ्याच समर्थपणे पुढे नेला. अग्रलेखासाठी दैनिक वाचायला हाती घ्यायचे, हे मटाचे वैशिष्ट्य त्यांच्या काळापर्यंत टिकून होते. तेव्हा ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वाचकाला आपण बुद्धिनिष्ठ, विवेकनिष्ठ, विचारनिष्ठ आहोत असा काहीसा सुप्त अहंगंडच होता म्हटलं तरी चालेल.
या अशा परंपरेत वाढलेल्या मटाचा चेहरामोहरा बदलणं ही वाटते एवढी सोपी गोष्ट नव्हती. पण भारतकुमार राऊत या जिगरबाज संपादकाने हे धाडस केलं. आपल्या नावात जरी कुमार असलं तरी त्याचा ‘कुमार केतकर’ यांच्याशी काहीही संबंध नाही, हे त्यांनी कृतीने दाखवून दिलं. त्यांनी ‘मुंबई टाईम्स’ या गुलगुलीत पुरवणीची निर्मिती केली. भरपूर इंग्रजी शब्द वापरून मराठी लेखन करण्याच्या नव्या परंपरा या पुरवणीद्वारे रूढ केल्या. पण आपल्या ‘पत्र नव्हे मित्र’ ला असा चेहरा दिला म्हणून त्यांच्यावर उथळपणाचा आरोप व्हायचा. त्यांच्या दैनिकाला संस्काराची, अध्यात्माची, बुद्धिवादाची किंवा बुद्धीची चाड नाही, असं विद्वान लोक म्हणू लागले होते. त्यांना राऊत यांनी कृतीनेच उत्तर दिले. बुद्धीचे दैवत श्री.गजानन याची प्रतिष्ठापना त्यांनी थेट मटाच्या शीर्षकामध्येच केली. बुद्धीची देवता घ्या थेट पहिल्या पानावरच, दैनिकाच्या शिरोभागी! आता कराल का आरोप मटा बुद्धीला मानत नाही असा?
संस्काराक्षम वाचकांनाही हा बदल चांगला वाटला. ‘मुंबई टाईम्स’मधल्या नागड्या उघड्या बायका अगदी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पाहण्यापेक्षा प्रथम गजाननाचं दर्शन घेऊन मग त्यांचा समाचार घेण्यानं, नाही म्हटलं तरी, वाचकांच्या जगण्याला एक आध्यात्मिक बैठक प्राप्त झाल्यासारखी झाली. रोज गणपतीला इतक्या फेर्या घालीन, इतक्या वेळा अथर्वशीर्ष म्हणीन, चतुर्थीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन असल्या किरकोळ व्रतापेक्षा हे व्रत खूपच महान होतं. पण संपादक उतले नाहीत, मातले नाहीत, गणपतीचा फोटो मटाच्या मथळ्यात टाकण्याचा घेतला वसा त्यांनी टाकून दिला नाही आणि त्याची प्रचिती त्यांना आलीच. लवकरच त्यांना शिवसेनेची खासदारकी मिळाली. पूर्वीची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेबांना संपादकांनाच खासदारकी द्यावी असं का वाटलं असणार? तर गजाननाची कृपा! त्यानेच बाळासाहेबांच्या डोक्यात हे भरवलं असणार.
