Categories
कार्यकर्ता मुलाखत

विज्ञाननिष्ठ साथीदार : प्रमोदिनी व कुमार मंडपे

वार्षिकांक – २०११

प्रत्येक यशस्वी पुरषाच्या मागे त्याची पत्नी असते हे अर्धसत्य आहे. यशस्वी पुरूषाच्या पुढे त्याची पत्नी असते हेही खरे आहे. आमचे मंडपे सर त्याचे उदाहरण ठरावे. आणखी एक समजूत म्हणजे स्त्रिया या अंधश्रद्ध असतात. कुमुदिनी मंडपे याला अपवाद आहेत. त्या अंधश्रद्ध नाहीतच उलट त्यांनी अंधश्रद्ध नवर्‍याला विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. कुमार मंडपे व कुमुदिनी मंडपे यांनी परस्परांना साथ देत स्वत:त व कुटुंबात विज्ञाननिष्ठा अंगिकारलीच, त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात व समाजात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन राबविण्याचे कार्य निष्ठेने केले.

            यावर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यकर्त्याचा आपल्या विशेषांकात परिचय करून द्यावयाचा होता. संपादक मंडळाच्या मिटींगमध्ये मंडपे सरांचे नाव प्रथम पुढे आले तर राजू देशपांडे म्हणाले, ‘हे बेस्टच नाव आहे. आता पुढे चर्चाच नको.’

            एका रविवारी मी, रमेश माणगावे व आर.एस.कुलकर्णी सर सातार्‍यात मंडपे सरांच्या घरी पोहोचलो. मुलाखतीच्या सुरवातीलाच मी मंडपे सरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दलच थेट प्रश्न विचारला.

* तुम्ही प्रथमपासूनच अंधश्रद्धा मुक्त होता की, सुरवातीला अंधश्रद्धांच्या प्रभावाखाली होता?

            मंडपे सरांचे उत्तर अनपेक्षित होते. सर वयाच्या पंचवीशीपर्यंत अंधश्रद्ध होते हे तुम्हाला पटेल का? सर सांगू लागले,

मॅडममुळे बदललो.

            “आजूबाजूचे वातावरण व कुटुंबातील अंधश्रद्धांचे संस्कार यांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. नेहमीच्या शिक्षण पद्धतीत चिकित्सक दृष्टिकोनाचा अभाव असेल, परीक्षार्थी ज्ञान पद्धतीचा प्रभाव असेल, मी वयाच्या पंचवीशीपर्यंत पोथीनिष्ठच होतो. पण एका प्रसंगाने मला अंतर्मुख बनविले व मी चिकित्सक बनण्यास सुरवात केली. नोकरीनिमित्त मी सातार्‍यास आलो तेव्हाचा हा प्रसंग. मंडपे मॅडम आजारी पडल्या. अंगात सटकून ताप भरला होता. मी घाबरलो होतो. मॅडमच्या भावाने मला गजानन महाराजांची पोथी आणून दिली. बाईच्या जवळ बसून ती मी वाचू लागलो. पण तशा अवस्थेतही मॅडम माझ्याकडे बघून स्मितहास्यच करायच्या. त्या निर्भय होत्या. अंगारा-धुपारा नाही, प्रार्थना नाही, चेहर्‍यावर चिंता नाही. त्या धैर्याने वागत होत्या. त्यांच्या या वागण्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी विचार करू लागलो व संकटसमयीसुद्धा निर्भयपणे वागू लागलो. पुढच्या आयुष्यात दोघांच्या चर्चेतून व विज्ञान अध्यापनाचा प्रभाव असेल म्हणून मी विवेकनिष्ठेने वागू लागलो.”

* मॅडम, आपली वाटचाल कशी झाली?

            “मी प्रथमपासूनच विवेकनिष्ठ होते. माझ्या कुटुंबात मिश्र वातावरण होते. एक बहीण व वडील अंधश्रद्धामुक्त तर आई व भाऊ अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली होते. मला वडीलांचे विचार पटायचे. मी ख्रिश्चन शाळेत शिकले. वडील, बहीण व शाळेतील अंधश्रद्धामुक्त वातावरण यांचा प्रभाव माझ्यातील विवेकाचे बीज फुलवत केला व प्रथमपासूनच मी कर्मकांड व अंधश्रद्धांना झुगारून देत पुढे गेले.”

माझं छान चाललंय! तुमचं का चालू नये?

            मंडपे मॅडम पुढे सांगू लागल्या, “माझे माहेर कोल्हापूर. वडील नोकरीनिमित्त भाटघर(जि.पुणे) येथे. आमचे कुटुंब बारामतीला वास्तव्यास होते. माझी आई अंधश्रद्धाळू. तिचा भुता-खेतावर विश्वास होता. रात्री ती विजेच्या खांबाजवळ उंच भूत दिसल्याचे सांगायची. वडील तिला समजावयचे. खांबावर दिवा लावण्यासाठी चढणारा माणूस तुला उंच भुतासारखा वाटला असेल. (पूर्वी वीज नसताना खांबावर साधे दिवे पेटविले जात.) कधी कधी आई म्हणायची, मोलकरणीच्या झाडूमागे गोल गोल गोळे पळताना दिसले. हा करणीचा प्रकार असावा. वडील तिला सांगत की, केरसुणीला चिकटून आलेल्या केसात कचरा गुंडाळून त्याचा गोळा तयार झाला असेल. मला वडिलांचे म्हणणे पटे.”

            “माझे दोन्ही भाऊ अंधश्रद्धाळू. संकटं आली की, ते मला म्हणायचे, ‘तू काहीच मानत नाहीस. त्यामुळे आमच्यावर संकटं येतात. आमचं वाईट घडतंय.’ माझ्या दोन्ही भावांना मुलं नाहीत. मी त्यांना समजावी, ‘अरे, मी काहीच मानत नाही तर माझं वाईट घडायला नको का? माझं छान चाललंय. तुमचं का चालू नये?’ माझ्या एका भावाला हा मुद्दा पटला. त्याला मी दत्तक मूल घेण्यास सुचविलं. त्याचं आता चांगलं चाललंय.”

* मॅडम, आपले शिक्षण ख्रिस्ती शाळेत झाले. त्याचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडला?

            “शाळेतील वातावरणाची विवेकी बनण्यात मदत झाली हे खरे आहे. माझ्या सहाध्यायी मैत्रिणी बहुसंख्य ख्रिस्ती. त्या उपास-तापास किंवा व्रतवैकल्ये व कर्मकांडे करीत नसत. त्यामुळे असेन मी कर्मकांडांपासून दूर राहिले. माझा आवाज खणखणीत होता. वर्गात मला बायबल वाचायला सांगत. त्यातून प्रेम व करूणा ह्या मूल्यावर भर होता. त्यामुळे माझ्यावर नैतिक मूल्यांचे संस्कार झाले व अंधश्रद्धांकडे नेणार्‍या कर्मकांडांपासून मी दूर गेले हे नाकारता येणार नाही.”

            मंडपे सरांचे बालपण व तारूण्य अतिशय कष्टात गेले. त्यांचे वडील लहानपणीच वारले. आईने मोलमजुरी करून त्यांचे संगोपन केले. दुधगाव, ता.मिरज, जि.सांगली येथे त्यांचे वास्तव्य होते. आईच्या मोलमजुरीतून केवळ पोट भरायचे. शिक्षणासाठी पैसे नसायचे. दुधगावच्या शाळेत शिकत असताना ते ऑफीसबॉयचे काम करायचे. रयत शिक्षण संस्थेच्या शाळामध्ये  गरिबीमुळे शिक्षण अडू नये म्हणून मुलांना मदत केली जायची. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्वावलंबन सूत्राचा तो परिणाम होता. ऑफीसबॉयच्या कामात दूरच्या नदीवरून पाणी आणणे, वर्ग झाडणे, घंटा देणे व रात्री शाळेची देखभाल करणे, अशी कामे सरांनी केली. 10 वी पर्यंत हे असे चालू होते. कामाच्या मोबदल्यात त्यांना महिनाकाठी 5 रू. मिळत. त्यातील अडीच रूपये शाळेची फी व राहिलेल्या अडीच रूपयातून वह्या, पुस्तके व इतर साहित्य घेण्यात खर्च होत.

