Categories
मंथन

यज्ञेश्वराला ज्ञानेश्वर कळाला नाही.

ऑगस्ट - २०१२

            उस्मानाबाद येथे आर्य चाणक्य शाळेच्या परिसरात 7 मे पासून पंधरा दिवस चालणार्‍या छन्दोमवान् दशरात्र महासोमयाग या धार्मिक यज्ञाचे यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर यांच्या धार्मिक मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. दि.10/5/2012 रोजी झालेल्या अकाली पावसाच्या व तुफानी वार्‍याच्या तडाख्याने यज्ञासाठी उभारलेला मंडप पूर्णपणे कोसळला. एकंदरीतच यज्ञाचा पूर्ण कार्यक्रम विस्कळीत झाला. दुपारचे होम हवनाचे व संध्याकाळचे धार्मिक कार्यक्रम विस्कळीत झाले. एकंदरीत यज्ञाच्या सर्व प्रक्रियेवर पाणी पडून आयोजकांच्या तोंडचे पाणी पळाले! या यज्ञासंबंधी समाजात ज्या उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या त्याचा हा आलेख!

            यज्ञामुळे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण होते, समृद्धीत भर पडते, मंत्रोच्चारामुळे लहरी उत्पन्न होऊन सृष्टीत, वातावरणात व समाजात अपेक्षित परिणाम साध्य होतात असे विज्ञानाने सिद्ध झाले आहे? असा दावा परंपरागत धर्मवाद्यांकडून केला जातो. यासाठी अनेक बोगस विज्ञान संस्थेचे दाखले दिले जातात. वास्तविक पाहता धर्म व विज्ञान या दोन बाजू पूर्णपणे भिन्न असून त्या दोन्ही कधीही एकत्र येऊ शकत नाहीत!

            ज्ञानेश्वर माऊलींपासून कर्मकांडाविरूद्ध निर्गुण-निराकार भक्ती(नामजप) असा संघर्ष चालू आहे. सर्व कर्मकांडाला ज्ञानेश्वर माऊलींनी विरोध केला आहे. नामजपातून मुक्ती लाभते, परमेश्वराशी नाते निर्माण होते. मुळात संसारात आलेल्या अडी-अडचणी व संकटावर मात करण्याचे सामर्थ्य मनात तयार होते, मनात चैतन्याची भावना नांंदते, असा नामजपाचा महिमा सांगितला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा केवळ कर्मकांडालाच नव्हे तर संस्कृत भाषेला विरोध होता. तत्कालिन ब्राह्मण समाजाने संस्कृत शिक्षण घेण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्गाच्या हातात ठेवला होता. आपली व आपल्या अनेक पिढ्यांची उपजीविका धर्मसत्तेवर चालावी, समाजावर धर्मसत्तेचे ओझे लादावे, या दुष्ट हेतूने केलेला कट होता! परंतु, या समाजव्यवस्थेच्या विरोधात ज्ञानेश्वर माऊलींनी क्रांती केली व “संस्कृत देवे निर्मिली! मर्‍हाठी काय चोरूनी आणली?” असा प्रश्न सकळ ब्रह्मवृंदाला त्यांनी विचारला. ज्ञानेश्वर माऊलींचा हा क्रांतीकारी संदेश सर्व जाती जमातींनी उचलून डोक्यावर घेतला, शेतावर काम करणार्‍या मजूरापासून पाठीवर पोती वाहणार्‍या हमालापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश कायम ठेवून आपले जीवन सार्थक केले. ज्ञानेश्वरी हे दुसरे काही नसून चार वेदाचे सार असलेल्या  भगवद्गीतेतील मराठी भाषेतील टीका(विवेचन) आहे. आणि कर्मकांड म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून पुजेचे साहित्य व साधने घेऊन दुसर्‍या व्यक्तीच्या मंत्रोच्चाराच्या सहाय्याने केलेला पूजाविधी होय!

            माऊलींनी यज्ञ संस्कृतीला विरोध करताना मागितले पसायदान, जे चराचर सृष्टीतील प्राणीमात्राला सुखी ठेवण्यासाठी भूतदयेने व मानवतेने केलेली प्रार्थना आहे. समस्त प्राणीमात्राला उपदेश करताना यज्ञकर्माऐवजी ‘वाग्यज्ञे तोषावे’ असा उपदेश केला. आपल्या वाचेत, वाणीत एवढा चांगुलपणा ठेवा, गोडवा ठेवा, चैतन्य निर्माण करण्याची शक्ती ठेवा, ऐकणार्‍याच्या मनाला वाटणारा वाणीचा स्पर्श आनंददायी असावा यामुळे सकळ प्राणीजात सुखी होईल, असा संदेश दिला आहे!

            धर्ममार्गातील क्रांतीचा ‘ज्ञानेश्वरी’ हा जर पाया असेल तर ‘पसायदान’ हा सकल मानवतावादाचा कळस आहे! प्रसिद्ध प्रवचनकार कालवश मामासाहेब दांडेकर हे आपल्या प्रवचनातून सांगत की, विश्वशांती व विश्वबंधुत्वाची मूल्ये जगात पहिल्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी आखिल मानवजातींना सांगितली. संयुक्त राष्ट्र संघ(युनो)च्या स्थापनेचे ते दिवस होते. यावर खरंतर संयुक्त राष्ट्र संघाने पसायदान हे बोधवाक्य अथवा ध्येयधोरण म्हणून स्वीकारावे लागेल, असेही प्रतिपादन केले होते!

बहुजन समाजाच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका?