वर म्हटल्याप्रमाणे हा बदल करणं ही सोपी गोष्ट नव्हती. वर्षानुवर्षं मराठी वाचकांच्या मनात पत्रकारितेची एक बुरसटलेली प्रतिमा होती. ‘पत्रकारिता’ म्हणजे बातम्या, अग्रलेख, पहिल्या पानावर आर.के.लक्ष्मण यांचं राजकीय व्यंगचित्र असं काहीसं डोक्यात होतं. काही वाचक केवळ बातम्या वाचण्यासाठी तर काही स्वत:चं उद्बोधन व्हावं म्हणून अग्रलेख आणि इतर वैचारिक लेख वाचण्यासाठीच पेपर घ्यायचे. यांना केवळ मनोरंजन म्हणून पेपर असतो ही संकल्पनाच मान्य होणं कठीण होतं. परंतु हा ट्रेन्ड मटानं आणला. मटाच्या नावाने कावकाव करणार्या इतरही मराठी वृत्तपत्रांनी पुढे त्याचं अनुकरण करून इंग्रजी नावाच्या आणि मंग्रजी किंवा महिंदी किंवा मंग्रजीहिंदी अशा मिश्र भाषेतल्या पुरवण्या सुरू केल्या. निखळ मराठी भाषेच्या संदर्भात बघितलं तरी हे ऐतिहासिक कार्य होतं आणि मराठी भाषेबाबतच्या या महान कार्यामुळेच बाळासाहेबांनी राऊत यांना खासदारकी बहाल केली असणार.
पण हा गणपतीच्या चित्रांचा उपक्रम मात्र सोपा नव्हता. त्याचं अनुकरण करण्याचं धाडस काही इतर मराठी वृत्तपत्रं दाखवू शकली नाहीत. एक तर त्या काळात जागतिकीकरण नुकतंच आलेलं. संगणक घरोघर येत होता. अशा आधुनिक वातावरणात रोज वर्तमानपत्राचा मथळा गणेशयुक्त करायचा, हा मोठा धाडसी निर्णय होता. शिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणात त्या काळात नाही म्हटलं तरी शाहू-फुले-आंबेडकर यांचं नाव उठसूट घेण्याला प्रतिष्ठा होती. आजही आहे.(पण असा नाव घेण्यामागचा पोकळपणा आता राजकारण्यांसकट सार्यांनाच जाणवू लागला आहे.) आजही आपल्या वर्तनातून आणि कृतीतून थेट शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावाला काळीमा फासणारा राजकारणीसुद्धा त्यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारणात तोंड उघडत नाही. जे स्थान मटावरच्या गणपतीचं तेच स्थान राजकारण्यांनी महाराष्ट्र शासनात या तिघांचं बनवून टाकलेलं आहे. तर या नावांना काळीमा फासेल असा ‘असेक्युलरपणा’ उघडपणे करताना त्या काळात सार्वजनिक क्षेत्रातली व्यक्ती नाही म्हटलं तरी थोडी कचरली असती. पण हे धाडस मटाच्या संपादकांनी त्या काळात दाखवलं. आपल्या अशा कृत्यानं सरकारी जाहिराती बंद होतील की काय अशी भीती त्यांनी मनात बाळगली नाही. पण गजाननाची कृपा अशी की त्या जाहिरातीही घटल्या नाहीत.
धोरणात्मक पातळीवर हा निर्णय घेणं तर कठीणच होतं, पण व्यावहारिक पातळीवरही अडचणी कमी नव्हत्या. रोजच्या रोज छापता येतील इतके गणपतींचे फोटो गोळा करणं हे एक स्वतंत्र काम होतं, नव्हे आव्हानच होतं. त्या कामासाठी त्या काळात मटाला एखादा स्वतंत्र ‘गुळाचा गणपती’ असा संपादक नेमावा लागला असेल. त्याचं दिवसभराचं काम म्हणजे फक्त गणपती गोळा करणं एवढंच. एवढ्या कामासाठी एक संपादक खर्ची घालायचा म्हणजे मॅनेजमेंटशी वाद घालून अंगीकृत कार्याचं महत्व संपादकांना पटवून द्यावं लागलं असेल. मॅनेजमेंटमध्येही एखादा गणपतीभक्त असेल तर हे काम सोपं गेलं असेल. नाही तर या जगावेगळ्या पत्रकारितेचं महत्व तिथल्या आंग्ळाललेल्या मॅनेजमेंटला कसं पटवून देणार?