चटणी-भाकरीचा लंच

            मंडपे सर सांगू लागले “याच काळात महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांचे सरकार सत्तेवर आले. त्यांच्या मंत्रीमंडळातील शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गरीब मुलांना ई.बी.सी.सवलतीची योजना जाहीर केली. माझा फीचा प्रश्न सुटला. त्यामुळे मी महाविद्यालयात कराड येथे दाखल झालो. माझा भाऊ मला दरमहा 20 रू. पाठवी. त्यातून जगण्याचा खर्च भागे. पहिली दोन वर्षे कराड येथे काढली. व शेवटच्या दोन वर्षांच्या डिग्री शिक्षणासाठी मी विलिंग्डन कॉलेज, सांगली येथे दाखल झालो. आई दुधगाववरून जेवणाचा डबा पाठवी. डबा 1 वाजता पोहोचे. त्यातील कालवण आंबून गेलेले असायचे. आईने दिलेल्या चटणीच्या डब्यातील चटणी व भाकर असा असे माझा लंच. असे दिवस काढीत मी बी.एस्सी. झालो.”

* सर, पुढचा प्रवास कसा झाला?

            “तो काळ महाराष्ट्रात शिक्षण जागरणाचा होता. बहुजनांना जाग आली होती. नवीन शाळा व महाविद्यालये निघत होती. पदवीधरांना शिक्षण क्षेत्रात चांगली मागणी होती. खरं तर पुढचे शिक्षण पुरं झालं असतं तर मोठ्या पगाराची सरकारी नोकरी मिळणे शक्य होते. पण….”

            “एवढ्या प्रवासातच दमछाक झाली होती. आता पैसे मिळविणे व जगणे आवश्यक होते. आई थकली होती. मी कासेगाव शिक्षण संस्थेत 120 रू. पगारावर शिक्षकाची नोकरी पकडली. सुट्टीचा पगार देण्याचे आश्वासन हेडमास्तरांनी पाळले नाही. मी राजीनामा दिला व बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये 150 रू. पगाराची नोकरी धरली. तेथे मंडपे बाईंचा परिचय झाला. त्याचे विवाहात रूपांतर झाले.”

* विवाह कसा झाला? प्रेमविवाह की, ठरवून? हुंडा घेतला?

            मंडपे बाई हसल्या व मिश्किलपणे म्हणाल्या, “रानात शेत नाही व गावात घर नाही, असा उमेदवार मी निवडला. तो हुंडा मागेलच कसा? लग्नाच्या थाटामाटाचीही अपेक्षा सरांनी केली नाही. उलट बी.एड.ला शिकत असताना काढलेले लोन लग्नानंतर आम्ही फेडू असे कबूल करणारा हा राजकुमार! याला वरमाला घालायला हरकत नाही असा निर्णय आम्ही घेतला.”

            यावर मंडपे सर खळखळून हसले. आमचे लग्न ठरवून झाले असे सांगून ते म्हणाले, “कोल्हापूरच्या सत्यशोधकी वारशाचा व शाहू विचारांचा प्रभाव असेल आमचे लग्न साधेपणानेच पार पडले. ब्राम्हण नाही, वाजंत्री नाहीत, जेवणावळ नाही, हुंडा नाही, फक्त टाळी वाजवून लग्न पार पडले. मला लोकांमध्ये कुजबूज ऐकू यायची. 3000 रू. तरी हुंडा मिळेल. पण हुंडा नाही. उलट कर्जबाजारी बायकोचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मी स्वीकारली. आमच्या लग्नात दोघांची गुणवत्ता हाच घटक प्रभावी ठरला.”

* नव्या संसारातील काही गंमती जंमती सांगा ना!

            मुलाखत रंगत चालली. मंडपे सर व मॅडम मोकळेपणाने बोलत राहिले. मॅडम सांगू लागल्या.

आमच्याकडे पेठेतून बायका चप्पल घालून जात नाहीत!

            “सरांनी बी.एड.केल्यावर रयत शिक्षण संस्थेत येळगाव, ता.कराड येथे सहशिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्यावेळी मी कोल्हापूरला ट्रेनिंग कॉलेजमध्ये बी.एड.करत होते व याच काळात आम्ही विवाहबद्ध झालो होतो. लग्न लागले व थोड्यात दिवसांत कॉलेजला सुट्टी लागली. मी येळगावला सरांकडे निघाले. नव्या नवरीने नवर्‍याच्या घरी पहिल्यांदा जाताना काही रितीभाती पाळायच्या असतात. खिलारी  बैलांच्या गाडीतून मुराळी बरोबर घेऊन सासरी जायचे. पुरण पोळीची बुत्ती नवर्‍याच्या गावात वाटायची. पण कोल्हापुरातून येळगावला 50 कि.मी. बैलगाडीत बसून कसं जाणार? आणि गाडी कुणाची आणायची? झालं. बुत्ती नाही, मुराळी नाही. प्रथांना महत्व द्यायचे नाही अशी विचारसरणी. मी एकटीच एस.टी.ने येळगावला आले. स्टँडवर उतरल्यावर एका मुलीला सरांचा पत्ता विचारला. ती मला मुख्य रस्त्याने न नेता आडवाटेने न्यायला लागली. बोळाबोळातून ही का नेते आहे म्हणून मी तिला म्हणाले, ‘आपण पुढच्या चांगल्या रस्त्याने जाऊ या की!’ त्यावर ती म्हणाली, ‘आमच्या इकडं पायात चप्पल घालून व डोक्यावरून पदर न घेता बायका मुख्य रस्त्यानं जात नाहीत. डोक्यावर पदर घेऊन आडवळणानंच जायचं!’ नवर्‍याला पहिल्यांदा भेटायला जाताना अशी निघाली होती माझी वरात!”

            “घरी पोचल्यावर सासूच्या चेहर्‍यावर आश्चर्य! ‘एकटीच कशी आलीस?’ सासूचा प्रश्न. पण माझ्या शिक्षणाचा प्रभाव असेल किंवा त्यांचा जुळवून घेण्याचा स्वभाव असेल त्यांनी फार ताणून धरलं नाही. त्या अडाणी व अंधश्रद्ध होत्या. पण दुराग्रही नव्हत्या. नवी नवरी आडमार्गाने चालत आली त्या मार्गावरील दुष्ट शक्तीची तिला नजर लागायला नको म्हणून त्यांनी माझ्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. सोवळे-ओवळे, उपास-तापास, व्रतवैकल्ये याबाबतीत त्या आग्रही नव्हत्या. शिकलेल्या सुनेला त्यांनी स्वातंत्र्य दिलं व त्या माझ्याशी समजुतीनं वागल्या.”

गणपतीचा किस्सा

* सर, तुम्ही पूर्वी कर्मकांडे करीत होता? रूढींच्या प्रभावात होता?

            “मंडपे बाईंच्यामुळे मी अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू लागलो हे मी तुम्हाला सांगितले. मात्र पूर्वी मी अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली होतो त्याचा किस्सा तुम्हाला सांगतो. आजूबाजूला लोक अनेक प्रथा पाळत. त्या मला दिसायच्या. मित्र व शेजारी यांच्या घरी देवाचे फोटो असत. त्यांना ते नमस्कार करीत. मग मीही तसे करीत असे. मला शिल्पकला अवगत आहे. शंकराची पिंड मी बनविली होती. गणपतीच्या मूर्ती मी छान बनवायचो, लहान असताना माझा मुलगा विक्रांत याने गणपतीचा हट्ट धरला. मी गणपतीची छान मूर्ती बनविली व त्याचा हट्ट पुरविला. विसर्जनाचे वेळी विक्रांतने गणपती स्वत:च्या हातात घेण्याचा हट्ट धरला. वाटेत मूर्ती पडली व तिचे शीर धडापासून वेगळे झाले. ही घटना अशुभ मानतात. पण या प्रसंगाचे मंडपे मॅडमना काहीच वाटले नाही. उलट आपला अभ्यास बुडतोय हे विक्रांतला पटवून देऊन गणपती बसविणे आम्ही बंद केले. मीही त्याला संमती दिली.

