Categories
कार्यकर्ता मुलाखत

विवेकाच्या वाटेवरचा विनम्र वाटसरू – विनोद वायंगणकर

वार्षिकांक - २०१९

कोकण या निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार प्रदेशाला अंधश्रद्धांचे आगर म्हटले जाते, ते तिथल्या निसर्गाच्या हिरव्या पडद्याआड चालत असलेल्या जगावेगळ्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे! इथल्या भुतांनी तर काही मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. याच विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात अंधश्रद्धांचा अंध:कार दूर करण्यासाठी विवेकाचा दिवा पेटवून तेवत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता गेल्या सुमारे 20 वर्षांपासून करीत आहे. त्या कार्यकर्त्याचे नाव आहे, विनोद रामकृष्ण वायंगणकर.

कोकण या निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार प्रदेशाला अंधश्रद्धांचे आगर म्हटले जाते, ते तिथल्या निसर्गाच्या हिरव्या पडद्याआड चालत असलेल्या जगावेगळ्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे! इथल्या भुतांनी तर काही मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. याच विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात अंधश्रद्धांचा अंध:कार दूर करण्यासाठी विवेकाचा दिवा पेटवून तेवत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता गेल्या सुमारे 20 वर्षांपासून करीत आहे. त्या कार्यकर्त्याचे नाव आहे, विनोद रामकृष्ण वायंगणकर.

रत्नागिरी जवळील एका छोट्या खेड्यातल्या कनिष्ठ मध्यम वर्गातील कुटुंबात जन्मलेल्या विनोद वायंगणकर यांचा कोकणातील अंधश्रद्धांना तोंड देत, त्यामागील कार्यकारणभाव समजून घेत व त्यांची उकल करीत महाराष्ट्र अंनिसचा एक विवेकी कार्यकर्ता बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास उद्बोधक व नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. मध्यंतरी 1991 ते 1995 या काळात ते त्यांच्या गावच्या शिवसेना शाखेचे शाखा-उपप्रमुख सुद्धा होते. श्रमाचा सन्मान करणारे विनोद वायंगणकर कोणतेही काम कसलाही संकोच न बाळगता प्रामाणिकपणे करत असतात. वडापावची गाडी ते शहरातील मध्यवर्ती भागात भर चौकातील प्रसिद्ध हॉटेल अशी त्यांची व्यावसायिक वाटचाल त्यांच्या सचोटीची व कठोर परिश्रमाची साक्ष देते व नोकरी म्हणजेच जीवन या टिपिकल मराठी संकल्पनेला सुरूंग लावते. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस रात्री दहानंतर कधीतरी संपतो. अशा अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून महाराष्ट्र अंनिसचे काम ते मन लावून करतात. त्यांच्या चेहर्‍यावर कायम दिसणारे मंद स्मित व त्यांचा मृदु स्वभाव यामुळे ते माणसे जोडत राहतात व महाराष्ट्र अंनिस ही माणसे जोडणारी चळवळ आहे, हे कथन सार्थ ठरवत असतात. त्यांच्या मित्र-परिवारात त्यांना प्रेमाने अण्णा म्हणून संबोधले जाते. त्यांच्या या अंनिसच्या कामातील सातत्यामुळे आज ते राज्यस्तरावर सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे सहकार्यवाह या पदावर कार्यरत आहेत. अशा कार्यकर्त्याचा परिचय महाराष्ट्रातील अन्य कार्यकर्त्यांना व्हावा, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची ही विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

विनोदजी, ‘अंनिवा’ टीमतर्फे तुम्हाला सप्रेम नमस्कार. आपले वय व आपण सध्या काय करता, हे सांगा.

नमस्कार. माझी मुलाखत घ्यावी एवढा मोठा असामी मी नाही, तरीही आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेत आहात व माझ्या रत्नागिरी शाखेचा व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सन्मान करीत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.

माझा जन्म 5 मार्च 1965 रोजी रत्नागिरीपासून सुमारे 4 किमी वरील आंबेशेत या छोट्या खेड्यात झाला. सध्या रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळ माझे एक हॉटेल आहे, जे मी व माझी पत्नी चालवतो. मी स्वतः एक सर्पमित्र असून सापांना पकडून गावाबाहेर सोडण्याचे काम करतो. तसेच, सापाविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करून प्रबोधनाचे काम करतो.

आपले बालपण, शिक्षण, तारुण्यात असताना जोपासलेली स्वप्ने व नंतरचा प्रवास याविषयी सांगा.

माझे बालपण माझ्या जन्मगावी म्हणजे आंबेशेत येथेच गेले. सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण तेथील शाळेतच झाले. मग माध्यमिक शिक्षणासाठी रत्नागिरी येथे फाटक माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. एस.एस.सी. पास झाल्यावर गोगटे जोगळेकर कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालो. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) मशिनिस्टचे प्रशिक्षण घेतले. आयटीआय प्रशिक्षित तरुणांना त्या काळात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिस पदावर काम मिळत असे. मलाही मुंबईच्या पार्ले बिस्कीट कंपनीत एक वर्षासाठी अप्रेंटिस पदावर काम करण्याची संधी लाभली. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर आकुर्डी, पुणे येथील प्रसिद्ध बजाज ऑटो कंपनीत मला हंगामी (टेंपररी) नोकरी मिळाली. तिथे दोन वर्षे काम केले; परंतु त्या वेळी आखाती युद्ध सुरू झाले. देशात पेट्रोलची टंचाई निर्माण झाली. त्याचा परिणाम ऑटो उद्योगावर झाला. म्हणून बजाज ऑटोने कामगार कपात केली. त्यात हंगामी कामगारांचा प्रथम बळी गेला. माझी नोकरी सुटली व मी परत गावी आलो. त्यावेळी माझ्या आईने रत्नागिरी शहरात वडापावची गाडी टाक म्हणून सुचविले. त्याप्रमाणे मी माझ्या दोन्ही भावांना सोबत घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वडापावची गाडी सुरू केली.