खरं तर मटाचा वाचक फक्त ‘हिंदू’च आहे, असं समजणं यालाही एक वेगळीच श्रद्धा संपादकाच्या ठायी हवी. कारण वसईच्या मराठी खिश्चनांच्या टाळक्यावर रोजच्या रोज गणपती का म्हणून मारायचा? मटाचे जैन वाचक असतील, रामदास आठवल्यांसारखे नवबौद्ध वाचक असतील, त्यांना रोजच्या रोज हे सक्तीचं गणेश-दर्शन का म्हणून घडवायचं? पण असल्या किरकोळ मुद्यांचा बाऊ न करता संपादक दणकून पुढे गेले. एखादा बिल्डर बिल्डींगमधल्या प्रत्येक फ्लॅटच्या बाहेरच्या दारावर गणपती देतो. तो प्रत्येक फ्लॅटधारकाला ‘तुला गणपती दारावर आवडेल का रे बाबा’ असं विचारत बसत नाही. फ्लॅटधारकाचा धर्म कोणता वगैरे विचार न करता तो प्रत्येकाच्या दारावर गणपती झळकवतो. तशीच बिल्डर-मनोवृत्ती संपादकांनी दाखवली आणि घरोघर रोज गणपतीचं दर्शन घडू लागलं. पुण्यात ऐन सदाशिव पेठेत अतिभव्य असं ‘नऊ सदाशिव’ नावाचं अलिशान टॉवरयुक्त असं अतिभव्य गृह-संकुल होतं आहे. तिथं तर रोज पहाटे सनई-चौघडा वाजवण्याचं आणि दारासमोर रोज नवीन रांगोळी काढून देण्याचं आश्वासन बिल्डरनं प्रत्येक फ्लॅट धारकाला दिलेलं आहे. (रांगोळ्या दारासमोर काढण्याचं कंत्राट रवी परांजपे या थोर भारतीय चित्रकाराला दिल्याचं ऐकिवात आहे.)
असो. तब्बल दहा वर्षं हे व्रत निभावणं इज नॉट अ ज्योक. तेव्हा भारतकुमार राऊत यांच्यानंतर आलेले संपादकही त्यांच्याएवढेच अभिनंदनास पात्र आहेत. मटानंच आपल्या वाचकांना ही देवदर्शनाची चटक लावल्यानं आता काही वेगळे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता भविष्यात निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, एक वयस्क गणपतीभक्त म्हणत होते की, ‘हा रोजचा गणपती फार छोटा आहे. चष्मा लावल्याशिवाय तो दिसत नाही. तेव्हा गणपतीचा आकार संपादकांनी वाढवावा.’ रोजच्या गणपतीचा आकार वाढवायचा ठरवला तर तो गणपती नेमका कोणत्या आकारात द्यावा, हा प्रश्न उभा राहू शकतो. कुणाला तो पानभर पाहावा असंही वाटू शकतं. संपादकांचीही तशी इच्छा असली तरी मॅनेजमेंटला ते मान्य होणार का? बर्याचदा पहिलं पानभर जाहिरात चालून येते. तो रेव्हेन्यू बुडवून कसं चालेल?