भुताटकीच्या घरात राहिले

            शुभ-अशुभ, भुताटकी अशा घटनाबाबत मंडपे मॅडम निर्भय होत्या. त्यांनी भुताटकीच्या घरात रहात असतानाचा एक अनुभव सांगितला.

            “विक्रांत लहान असताना(दीड वर्षाचा) सातार्‍यात अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी असलेल्या घरात आम्ही रहात होतो. विक्रांत आजारी पडायचा. शेजारीच मैत्रिण रहात होती. तिच्या नवर्‍याने सल्ला दिला, ‘हे घर बाधित आहे. इथं उंबराच्या झाडाखाली दत्ताच्या पादुका होत्या. त्यावर घरमालकाने संडास बांधलाय. त्यामुळे ही जागा बाधित आहे.’ मी त्यांचं ऐकलं नाही व घर सोडले नाही. मग त्यांनी पर्याय सुचविला. ‘झाडाजवळ दत्ताचा फोटो ठेवा व त्याची रोज पूजा करा.’ त्यांनी तो फोटो स्वत: आणला व त्या जागी ठेवून दिला. पण मी त्याची पूजा करण्याच्या भानगडीत पडले नाही.”

            “माझ्या शेजारच्या खोलीत घरमालकीण रहात होती. तिचा नवरा ड्रायव्हर होता. महिना-महिना तो बाहेर असायचा मग ही माहेरी जाऊन राहायची. एके दिवशी तिच्या मुलगीने खेळता खेळता विजेच्या बटनाला हात लावला. शॉक बसला असेल किंवा काही टोचले असेल. ती जोरात ओरडली. त्याचवेळी कपाटावर ठेवलेले भुसा भरलेले मुंगुस खाली पडले. मुंगुस खाली कसे पडले? ही भुताटकीच आहे असे समजून त्या बाईंनी घर सोडले. पण आम्ही तेथेच राहिलो. विक्रांतनंतर सर टायफॉईडने आजारी पडले ते बरे झाले. मग मी आजारी पडले. मीही बरी झाले. पण घर सोडले नाही. घरासमोर लिंबे व टाचण्या पडलेल्या असायच्या. त्या उचलून मी फेकून देई. नंतर आमच्या शाळेजवळ सोयीचे घर मिळाल्यानंतरच ते घर आम्ही सोडले. भितीमुळे नव्हे तर सोयीसाठी सोडले.”

* सर, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कसा प्रवेश झाला?

            “रयतमध्ये नोकरी करताना येळगावहून सातार्‍याला बदली झाली. सातार्‍यात कल्याणी विद्यालयात मी शिक्षक झालो. तर मंडपे बाई ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका. आर्डे सर त्यावेळी सातार्‍यात प्राध्यापक होते. त्यांची कन्या रूपाली व माझी मुलगी वृषाली आमच्या शाळेत एकाच वर्गात शिकत होत्या. त्या दोघींमुळे आर्डे सरांचा व माझा परिचय झाला. सर त्यावेळी डॉ.दाभोलकरांबरोबर चळवळीत काम करत होते.”

            “दरम्यान ‘मुक्तांगण’ सातारा येथे नरेंद्र दाभोलकरांनी 7 दिवसांची अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यानमाला जाहीर केली. आर्डे सरांच्या आवाहनामुळे मी त्या व्याख्यानमालेला जाऊ लागलो. आज भूत-भानामती, तर उद्या ज्योतिष्य, परवा चमत्कार व बुवाबाजी अशी ती व्याख्याने डॉक्टर दाभोलकर व आर्डेसर आलटून पालटून देत.”

                        “मुक्तांगणमधल्या व्याख्यानमालेने मी व मंडपे मॅडम खूपच प्रभावित झालो. या व्याख्यानांचा आशय मनाला भिडला होता. व्याख्यानातील अंधश्रद्धांच्या दुष्परिणामाचे कथन अस्वस्थ करीत होते. आपणही हे कार्य करावे याची प्रेरणा या व्याख्यानमालेने आम्हाला दिली.”

येळगावची ती घटना

            सर सांगू लागले – “येळगावला शिक्षक असताना घडलेली एक घटना मनात घर करून होती. मी ज्या कुटुंबाच्या घरात भाड्याने रहात होतो तेथील लहान मूल आजारी पडले. त्याला धाप लागायची. पोट जोरात हालायचे. त्याला न्युमोनिया झाला असावा. पण त्याचे पालक त्याला पोटाचा विकार झालाय असं समजत होते. बालरोग तज्ञ दूरच, गावात डॉक्टर एकमात्र होता. त्याला पण दाखवण्यात हयगय झाली. बाहेरचं समजून मुलावरून उतारे टाकले जात होते. त्या कुटुंबाला खरं तर मी मार्गदर्शन करायला हवे होते. पण मला धाडसच झालं नाही. ते मूल गेले. या प्रसंगाची आठवण मुक्तांगणमधल्या व्याख्यानानी जागी झाली आणि आपण अंधश्रद्धांबाबत लोकांचे प्रबोधन करायला हवं असा निश्चय झाला.”

            “आर्डे सरांच्या बरोबर माझ्या अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा सुरू झाल्या. ठिकठिकाणी कार्यक्रमात सामील होऊ लागलो. सातारा डी.सी.सी.बँकेत पांगे नोकरीस होते. ते आमच्यात सामील झाले. पांगे बुवाचा वेष धारण करीत. आर्डे सर भाषण देत. भाषणाच्या मध्येच बुवाचे आगमन स्टेजवर होई. मी बुवाला आव्हान देण्याचे काम करी. असे नाट्य छान रंगे.”

दारूड्याचा किस्सा

            “पांगे यांचे गाव येळगाव. तेथे कार्यक्रम होता. आख्खा गाव जमलेला. आर्डे सर भाषण देत होते. समोर दारूडा बसलेला. तो मध्येच उठून काहीतरी बडबडे. त्यामुळे व्याख्यानाचा रसभंग होई. मग एका तरूणाने दारूड्याच्या दाढीला हिसका दिला. त्याबरोबर दारूड्याची विजार पटकन निसटली व खाली पडली. लोक जोरजोरात हसू लागले. आता त्याची नशा झटक्यात उतरली होती. पुढचा कार्यक्रम सुरळीत झाला. व्याख्यान संपल्यावर तो दारूडा गयावया करत खजील होऊन आमची माफी मागत होता.”

            “कराडजवळ कापील गोळेश्वर येथे रात्री 7 ते 9 या वेळेत आम्हा तिघांचे बुवाबाजीचे नाट्य ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमात सादर झाले. ते लोकांना खूप आवडले. हजारभर लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. अशा तर्‍हेने माझा चळवळीत सहभाग वाढत होता.

पंत गेले – राव चढले

सर पुढे सांगू लागले-

            “1988 ला आर्डे सरांची बदली सातार्‍याहून विट्याला झाली. सर मला म्हणाले, ‘मंडपे सर, तुम्ही डॉक्टर दाभोलकरांना सहकार्य करा. मराठीत म्हण आहे पंत गेले-राव चढले. आर्डे सर विट्याला गेले व मला अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात बढती मिळाली.”

            “मी जरी आर्डे सरांबरोबर कामाला सुरवात केली तरी अंधश्रद्धेतील एखाद्या विषयावर स्वतंत्रपणे भाषण देण्याइतपत निर्भय झालो नव्हतो. सर, पांगे व मी फक्त बुवाबाजीचे चमत्कार नाट्यरूपाने एकमितपणे सादर करण्यात सहभागी होई. सर विट्याला गेल्यावर मला डॉ.दाभोलकरांनी एकट्याला अंधश्रद्धाविरोधी प्रबोधनाच्या मैदानात उतरायला उद्युक्त केले.”