मी लहान किंवा तारुण्यात असताना कसलीही स्वप्ने पाहिली नव्हती. एखाद्या कनिष्ठ मध्यम वर्गातील तरुणाचे सामान्यपणे आयुष्य असावे, तसेच एका सरळ रेषेसारखे माझे आयुष्य होते. आई-वडील व आम्ही तिघे भाऊ असे आमचे कुटुंब होते.

आपली नोकरी गेल्यावर आपण वडापावची गाडी टाकली व नोकरी या प्रकाराकडे पाठ फिरवलीत. हा बदल स्वीकारताना आपल्या भावना कशा होत्या?

खरे तर नोकरी या प्रकाराविषयी माझ्या मनात फारसे आकर्षण नव्हते. नोकरीपेक्षा व्यवसायाकडे माझा कल होता. कोणतेही काम हलके किंवा भारी असा भेदभाव मी कधीही केला नाही. श्रमाला कायम प्रतिष्ठा दिलेली आहे. आमच्या कुटुंबाचे गावात किराणा सामानाचे छोटे दुकान होते. रत्नागिरी शहरातील शाळेला जाताना मी घासलेटचे रिकामे कॅन बरोबर घेऊन जायचो व येताना त्यात घासलेट भरून घेऊन रिक्षाने ते गावात घेऊन यायचो व त्याची विक्री आमच्या दुकानातून केली जात असे. माझी आई गृहिणी होतीच; पण सोबत महिलांचे ब्लाऊज शिऊन द्यायचे काम करायची. गावात लग्न असल्यास लग्नघरातील महिलांचे कपडे तातडीने शिवून द्यावे लागत व त्यासाठी आई रात्र-रात्र जागरण करून ते शिवून देत असे. व्यवसायात मन लावून मेहनतीने काम करण्याचे धडे मी आईकडून शिकलो. माझे वडील मुंबईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात स्टोअर कीपर म्हणून काम करीत. त्यांनी मला धंद्यात जोखीम असते व ती घेतली पाहिजे, याचे धडे दिले. हे सारे खरे तर मराठी माणसांच्या मध्यमवर्गीय मानसिकतेत बसणारे नव्हते. म्हणून नगदी उत्पन्न देणारी व त्यातल्या त्यात कमी जोखीम असलेली वडापावची गाडी आम्ही टाकली. तांत्रिक धंद्यात असणारी अधिक जोखीम टाळण्यासाठी आम्ही हा मार्ग पत्करला. आयटीआय झाल्यावर प्लंबिंगसारखी कामे सहा-सात महिने केली. त्यात दिवसाकाठी 70 रुपये एवढी कमाई होत असे. त्या काळात शासकीय दूध योजना व वितरण मी गावात सुरू केले. यात मला आर्थिक नुकसान सोसावे लागले; परंतु माझ्या आईने मला धीर दिला, प्रोत्साहन दिले. या पार्श्वभूमीवर व्यवसाय करावा की करू नये, असा कसलाही संभ्रम माझ्या मनात नव्हता.

आपला विवाह कधी झाला? आपल्या पत्नीविषयी सांगा.

माझे लग्न 1993 साली झाले. माझी पत्नी सुप्रभा ही मालवणची आहे. तिचे शिक्षण 9 वी पास आहे. आमचं लग्न हे पारंपरिक पद्धतीने जुळवून (अरेंज्ड) केलेले लग्न आहे. त्या काळात मी ‘अंनिस’ सोबत जोडलेला नव्हतो. त्यामुळे अन्य कोणत्याही सामान्य लग्नाप्रमाणेच हे लग्न होते. आम्हाला एक मुलगा आहे. त्याचे नाव सागर. तो मर्चंट नेव्हीमध्ये असतो. सुट्टीवर आला की तो आमच्या व्यवसायात हातभार लावतो.

कोकणाला अंधश्रद्धेचे आगर असे म्हटले जाते. इथल्या अंधश्रद्धा काहीतरी वेगळ्याच असतात, असे ऐकले आहे. त्याविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

तुम्ही म्हणता ते खरे आहे. आमच्या कोकणातल्या अंधश्रद्धेत भरपूर विविधता आहे. आमच्याकडील भुतांचे विविध प्रकार तुम्ही कधी ऐकलेही नसतील. आमच्याकडे एक ‘बायंगी’ नावाचे भूत असते, ते ज्याला वश होईल त्याची भरभराट होते. त्याला वश करण्यासाठी काही गावे प्रसिद्ध आहेत. तिथले ‘बायंगी’तज्ज्ञ लोक नारळाच्या रुपाने ‘बायंगी’ देतात व त्याची जोपासना करण्याविषयी मार्गदर्शन करतात. जर जोपासना नीट केली नाही, तर होत्याचे नव्हते होऊ शकते. ‘मानकाप्या’ नावाचे भूत अमावस्येच्या रात्री फिरते व त्याच्या फेर्‍यात जो सापडेल तो बरबाद होतो, असे इथे मानले जाते; परंतु कोणाची मान कापली गेल्याचे मात्र कधी ऐकले नाही. ‘गिरोबावा’ याच्या फेर्‍यात आल्यास आजार होतात. वावटळ, पिंपळावर राहणारा मुंजा, अंगात येणार्‍या ‘बाया’ किंवा देवी यांची कोकणात रेलचेल असते. या प्रकारांना हाताळण्यासाठी खेडोपाडी दत्ताचे वारे येणारे भगत असतात. ‘राखण देणे’ नावाचा प्रकार असतो, ज्यामध्ये कोंबड्याची मान कापून सोडून देतात. गावकीचा हा वार्षिक कार्यक्रम उरूस वगैरे ठिकाणी चालतो. ही ‘राखण’ समजा कोणी दिली नाही व गावात काही बरेवाईट झाले, तर त्याच्यावर याचे खापर फोडले जाते. तिठ्यावर नारळ फोडणे, उतारे काढणे असे प्रकार सुद्धा सर्रास चालतात.

आपण पूर्वी अंधश्रद्धाळू होता काय? कोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा तुम्ही पाळत होता?

