माझ्यासारख्या बहुजन समाजातील लेखकाचा प्रवास समाजाकडून व्यक्तीकडे होतो, तर अभिजन वर्गातील लेखकाचा प्रवास व्यक्तीकडून समाजाकडे होतो. बहुजन लेखक आणि अभिजन लेखक यातील हा परस्परविरोधी प्रवास आहे. साहजिकच माझ्या लेखनात अभिजन लेखकासारखे मनोविश्लेषणात्मक, स्त्री–पुरुष संबंध हे विषय न येता सामाजिक समस्या, दु:ख, कामगार कुटुंबातले ताणेबाणे यांचे चित्रण असे.
1975 नंतरच्या काळातील मराठी साहित्य-नाट्य विश्वाला जयंत पवार हे नाव चांगलेच सुपरिचित आहे. नाटककार, कथाकार आणि नाट्य समीक्षक अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1997 साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या मुंबईतील गिरणी संपानंतर निर्माण झालेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगाराच्या कुटुंबातील ताणतणावांचे दर्शन घडविणार्या ‘अधांतर’ नाटकाने मराठी नाटकांच्या वास्तववादी परंपरेत एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकानेही ही परंपरा आणखी समृद्ध केली. मध्यमवर्गीय मराठी माणसाची; तसेच सर्वसामान्य गरीब माणसाची मुंबईसारख्या शहरात बिल्डर, उद्योगपती व राजकीय शक्ती यांच्या वर्चस्वापुढे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी आपल्या या नाटकात वास्तवतेच्या पातळीवर मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायातून आजच्या विदारक परिस्थितीचे दर्शन नाटकातून घडते. जागतिकीकरणाच्या धोरणातील विकासाचा हा ‘डेंजर वारा’ केवळ मुंबई शहरातील मध्यमवर्गीय व निम्नवर्गीय यांना उद्ध्वस्त करेल असे नसून तो एकूणच बहुजनांनाही उद्ध्वस्त करेल, ही जाणीव जयंत पवार जशी करून देतात, तशीच या उद्ध्वस्तीकरणाच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणाही ते नाटकातून देतात. ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ हे त्यांचे नाटकही मराठी रंगभूमीवर गाजलेले आहे. ‘माझं घर’ या त्यांच्या स्त्रीवादी नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर 200 हून अधिक प्रयोग झाले आहेत.
मराठीला एकांकिका लेखनाची मोठी परंपरा आहे. ही मराठी एकांकिकेची परंपरा जयंत पवार यांच्या एकांकिकांनी समृद्ध केलेली आहे. आपल्या लेखनाच्या सुरुवातीपासून 1980 पासूनच ते एकांकिका लिहित आहेत. या सर्वच एकांकिका प्रयोगशीलता, विविध रूपबंध हाताळणार्या आणि आशयाच्या दृष्टीने आगळ्या-वेगळ्या आहेत.
जयंत पवार यांनी केवळ नाटक, एकांकिका हेच प्रकार हाताळले, असे नाही तर ते मराठीतील एक महत्त्वाचे कथाकारसुद्धा आहेत. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ आणि ‘वरनभात लोन्चा नि कोन नाही कोन्चा’ हे त्यांचे कथासंग्रह कथारचना, भाषा, प्रसंग, पात्रे आणि संवाद या सर्व अंगांनी नाविन्यपूर्ण आहेत.
‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या जयंत पवार यांच्या पहिल्याच कथासंग्रहाला 2012 मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. 2015 मध्ये मुंबई येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, तर 2015 मध्ये बुलढाणा येथे झालेल्या ‘विद्रोही साहित्य संमेलना’चेही ते अध्यक्ष होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले होते, “आज आपल्या देशात फणा काढून उभा असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा समरसतेची भाषा बोलणारा आणि राज्य घटनेच्या समतेच्या ढाच्याला आव्हान देणारा आहे. तो शांतीची भाषा जरी बोलत असला, तरी त्या शांततेच्या खाली भयाच्या आणि असुरक्षिततेच्या वस्त्याच वाढणार आहेत. प्रसिद्ध हिंदी कवी राजेश जोशी यांच्या शब्दात सांगायचे तर ‘जो इस पागलपनमें शामिल नहीं होंगे, मारे जायेंगे। कठघरेमें खडे कर दिये जायेंगे, जो विरोधमें बोलेंगे, जो सच सच बोलेंगे…. मारे जायेंगे।’ अशा या भयावह आणि हिंसक राष्ट्रवादात ठेचले जाण्याविरुद्ध तो लादत असलेल्या सेन्सारशिप विरुद्ध, स्त्री स्वातंत्र्यावर चालवत असलेल्या बुलडोझरविरोधात लेखक, कलावंत, विचारवंतांच्या मुस्कटदाबी विरोधात आवाज उठविण्याची ही वेळ आहे. या विचारमंचावरून या सांस्कृतिक आक्रमणाचा मी निषेध करतो आणि त्याचवेळी आपल्याला जे-जे विचारपीठ मिळेल, चौथरा मिळेल, तिथून सर्वांनी याचा धिक्कार करावा, असं समतेचं मूल्य मानणार्या सर्व लेखक, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ते आणि प्रत्येक विवेकवादी माणसाला आवाहन करतो.” आणि केवळ आवाहन करून जयंत पवार थांबले नाहीत, तर त्याप्रमाणे ज्या-ज्या वेळी नाटकावर सनातन्यांचे हल्ले झाले, बंदी घालण्याच्या मागणीचा प्रयत्न झाला, तेव्हा-तेव्हा ते कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जाहीरपणे उभे राहिले. अखिल भारतीय साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन ते नाकारण्याचे प्रकरण असो किंवा नुकतेच घडलेले नाट्यकर्मीच्या मागच्या पोलिसी चौकशीचे प्रकरण; त्याविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेत निषेध केला आहे. अशा या कलावंतांबरोबर बातचीत करताना सुरुवातीला आम्ही त्यांना विचारले –
केवळ मनोरंजन किंवा कलेसाठी कला असा कलेचा उद्देश असतो की मानवतावादी मूल्ये आपल्या कलेतून रुजवत विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी वातावरण तयार करणे, हा कलेचा उद्देश आहे. आपल्याला काय वाटते?
माझ्या मते, कला हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. मी कलेकडे त्याच उद्देशाने पाहतो. केवळ कलावंतालाच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याची गरज असते. त्याला व्यक्त होता आले नाही तर तो आतल्या आत कोंडून जाईल आणि त्याच्यात एक प्रकारची विकृती तयार होईल. त्यामुळे माणसाला जे माध्यम भावते, त्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी मुक्त अवकाश असला पाहिजे. आता माझ्यासाठी ‘मी’ हा अवकाश शोधला तो लिखाणात. कारण लहानपणापासूनच मी अशक्त, मितभाषी होतो, माझ्यात स्वत:विषयी न्यूनगंड होता आणि मी इतरांशी संवाद साधू शकत नव्हतो. त्यामुळे मी स्वत:शीच संवाद करायचो आणि तो संवाद करताना मी माझ्या परीने आजूबाजूच्या परिस्थितीची, माणसांची, मानवी संबंधांची एक प्रकारे मांडणी करत असे. आता ही मांडणी कशाच्या आधाराने होत असेल? माझे बालपण, तरुणपण कामगार भागात गेले. माझे वडील गिरणीत कारकून होते, ते गेल्यावर मी पण गिरणीतच कामाला लागलो. त्यामुळे मी कामगार वर्गाचे जीवन जगत होतो, पाहत होतो. गिरणी संप, संपाआधीची, संपानंतरची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवत होतो. गिरणगावच्या चाळीतील घरे लहान, घरात अवकाशच नाही. झोपण्या-खेळण्यापासून सगळा वावर बाहेरच समाजात. सण, उत्सव सामूहिक. सारे संस्कार सामूहिकच. त्यामुळे माझ्यासारख्या बहुजन समाजातील लेखकाचा प्रवास समाजाकडून व्यक्तीकडे होतो, तर अभिजन वर्गातील लेखकाचा प्रवास व्यक्तीकडून समाजाकडे होतो. बहुजन लेखक आणि अभिजन लेखक यातील हा परस्परविरोधी प्रवास आहे. साहजिकच माझ्या लेखनात अभिजन लेखकासारखे मनोविश्लेषणात्मक, स्त्री-पुरुष संबंध हे विषय न येता सामाजिक समस्या, दु:ख, कामगार कुटुंबातले ताणेबाणे यांचे चित्रण असे. ते सुरुवातीच्या काळात तरी ढोबळ, वर्तमानपत्री स्वरुपाचे होते; पण पुढे गिरणी संपानंतरची गिरणी कामगारांची परिस्थिती विदारक झाली होती. संपानंतर त्यांचा पूर्वीचा क्रांतिकारकपणा पार लयाला गेला होता. गिरणी मालकांनीही त्या परिस्थितीचा गैरफायदा घेत कामगारांवर भयानक दबाव टाकणे चालू केले होते. अशा परिस्थितीत मला नोकरी करणे शक्यच नव्हते. मी नोकरी सोडली. विजय तेंडुलकरांच्या शिफारशीने जरी मला ‘चंदेरी’ या मासिकात नोकरी मिळाली तरी गिरणगावातील ही सारी परिस्थिती आणि गिरणीच्या नोकरीतून बाहेर पडल्यावर मला आलेला नैराश्याचा अनुभव या प्रवासात कलेकडे बघण्याच्या माझ्या दृष्टिकोनास आकार येऊ लागला. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या दोन्ही बाजू माझ्या मते निरर्थक आहेत. कला हे स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम आहे, हे तर स्पष्टच आहे; पण त्याचबरोबर आपण आपल्यासमोर जी वस्तुस्थिती आहे, ती समजून घेत, तिची फेरमांडणी करत म्हणजे ती वस्तुस्थिती केवळ आहे, तशी कलात्मक छायाचित्रासारखी न मांडता त्या वास्तवाची आपल्याला हवी तशी रचना करत आणि ती करत असताना त्या वास्तवामागचे राजकारण जाणून घेतो. हे राजकारण जाणणे म्हणजे आपण मांडत असलेले वास्तव जी व्यवस्था निर्माण करते, ती व्यवस्था कशी काम करते, शोषितांना कशी वापरून घेते, शोषकांचीही भूमिका काय असते, हे समजून घेणे. हे झाले सामाजिक पातळीवर. पण वैयक्तिक पातळीवरही अगदी स्त्री-पुरुष संबंधात अगर नातेसंबंधातही प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असते. या राजकारणामागे कौटुंबिक, सामाजिक, नैतिक मूल्यव्यवस्था असते. त्या आधाराने व्यक्ती, समाजगट एकमेकाला वापरून घेत असतात. ही गुंतागुंत समजून घेत त्याची कलात्मक मांडणी करणे हे कलावंताचे काम आहे. कलेचे काम त्या गुंत्यातून निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे नाही. कारण कलेचा परिणाम त्या कलेचा आस्वाद घेणार्या ज्या माणसांवर होतो, ती माणसे आपल्या जगण्याच्या आकलनानुसार ती उत्तरे शोधतील….तर त्या गुंत्याबाबत आस्वादकांच्या मनात प्रश्न निर्माण करणे, त्यांचा विवेक जागृत करणे, हे कलेचे उद्दिष्ट आहे.
म्हणजे कला ही अशी आहे, जी वास्तवाचे भान आणून देते. तुम्हाला स्वत:ला ते भान होते, त्याची फेरमांडणी करणे हे ठीक. पण कलावंताला स्वत:ची भूमिका असावी की नसावी?
निश्चितच असायला हवी. कारण वास्तवाची फेरमांडणी करताना ती भूमिका तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सूचित करावीच लागते. नाही तर जे जगणे तुम्ही मांडत असता, ते तुम्हाला केवळ जसे दिसते तसे मांडावे लागेल; पण असे होत नाही. एखादे छायाचित्र जेव्हा तुम्ही घेता, तेव्हाही ते छायाचित्र कोणत्या कोनातून घ्यावे, उजेड कसा असावा, त्या छायाचित्राचा परिणाम मला काय साधायचा आहे, याचा विचार करूनच तुम्ही ते छायाचित्र घेत असता. तुमचा दृष्टिकोन त्यात येतोच. कलावंताची कोणतीही कलाकृती ही एक प्रकारे राजकीय खेळीच असते, वास्तव जाणून घेणे आणि त्याची फेरमांडणी आपल्या भूमिकेतून करणे.