            “दाभोलकरांबरोबर काम करू लागल्यावर मला मराठा समाज, सांगली येथे 3 दिवसांच्या अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरात चमत्कार व बुवाबाजी हा विषय मांडण्यास संधी मिळाली. या शिबिरात ना.ग.गोरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली होती. त्यांच्या तत्वप्रचुर जड भाषणापाठोपाठ माझे चमत्कार व बुवाबाजी या विषयावरील हलके फुलके व्याख्यान मुद्दामहून ठेवले होते. ते शिबिरार्थींना आवडले. आणि माझा आत्मविश्वास वाढला. मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील वक्ता झालो. अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील पहिले स्वतंत्र व्याख्यान मी सातार्‍याजवळील एका गावात दिले. ते लोकांना आवडले. मग मी व्याख्यानाला शाळेच्या सुट्टीच्या दिवशी गावोगावी जाऊ लागलो. ट्रेनिंग कॉलेजमध्ये माझी व्याख्याने झाली. हे चांगले काम आहे असे मनोमन वाटू लागले व मी डॉ.दाभोलकरांना चळवळीत साथ देऊ लागलो.”

            “ही साथ आजतागाईत कायम राहिली आहे. शिक्षक शिबिरांमध्ये व डॉ.दाभोलकर यांच्याबरोबर मी महाराष्ट्रभर व्याख्याने देत राहिलो. बुवाबाजी व चमत्कार आणि ज्योतिष शास्त्र का नाही हे माझे आवडते विषय. बेळगावपासून ते यवतमाळ, अमरावतीपर्यंत माझी भ्रमंती चालू राहिली. या भ्रमंतीत अधूनमधून आर्डे सरही सामील असायचे. शिक्षक शिबिरातील आमचे दोघांचे योगदान चळवळीच्या वाढीला खूपच पूरक ठरले असं माझं प्रामाणिक निरीक्षण आहे.”

* प्रबोधनाबरोबर अंधरूढीच्या विरोधात आपण कृतीशील होता. त्यातले काही अनुभव?

            “फलटणजवळ जावली नावाचे गाव आहे. तेथे यात्रेच्या  दिवशी दलित समाजातील लोक देवाच्या गाभार्‍याच्या भिंतीवर पळत जाऊन धडका घेत. ही अमानुष प्रथा होती. ती थांबविण्याच्या कृती कार्यक्रमात मी व आर्डे सरांनी दाभोलकरांना साथ दिली. तेथील दलितांचे प्रबोधन करून सत्याग्रह केला. त्यावेळचे फलटणचे उपजिल्हाधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आम्हाला साथ दिली व ही दुष्ट प्रथा बंद झाली.”

विधवा विवाहाची सुरवात

            “मराठा समाजात विधवा विवाहाला मान्यता नव्हती. डॉ.देवकर हे सातारा जिल्ह्यातील मराठा समाजातील गृहस्थ. विधवा बहिणीच्या दु:खाने ते व्यथित झाले होते. त्यांनी दाभोलकरांशी संपर्क केला व एका विधवेशी विवाह करण्याचे मनोगत व्यक्त केले. अशी विधवा की तिला मूल असावे. आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले. त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. घोरपडी(जि.पुणे) येथे अशी मुलगी होती. संपर्क झाला. देवकर एकटेच घोरपडीला गेले. त्यांना मुलगी पसंत पडली. पण मुलीकडच्यांना अचंबा वाटला. मुलगी अडाणी. एखादा शेतकरी नवरा मिळेल एवढीच तिची अपेक्षा. एक डॉक्टर कसा काय हिला पसंत करतोय? आणि मुलाबरोबर कोणीही मोठे नातेवाईक आले नाहीत. मुलीच्या घरच्यांनी देवकरना घरी पाठविले. घडलेला प्रकार ऐकून मी व देवकर परत घोरपडीला गेलो व मुलीची व घरच्यांची समजूत काढण्यात यशस्वी झालो. डॉ.देवकरांचे लग्न रयत शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग कॉलेजच्या हॉलमध्ये माझ्या पुढाकाराने पार पडले. या लग्नाला एन.डी.पाटील, आ.ह.साळुंखे, ना.ग.गोरे इ.मान्यवर उपस्थित होते.”

            “देवकरांना विवाहानंतर शेजारी पाजारी टोमणे मारीत. गाईबरोबर वासरू पण आणलंय! देवकरांची पत्नी कणखर होती. त्यांनी या टीकेवर मात केली. मुलीला छान वाढविलं. तिचे आता लग्न झालंय. ती सुखात आहे.”

            ही घटना 15-20 वर्षांपूर्वीची. अशा प्रबोधनातून समाजबदलाची सुरवात होते व पुढे त्याला गोड फळे येतात याचा मला आज प्रत्यय येतोय. सांगलीच्या मराठा समाजाने विधवा-विधुर मेळावा भरवण्यास सुरवात केलीय. अ‍ॅड.दत्ताजीराव माने हे सांगलीतील मराठा समाज संस्थेचे पदाधिकारी. त्यांना अंनिसचा विचार भावला व सहकार्‍यांसमवेत मराठा समाजात विधवा-विधुर विवाहाला चालना दिली. सर्वच समाजात आता विधवांचे विवाह होऊ लागलेत. अंनिस व इतर पुरोगामी संघटना यांचा प्रबोधन कार्यक्रम याला कारण आहे.

* मॅडम, तुमचा अंनिस चळवळीत प्रवेश कसा झाला?

            “मी सातारा येथे मुलींच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका असताना अनेक अनुभव घेतले. कॉलेजमध्ये गौरीच्या सणादिवशी एका मुलीच्या अंगात देवी आली. आयाबाया जमल्या. तिने बायकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. सगळीकडे कौतुकाचा विषय. आजीच्या अंगात येत होते. परंपरेने तिच्याही अंगात आले. पहाटेपर्यंत बाई ट्रान्समध्ये होती. एकदाची देवी गेली. हिला थंड पाण्याने पहाटे आंघोळ घातली. परिणामी ताप चढला. आणि त्यातच ती संपली. बहुतेक मेंदूत ताप जाऊन हे घडले असावे. सणादिवशी बाई गेली. पुण्यवान होती अशी सगळ्यांची प्रतिक्रिया. चौकशी केल्यावर मला वरील माहिती मिळाली. मी माझ्या विद्यार्थिनींना याबाबतचे वास्तव समजावून देण्यात सुरवात केली. वेळ मिळेल तेव्हा प्रबोधन व चर्चा करू लागले. ऑफ तासाला सहकारी शिक्षक व शिक्षिकांशी गप्पा व्हायच्या. त्यात अंधश्रद्धेवर चर्चा व्हाव्यात म्हणून मी विषय काढी. शिक्षक मुलीच्या शिबिरात हे विषय चर्चेला आणू लागले. शिबिरात मुली भुताबद्दल व इतर अनुभव सांगत. मग भूत असतं की नसतं अशा गप्पा होऊ लागल्या.”

            “यातून अंधश्रद्धाबाबत वास्तव काय आहे याचे संशोधन करावे असे मी ठरविले व विविध शाळांमधून विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी बोलले. प्रश्नावली तयार करून घेतल्या. शाळांमध्ये फक्त मुलींची शाळा, सहशाळा, वस्तीगृहे अशा संस्था निवडल्या. ह्या प्रकल्पातून धक्कादायक निष्कर्ष हाती आले. ते पुस्तक रूपाने मी मांडले. त्याला दाभोलकरांची प्रस्तावना घेतली. निष्कर्ष असे- 95 टक्के स्त्रिया अंधश्रद्ध असतात. पुरूष 60 टक्के. मुलींच्या शाळेतील मुली जास्त अंधश्रद्ध असतात. वसतीगृहातील मुलांमुलींमध्ये अंधश्रद्धांचे प्रमाण खूपच कमी असते. शिक्षक व शिक्षिका अंधश्रद्ध असतात. पण शिक्षकांचा एक गुण आहे. ते कसेही असतील पण वर्गात शिकवताना ते अभ्यासक्रमाशी प्रामाणिक रहातात. ग्रहण कसे होते हे शिकविताना ते हा खेळ सावल्यांचा असंच शिकवतील पण स्वत:च्या घरात ते ग्रहण पाळतील. परिणामी अंधश्रद्धा कमी करण्यासाठी शिक्षकांचे प्रबोधन व्हावे या निष्कर्षाप्रत समिती आली. या प्रकल्पाचा परिणाम म्हणून शिक्षकांची शिबीरे अंनिसने सुरू केली व सत्यशेध प्रज्ञा परीक्षा सुरू झाल्या. शिक्षक बदलले तर तरूणपिढी बदलेल हा विचार समितीने स्वीकारला.”