होय. कुटुंबात चालत असलेल्या परंपरागत विविध श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा पगडा माझ्यावर होता; परंतु लहानपणापासून माझा स्वभाव चौकस, चिकित्सक होता. मी 12-13 वर्षांचा असताना एकदा आजारी पडलो. माझ्या गावात दवाखाना नव्हता म्हणून आईसोबत रत्नागिरी शहरात जावे लागले. तिथून परत निघायला उशीर झाला होता. त्याकाळी आताच्या सारखी वाहतुकीची मुबलक साधने नव्हती. एक बस कशी-बशी मिळाली; पण ती गावात जात नव्हती, दुसर्‍या मार्गाने जात होती. निदान अर्धे अंतर तरी चालायला नको म्हणून ती बस पकडली. बस स्टॉपवर उतरल्यावर अजून अर्धे अंतर चालायचे होते. त्या रस्त्यात मध्ये एक अशी जागा होती की, तिथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक तरुण मृत्युमुखी पडला होता. तो रात्री दिसतो अशी अफवा त्या परिसरात पसरली होती. माझी आई, मी व बसमधून उतरलेली गावातील एक अन्य व्यक्ती चालत गावाकडे निघालो. ‘मागे वळून बघू नको’ अशी सक्त ताकीद माझ्या आईने मला दिली होती. सर्वत्र अंधार पसरलेला होता व भीषण शांतता होती. माझ्यातील चिकित्सक वृत्ती मला गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहिलेच. त्या अंधारात सुद्धा आईने ते बरोबर हेरले व त्या क्षणी माझ्या पाठीत एक जोरदार धपाटा बसला. तो धपाटा माझ्या लक्षात अजूनही आहेच; पण त्याच वेळी माझ्या मनात एक बाब कायमची ठसली गेली की, तिथे तो मृत तरुण अजिबात दिसत नव्हता. दुसरे उदाहरण म्हणजे गावातील विठ्ठल मंदिर आवारातील शंकराच्या देवळातल्या पिंडीवर तीन दिवस दुधाचा अभिषेक केला जायचा. ते दूध वाहून बाहेर जायचे. काही लोक ते तीर्थ म्हणून घ्यायचे व जवळजवळ सर्व दूध वाया जायचे. एके दिवशी मी माझ्या बहिणीसोबत त्या देवळात गेलो होतो, तेव्हा तिला अगदी भाबडेपणाने बोललो की, ताई हे दूध तर फुकट जाते आहे. या वेळेस ताईने सुद्धा पाठीत धपाट्याचा ‘प्रसाद’ दिला; परंतु मार खावा लागतो म्हणून मी माझी चिकित्सक वृत्ती सोडली नाही. सत्यनारायण किंवा पत्रिका याविषयी मात्र मला त्या वेळी खरोखरच काही माहिती नव्हते.

अंधश्रद्धा सोडाव्यात असे आपणास कधी आणि का वाटू लागले?

वडापावचा व्यवसाय सुरू केला तेव्हा अगरबत्ती लावणे वगैरे प्रकार मी सुरुवातीला केले. एका ‘जाणकार’ माणसाने मला सल्ला दिला होता की, ‘ही जागा महापुरुषाची आहे, तर तू तिथे दर अमावस्येला नारळ देत जा.’ पूर्वी ‘धपाटे’ खाल्ल्याने व त्या-त्या वेळी प्रचलित अंधश्रद्धा या थोतांड आहेत, हे लक्षात आल्याने माझे मन हे नारळ देण्याचा प्रकार करायला तयार झाले नाही; शिवाय आता मी स्वतः माझ्या अधिकारात वडापावची गाडी चालवत असल्याने माझे निर्णय मीच घेण्याचे स्वातंत्र्य मला लाभले होते. म्हणूनच, शेगडीला पहिला वडा अर्पण करणे, चहाचा पहिला कप रस्त्यावर ओतणे हे प्रकार मी केले नाहीत. मी व माझे दोन भाऊ भरपूर मेहनत करीत असू. त्या जोरावर धंदा सुद्धा जोरात चालत होता. यामुळे वरील अंधश्रद्धेचे प्रकार न केल्याने काही बिघडत नाही, याचा प्रत्यय येऊ लागला व मी अंधश्रद्धेपासून दूर जाऊ लागलो.

महाराष्ट्र अंनिसकडे कधी, का व कसे वळलात? अंनिसमध्ये काय काम केले? काही उल्लेखनीय उपक्रम, घटना, कामे याबाबत सांगा.

माझ्यासमोर राजकीय किंवा सामाजिक कार्याचे असे काही लक्ष्य किंवा उद्दिष्ट नव्हते. तसा मी शिवसेनेत सुद्धा होतो व आमच्या गावच्या शाखेचा 1991 ते 1995 या काळात शाखा उपप्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत होतो; पण तिथे माझे मन फार काळ रमले नाही. आपला धंदा भला व घर भले एवढाच माझ्या जगण्याचा दृष्टिकोन होता. त्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडलो.

महाराष्ट्र अंनिस, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयी ऐकून होतो. आधीच चिकित्सक स्वभाव असल्याने अंनिसचे मला आकर्षण होतेच. 1999 साली डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी आयोजित केलेल्या काही उपक्रमांविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांच्याशी संपर्क करून मी महाराष्ट्र अंनिसमध्ये सामील झालो व माझा विवेकाच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. माझ्या चिकित्सक वृत्तीला पूरक असे वातावरण मला मिळाले व आयुष्याला नवी दिशा मिळाली. मी रत्नागिरी अंनिसमध्ये काम करू लागलो. 2004 साली शहर कार्याध्यक्ष म्हणून मला निवडण्यात आले. 2014 साली रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी निवडला गेलो. मे 2019 मध्ये भोर येथे झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीत नवीन कार्यकारिणीची बैठक झाली, तेव्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाच्या सहकार्यवाह पदावर माझी निवड करण्यात आली.

