Categories
व्यक्तिविशेष

विवेकवादाचे प्रणेते – गोपाळ गणेश आगरकर

वार्षिकांक - २०१९

मानवता आणि विवेकवाद या ध्येयांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रखर संघर्ष करीत आहे. ज्या विवेकवादाचा आपण अंगीकार केला आहे, त्याची ध्वजा ज्या समाजसुधारकांनी महाराष्ट्रात उंच फडकवीत ठेवली, त्यात गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यायला हवे. आगरकरांच्या निर्वाणाला 125 वर्षे पुरी होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र अंनिस कृतज्ञतापूर्वक अभिवादन करीत आहे. आगरकरांच्या कार्याचे स्मरण करणे आजही आवश्यक आहे. कारण ज्या अंधश्रद्धांच्या आणि जुलमी रुढी आणि परंपरांच्या विरोधात त्यांनी एकाकी झुंज दिली, त्या पूर्णपणे निमालेल्या नाहीत.

आगरकरांचे आयुष्य म्हणजे झुंज, सर्वत्र झुंज; आणि तीही एकाकी झुंज. प्रथम विद्यार्जन करताना दारिद्य्राशी, कष्टांशी; त्यातून उद्भवलेल्या दम्याशी आणि पुढे आयुष्यभर अंगीकृत कार्यासाठी शासनाशी, जनतेशी, प्रिय आप्तांशी, जिवलग मित्रांशी व अखेर मृत्यूशी! आगरकरांचा जीवनपट उलगडताना त्यातील अनेक धीरोदात्त व करुण चित्रांनी आपले मन एकाच वेळी स्तिमित आणि व्याकुळ होते. सातारा जिल्ह्यातील कराडजवळील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी गरीब माता-पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणासाठीसुद्धा त्यांना घर सोडावे लागले. टेंभूत शाळा नसल्यामुळे कराडला आजोळी जाऊन त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. हुशार असूनही पुढचे शिक्षण घेण्याची आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांना म्युनिसिपालिटीच्या कचेरीत खरडेघाशी करावी लागली; पण ज्ञानाची आस असल्यामुळे रत्नागिरीस शिक्षणाधिकारी असलेल्या आपल्या चुलत्याकडे कराडपासून दीडशे मैल चालत जाऊन रत्नागिरी गाठली. तेथेही चुलत्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वार लावून, माधुकरी मागून त्यांनी पुढचे शिक्षण चालू ठेवले. चुलत्यांचे एकाएकी निधन झाल्यामुळे कराडला परत येऊन त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम सुरू केले. नंतर अकोला, पुणे, परत अकोला, परत पुणे अशी त्यांची शिक्षणासाठी भटकंती झाली.

अनेक अडचणींना तोंड देत-देत अखेरीस ते बी. ए. झाले आणि नंतर एम. ए.ची पदवी त्यांनी प्राप्त केली. पुण्यामध्ये एम. ए. करीत असताना बाळ गंगाधर टिळक यांच्याशी त्यांची गाढ मैत्री जमली. त्या काळात त्यांनी मातृभूमीच्या उद्धाराचे अनेक बेत रचले. सरकारी नोकरी न पत्करता केवळ निर्वाहापुरतेच वेतन घेऊन शिक्षण कार्यात सर्व आयुष्य घालवण्याचा त्यांनी संकल्प केला. एम. ए. झाल्यावर आगरकरांनी आपल्या आईस पत्र लिहिले, “आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत, आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील, असे मोठाले मनोरथ, आई तू करीत असशील; पण मी आताच तुला सांगून टाकतो की, विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार.”

दारिद्य्राशी झुंजत असताना अनेकजण संकटांवर मात करीत आपले दारिद्य्र संपवितात आणि वैभवात मश्गुल होतात. बहुतेकांना दारिद्य्राचा तिटकाराच येतो आणि सत्ता, संपत्ती यांच्या प्राप्तीतून बरेचजण ऐषारामाचे जीवन जगू इच्छितात; पण याला अपवाद म्हणजे आगरकरांसारखी ध्येयनिष्ठ माणसं होत. केवळ पोटापुरते पैसे मिळवून समाजाच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचणारे आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आदी समाजसुधारक म्हणजे वाळवंटातील हिरवळच होय.