सत्यशोध परीक्षांची सुरवात

            “माझ्या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षातून शिक्षक अंधश्रद्ध असतात असा निष्कर्ष निघाला होता. मी स्वत: याबाबतीत माझ्या सहशिक्षकांशी बोलू लागले. ट्रेनिंगसाठी विद्यार्थिनी म्हणून आलेल्या मुलींशी बोलू लागले. बाहेर गावी व्याख्यानातून अंधश्रद्धांवर टीका करू लागले. गणेश उत्सवात व शारदा उत्सवात भुताने झपाटणे हा मनाचा आजार, देवी अंगात येणे ढोंग तरी असते किंवा तो मनाचा आजार असतो हे गावोगावी बोलू लागले. समोर बसलेल्या जमावात अंगात येणार्‍या बायका असत पण त्यांनी कधीच विरोध केला नाही. काही शिक्षक व श्रोते चाणाक्ष असत. ते तुम्ही देवाला का विरोध करता असे विचारीत. मी म्हणे, तुमचा देव वेगळा मी ज्यावर बोलते तो देव वेगळा आहे. तुमचा देव तुमच्या घराच्या कोनाड्यात. त्याबद्दल मी काही बोलले का?”

बी.एड.च्या मुलींचा किस्सा

            “एकदा परीक्षेच्या वेळी 4 मुली गैरहजर होत्या. त्यांच्या मनीऑर्डरी आल्या होत्या. मी चौकशी केली. तर त्यादिवशी ग्रहण होते. म्हणून त्या आल्या नाहीत असे समजले. त्या चौघीही गरोदर होत्या. गरोदर बाईने ग्रहण पाळायचे असते. दुसर्‍या दिवशी मी त्यांना म्हटले, तिसरीतील पुस्तकात ग्रहण का होते हे तुम्ही मुलांना शिकविता. मग तुम्ही स्वत: ही अंधश्रद्धा का पाळता? मुलींचे उत्तर-सासूबाईंना विरोध कसा करायचा? मी म्हणाले, सासूच्या सर्व आज्ञा पाळता का? त्या हसल्या. सहलीमध्ये येण्यास पाळी झालेल्या मुली टाळायच्या. त्यांचे पण मी प्रबोधन करायचे. शिक्षक व विद्यार्थी यांच्या बाबतीततले माझे अनुभव विचारात घेऊन दाभोलकरांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रबोधन होण्याची गरज हेरली. यातून सत्यशोध परीक्षा व शिक्षकांची प्रबोधन शिबीरे सुरू झाली. सत्यशोध परीक्षा व शिबिरे या माध्यमातून हजारो विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रबोधन अंनिसने केले. सत्यशोध परीक्षा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून मंडपे सरांनी केलेले कार्य तुम्हाला माहीतच आहे. त्याबद्दल तुम्हाला तेच सविस्तर सांगतील.”

* सर, सत्यशोध प्रकल्पात तुमचे योगदान महत्वाचे आहे. हा प्रकल्प तुम्ही कसा सुरू केला?

            “मी अंनिसमध्ये चमत्कार व बुवाबाजी या विषयावरील व्याख्यानांतून सहभागी झालो. बुवा लोक जे चमत्कार करतात त्याच्यावर कथा स्वरूपात पुस्तक काढावे अशी कल्पना दाभोलकरांनी मांडली. त्यातून ‘अंधश्रद्धांची दुनिया-चमत्काराची किमया’ हे पुस्तक आकाराला आले. व ते लोकप्रियही झाले. एन.डी.पाटील सर रयतचे चेअरमन. ते अंनिसचेही अध्यक्ष होते. दाभोलकरांनी शिक्षक प्रबोधनाची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. एन.डी.पाटील सरांनी सातारा शहरातील रयतची महाविद्यालये व माध्यमिक शाळा यातील शिक्षकांना आवाहन केले. आणि 3 दिवसांची व्याख्यानमाला रयत प्रशासनाने नियोजित केली. मी त्याचे संयोजन केले. व्याख्यानमालेत रोज सायंकाळी 6 वाजता व्याख्यान सुरू होई. स्थळ होते, सातार्‍यातील महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेजचा हॉल. या मालेचे उद्घाटन तर्कतीर्थांनी केले. मे.पु.रेगे, आ.ह.साळुंखे, डॉ.दाभोलकर यांची व्याख्याने झाली. महाविद्यालयातील प्राध्यापक सुरवातीच्या दिवशी मला उपरोधिकपणे टोचत. पण नंतर मात्र ते या व्याख्यानांनी प्रभावित झाले व आपण याबाबतीत अधिक माहीत करून घेतले पाहिजे असे म्हणू लागले. या यशस्वी उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधील शिक्षकांचे तीन दिवसांचे शिबीर एन.डी.पाटील सरांच्या सहकार्याने आयोजित झाले. रयतच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये याचे आयोजन झाले. भुताने झपाटणे, मनाचे, आजार, भानामती, ज्योतिष, श्रद्धा-अंधश्रद्धा, बुवाबाजी व चमत्कार असे विविध विषय या शिबिरात मांडले होते. हे शिबीर शिक्षकांना आवडले. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा असे ठरले. त्यातून शिक्षकांची शिबिरे महाराष्ट्रभर सुरू झाली.”

            “शिक्षकांनी मुलांना प्रबोधित करावे अशी कल्पना दाभोलकरांनी मांडली आणि त्यातून सत्यशोध प्रज्ञा परीक्षा ही माध्यमिक स्तरावरील परीक्षा साकार झाली. त्याच्या प्रश्नपत्रिका काढणे, शिक्षकांनी मुलांना माहिती देणे, परीक्षा झाल्यावर मुलांना सर्टिफिकेट देणे या सगळ्या गोष्टींचे नियोजनाची जबाबदारी मी घेतली. ती मी निष्ठेने पार पाडली. पुढे मग प्राथमिक स्तरावरील सत्यशोध परिचय परीक्षा व कॉलेज स्तरावर सत्यशोध प्रबोध परीक्षा सुरू केल्या. माझ्या काळात या सर्व परिक्षांना तीन लाखांवर विद्यार्थी बसले. शिक्षक शिबिरात 15 ते 20 हजार शिक्षक प्रबोधित झाले. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात अंनिस चळवळ पोचली. शिक्षण क्षेत्रात अनौपचारिक पद्धतीने विज्ञान-चिकित्सा-आत्मविश्वास हा विचार प्रसारीत करण्याचे श्रेय या प्रकल्पाला द्यायला हवे.”

* हा प्रकल्प चालू आहे? त्यात नवीन भर पडली आहे का?

            “अंधश्रद्धेबरोबरच व्यसन मुक्ती, वयात येताना असे विषय समाविष्ट होऊन व्यसनमुक्ती व लैंगिक शिक्षणासाठी प्रबोधनाचा प्रयत्न झाला. पण यावेळी मी शिक्षक म्हणून निवृत्त झालो होतो व माझी नेमणूक रयतच्या मध्यविभागाचे इन्स्पेक्टर म्हणून झाली. या प्रकल्पाचा भर सद्या ओसरला असेल किंवा इतर काही कारणे असतील, शिक्षकांचा प्रतिसाद कमी होत गेला व या परीक्षांचा प्रतिसाद थंडावला. पण पर्याय म्हणून स्वयंअध्ययन परीक्षा सुरू केल्या. त्या चालू आहेत. त्यांचे व्यवस्थापन प्रशांत पोतदार पाहतो.”