पण हल्ली काही अपवाद वगळता आपल्याकडचे बहुतेक नाटककार, लेखक, कलाकार जाहीरपणे भूमिका घेण्यास कचरतात…
कलावंताला भूमिका असता कामा नये, असे म्हटले जाते. एका पातळीला एक कलाकार म्हणून मला ते पटतेही. कलाकृतीला कलात्मक मूल्य असलेच पाहिजे आणि या कलात्मकतेची जाणीव कलाकृती घडवणार्याला असलीच पाहिजे. म्हणजे मी कलात्मकता आणि त्यातील सामाजिक आशय या दोन्हींना सारखेच महत्त्व देतो. कलेसाठी कला जशी आहे, तशी ती जीवनासाठीही कला आहे; पण दोन्ही एकाच वेळी आहेत. जीवनापासून कला वेगळी काढता येत नाही. इथे मला एक मुद्दा मांडायचा आहे, आपल्याकडचा लेखक वर्ग जो समाजाला एक प्रकारे मार्गदर्शन करत असतो, तो सारा पांढरपेशा, अभिजन, सुस्थिर उच्च मध्यमवर्गातून आलेला होता. त्याला इथला समाज कळला नव्हता. म्हणजे दलित साहित्य येण्यापूर्वीच्या मराठी साहित्यातील सामाजिक घुसमटीचे चित्रण हे पांढरपेशा, अभिजन, सुस्थिर उच्च मध्यमवर्गाच्या घुसमटीचे आहे. जरी कोणत्याही वर्गातील मानवी शोकांतिका या दु:खकारकच असल्या, तरीपण या वर्गातील घुसमट किंवा शोकांतिका आणि बहुजन, दलित वर्गातील माणसांची घुसमट किंवा शोकांतिका यात मूल्यात्मक फरक आहे. जसजसे तुम्ही सामाजिक, आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तराकडे जाल, तसतसे तुम्हाला जाणवेल की, या स्तरातला माणूस स्वत:च हतबल, एकटा असतो. सामाजिक स्थितीच अशी असते की, वरच्या वर्गासारखी त्याच्याकडे ‘सपोर्ट सिस्टिम’ नसते. त्यामुळे त्याची शोकांतिका ही अधिक दारूण बनते. ती व्यक्तिगत शोकांतिका राहत नाही, तर ती सामाजिक शोकांतिका बनते आणि ती जास्त व्यापक होते. एखाद्या गिरणी मालकाची शोकांतिका त्याच्या व्यक्तिगत कारणांमुळे घडते, कामगारांमुळे घडत नाही; पण कामगाराची शोकांतिका मात्र एकट्या कामगाराची नसते, तर ती समाजाची असते. त्याच्या स्वत:बरोबरच त्याचा समाज, कुटुंब, मालक हे सारेच त्या शोकांतिकेला जबाबदार असतात. त्यामुळे अशा सर्व बाजूंनी दाबल्या जाणार्या वर्गाच्या बाजूनेच भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणूनच माझी नाटके, कथा अजरामर आहेत की नाहीत, हे लोक ठरवतील….एकांगी चित्रणाचा, पक्षपाताचा आरोपही माझ्यावर होईल. पण ते सारे सहन करीत मी ज्या बहुजन, कामगार वर्गातून आलेलो आहे, त्यांची बाजू घेत आलेलो आहे. कारण ही बाजू घेत लिखाण करणे म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे प्रमाणभूत मानून सर्व तर्हेच्या शोषणाविरोधात संघर्ष करणे आहे.
पण अशी बाजू घेण्यामुळे आपल्या कलाकृतीवर पक्षपातीपणाचा आरोप होणार नाही काय ?
नाही. कलावंताने आपल्या कलेत अजिबात पक्षपाती होऊ नये; उलट लेखकाने अत्यंत निर्दयी, निष्ठूर आणि क्रूर होऊनच लिखाण केले पाहिजे. शोषण, छळ, अवहेलना, परवड यांचे वर्णन करताना लेखकाच्या करुणेचा झरा त्याच्या अंत:स्तरावर असला पाहिजे. तो प्रत्यक्षात दिसला तर या करुणेच्या दाखवेगिरीतूनच सहानुभूती, पक्षपातीपणा निर्माण होतो. त्याने तटस्थतेने आणि निर्ममतेने लिहिले, तरच त्या वर्णनाने वाचकाच्या मनात करुणा निर्माण होऊ शकते. कारण शेवटी वाचणार्याच्या मनात करुणेने जन्म घेऊन त्याचे जीवनभान विस्तारावे, हाच खर्या साहित्याचा हेतू असतो. या संदर्भात मराठी साहित्यात भाऊ पाध्ये यांच्याइतके समर्थ उदाहरण दुसरे सापडणार नाही.