सरकारी नोकरीची रुपेरी बेडी तोडून 1880 साली विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी स्वतंत्र शाळा स्थापण्याचा मनोदय जाहीर केला. आगरकर आणि टिळक त्यांना येऊन भेटले. स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यासाठी लोकशिक्षण या समाजध्येयावर या त्रयींनी आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली; परंतु शाळेबाहेर असलेल्या असंख्य लोकांचे प्रबोधन कसे होणार? देशापुढील इतर समस्या कशा सुटणार? म्हणून मग 2 जानेवारी 1881 रोजी टिळकांच्या संपादकत्वाखाली ‘मराठा’ हे इंग्रजी आणि 4 जानेवारी 1881 रोजी आगरकरांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे मराठी अशी दोन वृत्तपत्रे या मंडळींनी काढली. या वृत्तपत्रांतून जनजागृती आणि सरकारी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सुरू झाले; पण निर्भीड पत्रकारिता ही एक असी धाराव्रत आहे. पण निर्भीडपणे टीका करताना अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्या राजकारणावर ‘मराठा’ आणि ‘केसरी’ यांनी आवाज उठविला. बर्व्यांनी टिळक आणि आगरकर यांच्यावर खटला भरला. त्यात दोघांनाही चार महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली गेली आणि डोंगरीच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. आगरकरांनी खटल्याच्या खर्चासाठी तुरुंगातच ‘विकार विकसित’ हे हॅम्लेटचे भाषांतर पुरे केले व डोंगरीच्या तुरुंगात आपले ‘101 दिवस’ हे कैद्याच्या जीवनावरील पुस्तक तेथेच लिहिले. तुरुंगातून सुटका होताच पुण्यामध्ये टिळक, आगरकरांचा जंगी सत्कार झाला. पुन्हा टिळक-आगरकर दुप्पट जोमाने कामास लागले. आगरकरांच्या कुशल संपादनामुळे ‘केसरी’ची गर्जना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात निनादली. पुढे 1884 च्या अखेरीस ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची त्यांनी स्थापना केली. 1885 साली सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले.

वैचारिक सामर्थ्य असलेल्या स्वतंत्र बाण्याच्या विद्वानांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यताच अधिक. टिळक आणि आगरकरांच्या बाबतीत तसेच घडले. बालविवाह आणि विधवा विवाह याबाबत टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद जाहीर झाले; परिणामी 25 ऑक्टोबर 1887 रोजी आगरकरांना ‘केसरी’ सोडावा लागला. पुढे 1888 साली गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सहकार्याने आगरकरांनी ‘सुधारक’ हे दैनिक सुरू केले. आता त्यांच्या ऊर्जस्वल लेखणीला सारे मैदान मोकळे झाले. विचारांची परिपक्वता आणि आविष्काराचे पूर्ण स्वातंत्र्य यामुळे ‘सुधारक’ चढत्या-वाढत्या तेजाने तळपू लागला. आगरकरांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणार्‍या ‘सुधारका’तून अवघ्या सात वर्षांत विवेकाच्या पायावर जहाल राजकीय व जहाल सामाजिक सुधारणेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. हे बिकट कार्य करताना त्यांना अर्थातच एकाच वेळी राजक्षोभास, लोकक्षोभास सामोरे जावे लागले; प्रसंगी खुनाच्या धमक्यांनाही तोंड द्यावे लागले; पण हे दिव्य त्यांनी मुळीच न डगमगता केले. आगरकरांच्या चारित्र्यातील हे सर्वांत महान धीरोदात्त पर्व!

सर्व बाजूने होणार्‍या विरोधास तोंड देता-देता आगरकरांचे शरीर फार थकले. दम्याचा आजार बळावला; पण मृत्यूची चाहूल लागल्यावरही न डगमगता त्यांनी आपले कार्य अखेरपर्यंत चालू ठेवले. आपल्या मागे आपल्या पत्नीने केशवपन करू नये म्हणून तिच्या मनाची तयारी केली आणि स्वाभिमानाने व स्वावलंबाने मुलांचा सांभाळ करावा, असे तिला सांगितले. आपल्या प्रेतदहनाची इतरांना झीज लागू नये, म्हणून पैशाची एक पुरचुंडी बांधून ठेवली आणि 17 जून 1895 रोजी पहाटे, ‘झोप येते, मी स्वस्थ निजतो, तुम्हीही निजा,’ असे पत्नीला सांगून स्थितप्रज्ञाप्रमाणे ते मृत्यूला सामोरे गेले!