* आपणास रयत शिक्षण संस्थेत, निवृत्तीनंतर इन्स्पेक्टर पद मिळाले. या पदावरून आपण संस्थेच्या शाळांमध्ये धर्मनिरपेक्षतेची  मूल्ये रूजविण्याचा यशस्वी प्रयोग केला, त्याबद्दल सांगा.

            मंडपे सरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील कार्याचा परिचय एन.डी.पाटील सरांना होताच. त्यांनी मंडपे सरांना निवृत्तीनंतर रयत शिक्षण संस्थेच्या मध्यविभागाच्या इन्स्पेक्टर पदाची जबाबदारी(5 वर्षे) सोपविली. व शाळांमधून धर्मनिरपेक्षतेची व वैज्ञानिक दृष्टिकोनाची मूल्ये रूजवून अंधविश्वासाला हद्दपार करण्याचे आदेशच दिले. या अधिकाराचा मंडपे सरांनी पुरेपूर वापर केला.

            “प्रथम मी शाळेतील देवाच्या प्रार्थना बंद केल्या. व त्याजागी वसंत बापट यांचे ‘आभाळाची आम्ही लेकरे’ हे व ‘चला आज मिळून सारे’ हे पां.न.निपाणीकर यांनी लिहिलेले अंधरूढीविरोधी गीत प्रार्थनेच्या जागी विद्यार्थ्यांनी म्हणावे अशी नोटीस शाळांना पाठविली. हा बदल होतोय की नाही याचा पाठपुरावाही केला.”

प्रार्थनेत गायत्री मंत्र

            “मी बलवडी, ता.माण या शाळेला भेट दिली. तेव्हाची घटना. प्रार्थना सुरू होती. हेडमास्तर विज्ञानाचे पदवीधर. शिवाय दलित समाजातील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्यांच्यावर संस्कार झाला असणार अशी माझी समजूत. पण कसचे काय? हेडमास्तरांनी कॅसेट सुरू केली गायत्री मंत्राची. मी मास्तरांना ही प्रार्थना बंद करायला सांगितली. त्यांना समजावले की, आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही एका धर्माची प्रार्थना शाळेत चालणार नाही. व्यक्तीला धर्म आहे पण राष्ट्राला नाही. तुम्ही घरात खुशाल प्रार्थना करा पण शाळेत धर्मनिरपेक्ष गीत म्हटले पाहिजे.”

            “मी रयतच्या विविध भेटी दिल्या. वर्गावर्गात, कार्यालयात विविध देवदेवतांचे फोटो लावलेले दिसले. मी हे सर्व फोटो शाळांना काढावयाला लावले.”

            “शाळांना भेटी देत असताना मला आणखी एका गोष्टीचा विषाद वाटला. येळगाव, ता.कराड येथील शाळेत भिंतीवर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे चित्र रेखाटले होते. चित्र सुंदर होते. पण या चित्राच्यावर एक वाक्य होते ते आक्षेपार्ह होते. ते वाक्य असे,

काशीकी कला जाती। मथुरामे मसजिद बनती

अगर शिवाजी न होता। तो सभीकी सुन्नत हो जाती

            शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचा आदर करणारा राजा होता. त्यांचा विरोध मुस्लिमांना नव्हता तर मुस्लीम सत्तेला होता. अनेक मुस्लीम त्यांच्या सैन्यात होते. मदारी मेहत्तरनी आग्य्राच्या प्रकरणात त्यांना मदत केली होती. शिवाजी महाराजांची ही प्रतिमा दुर्लक्षित व्हावी व ते हिंदुत्वाचे कडवे पुरस्कर्ते होते ही चुकीची प्रतिमा लोकांमध्ये ठसावी म्हणून हिंदुत्ववाद्यांनी ह्या चित्रावर उपरोक्त ओळी प्रसृत केल्या होत्या. येळगाव शाळेतील कार्यालयात सुपरवायझर पठाण नावाचा मुस्लीम होता. त्यांच्या डोक्यावर याच ओळी छापलेले महाराजांचे चित्र होते. हेच चित्र आणखी दोन ठिकाणी पहायला मिळाले. मी या चित्रावरच्या त्या ओळीवर पट्टी चिकटवण्याचा हुकूम हेडमास्तरांना दिला.”

            ‘एम.ए.शेख डी.जी.कॉलेजमध्ये प्राचार्य असताना घडलेला हा किस्सा. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षात निरोप देण्याची प्रथा शेख सरांनी सुरू केली होती. विद्यार्थ्यांनी भेट म्हणून जी फ्रेम दिली. त्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. पण शिवाजी न होता…. या चार ओळीपण चित्रावर होत्या. शेख सरांनी तो फोटो कुठेही न लावता तसाच ठेवून दिला होता. मी इन्स्पेक्टर पदावरून निवृत्त झाल्यावर डी.जी.कॉलेजमध्ये गेलो होतो. पाहतो तर कार्यालयात तो फोटो भिंतीवर लटकला होता. मी काहीही बोललो नाही. कारण त्यावेळी मला अधिकारपद नव्हते. मी व्यथित मनाने तेथून बाहेर पडलो.”

            मंडपे मॅडमनी धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या मूल्यांशी प्रामाणिक राहून विविध धाडशी निर्णय घेतले. ट्रेनिंग कॉलेजमध्ये पूर्वी चालू नसलेला गणेशोत्सव एका प्राचार्यानी सुरू केला होता. मंडपे मॅडम तेथे प्राचार्य होताच त्यांनी  तो बंद केला.

            पुसेगाव येथे मंडपे सर मुख्याध्यापक झाले. तेथे गणपती बसवण्याची परंपरा होती. गणेश विसर्जन पाण्यात होई. त्यात बदल करून सरांनी गणपती दान प्रथा सुरू केली. पण मंडपे मॅडम सरांच्या पुढे चार पावले असत. सर निवृत्त झाले व पुसेगावला मॅडम प्राचार्य झाल्या. तेथे त्यांनी गणपती बसविण्याची प्रथाच बंद करून टाकली.

            गोंदवले येथील हायस्कूलमध्ये गुरूवारी दत्ताची आरती होई. तिला मुलाकडून वर्गणी घेतली जाई. मॅडमनी आरती बंद केली व मुलांची वर्गणी दानपेटीत टाकण्याची व्यवस्था केली. ते पैसे नारळ-खोबर्‍याऐवजी गरीब मुलांसाठी उपयोगी आणले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रयोग

            प्रचलीत शिक्षणात ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ चा अतिरेक झालाय. विद्यार्थी परीक्षार्थी व घोकंपट्टी करणारे पोपट बनविले जातात. विज्ञानाचा इतिहास असं सांगतो की, प्रचलित ज्ञानाबद्दल  शंका घेऊनच नवे सिद्धांत पुढे येतात. शंका हीच ज्ञानाची जननी आहे. निरीक्षणाचे महत्व विज्ञानात अनन्य साधारण आहे. मानवी संस्कृतीचा विकास श्रद्धेला प्रश्न विचारूनच झाला आहे. म्हणून शालेय अभ्यासक्रमात मुलांना धीटपणे प्रश्न विचारण्यास व निसर्ग निरीक्षण करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्नांना घोकंपट्टीद्वारे उत्तर देणे म्हणजे अध्ययन नव्हे तर दिलेल्या उत्तराला प्रतीप्रश्न विचारून सत्य शोध घेणे म्हणजे अध्ययन.( Not to answer the question but to question the given answer is real learning)

            मंडपे सरांनी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कल्याणी हायस्कूलमध्ये व नंतर मुख्याध्यापक म्हणून पुसेगाव हायस्कूलमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा आशय विद्यार्थ्यांना प्रभावीपणे देण्याचा प्रकल्प राबविला.