त्यानंतर मी महाराष्ट्र अंनिसच्या विविध उपक्रमांमध्ये सामील होऊ लागलो. त्या काळात म्हणजे जुलै 1999 मध्ये महाराष्ट्र अंनिसने नरेंद्र महाराज यांना आव्हान दिले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी नरेंद्र महाराज यांना विचारलेले प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे यावरील व्हिडीओ क्लिप आजही पाहिली जाते. त्या प्रक्रियेत मी सहभागी होतो, याचा मला खूप आनंद होतो. त्या काळी काही लॉजमध्ये बंगाली बाबा मुक्काम ठोकायचे व आपला ठकविण्याचा व्यवसाय चालवायचे. तेव्हा मी डमी ग्राहक बनून जायचो व आमची रत्नागिरी टीम त्या बाबांना पोलीस स्टेशनला घेऊन जायची. त्या वेळी जादूटोणाविरोधी कायदा नसल्याने पोलीस त्यांना दम देऊन सोडून द्यायचे. गळ्यात जिवंत मासा सोडून दम्यावर उपचार करणार्‍या वैदूंना पिटाळून लावण्याच्या कामात माझा सहभाग होता. एकदा तर भामट्यांची एक टोळी इकडे आली होती व ती सोन्याचे खोटे दागिने विकून पसार व्हायची. एकदा त्या टोळीतील एकाने मला एका हॉटेलमध्ये खाजगीत विचारले की, सोन्याचे प्राचीन नाणे विकत घेणार का? या प्रकरणात काहीतरी गडबड आहे, ही शंका नव्हे, खात्री मला होतीच, तरीही त्यांना पकडून देण्याच्या उद्देशाने मी त्याला ‘हो’ म्हणालो. त्यानंतर तो मला बाहेर घेऊन गेला. तिथे अजून दोन इसम उभे होते. त्यांच्याकडे इंग्रजी 8 आकाराच्या हूकमध्ये अडकवलेल्या सोन-साखळ्यांचा भला मोठा जुडगा होता. त्या सगळ्या विकायच्या आहेत, असे त्यांनी मला सांगितले. त्यातील एका साखळीचा तुकडा त्यांनी मला सोन्याचा कस तपासून घेण्यासाठी दिला होता. तो मी सोनाराकडून तपासला असता तो सोन्याचाच आहे, असे सिद्ध झाले होते, तरीही या साखळ्या एक तर खोट्या आहेत किंवा सोन्याच्या असतील, तर त्या चोरीच्या आहेत, हे मी ओळखून होतो व त्यावेळचे पोलीस निरीक्षक उल्हास भोसले यांच्याशी सतत संपर्क ठेवून होतो. त्या लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी मी किमतीवर घासाघीस करू लागलो. शेवटी व्यवहार 3 लाख 30 हजार रुपयांत पक्का झाला. मग हे सोने व पैसे यांची देवाणघेवाण करण्यासाठी एक ठिकाण ठरले. त्याप्रमाणे एका हॉटेलशेजारी मी गेलो असता आसपास पोलीस होते, असे वाटल्याने त्यांनी यास नकार दिला. मग दुसरे ठिकाण ठरले. तिथे सुद्धा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. मग तिसर्‍या ठिकाणी त्यांनी मला गाडीवर बसवून नेले. हा व्यवहार होत असतानाच तिथे पोलीस आले व गुन्हेगारांना त्यांनी मुद्देमालासह अटक केली. हा प्रकार अंधश्रद्धेशी निगडित नसला तरी माझ्या या प्रयत्नांमुळे ठकांच्या एका मोठ्या टोळीला गजाआड टाकले गेले होते.

महाराष्ट्र अंनिसचे जवळजवळ सर्व उपक्रम आमच्या रत्नागिरी टीमने व्यवस्थित राबविले व त्यात मी सहभागी झालेलो आहे. निर्माल्य संकलनाचे काम केले. पर्यावरणपूरक होळी साजरी करताना गावपरिसरात स्वच्छता करून कचर्‍याची होळी केली. या सर्व उपक्रमांना वर्तमानपत्रात चांगली प्रसिद्धी देण्यात आली. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम राबविला. विशेष म्हणजे एप्रिल 2017 मध्ये राज्य कार्यकारिणी बैठक रत्नागिरी येथे यशस्वीपणे आयोजित करून दाखविली आहे.

लांजा तालुक्यातील वाघण या गावात ‘गावपळण’ ही प्रथा पाळली जायची. हे ‘गावपळण’ 21 दिवसांसाठी पाळले जायचे. या काळात गावातून सगळे बाहेर जातात व जो कोणी गावात राहिला, गावात अन्न शिजविले, आग पेटवली तर त्याला त्रास होईल, असा गैरसमज या प्रथेमागे होता. 2004 साली आम्ही या बाबतीत लोकांचे प्रबोधन केले. लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु गावचे कोणीही काहीही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी काही समविचारी लोकांना सोबत घेऊन आम्ही चार दिवस व तीन रात्री त्या गावात राहिलो. सोबत सर्पमित्र होते व जनरेटरसुद्धा घेतला होता. तिथे आम्ही आग पेटवली, अन्न शिजविले गावात राहून काहीही वाईट होत नाही, हे दाखवून दिले. यादववाडीमधील दलित तरुणांनी साथ दिली पण, गावातील काही परंपरावाद्यांनी आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला. कोणी अंगात आल्यासारखे करायचे. त्यावेळी डॉ. मुळ्ये त्यांच्या नाकाजवळ स्पिरीटचा बोळा धरत व त्या माणसाच्या अंगातले भूत पळवून लावत. शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले. याचा सविस्तर वृत्तांत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रसिद्ध झालेला आहे.

रत्नागिरी येथे 2001 साली भरलेल्या ज्योतिष परिषदेला आमच्या टीमने आव्हान दिलेे. त्यानंतर 2016 साली पुन्हा एकदा अशीच परिषद भरली. त्यास या परिषदेचे पदाधिकारी जकातदार आले होते. त्यांच्या सोबत आदिती मुळ्ये यांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ‘आयबीएन लोकमत’ वाहिनीने ठेवला होता. त्या वेळेस आदिती मुळ्ये यांनी जकातदार यांना निरुत्तर केलेे. तेव्हा ज्योतिष परिषदेचे कार्यकर्ते आमच्याशी वितंडवाद घालत होते.