या धक्क्याने सारा महाराष्ट्र हळहळला. ‘माझ्या प्रेतदहनार्थ’ हे शब्द लिहिलेली ती पैशांची पुरचुंडी पाहून गोखल्यांना रडू कोसळले. हजारो शिष्यांच्या व मित्रांच्या शोककल्लोळात मुळा-मुठेचा तीर बुडाला. ‘केसरी’तला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक घळाघळा रडत होते व तो लेख लिहिण्याला त्यांना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाहीत. 24 जूनच्या ‘सुधारका’तील आगरकरांवरील इंग्रजी मृत्युलेखाचा आरंभ गोखल्यांनी शेक्सपिअरने अँटनीच्या तोंडी घातलेल्या बु्रटसविषयीच्या पुढील उद्गाराने केला :

…. the elements

So mixed in him that Nature might stand up

And say to all the world, “this was a man!’

अवघे 39 वर्षे आयुष्य आगरकरांना लाभले; पण या छोट्याशा काळात अवघ्या महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यांवरील अंधविश्वासाची झापडे आपल्या ‘सुधारक’ पत्रातून दूर करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. अंधविश्वास, चुकीच्या रुढी आणि परंपरा आणि त्यासाठी धर्मचिकित्सा आगरकरांनी आपल्या ‘सुधारक’ या पत्रांतून मृत्यूपर्यंत निर्भयपणे चालू ठेवली. धर्मावर अतिशय कठोर शब्दांत टीका करताना आगरकरांनी लिहिले, “सुधारक आणि सुधारणा या शब्दांचा विपरीत अर्थ लावून त्यांच्या भरांत तुम्ही त्याविरुद्ध हवे तसे बहकू लागला आहात; पण हे पक्के ध्यानात ठेवा की, मांसाहार, मदिरापान, व्यभिचार, अनवृत भाषण, विश्वासघात, अप्रामाणिकपणा, क्रूरपणा वगैरे गोष्टी खर्‍या सुधारकास तुम्हांपेक्षा अधिक निंद्य वाटतात; पण ही महापातके कितीही वाढली, तरी त्याची तुम्हास विशेष काळजी वाटत नाही. अशा प्रकारच्या पातकांत रात्रंदिवस पोहणारा मनुष्य तुमच्या दृष्टीने अत्यंत धर्मनिष्ठ असून, त्याच्याशी अन्नोदक व्यवहार करण्यासच काय; पण त्याच्या अंगुष्ठाचे तीर्थ घेऊन, आपल्या पापाचे क्षालन करून घेण्यास देखील तुम्ही तयार व्हाल! पण या घोर पातकांपैकी ज्याला एकाचाही स्पर्श झाला नाही, असा एखादा ब्राह्मण, प्रभू किंवा सारस्वत शूद्राच्या हातचे उघडपणे पाणी पिईल. एखाद्या ख्रिस्ती स्नेह्याच्या घरची चार-दोन बिस्किटे आणि पेलाभर चहा यांचे सेवन करील किंवा अडचणीच्या वेळी एखाद्या मुसलमानाने तयार केलेला भात खाईल, तर मात्र तुम्ही त्यास वाळीत टाकणार व पंधरा पावल्या दिल्या की, त्यावरील बहिष्कार काढून घेणार! काय धर्म! काय प्रायश्चित्त!! काय धर्मशास्त्रे!!! थूऽऽ तुमच्या धर्माला, तुमच्या प्रायश्चित्ताला आणि तुम्हाला!”

वरील अवतरणातून आगरकरांचा निर्भयी बाणा स्पष्ट होतो. बुद्धिवादाच्या आधारे समाजातील धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक प्रश्नांची चिकित्सा केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, या बाण्याने त्यांनी सामाजिक प्रश्नांची सर्वांगीण चिकित्सा करण्याचे धैर्य दाखविले. आगरकरांनी तर्कशून्य धर्मकल्पनेवर केलेलं वैचारिक आक्रमण पाहण्यासारखे आहे. त्यांनी म्हटलं आहे, “बांधव हो! विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता? दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्य संशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणार्‍या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशात हा कलह तितका कधीच न माजल्याने व बहुधा लोक ‘गतानुगतिकच’ असल्यामुळे हा भरतखंड इतकी अनेक शतके अनेक प्रकारच्या विपत्तीत खितपत पडला आहे. हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊ न देण्याविषयी मात्र खबरदारी ठेवली पाहिजे!”