* सर, वैज्ञानिक दृष्टिकोन हा मूल्यशिक्षणाचा एक महत्वाचा गाभा घटक आहे. त्याचे प्रयोग तुम्ही शाळेमध्ये यशस्वीपणे राबविले. ते कसे?

            “मी कल्याणी हायस्कूलमध्ये विज्ञानाचा शिक्षक होतो. तेथे व नंतर पुसेगाव हायस्कूलमध्ये असा एकूण वीस वर्षे ‘प्रश्नमंजुषा’ हा प्रकल्प राबविला. वाटेल तो प्रश्न विचारा असे त्याचे नाव होते. विद्यार्थी दर गुरूवारी शाळेतील पेटीत प्रश्न टाकीत. हे सर्व प्रश्न गोळा करून मी शनिवारी मूल्य शिक्षणाच्या तासाला त्यांची उत्तरे देत असे. या प्रश्नांत अनेक अवघड प्रश्नही असत. काही प्रश्नांची उत्तरे शोधायला मला ज्ञानकोशाची मदत घ्यावी लागे. मराठी ज्ञानकोशाचे सर्व खंड मी त्यासाठी विकत घेतले होते.”

            “आमच्या शाळेजवळ झाडांना सुतारपक्षी भोके पाडीत. त्याचा टिकटिक आवाज ऐकू येई. या पक्षांचे निरीक्षण करायला मी सांगे. चंबूत पाणी घेऊन त्यात डासाच्या अळ्या सोडायच्या. त्या कशा वाढतात याचे प्रयोग व निरीक्षण करायला मी मुलांना सांगे. पानावरच्या अळ्या मुले पकडीत. त्या कंपास पेटीत ठेवून त्यांचे कोष व नंतर फुलपाखरू कसे होते याचे निरीक्षण करीत.”

फुलपाखरांना किती पाय?

            “जीवशास्त्राच्या पुस्तकातून कीटकांना 6 पाय असतात असे आम्ही शिकवायचो. एके दिवशी संग्राम नावाचा मुलगा मला म्हणाला, ‘सर, फुलपाखरांना चारच पाय असतात.’ त्याने चार पायाचे फुलपाखरू मला दाखविले. मी त्याला म्हणालो, ‘अरे, त्याचे दोन पाय जंतुसंसर्गाने गळाले असतील. तर आणखी फुलपाखरे मुलांनी आणली. त्यांना पण चारच पाय होते. मी सर्व किटकांना 6 पाय असतात हे 20 वर्षे शिकवित होतो. पण फुलपाखरू या कीटकाला चार पाय असतात हे मुलांना दाखविले. मुलांनी माझा अधिकार नाकारला. ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ ला नकार दिला.”

            “हा माझा अनुभव ‘दै.सकाळ’मधील दिशा पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे ते उदाहरण होते.”

करणीचा किस्सा

            “माझ्या शाळेतील मुले वैज्ञानिक दृष्टिकोन कशी वापरायला लागली याचा एक छान अनुभव तुम्हाला सांगतो.”

            “सातार्‍याजवळील एक खेडेगाव. तेथील एक मुलगा आमच्या शाळेत येत होता. एक दिवस एक आजोबा आमच्या शाळेत आले. मला भेटून म्हणाले, ‘गुरूजी माझा मुलगा तुमच्या शाळेत झकास शिकतोय! ते सांगू लागले.”

            “मी सातार्‍याला दुधाचे रतीब घालतो. काही दिवसांपूर्वी त्या दुधात खडे निघून दूध नासल्याच्या गिर्‍हाईकांच्या तक्रारी आल्या. दुधाची बादली घासून स्वच्छ केली तरी पुन्हा तोच प्रकार. बायको म्हणाली म्हशीवर कुणी तरी करणी केली असावी. शेजारच्या मांत्रिकाला विचारू या. हा माझा मुलगा म्हणाला, बाबा थांबा. मी तुमच्याबरोबर येतो. बघू या कसे दुधात खडे पडतात ते. मग मी पुढे, मुलगा मागे. मुलाला दुधात खडे कसे येतात त्याचे कारण कळाले. माझ्या पायात स्लीपर होते. ते चटाक चटाक वाजत. त्यांना चिकटून खडे वर उडत व बादलीत पडत. या बेट्याने मला चप्पल घालायला सांगितले. व बंद किटलीत दूध घ्यायला लावले. तेव्हापासून दुधात खडे पडायचे बंद झाले.”

            “मी म्हातार्‍याच्या मुलाची पाठ थोपटली. शाळेत निरीक्षण कसं करायचं याचे धडे ह्या मुलाने घेतले होते व ते व्यवहारात वापरण्यास तो शिकला होता. दुधातील खडे करणीमुळे नव्हते, मुलं अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ओळखायला शिकतात. याचा मला आनंद झाला होता.”

            मंडपे बाईंनी ‘गणपती दूध पितो’ या घटनेच्या वेळचा किस्सा कथन केला. गणपती दूध पीत नाही तर ते त्याच्या अंगावरून खाली ओघळते व खाली साचून रहाते हे त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवले व या अंधश्रद्धेतून मुलांना बाहेर काढले.

            विज्ञाननिष्ठेचे सातत्याने 20-25 वर्षे हे प्रयोग या पती-पत्नीनी निष्ठेने, चिकाटीने राबविले.

विवेकाने संकटावर मात केली.

            मंडपे पती-पत्नीनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला मोलाचे योगदान दिले. त्यांचे विद्यार्थी व सहकारी विवेकी बनण्यास मदत झाली. हे खरे आहे. पण चळवळीचा विचार मंडपे पती-पत्नीला स्वत:च्या व कुटुंबाच्या संकटसमयी सुद्धा मोलाची साथ देऊन गेला.

            वृषाली ही सरांची कन्या. बी.ए.एम.एस. डॉक्टर झालेली ही हुशार मुलगी. तिच्या आयुष्यात वादळ आले. नवर्‍यापासून तिला विभक्त व्हावे लागले. छोटी कन्या बरोबर घेऊन ती माहेरी आली.

भित्रा ससा वाघीण झाली!

            सर सांगू लागले-

            “वृषालीला नैराश्य आले होते. आम्ही सगळे धास्तावलो. पण चळवळीत राहून संकटावर मात करण्याची ताकद आमच्यात आली होती. चळवळीने अंधार जाऊन प्रकाश येतो हा आशेचा विचार आम्हाला दिला होता. शेजारी वृषालीबद्दल कुजबूज करीत. मग तिला अधिकच वाईट वाटे. मंडपे बाईंनी शेजार्‍यांना स्पष्ट शब्दात वृषालीच्या घटस्फोटाबद्दल कल्पना दिली. मग ही कुजबूज थांबली. एके दिवशी शैलाताई घरी आल्या व वृषालीला स्पर्धा परीक्षेचा फॉर्म देऊन गेल्या. परिवर्तनमध्ये काम करण्यास त्यांनी सल्ला दिला. हा सल्ला चांगलाच उपयोगी ठरला. वृषाली शैलाताईंच्या परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रात येऊ लागली. तेथील पेशंटच्या दु:खांना समजून घेऊ लागली. आपले दु:ख यांच्या प्रश्नापुढे काहीच नाही हा विचार भावला. व वृषालीने स्वावलंबी होण्याची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेत तिने उज्वल यश मिळविले. ती डी.वाय.एस.पी.ची परीक्षा उत्तीर्ण झाली. ट्रेनिंगसाठी ती मुंबईला गेली. आणि तिच्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला. ट्रेनिंग पूर्ण करून निरोप घेताना भित्र्या सशाची वाघीण झाली असे तिचे कौतुक ज्येष्ठांनी केले. वृषालीने मग मागे वळून पाहिलेच नाही. तिने एम.पी.एस.सी.ची सेल टॅक्स विषयाची परीक्षा दिली. त्यातही ती यशस्वी झाली. पोलीस विभागापेक्षा सेल्स टॅक्समधील काम अधिक सोयीचे म्हणून तिने सेल टॅक्स अधिकार्‍याचा जॉब स्वीकारला. सद्या ती डेप्युटेशनवर कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेत आहे. तेथे स्वत:चे घर घेण्याचा तिचा विचार आहे.”