या व्यतिरिक्त रत्नागिरी येथील ‘संकल्प कला मंच’ या नाट्यसंस्थेचा अध्यक्ष आहे. गेली 24 वर्षेही नाट्यसंस्था राज्य नाट्य स्पर्धेत सतत भाग घेत आहे. या संस्थेने सादर केलेल्या एका नाटकाला उत्कृष्ट प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे.

आपण आज जे आहात, तसे घडताना बदलाची एक प्रदीर्घ प्रक्रिया घडलेली आहे. आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या वाटचालीतील अशा खास कोणत्या घटना आहेत की, ज्यांनी आजचे बदललेले विनोद वायंगणकर घडले आहेत?

महाराष्ट्र अंनिससोबत जोडला गेल्यावर मी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचे वाचन केले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या आपल्या मुखपत्राचा वर्गणीदार झालो व त्याचे वाचन नियमितपणे करू लागलो. त्यातून माझ्या चिकित्सक वृत्तीला उत्तरे मिळत गेली. माझ्या मनावरील अंधश्रद्धांचे मळभ हळूहळू दूर होऊ लागले. आधी वर्णन केल्याप्रमाणे शेगडीला वडा, रस्त्यावर ओतला जाणारा चहा, हार, तेल, निरंजन अशा गोष्टी बंद केल्याने माझे दिवसाकाठी सुमारे पन्नास रुपये वाचू लागले. या बदलाला माझ्या दोन्ही भावांनी साथ दिली. घरातून सुद्धा कोणीही विरोध केला नाही. कधी काही विरोध झाला तर मी त्यांना शांतपणे व तार्किक पद्धतीने सर्व पटवून द्यायचो व त्यांचा विरोध मावळायचा.

मी ज्या-ज्या वेळी नवीन जागा घेतली, घर घेतले, त्याची ‘शांती’ किंवा तत्सम कर्मकांड केले नाही. महाराष्ट्र अंनिसमध्ये आल्यानंतर तर घरात सत्यनारायण किंवा तसे अन्य कोणतेही पूजाविधी केले नाहीत. सांगावेसे वाटते की, यासाठी अंनिसच्या कोणाही कार्यकर्त्याने पूजाविधी करू नको, असे मला एका शब्दानेही सांगितलेले नाही. एवढेच नाही, तर ज्या वडापावच्या गाडीपासून माझ्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात झाली तिच्यात भावनिक किंवा श्रद्धात्मक दृष्टीने अडकून न पडता, योग्य वेळी ती बंद सुद्धा केली. अंनिससोबत माझ्यातील विवेकवाद आपोआप विकसित होत गेला, कर्मकांडातील फोलपणा मला स्वतःला पटू लागला व त्या कर्मकांडातून मी अलगद बाहेर पडलो. माझ्या कुटुंबीयांना सुद्धा या बाबतीत मी माझे विचार पटवून देऊ शकलो.

माझ्या स्वतःचा एक खूप मोठा फायदा अंनिसमध्ये आल्यापासून झाला आहे, तो म्हणजे मी व्यसनमुक्त झालो आहे. मी अगदी व्यसनी होतो असे नाही; परंतु मद्यपान मला निषिद्ध नव्हते; परंतु अंनिस सोबत राहून मी कधी व्यसनमुक्त झालो, हे मला कळले देखील नाही.

गेल्या वर्षी माझ्या आईचे निधन झाले. तिच्या मृतदेहाला अग्नि दिल्यानंतर व स्मशानातील राखेची साफसफाई केल्यानंतर कुठलेही धार्मिक विधी केले नाहीत. असा प्रकार रत्नगिरीमध्ये पहिल्यांदाच होत होता. समाजबांधवांनी यास समोर विरोध केला नाही; परंतु माझ्या अपरोक्ष काही जण टीका करत होते. ‘विधी न करून आईला मध्येच ताटकळत ठेवले तुम्ही…..’ हे वाक्य कानावर आले होते; परंतु त्याच वेळी जे केले ते योग्यच केले व आमच्याही मनात तसेच करायचा विचार आहे असे सांगणारे लोक अधिक भेटले. या पाठिंब्याने मनाला उभारी येत राहिली. याप्रसंगी माझे कुटुंबीय भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. माझे भाऊ, वहिन्या, पत्नी यांनी मला खूप पाठिंबा दिला व अन्य नातेवाईकांना आमचा दृष्टिकोन पटवूनसुद्धा दिला. आमच्या गावाचे हे वैशिष्ट्य आहे की, येथील लोक परिवर्तनाला स्वीकारायला तयार असतात. गावात उच्च शिक्षित लोक कमी असले, तरी बहुसंख्य लोक समजदार व विवेकी आहेत.

अशा पद्धतीने आजचा तुमच्या पुढे बसलेला विनोद घडला आहे.

जीवनाच्या मार्गात आपण अनेक चढउतार पहिले असतील. त्या विषयी जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

होय, असे चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. शिक्षणानंतर माझ्या ‘करिअर’ची सुरुवात वडापावच्या गाडीने झाली. कठोर परिश्रम, विवेकी विचार, प्रामाणिकपणा यामुळे आज माझे शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक हॉटेल आहे. तसेच माझ्या दोन्ही भावांनी सुद्धा दोन-तीन वर्षांत स्वत:ची हॉटेल्स टाकली आहेत. हा माझा व माझ्या कुटुंबाचा चढता आलेखच आहे. नुकताच हा व्यवसाय मंद होत असल्याचे व हवा तसा नफा मिळत नसल्याचे मला जाणवले. याला काही जण ‘बॅड पॅच’ असेही म्हणतात. त्या वेळी मला काही लोकांनी सल्ले दिले की कोणाला तरी ‘दाखवून’ घे. थोडे ‘बाहेरचे’ बघायला काय हरकत आहे…वगैरे; परंतु व्यवसायात चढ-उतार असतात, हे मला माहिती होते. म्हणून त्या सल्ल्यांवर काहीही प्रतिक्रिया न देता अंनिसकडून शिकलेल्या कार्यकारणभावाचा उपयोग मी केला. व्यवसायात कालानुरूप बदल न केल्यास असे ‘बॅड पॅच’ येत असतात हे मी नोकिया फोन, एचएमटी घड्याळे, अ‍ॅम्बॅसीडर कार इत्यादीच्या उदाहरणांवरून जाणून होतो. त्यानुसार मी दुकानाचे रिनोव्हेशन केले, त्यास आधुनिक अवतार दिला व ‘बॅड पॅच’चे कारण दूर केले.

काम करताना काही कटू, अप्रिय अनुभव किंवा काही चांगले अनुभव सुद्धा येत असतात. आपल्याला आलेल्या अशा अनुभवांविषयी सांगा.

कटू अनुभव फारसे आलेले नाहीत, तरीही रिंगणनाट्याला ‘सनातन’ने केलेला विरोध मला आठवतो; परंतु आम्ही सर्व परवानग्या व्यवस्थित घेतल्या होत्या म्हणून पोलिसांनी ‘सनातन’चा विरोध धुडकावून लावला. पाटील बाबा प्रकरणात एका बाईने तक्रार केली होती. पाटील बाबावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्या झरेवाडी येथील मठाला सील लावले गेले आहे; परंतु या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत काय होईल, याची धाकधूक आहेच. त्याचे ‘समाजकार्य?’ अजून सुरू असलेचे कळते.

काम करताना येणार्‍या मर्यादा व आपणास लाभलेले यश/अपयश यावर सांगा.

आपल्या कार्यक्रमांना लोकांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नसतो. येथील नवनिर्माण कॉलेजचे लोक आपल्या विचाराचे असल्याने तेथील विद्यार्थी बर्‍याच उपक्रमात, कार्यक्रमात सहभागी होतात. दुसरे असे की, बैठका वेळेवर होत नाहीत. शाखेची सदस्य संख्या वाढत नाहीये. केवळ 20 कार्यकर्ते आहेत. त्यातील क्रियाशील कार्यकर्ते केवळ दहा-बारा आहेत. या बाबतीत सुधारणा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. या बाबी वगळता आमचे उपक्रम यशस्वी होतात. त्यांना वर्तमानपत्रातून चांगली प्रसिद्धी सुद्धा मिळते.

अंनिसमधील वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या संपर्कात आपण आलात का? विशेषतः डॉ दाभोलकर यांच्या? त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

डॉ. नरेंद्र दाभोलकर रत्नागिरीला नेहमी यायचे. ते आले की, कार्यकर्त्यांच्या घरीच राहायचे व कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात राहायचे. आपले राज्य कार्याध्यक्ष अविनाशभाई पाटील हे नेहमी संपर्कात असतात. कोकण विभागाचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत हे खूप चांगले मार्गदर्शक आहेत. आपले काम वाढविण्यासाठी ते नेहमी प्रोत्साहन देत असतात. मुक्ता दाभोलकर रत्नागिरी येथे असताना त्यांचे मार्गदर्शन नेहमी लाभायचे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून शिस्त काय असते हे शिकायला मिळाले. ते स्वतःचे काम स्वतः करीत, नियमित व्यायाम करीत. हेच त्यांच्याकडून शिकायला मिळाले. अविनाशभाई यांच्याकडूनही शिस्त, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे या बाबी शिकायला मिळाल्या. नितीन राऊत यांच्याकडून सुस्त कार्यकर्त्यांना कसे जागे करायचे, याची शिकवण मिळाली तर मुक्ता दाभोलकर यांच्याकडून अंनिससोबत नव्याने जोडून घेणार्‍या कार्यकर्त्यांना प्रेरणा कशी द्यावी, हे शिकायला मिळाले.

आपले आतापर्यंतचे हे स्थित्यंतर सहजसोपे होते की यात काही अडथळे आले?

विशेष काही अडथळे आले नाहीत. नातेवाईकांची नाराजी समजूत घालून वेळोवेळी दूर केली. मी स्वतः अंधश्रद्धा पाळत नसताना मला येणारे यश व अपयश; तसेच अंधश्रद्धा पाळून दुसर्‍यांना येणारे यश व अपयश याची तुलना करून त्यांना हे दाखवून दिले की, दोन्ही बाबतीत येणारे यश किंवा अपयश हे समान होते. त्यामुळे त्यांचेही एक प्रकारे प्रबोधनच होत गेले.

जादूटोणाविरोधी कायदा आपल्या समोर होताना पाहिलात; तसेच महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नातून सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अस्तित्वात आला आहे. त्या विषयीचे आपले अनुभव सांगा.

हा कायदा होण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने खूप काम केले आहे. ‘मध्यवर्ती’कडून आलेल्या सूचनांप्रमाणे आमची शाखा यासाठी विविध अभियान राबवीत असे; परंतु त्यास खूप विरोध होत होता. हा कायदा आल्यास सत्यनारायण घालता येणार नाही, सप्ताह करता येणार नाही अशा विविध अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात होत्या. त्या आम्ही मुद्देसूदपणे खोडून काढायचो. हा कायदा नव्हता तेव्हा बाबा-बुवांची मजा होती. त्यांना कोणत्या कायद्याखाली अटक करायची, याबद्दल स्पष्टता नसल्याने पोलीस त्यांना दम देऊन सोडून देत असत. आता कायदा अस्तित्वात आल्याने बुवा-बाबा घाबरून असतात. हा कायदा आल्यावरच पाटील बाबावर केस करणे शक्य झाले आहे.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा आल्यावर कोकणात बर्‍याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. मुक्ता दाभोलकर यांच्या पुढाकाराने दापोलीमध्ये व अन्य ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. हा कायदा झाल्याने लोक आनंदी आहेत व पंच मंडळी काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत.

आपल्या जीवनावर प्रभाव टाकणार्‍या नात्यातील व्यक्ती व मित्रपरिवारातील/बाहेरील व्यक्ती यांच्याविषयी सांगा.