आगरकरांचं अत्यंत महत्त्वपूर्व कार्य म्हणजे महाराष्ट्रीय माणसाला त्यांनी मध्ययुगातून आधुनिक विचारयुगात आणलं. या विचारयुगात बुद्धीला प्राधान्य आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या गतार्थ झालेल्या कल्पनांच्या आणि रीतिरिवाजांच्या डबक्यात डुंबत राहिलेल्या समाजमनाला त्यांनी बाहेर काढून सुधारणेचा मार्ग दाखवला. भूतकाळाचं गाणं गायचं आणि आत्मसंतुष्टतेच्या वलयात गुरफटून जायचं, या निष्क्रिय प्रवृत्तीवर आगरकरांनी जे वैचारिक हल्ले चढविले, त्याला मराठी साहित्यात तोड नाही. दमा आणि दारिद्य्र यांच्याशी झगडताना त्यांनी ‘सुधारका’तून जे नवरचनात्मक ज्वलंत लेखन केलं, त्याचं पुन्हा-पुन्हा महत्त्वमापन केलं पाहिजे.

ध्येयवाद, त्याग, सदाचार, नीतिमत्ता, लोकसेवा, परोपकार, सत्यनिष्ठा या तत्त्वांनी संपन्न तो खरा धर्म होय. आचार म्हणजेच कर्मकांड, नीती व तत्त्वज्ञान ही धर्माची तीन अंगे; आचाराला जेव्हा जड कर्मकांडाचे रूप येते, तो आचार आगरकरांना मान्य नव्हता. नीतीला ते धर्मात विशेष स्थान देतात. ‘सुधारक’मध्ये विविध प्रकारच्या अनाठायी कर्मकांडांवर त्यांनी कठोर टीका केली आहे. धार्मिक अंधश्रद्धा, मूर्तिपूजा; याचबरोबर सोवळे-वोवळे यातील फोलपणा त्यांनी ‘सुधारका’तून मांडला. आगरकरांनी स्वच्छतेला महत्त्व दिले. ज्या सोवळ्याचा स्वच्छतेशी संबंध येतो, त्याचे रक्षण करणे योग्य; परंतु त्याचा बडेजाव करणे, त्याला धर्माचे अधिष्ठान देणे व व्यवहारात अनेक अडचणी निर्माण करून ठेवणे हे अयोग्य आहे. समाज जोपासत असलेल्या रुढी, परंपरा, सोवळे-ओवळे याविषयीच्या कल्पना किती पोकळ आहेत, हे पटवून देताना आगरकर लिहितात, “सर्वांपेक्षा जोड्यांची गोष्ट विशेष आश्चर्य करण्यासारखी आहे. जोडे मेलेल्या किंवा मारलेल्या जनावरांच्या कातड्याचे केलेले असून, कातड्याच्या किंवा सुताच्या दोरांनी चांभारांनी शिवलेले असतात, हे सर्वप्रसिद्ध आहेच! या जोड्यांचा आमचा सकाळ-संध्याकाळ नित्य सहवास असतो! पण चमत्कार हा की, ही सर्वोपयोगी पदार्थ करणारे चर्मकार अपवित्रतेची खाण घेऊन बसले आहेत! त्यांच्या हातातील जोडे घेताना, ‘अरे, दुरून टाक, दूर हो, विटाळ करशील,’ अशी एकच ओरड केली जाते! मेलेल्या किंवा मारलेल्या जनावरांच्या कातड्यापेक्षा जिवंत मनुष्य विशेष अस्पृश्य काय? पण धर्मसंबंधात विचार करतो कोण? कुत्र्याप्रमाणेच मांजरेही मांसभक्षक आहेत; पण एकाला जेवणाच्या ताटापाशी घेऊन बसायचे आणि चित्रावती खाऊ द्यावयाचा आणि दुसर्‍याला ओटीची पायरीच चढू द्यावयाची नाही. केवढा हा पक्षपात!”