या उपक्रमाचं कौतुक करणारा लेख ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी मटातच लिहिला आहे. लेखाचा शेवट करताना त्यांनी म्हटलं आहे, ‘पहिल्या पानावर गणपतीबाप्पाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची संकल्पना मला नेहमीच काळाच्या पुढे जाणारी आहे असे वाटते.’ साळगावकर म्हणतात म्हणजे ते खरंच असणार. त्या लेखातच ‘मटाचा हा उपक्रम पुढची आणखी शंभर वर्षं तरी सुरू राहायला हरकत नाही.’ असा आशिर्वादही दिलेला आहे. कुणाची हरकत असणार? आमचीही नाही. पण संपादकांच्या ‘भविष्या’तील अडचणींचाही ज्योतिर्भास्करांनी विचार करायला हवा ना. बिचार्या संपादकांनी रोजच्या रोज नवनवे गणपती आणायचे कुठून? जुने गणपती रिपीट केले तर सर्वसामान्य वाचकांना काही फरक पडणार नाही. पण रोजच्या गणपतींचे फोटो कापूनबिपून संग्रह करणारे संग्रहक आहेत.(त्यांच्या मुलाखती त्याच मटाच्या अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत.) या जागरूक संग्रहकांना ही बनवेगिरी लगेचच लक्षात येईल. तेव्हा मटाचे संपादक(नाईलाज म्हणून का होईना) इतर हिंदू देव-देवतांकडे आपली नजर वळवणार का? तशी मागणी भविष्यात होणारच नाही असं नाही. हिंदू धर्मात फक्त एकच एक गणपती दैवत आहे का? समजा, बाबरी मशीद पाडणारे काही रामभक्त जर ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ असा दाखला देऊन म्हणू लागले की, ‘रोज शिर्षकात गणपतीच का? प्रभू रामचंद्र का नकोत?’(त्याचा फायदा 2014 च्या राजकारणालाही होऊ शकतो) तर संपादकांची भूमिका काय राहील? काळाराम, गोराराम, कोदंडधारी राम असे काही राम पटापट आठवतात. नाशिकला ‘भोसला मिलिटरी स्कूल’मध्ये बंदुकींच्या गोळ्यांच्या धातूचा बनवलेलाही एक आक्रमक राम आहे. तो एखादा दिवस भागवू शकेल, पण वर्षभर पुरवठा होईल एवढे राम तरी आपल्याकडे आहेत का? रामभक्तांप्रमाणे काही वाचक गुरूदेव दत्ताचे भक्त आहेत. ते मुखपृष्ठावर ‘कधी तरी दत्त का नको’ असं म्हणू लागले तर? आज ना उद्या हा प्रश्न संपादकांसमोर दत्त म्हणून उभा राहणारच आहे. झालंच तर ‘बारा ज्योतिर्लिंग’ पुजणारे भक्त आहेत. वारकर्यांचे ‘फुडारी’ पताकांची दांडकी हातात घेऊन कधी तरी पहिल्या पानावर विठ्ठलाचीही मागणी करणार, हेही उघडच आहे. तेव्हा त्यांचीही काही तरी सोय संपादकांना करावीच लागेल. विठोबा आल्यावर खंडोबा का नको? खंडोबा चालतो तर म्हसोबा का नको? हिंदू धर्मातले इतर देव वापरायचे असं धोरण आखल्यास संपादक महोदयांचा एक फायदा मात्र नक्की होईल. त्यांना पुढचे किमान तेहतीस कोटी दिवस तरी मटा चालवण्यासाठी कुणाच्या तोंडाकडे पाहायची वेळ येणार नाही! ‘तेहतीस कोटी भागिले तीनशे पासष्ट’ इतकी वर्षं मटा हा काळाच्या पुढे धावणारा उपक्रम चालवू शकेल. साळगावकरांच्या शंभर वर्षांच्या सूचनेला व्यवहाराचं अधिष्ठान नाही, जे आमच्या सूचनेला नक्कीच आहे.
दशकपूर्तीचा हा सोहळा एकीकडे चालू असतानाच दुसर्या मराठी वृत्तपत्रात ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’त एक पत्र प्रसिद्ध झालं होतं. दिंडोशीच्या शिवधाम संकुलातल्या 19 इमारतींतील महिलांनी पुढाकार घेऊन एक नागरी मंच स्थापन केला आणि जवळच्या म्हाडाच्या मैदानावर होऊ घातलेल्या सहस्त्रचंडी-नवकुंडी यज्ञाला, महाराष्ट्रात दुष्काळ असताना ज्या यज्ञात तेल-तूप-धान्य याची नासाडी होणार होती, परीक्षेच्या काळात ध्वनिप्रदूषण होणार होतं, अशा महायज्ञाला, कडाडून विरोध केला. पुढे त्यांच्या आंदोलनाला यश येऊन हा महायज्ञ तिथे झाला नाही. वर्तमानपत्रं गणपतीचे फोटो छापण्यात मग्न झाल्यावर यापुढे लोकांनाच असा पुढाकार घेऊन अंधश्रद्धेच्या विरोधातला लढा आपला आपण लढावा लागणार हे उघड आहे.
-मुकुंद टाकसाळे