या सगळ्या प्रवासात आपली मूल्ये आपले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपत असताना संघर्षाचे प्रसंग आले? त्यावर तुम्ही कशी मात केली?
‘अधांतर’ नाटकाच्या वेळेस किंवा त्याही आधीच्या आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवरील माझ्या नाटकावर त्यातील शिव्यांवर सेन्सारने आक्षेप घेतला होता. पण मी काही त्याला दाद दिली नाही. पण नंतर माझे ‘अधांतर’ नाटक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात नंतर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभागाच्या अभ्यासक्रमाला लावले असताना शिवसेनेनेही नाटकातील शिव्यांबाबत खूपच हंगामा केला होता; अगदी ‘अधांतर’विरोधात प्रचंड मोहीमच उघडली होती. त्यावेळेसही मी दाद दिली नाही आणि इतर नाटककार वगैरेंनी पत्रके काढली आणि ते सारे बारगळले. पण यानिमित्ताने भाषेच्या राजकारणाचा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. ’अधांतर’ किंवा ‘नटरंग’मधील शिव्या या काही स्टंट म्हणून आलेल्या नव्हत्या. त्या त्यांच्या बोलीभाषेच्या भाग होत्या. त्यांच्या भावनांचे ते प्रकटीकरण होते. भाषेच्या राजकारणावर नियंत्रण आहे अभिजनांचे, पांढरपेशांचे. त्यांनी प्रमाणभाषा बनवून त्याचे नियम बनविले, आपले भाषिक वर्चस्व निर्माण केले. श्रमिकांचे या प्रमाणभाषेशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांचे सारे व्यवहार बोलीभाषेत. त्यामुळे त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा त्याची चीड शिव्यांच्या रूपातच बाहेर पडते. एक तर मराठी नाटकाची संस्कृती पांढरपेशी आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपलिकडील शिवराळ भाषा खपवून घेतली जात नाही.
तुमच्या नाटकांच्या बाबत तुम्ही जशा तडजोडी स्वीकारल्या नाहीत; तसेच इतरांच्या नाटकांवर जेव्हा–जेव्हा हल्ले झाले, बंदीची मागणी झाली, तेव्हा–तेव्हा तुम्ही या नाटकांच्या मागे ठामपणे उभे राहिलात, त्या मागची तुमची भूमिका काय?
‘अधांतर’ला झालेल्या विरोधापासून मला असे जाणवू लागले, जसा मला लिहिण्याचा अधिकार आहे, तसा तो इतरांनाही आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा मुक्त अवकाश असला पाहिजे, ही माझी भूमिका तर पहिल्यापासूनच होती आणि हा अधिकार राज्य घटनेने आपल्याला दिलेला आहे. तसेच माझ्या अवती-भवती या भूमिकेला बळ देणारी निखील वागळे यांच्यासारखी मंडळी होती. 1999-2000च्या सुमारास हिंदू देवदेवतांच्या कथित विटंबनेचा आरोप ठेवत ‘यदा-कदाचित’सारख्या नाटकांवर हिंदू जनजागरण समितीद्वारे हल्ले चढविले गेले, लेखक-निर्माते-दिग्दर्शक यांना धमक्यांचे फोन यायला लागले. त्या वेळेपासून मी अशा नाटकांच्या बाजूने उभा राहू लागलो. हा केवळ आमच्या हक्काचा प्रश्न नव्हता. आपल्या दशावतार, तमाशासारख्या लोककलांमध्ये अनेक देवदेवतांची टिंगल-खिल्ली उडविली आहे; ती विटंबना नाही आणि त्या खिल्लीला परंपरा आहे. तो बहुजन संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा एक अंगभूत भाग आहे. एखादा सामान्य माणूस, शेतकरी त्या अमानवी शक्तीला मानवी पातळीवर आपल्या बरोबरीला आणतो, असा त्याचा आशय आहे आणि बहुजन समाजातील मुले जेव्हा एकांकिका करायला लागली, तेव्हा साहजिकच त्यांनी आपल्या परंपरेतला हा आशय उचलला. हा आशय पोचविण्याचे स्वातंत्र्य कला तुम्हाला देते. त्या कलेलाच तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांच्या विटंबनेच्या नावाखाली अटकाव करायला लागला; मग हे बहुजन हिंदू नाहीत काय? त्यांचा हक्क तुम्ही कसा नाकारता? माझ्या मते, हे हिंदुत्वाच्या बुरख्याआडचे अभिजन राजकारण आहे. उदाहरणच घ्यायचे तर शंकासुराचे घेता येईल. हा दशावतारातील खलनायक असूनही लोकप्रिय. मालवणीत बोलणारे एकमेव पात्र. असुर असल्याने वेद शिकण्याचा अधिकार नाही. मग तो वेद पळवितो आणि समुद्राच्या तळाशी जाऊन लपतो. तिथे येऊन विष्णू त्याला मारतो. आता यातील अंदर की बात लोकांना लगेच जाणवते, म्हणून तिच्यावर बंदी आणा, हे सांस्कृतिक राजकारण आहे. ‘यदा-कदाचित’पासून हे राजकारण करणार्यांचे हितसंबंध मी उघड करत राहिलो.
आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत तुम्ही एकूण कलाक्षेत्राकडे आणि विशेषत: आपण ज्या साहित्य–नाट्यक्षेत्राशी संबंधित आहात, त्याकडे कसे पाहता?
देशात एक काळ असा होता की, प्रगतिशील लेखक संघटना, ‘इप्टा’ यांसारख्या संघटना यांच्याकडून राजकीय चळवळीत सांस्कृतिक हस्तक्षेप होत होता. सत्ता काँग्रेसची असली तरी त्यांची विचारसरणी समाजवादी असल्याने डाव्या विचारांना अवकाश होता. 1980 नंतर तो क्षीण होत गेला. आज तर या विचारांच्या पूर्णत: विरोधी असलेले सरकार सत्तेवर आहे. त्यांचा उद्देश डावा-समाजवादी विचार नष्ट करण्याचाच असल्याने ते त्यांच्या विरोधी आवाज उठवणार्यांना गुन्हेगार ठरवत दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत आणि ते काहीच बोलू नयेत, अशी व्यवस्था निर्माण करत आहेत. त्याशिवाय त्यांचा समाजावर असलेला प्रभाव कमी कसा होईल? पण तरीही विरोधी आवाज पूर्णत: नष्ट करता येत नाहीत आणि ते नष्ट होतही नाहीत, हे ‘पुरस्कार वापसी’पासून 49 कलावंतांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरून नुकतेच सिद्ध होत आहे. यात सत्ताधार्यांची गोची अशी आहे. पत्रावर सह्या करणार्या श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णन, अपर्णा सेन या कलावंतांना जी जागतिक प्रतिष्ठा आहे, ती त्या पत्राला उत्तर देणार्या प्रसून जोशी वगैरेंना नाही. हा विरोध वाढत जाईलच, प्रतिकार होत राहीलच. प्रतिकार करणार्यांना त्रास होईल. पण पुढाकार घेणार्याच्या मागे लोक उभे राहतीलच. मी कलाकारांच्या पोलिसी चौकशीबाबत निषेधाचे पत्र लिहिल्यानंतर मला अनेकांनी पाठिंबा दिला. नुकत्याच ‘कल्पना एक – आविष्कार अनेक’ मध्ये नामदेव ढसाळांच्या ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे,’ या काव्यपंक्तीवरील एकांकिका स्पर्धेत तरुण लेखकांनी चांगल्या एकांकिका सादर केल्या. असं म्हटले जाते की, पूर्वी लेखक, कलावंत भूमिका घ्यायचे. ते आज घेत नाहीत. पण त्यात तथ्य नाही. पूर्वी माध्यमे ज्या जातवर्गाच्या मालकीची होती, त्याच जातवर्गातून लेखक, कलावंत यायचे. त्यामुळे त्यांची प्रतिमा तयार व्हायची. आज ग्रामीण भागातला दलित, बहुजन लेखक, कलावंत भूमिका घेतात; पण त्यांच्या मागे माध्यमे नाहीत. त्यामुळे त्यांचा आवाज पोचत नाही. पण मी आशावादी आहे. ‘विद्रोह’ ही तात्कालिक अवस्था नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे ‘विद्रोह’ कधीच मरत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे.