इंटरनेटनं सगळं जग अगदी कमी कालावधीत व्यापून टाकलंय आणि तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय. आज जगातली कोणतीही ताजी बातमी, ताजी घटना या सर्वात पहिल्यांदा इंटरनेटवर उपलब्ध होतात. ज्यांना विशिष्ट वेबसाईटची माहिती हवी असते ते साहजिकच गुगल किंवा तत्सम सर्च इंजिनवर जातात. तर ज्यांना ज्ञान आणि माहिती हवी आहे ते विकिपीडीयाचा वापर करतात. गुगल जसं आपलं भरवशाचं ‘डिफॉल्ट सर्च इंजिन’ आहे, तसंच विकिपीडिया आपला ‘डिफॉल्ट’ ज्ञानकोश आहे, असं म्हणायला मुळीच हरकत नाही.
www.wikipedia.org (विकिपीडिया) हा एकत्रितपणे(‘क्राऊड-सोर्सिंग’पद्धतीने), असंख्य लोकांनी स्वयंसेवा करून, अनेक वेगवेगळे संदर्भ घेऊन बनवलेला ज्ञानकोश आहे. ‘विकी’ हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. या ज्ञानकोशाचं वैशिष्ट्य म्हणजे कुणीही या वेबपेजची बहुतेक पानं किंवा लेख सहजपणे संपादित करू शकतं. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्ती याच्यात लेख लिहू शकते किंवा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल करू शकते. याचाच अर्थ विकिपीडिया अत्यंत त्वरेनं ‘अपडेट’ होत असतो. पीअर रिव्ह्यू आणि योग्य संदर्भ यामुळे अचूकतादेखील खूपच जास्त असते. विकिपीडियामध्ये नवनवीन माहितीची भर घालण्याची लोकांची क्षमता अफाट आहे. तेच त्याचं बलस्थान आहे. विकीमिडिया फाऊंडेशन ही ’ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर चालणारी संस्था या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पहाते.
विकि(Wiki) हे वापर करणार्यांंना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणार्यांना बदल किंवा दुरूस्त्या करण्यास मुभा देणारं तंत्रज्ञान आहे. साधारणपणे इंटरनेटवर आढळणारी पाने(वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकाला बदलता येत नाहीत. विकि तंत्रज्ञानावर आधारित पानांमधील माहिती मात्र वाचकाला बदलता येते. विकितील नाव नोंदणीमुळे विकिचं संपादन सोपं होतं; पण बहुतेक वेळा नाव नोंदणी आवश्यक असते असं नाही. यामुळे एकत्र येऊन लेखन करण्याचं काम आणि संपर्क सुलभ होतात. विकि या वेबसाईटचं काम करणार्या संगणक प्रणालीलासुद्धा विकि असंच म्हणतात. विकिचे पहिलं प्रारूप “विकीविकीवेब” हे वॉर्ड कनिंगहॅम यांनी 1995 मध्ये केलं. ‘हवाई’ प्रदेशातील भाषेत ‘विकी-विकी’चा अर्थ “लौकर लौकर’ किंवा ‘चटपट’ असा होतो.
विकिपीडियाची सुरवात 2001 साली इंग्रजी भाषेत झाली. विकिपीडियाच्या इंग्रजी आवृत्तीत आत्तापर्यंत 38 लाखांहून अधिक लेख लिहिले गेलेत. विकिपीडिया आता जगातील सर्व भाषांमध्ये लिहिला जातोय. मराठीचासुद्धा यात समावेश आहे आणि अनेक मराठी भाषिक त्यात भर घालण्यासाठी हातभार लावतायत. संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण एक कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहिले गेलेत. ‘कॉपीराईट’च्या (प्रताधिकार) आजच्या जमान्यात ज्ञानाची मुक्तपणे देवाणघेवाण करण्याच्या उद्देशानेच विकिपीडियाची सुरवात झाली आणि विविध विषयांची व्यापक माहिती देणारी, त्यात सतत सुधारणा करणं शक्य असणारी विकिपीडिया ही इंटरनेटवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसाईट आहे. माहिती वाचण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ते एकही रूपया आकारत नाहीत आणि हे असंच रहावं, असं विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांचं आणि विकिमीडिया संस्थेचं उद्दिष्ट आहे. विकिपीडियावरील माहिती क्वचितच चुकीची किंवा एखाद्या विशिष्ट विचारसरणीची कड घेणारी असते. त्यावरील सर्व लेख हे तटस्थ भूमिकेतून लिहिलेले असतात. ही माहिती उपलब्ध करून देतात, ते जगातील तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक, जे आपल्या दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून माहिती गोळा करून लिहितात, त्याची सत्यता पडताळतात आणि ती वाढवत रहातात. लोकशाहीचा जगातील सर्वात सफल प्रयोग ह्यापेक्षा दुसरा कुठलाच नसेल.
विकिपीडियाचे फायदे कोणाला?
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प (प्रोजेक्ट) बनवण्याकरिता प्राथमिक माहिती उपलब्ध होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी ठेवण्यात मदत होऊ शकते. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण सबळ संदर्भानिशी एखादं विवेचन करण्याची सवय होते. विकिपीडियावर लेखन करणार्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ‘प्रबंध कसे लिहावेत’ याची पूर्व तयारी होते. एखाद्या विषयाबद्दल ‘समर्थन’ करणार्या तसेच ‘विरोध’ करणार्या मतांशी परिचय होतो, त्यामुळे दृष्टिकोन एकांगी होण्याचं टळतं. टीमवर्कची आणि परस्पर सहकार्याची तसंच इतरांना प्रोत्साहन देण्याची सवय लागते. एखादा नवीन विषय आल्यास विकिपीडियातील सोप्या भाषेत चटकन तोंडओळख होते. नवीन शहरात किंवा संस्थेत जाण्यापूर्वी त्या शहरांबद्दल किंवा संस्थेबद्दल समतोल माहिती मिळते. वेळ सत्कारणी आणि सकारात्मक कामात व्यतीत होतो.
– प्रा.आदिती मुळ्ये