माझ्या जीवनावर माझ्या आईच्या शिकवणीचा खूप प्रभाव आहे. ती आध्यात्मिक आहे. मी करत असलेल्या कार्याची ती माहिती करून घेते. या बाबतीत मी तिच्याशी वेळोवेळी चर्चा सुद्धा केलेली आहे. भविष्यात कोणतेही कर्मकांड मी करणार नाही, हे माझे म्हणणे तिने मान्य केले होते. माझ्या व्यवसाय उभारणीत स्वतःचे उदाहरण समोर ठेवून मला वेळोवेळी पाठिंबा देणार्‍या आईची, वडिलांची; तसेच सुरेशभाई मयेकर यांची मोलाची साथ लाभली आहे.

दुसरे व्यक्ती आहेत डॉ. आशुतोष मुळ्ये. त्यांच्याकडे मला पडलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळायची. त्यांच्यामुळेच मी अंनिसमध्ये आलो आहे.

आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनी तर माझे सर्व जीवनच व्यापून गेलेले आहे व त्यानुसारच माझी विवेकी वाटचाल चालू आहे.

कधी नैराश्य आल्यास प्रभाकर नानावटी, वंदनाताई शिंदे ऊर्फ माई, प्रभाताई पुरोहित यांच्याकडे पाहतो व आपण खूपच तुटपुंजे काम करीत आहोत, असे वाटते व काम करायला नवा हुरूप येतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरची; तसेच आधीची अंनिस, खुनानंतरचे व आधीचे विनोद वायंगणकर यात तुम्हाला काही फरक जाणवतो का?

डॉक्टर आपल्यातून गेले हा सर्वांवर खूप मोठा आघात आहे; परंतु डॉक्टरांनी अशा पद्धतीने संघटना बांधणी केली होती व पूर्वतयारी केली होती की, आपल्यानंतरसुद्धा संघटना व्यवस्थित चालेल. त्यानुसार ते गेल्यानंतरसुद्धा संघटना व्यवस्थित चालू आहे, जोरात चालू आहे. त्यांनी पेरलेले विचार रूजल्याने व विचारावर चालत असल्याने संघटना मजबूत स्थितीत आहे. महाराष्ट्र अंनिसच्या विरोधकांना खरे तर चपराकच बसलेली आहे. ज्यांनी त्यांचा खून केला त्यांना मनात कुठेतरी नक्कीच खंत वाटत असणार की, आपण चुकीच्या माणसाला मारले. त्यांची सदसद्विवेकबुद्धी थोडी जरी जागृत झाली तर कदाचित ते माफी सुद्धा मागतील, असे मला वाटते.

स्वतःविषयी बोलायचे झाले, तर डॉक्टरांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला, खूप वाईट वाटले. त्यांची अनुपस्थिती वेळोवेळी प्रकर्षाने जाणवते. त्याचवेळेस त्यांनी प्रत्यक्ष सांगितले नसले, तरी ते आपल्यावर अप्रत्यक्षपणे संघटनेची जबाबदारी टाकून गेले आहेत. या जबाबदारीपासून मरेपर्यंत दूर जायचे नाही, अशी माझी ठाम भूमिका आहे. ते आपल्यात नसले, तरी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात विचाराच्या रूपाने अस्तित्वात आहेत, हे जाणवत राहते. तसेच कार्यकर्तेही ही जबाबदारी समजून घेऊन त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, हेही दिसून येते.

या विचारांमुळेच मी विवेकी झालो व असे झाल्यावर माझे जे कर्मकांडावर खर्च होणारे पैसे वाचले, तेच मी अंनिसला देतो आहे, याचा आनंद होतो व पैसे सत्कारणी लागतात याचे समाधान मिळते.

समाजकार्य करताना तुमच्याशी जोडले गेलेले लोक, त्यांच्याशी आलेले संबंध, त्यांच्या सुखदु:खाविषयी, भावनांविषयी सांगा.

अंनिसचे सर्व कार्यकर्ते हे माझे विस्तारित कुटुंबच झालेले आहे. अभिजीत हेगशेटे हा असाच कार्यकर्ता; तसेच रत्नागिरी शाखेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे वल्लभ वणजू, राधा वणजू हेही या अंनिसच्या विस्तारित कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. हे कार्यकर्ते आपल्या कुटुंबीयांसारखेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, एकमेकांना वेळप्रसंगी मदत करतात. यास स्थळ-काळाचे बंधन नाही. माझ्या आईच्या मृत्यूनंतर इस्लामपूर येथून संजय बनसोडे आले होते, नितीन शिंदे आले होते. मला माझ्या भावांना व कुटुंबीयांना खूप आधार वाटला होता. अंनिस ही माणसे जोडणारी चळवळ आहे, याचा अगदी जिवंत अनुभव मला मिळाला.

आयुष्याच्या या टप्प्यावर असताना, आता इथून पुढे आपण काय करणार आहात, आपल्या काय योजना आहेत?

संघटनात्मक बाबीविषयी बोलायचे झाल्यास, मला असे कबूल करावेसे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे अजून निम्मे सुद्धा कार्य आमच्या जिल्ह्यात झालेले नाही. प्रत्येक गावातून बुवा, बाबा यांची बुवाबाजी दूर करण्यासाठी संघटनात्मक काम आम्ही हाती घेणार आहोत.

व्यक्तिगत पातळीवर मी कसल्याही कर्मकांडात सामील होत नाही, होणार नाही. मुलाच्या लग्नात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून पुस्तके देणार आहे; तसेच व्यावसायिकदृष्ट्या सध्या चालवीत असलेला हॉटेल व केटरिंग व्यवसाय पुढे नेणार आहे.

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग, सहकार्यवाह म्हणून पथनाट्यासाठी कार्यशाळा घ्यायच्या आहेत, पथ-नाट्य स्पर्धा घ्यायच्या आहेत. कोकणातील अंधश्रद्धा नाट्यमय टच देऊन शॉर्ट-फिल्मच्या माध्यमातून लोकांपुढे आणायच्या आहेत.

आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीविषयी, अंनिसच्या संदर्भात आपले आकलन काय आहे? या परिस्थितीला आपण तोंड कसे द्यावे व कसे देत आहात?

राजकारणी लोक तरुणांना निष्क्रिय बनवत आहेत, त्यांना स्वतःचे डोके वापरण्यापासून, भविष्याची चिंता करण्यापासून परावृत्त करीत आहेत. आपण मात्र त्यांना विवेकी बनायला सुचावीत आहोत, जे त्यांना त्रासदायक वाटते आहे. त्यामुळे तरुणांचा विश्वास नेत्यांवर अधिक बसतो आहे. आजचा दिवस कसा जाणार, एवढेच ते पाहत आहेत. शाश्वत भविष्यकाळाकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. हे खूप क्लेशदायक आहे व अंनिससमोर याचे खूप मोठे आव्हान आहे.

सामाजिक परिस्थिती फार विचित्र झाली आहे. लोकांच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याऐवजी त्यांना चुकीच्या लोकांकडे पाठवले जाते आहे. धार्मिक व जातीय जाणिवा प्रखर होत आहेत. उत्सव, समारंभ यावर खर्च करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. यास विरोध करणार्‍याला बहिष्कृत केले जात आहे; तसेच कोणत्याही थराला जाऊन विरोध मोडून काढला जात आहे. अशा घटनांचा शोध घेऊन आपण कार्यक्रम राबविले पाहिजेत व पीडितांना आपल्याकडे आकर्षित केले पाहिजे. त्यांच्यासाठी कार्यक्रम तयार केला पाहिजे. वर्तमान राजकीय व सामाजिक स्थितीत आपले काम खूपच कठीण झाले आहे.

आजच्या परिस्थितीत अंनिसच्या चळवळीचे भवितव्य आपल्या मते काय आहे? तुम्ही नवीन जोडून घेऊ इच्छिणार्‍यात कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल?

सगळ्या कार्यकर्त्यांनी शिस्तीने, एकजुटीने काम केल्यास आव्हान वाटते तेवढे कठीण नाही. आपले विचार पुढे रेटून उपक्रम व्यवस्थित राबविले पाहिजेत. लोक आपल्याला स्वीकारत आहेत व पुढेही स्वीकारतील.

संदेश देण्याएवढा मी मोठा नाही; परंतु नवीन सदस्यांपुढे मी माझे मनोगत पुढीलप्रमाणे व्यक्त करतो. महाराष्ट्र अंनिसमध्ये आपला व्यक्तिमत्त्व विकास होतो. खर्‍या अर्थाने चांगले कसे जगावे, हे कुणीही न शिकवतासुद्धा इथला साथी शिकतो. संकटांचा सामना करण्यासाठी बळकटी लाभते, वैचारिक बैठक लाभते. आपण स्वतःमध्ये सुधारणा करत-करत समाज सुधारण्याचे काम केले पाहिजे. टीका झाल्यास तत्काळ ‘रिअ‍ॅक्ट’ होऊ नये. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखे मंद स्मित करत विरोध निष्क्रिय केला पाहिजे. हा प्रकार मी खूप जवळून चिपळूण येथे अनुभवला आहे. ‘हे असे आहे; पण हे असे असणार नाही’ हाच तो अनुभव. वसंत बापटांच्या ‘वाचाळ दिंडी’ या कवितेसंदर्भात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यासमोर येऊन विवाद करत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘रिअ‍ॅक्ट’ न होता दिलेले उत्तर समोरच्याला निरुत्तर करणारे होते.

त्रिदशक उत्सवाविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो. हा उत्सव खूपच चांगल्या स्वरुपात साजरा केला गेला. नवीन कार्यकर्त्यांना अंनिसची तीन दशके कळली. त्यांचा आढावा घेतला गेला. जुन्यांना भविष्याची जाणीव झाली. सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा हा उत्सव होता. तसेच भारताबाहेर काय चालू आहे हेही आपल्याला कळले. हा उत्सव एक प्रकारचा आरसा होता.

आपण मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, विनोदजी. आपणाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा.

अहो, आभार कसले! माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा आपण ‘अंनिवा’मार्फत सन्मानच करीत आहात. त्याबद्दल आपले आभार! विवेकाचा आवाज बुलंद करू या.

मुलाखत देताना विनोद भूतकाळ आठवून त्यात रमून गेला होता. त्या वेळी अतुल तांबट हे तेथील कार्यकर्ते भेटायला आले होते. ते अंनिसमध्ये 15 वर्षे कार्यरत आहेत. सर्पमित्र म्हणून त्यांचा विनोदशी संबंध आला. अंनिसच्या सर्वच गोष्टी पटत नव्हत्या; परंतु आशुतोष मुळ्ये व विनोद यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपण अंनिससोबत जोडले गेलो, असे त्यांनी सांगितले. तसेच रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष मधुसूदन तायडे यांचीही भेट झाली. ते 2000 सालापासून नियमित स्वरुपात अंनिस सोबत जोडले गेलेले आहेत. वर्तमानपत्रातील अंनिसच्या एका जाहिरातीमुळे मी अंनिस सोबत जोडला गेलो, नरेंद्र महाराज प्रश्नोत्तराच्या वेळी सुद्धा हजर होतो, हे त्यांनी संगितले. इथे डॉ. मुळ्ये व वायंगणकर यांच्यामुळेच अंनिस रूजली वाढली, हे तायडे यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी अंनिस म्हणजेच डॉ. मुळ्ये व वायंगणकर असे समीकरणच इथे रूढ झाले होते. डॉ. मुळ्ये यांच्या मृत्यूनंतर वायंगणकर हे काम आपल्या सहकार्यांच्या मदतीने जोमाने पुढे नेत आहेत. जिल्ह्यात 9 शाखा आहेत, हेही तायडे यांनी सांगितले.

विनोद यांच्या हॉटेलमध्ये त्यांच्या पत्नी सुप्रभा व मुलगा सागर यांची भेट घेतली. त्यांच्याशी थोडा वेळ मनमोकळ्या गप्पा झाल्या. विनोद यांचे कार्य सुरुवातीला विशेष पटत नव्हते; परंतु त्यांनी व्यवस्थित पटवून दिल्यावर आपला त्यांच्या कामाला पूर्ण पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले; तसेच सागर याने सुद्धा बाबांचे काम आवडते व आपण सुद्धा त्याच विचाराने चालतो, हे सांगितले.