            “चळवळीच्या विचाराने आम्हाला बळ मिळाले. आणि वृषालीच्या जीवनात नवा प्रकाश आणण्यात आम्ही यशस्वी झालो. आपण आई-वडीलांना भार होणार काय अशा काळजीत असलेली वृषाली आई-वडीलांना त्यांच्या उतारवयात व आजारपणात आधार देण्यास समर्थ बनली.”

* सर मागे वळून पहाताना काय वाटते?

            “आम्ही खूप समाधानी आहोत. मी भित्रा होतो. सभेत बोलणे जमत नसे. आमच्या शाळेत बॅ.पी.जी.पाटील यांची व्याख्याने आयोजित केली होती. माझ्याकडे आभाराचे काम असे. मंडपे बाईंनी 5 वाक्ये मला लिहून दिली. आभाराचे वेळी त्यातली 3 वाक्ये मी विसरलो. असा भित्रा वक्ता अंनिसमुळे प्रभावी वक्ता बनला व समाजबदलाच्या कार्यात सहभागी झाला. समाज लगेत बदलत नाही. पण हळूहळू बदल होतच रहातो. या कार्यातील सहभाग खचितच समाधान देणारा आहे. महत्वाचे म्हणजे आमच्या व्यक्तीमत्वातही मोठा बदल झाला व जबाबदार्‍या पेलण्याचे सामर्थ्य चळवळीमुळे मिळाले याचा आनंद आहे.”

            “सध्या आम्ही दोघेही विकलांग आहोत. बाईंना हृदयविकाराचा त्रास आहे. मी मधुमेही आहे. पण सातार्‍याच्या परिसरात आम्ही आवर्जून व्याख्यानांना जातो. आठवड्यातून 2 ते 3 व्याख्याने देतो व प्रबोधनाचे कार्य चालू ठेवतो.”

            “एका शिक्षकाच्या निवृत्ती समारंभाला गेलो होतो. ते सत्काराला उत्तर देताना श्रोत्यांना नामस्मरणात वेळ घालवा असा उपदेश करीत होते. मी त्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. नामस्मरणाऐवजी लोकांना उपयोगी पडणार्‍या कार्यात वेळ घालवा असा सूर लावला. तो शिक्षक म्हणाला, ‘सर, माझं सगळंच तुम्ही खोडलं!”

            मंडपे पती-पत्नीनी नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला आहे. अंनिस चळवळीत कार्यकर्त्याकडून ही अपेक्षा असते त्याप्रमाणेच त्यांचा हा निर्णय आहे. या जोडीने आपल्या व मुलाच्या घराचा गृहप्रवेश गृहशांतीविना केलाय. मंडपे मॅडमच्या विधवा आईचे पाऊल घरात प्रथम ठेवून गृहप्रवेश केलाय. मुलांच्या व स्वत:च्या लग्नात सत्यनारायण नाही. जसे बोलणे तसे वागणे कठीण असते. अनेकांना ते जमत नाही. पण मंडपे पती-पत्नीनी हे साध्य केलंय. अंनिस चळवळीला हा आदर्श आहे.

* समितीच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल?

            “अंनिसचे कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे. प्रथम अंधश्रद्धा दूर करणे, पुढे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे व सर्वंकष जीवनात तो अंगिकारणे व धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करणे हे आपल्या चळवळीचे ध्येय आहे. अशी वाटचाल झाली तर जीवनातील कोणत्याही प्रश्नांना सामोरे जाण्याचे धैर्य प्रत्येक नागरिकांत येईल, त्याची चिकित्सा वृत्ती वाढेल व व्यक्ती, समाज व राष्ट्र  यांच्यापुढील प्रश्न सुटणे सहज साध्य होईल.”

            अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत अनेक कार्यकर्ते आले. कित्येकजण चळवळ सोडून गेले. मंडपे सरांच्या मते सोडून गेलेले कार्यकर्ते स्वत:चा स्वार्थ घेऊन चळवळीत येतात. स्वार्थ साधताच किंवा तो साधत नाही असं दिसताच दूर होतात.

            “आम्ही नि:स्वार्थी भावनेने चळवळीत आलो. निरपेक्षतेने कार्यरत राहिलो. आम्ही विकासत राहिलो, चळवळीला आम्ही थोडं फार दिलं, चळवळीने आम्हाला खूप काही दिलं.”

            चळवळीला आम्ही थोडं फार दिलं हा मंडपे पती पत्नीचा विनय आहे. त्यांनी चळवळीला खूप काही दिलं. अंनिस त्याबद्दल कृतज्ञ आहे. ह्या मुलाखतीत आर.एस.कुलकर्णी व रमेश माणगावे यांचा सहभाग होता.

पत्ता – कुमार मंडपे ‘जिज्ञासा’, 24/2-ब, विसावा नाका,

सातारा-415001  मोबा. 9527003548

पुरस्कार

1) अंनिसचे ‘कवडसे’ हे सुरवातीचे मासिक. या मासिकात ‘धडका दलितांच्या’ हा लेख मंडपे सरांनी लिहिला होता. त्यास बेळगाव अंनिसने अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार देऊन सरांचा गौरव केला. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र अंनिसच्या अगोदर बेळगावला अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत होती हे समजले. नारायण अतिवाडकर हे या समितीत काम करत होते. पुढे ही समिती व महाराष्ट्र अंनिस यांच्यात संवाद वाढला व अतिवाडकरांच्या रूपाने धडाडीचा कार्यकर्ता अंनिसशी जोडला गेला.

2) प्रमोदिनी मंडपे यांचे पुरस्कार

            1) कै.श्री.अच्युत लक्ष्मण दाभोलकर न्यासतर्फे ‘तारांगण               पुरस्कार’-1993

            2) कै.सुरजादेवी मंत्री अंधश्रद्धा निर्मूलन महिला पुरस्कार              – 1997

            3) अरूण लिमये पुरस्कार

            4) रयत शिक्षण संस्थेचा ‘आदर्श शाखा प्रमुख पुरस्कार’

            5) सातारा येथील शिंदे प्रतिष्ठानचा ‘अभिनंदन पुरस्कार’

            6) किशोरी मेळावा मानपत्र.

रयतचा वारसा आम्ही जपला

            मंडपे सर व मॅडम यांनी रयत शिक्षण संस्थेत सेवा केली. या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधक होते. ते कधीही देवळात गेले नाहीत. त्यांनी ज्ञानमंदिरे बांधली व गरीबांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले.

            हा वारसा आम्ही जपला असे मंडपे मॅडम अभिमानाने म्हणाल्या. त्यांनी कर्मवीरांच्या जीवनातील दोन घटनांचाही उल्लेख केला. सज्जनगड व औदुंबर येथे दास नवमीच्या वेळी ब्राह्मणांच्या पंक्ती प्रथम जेवायला बसत. तेथे अण्णांनी सर्व जातीच्या भक्तांना एकाच पंक्तीत जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून यशस्वी सत्याग्रह केला. आण्णाच्या विचारांशी प्रामाणिक राहून आम्ही धर्म व जातीची बंधने तसेच अंधश्रद्धा यापासून स्वत: दूर राहून विद्यार्थी व समाज विज्ञाननिष्ठ बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असे मंडपे मॅडमनी आवर्जून सांगितले.

            रयत शिक्षण संस्थेतील आमच्या अनेक सहकार्‍याबाबत आम्हाला उलटा अनुभव झाला असेही त्या खेदाने म्हणाल्या. काही मुख्याध्यापक एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म मुहूर्त बघून भरतात तर काही जण गायत्री मंत्राची कॅसेट मूल्यशिक्षणाच्या तासाला वाजवतात. हे थांबले पाहिजे असे त्या आग्रहाने म्हणाल्या.