सोवळ्या-ओवळ्यांच्या विकासाला बाधक, अशा चुकीच्या गोष्टींना समाज धर्माच्या नावाखाली जोपासत होता. माणूस माणसाचाच स्पर्श टाळत होता, आगरकर सहज; पण अतिशय मार्मिकपणे बोलतात की, जर क्षणभर अशी कल्पना करा की, ढोर, मांग, महार, चांभार यांनी आपापले व्यवसाय काही वेळ न करण्याचा कट केला, तर स्वत:स उच्च मानून घेणार्‍यांची काय अवस्था होईल? आगरकरांच्या सुधारणावादी विचारास व्यक्तिस्वातंत्र्य व समता ही दोन तत्त्वे आधारभूत आहेत. याबाबत विवेकाच्या आधारे आगरकरांनी आपल्या सर्व आचार-विचारांचे कठोर परीक्षण केले, आपल्या समाजरचनेतील गंभीर दोषांची जाणीव लोकांना करून दिली, ते दोष दूर करून त्यांच्या जागी नवीन आचार-विचार सुचविले आणि लोकांनी त्याचा स्वीकार करावा, यासाठी ते अविरत झटले. आगरकरांचा सुधारणावादी विचार सर्वस्पर्शी होता. या विचाराची सुरुवात त्यांनी कुटुंबाच्या सुधारणेपासून केली. त्यांच्या काळी स्त्रीची स्थिती फारच शोषणीय होती. बालविवाह, घटस्फोट, पुनर्विवाह, केशवपन, बाल-जरठ विवाह अशा प्रश्नांवर त्यांनी प्रखर शस्त्र उगारले.

स्त्री-पुरुष विषमतेप्रमाणे जातिभेद आणि तद्अंतर्गत अस्पृश्यता अतिशय अन्यायी असून ती आमच्या समाजोन्नतीच्या मार्गातील फार मोठा अडथळा आहे, हे आगरकरांनी वारंवार सांगितले आहे. अस्पृश्यांशी आपला होणारा व्यवहार किती भयंकर आणि निर्दय आहे, हे दाखविताना ते म्हणतात, “महारांची सावली पडली असताही विटाळ मानणारे लोक कितीही लांब जिभा करून ‘आमचा रंग काळा असला व तुमचा रंग गोरा असला म्हणून काय झाले, रंगावर काही मनुष्याची पात्रता ठरत नाही’ वगैरे गोष्टी प्रतिपादू लागले, तर त्याचा परिणाम कसा होणार?”

अस्पृश्यांप्रमाणेच श्रमजीवी वर्गावरील अन्यायही त्यांच्या नजरेतून सुटला नाही. या संबंधात त्यांनी मांडलेला पुढील विचार मूलगामी स्वरुपाचा आहे. ते म्हणतात, “विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे प्रत्येक देशांत सांप्रत काळी तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात, ते कायमचे नव्हते. हळूहळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हे समप्रमाणी करावी लागून सार्‍यांची सुखानुभवी इयत्ता सारखी होत जाणारी आहे व जो-जो ती होत जाईल, तो-तो खरी उन्नती होऊ लागली, असे म्हणता येऊ लागेल.“

आपल्या अर्थकारणाचाही आगरकरांनी सांगोपांग विचार केला आहे. भारतातील वाढत्या दारिद्य्राबद्दल त्यांनी सरकारला तर धारेवर धरलेच; पण त्याचबरोबर समाजालाही दारिद्य्र दूर करण्याचे उपाय सांगितले. ज्या देशात उत्पादक उद्योग (शेती, कापड, कारागिरी) करणार्‍यांची संख्या मोठी असते व नियामक उद्योग (नोकर्‍या) संख्या कमी असते, तो देश सुखी असतो. खांदा देऊन काम करण्याची व दुसर्‍याचे गुलाम न होता स्वत:च्या करामतीवर चरितार्थ संपादण्याची धमक का दिसत नाही? अशा रीतीने ऊठसूट नोकर्‍या मागणार्‍या लोकांबद्दल आगरकरांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यांचा हा विचार सध्याच्या काळातील नोकर्‍यांच्या मागे लागणार्‍या युवकांना तितकाच लागू होईल.

आगरकरांवर धर्मबुडवेपणाचा आरोप केला जातो. या संदर्भात ‘अशाने निभाव कसा लागेल?’ या निबंधात आगरकर हिंदूंचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. परधर्मातील लोकांनी हिंदू व्हावे, अशी हिंदू धर्माची बिलकूल इच्छा नाही. हिंदू धर्म सहिष्णू आहे, असे ते लिहितात. आगरकर म्हणजे सामाजिक सुधारणा असे समीकरण अनेकांच्या अंत:करणात ठाण मांडून बसले आहेे; परंतु आगरकर जसे जहाल समाजसुधारक होते, तसेच ते जहाल स्वराज्यवादीही होते. ही गोष्ट बहुतेकांना अज्ञात आहे, असे म्हणावे लागते. आगरकरांच्या जहाल स्वराज्यनिष्ठेबद्दल वाटेल तितका पुरावा त्यांच्या निबंधांतून घेता येईल. खुद्द लोकमान्य टिळकांनीही आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते, असा उल्लेख ‘केसरी’मध्ये केला आहे. पारतंत्र्यामुळे देशाचे सर्व बाजूने किती नुकसान होते, हे आगरकरांनी वारंवार दाखविले आहे. टिळक आणि आगरकर यांच्या विचारसरणीत एकच मतभिन्नता होती, ती म्हणजे टिळकांचे आधी स्वातंत्र्य आणि मग समाजसुधारणा असे मत होते; पण आगरकरांना. सामाजिक सुधारणा स्वातंत्र्यलढ्याइतक्याच महत्त्वाच्या आहेत, हे दोन्ही संघर्ष एकाच वेळी चालायला हवेत, असे वाटत होते.

आगरकरांवर केला जाणारा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे ते धर्मबुडवे, भारतीयत्वाविषयी कसलाही अभिमान नसलेले, भारतीय संस्कृतीचे द्वेष्टे, आंग्लाळलेले स्वजनद्रोही होते, या आरोपात आक्षेपकांचे आगरकरांचे जीवन व त्यांचे कार्य याबद्दलचे गाढ अज्ञानच दिसून येते. भारताच्या उन्नतीसाठीच तर त्यांनी आपले आयुष्य वेचले आणि लोकांच्या छळाला किंवा रोषाला न भिता विवेकी जीवनाचे महात्म्य त्यांना पटविण्याचा अविरत प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मातील असंख्य दोषस्थळे निर्भीडपणे आणि कठोरपणे दाखविल्यामुळे हिंदू धर्माचे त्यांना काही सोयरसूतक नव्हते, असा अनेकांचा समज झाला; परंतु बाह्यत: विध्वंसक दिसणारे हे कार्य वस्तुत: विधायक स्वरुपाचे, हिंदू धर्मातील दोषस्थळे दूर करून त्याला शुद्ध स्वरूप देण्याचे होते, हे लक्षात घेणे जरुरी आहे. ते म्हणत, “हिंदू धर्मविचारात आणि सामाजिक आचारात जेवढे काही खरोखर निर्दोष आणि हितावह आहे, त्याला कशाचीही भीती नाही. पण जे काही सदोष व अहितकारक आहे, त्याचा आपण निर्धाराने त्याग केला पाहिजे आणि त्याच्या जागी विविध संस्कृतीतील हितकर मूल्यांचा स्वीकार करण्यास तयार असले पाहिजे.” हे लक्षात घेऊनच आगरकरांनी हिंदू धर्मातील दोषस्थळांवर प्रखर हल्ले केले; पण हा संघर्ष धर्मावरीलच हल्ला आहे, या गैरसमजुतीपायी सनातन्यांनी आगरकरांना प्रखर विरोध केला, विविध प्रकारे त्यांचा छळ केला. जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. समाजसुधारकांना अशा यातना सोसतच आपले कार्य पुढे चालू ठेवावे लागते. आगरकरांनी इष्ट असेल, ते बोलणार, या निर्भयतेने विवेकवादाच्या प्रकाशात समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या सन्मानाने ते चिरंतन झाले.

आगरकर आणि त्यांच्या काळातील महात्मा जोतिराव फुले आणि इतर धर्मसुधारक यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी धर्मचिकित्सा आणि अंधविश्वासाच्या विरोधात प्रखर लढा उभा केला; पण आगरकरांप्रमाणेच सनातन्यांनी त्यांचाही अनेक प्रकारे छळ केला आणि अखेरीस त्यांना गोळ्या घातल्या. दाभोलकरांनी आगरकरांचा विवेकाचा वारसा महाराष्ट्र अंनिसच्या माध्यमामधून पुढे चालू ठेवला. तोच वारसा जपण्याचे आणि पुढे चालू ठेवण्याचे अवघड कार्य महाराष्ट्र अंनिसने त्याच जोमाने करीत राहणे, ही आगरकरांना खरी भावांजली होईल.

आगरकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र अंनिसने त्यांच्या नावे ‘आगरकर पुरस्कार’ अंनिसच्या कार्यकर्त्याला प्रतिवर्षी देण्याची प्रथा सुरू केली आहे. हा पुरस्कार ही त्यांच्या कार्याप्रतीची आदरांजलीच होय.