            या यज्ञाबाबत बहुजन समाजाच्या नेत्यांची भूमिका पूर्णपणे दुटप्पी आहे. जेथे जमाव तेथे नेता! मग तो कुठलाही असो. अशी राजकारणी लोकांची नीती आहे, कारण एवढी गर्दी पैसे देऊनही खेचून आणता येत नाही. व फुकटात प्रसिद्धी मिळते. मग उपस्थित राहून तेवढे फोटेसेशन द्यायला काय हरकत आहे? असा राजकीय विचार असतो.

            वास्तविक पाहता जे नेते यज्ञाला उपस्थित होते ते उद्या बहुजन समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ब्राह्मण समाजाने धार्मिक दृष्टीतून इतर समाजाचे कसे शोषण केले? याचे वर्णन सांगून टाळ्या मिळवण्यास कमी करत नाहीत. निवडणुकीत ब्राह्मणद्वेषाची लाट पसरवून बहुजन समाजाची मते कशी पदरात पाडून घेता येतील याचेही गणित मांडलेले असते. याकरिता राजकीय नेत्याची उपस्थिती ही किती तकलादू आहे हे कळून येते. रात्रंदिवस समाजसुधारकांच्या नावाचा जप करणारे राजकारणी यज्ञात जाऊन साष्टांग दंडवत घालतात, या दुटप्पी वागण्याचे रहस्यच कळत नाही!

धर्माचा बाजार

            हिंदू धर्माला कोणीही संस्थापक नाही, हा एक विचारप्रवाह, उपासनापद्धती व संस्कृती आहे. आणि उपासना पद्धतीत स्वातंत्र्य असल्यामुळे, कोणी काय धार्मिक उपचार करावा, यात पूर्णपणे स्वैराचार निर्माण झाला आहे. या प्रवाहात अनेक चांगले वाईट, विचार-आचार व तत्त्वज्ञानाचा समावेश झाला आहे. तर अनेक कालबाह्य झालेल्या आचार-विचारांना व संकल्पनांना जिवंत ठेवण्याचा काही जणांचा प्रयत्न चालू असतो. हिंदू धर्म म्हणजे काय? याची व्याख्याही सांगणे कठीण आहे. अनेक ठिकाणी बुवा, महाराजांची बेटे निर्माण झाली आहेत. त्यांनी करोडोंची माया गोळा केली आहे. भोंदू व दांभिक धर्मगुरूंची चलती आहे. धर्मपीठ पूर्णपणे निष्प्रभ असून त्यामुळे धार्मिकतेवर कसलेही निर्बंध नाहीत. गावात माणसांपेक्षा देवळांची संख्या जास्त आहे. बुवा महाराजाचे दुष्काळात विपूल पीक आले असून जगात आर्थिक मंदी असताना धर्माच्या नावावरचा बाजार भारतात तेजीत चालू आहे!

यज्ञ परंपरेबाबतची सुरवात:

            हिंदू धर्माची सुरवात वेद काळापासून झाली. चारही वेदांना प्रमाणभूत मानण्यात येते. परंतु नंतर वेदाचा अर्थ ऋषी-मुनी आपल्या बुद्धीनुसार व तर्कानुसार लावून उपनिषदांची निर्मिती केली तर पुराणे ही धार्मिक मनोरंजन (Religious Mythology) आहे. त्यामुळे पुराणात कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे. पुराणात अनेक विसंगत व परस्परविरोधी मते व कथा असल्यामुळे त्यांना प्रमाणभूत मानण्याची प्रथा नाही!

            वेदकाळात पंचमहाभुताची उपासना होती. त्यानंतर चराचरातील भौतिक उत्पत्तीची नदी, डोंगर, दर्‍या, सरोवर याची पूजा मध्यपूर्वेकडून आलेले आर्य लोक करू लागले. त्यानंतर प्रतिकामत्मक म्हणून यज्ञपूजेस सुरवात झाली. यज्ञ हे त्यागाचे प्रतिक आहे. एका वस्तुच्या नाशातून दुसर्‍याला ऊर्जा मिळावी अशी यामागची संकल्पना आहे. यज्ञपुजेतून पंचहाभूतापैकी अग्नीची पूजा तत्कालिन लोक करू लागले. अग्नीची पूजा करण्यामागे अग्नी सदैव प्रज्वलित राहून तो उपलब्ध असावा असा उद्देश होता(त्यावेळेस लायटर किंवा माचिस उपलब्ध नव्हते). त्याशिवाय तत्कालिन काळात हवेतील कार्बनचे प्रमाण अत्यंत कमी होते. कार्बनचे प्रमाण संतुलित रहावे यासाठी यज्ञाचा प्रयोग असावा. त्याचबरोबर जे ऋषीमुनी अरण्यात राहत त्यांच्या आश्रमाभोवती वडवानल म्हणजे जंगलातील अग्नी निर्माण होऊन आश्रम जळून जाण्याचा धोका होता. याकरिता जवळपासचा परिसर स्वच्छ रहावा यासाठीही यज्ञविधी केले जात असावेत असे संकेत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत! त्यानंतर मुर्तीपूजेस सुरवात झाली व ती रूढ झाली. त्यानंतर गुरू-शिष्य परंपराही निर्माण झाली.

            आज यांत्रिकीकरणामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण इतके वाढले आहे. त्यामुळे सगळीकडे प्रदूषण वाढलेले आहे. यज्ञामुळे प्रदूषण कमी होते असे कोठेही सिद्ध झालेले नाही (परंपरावादी कोणीतरी प्रसिद्ध केलेल्या लेखाचा हवाला देऊन यज्ञप्रक्रिया विज्ञानवादी असल्याचा आभास निर्माण करतात) वास्तविक पाहता भारतातील कुठल्याही मान्यताप्राप्त विज्ञान संस्थेने त्याला मान्यता दिलेली नाही. कुठल्याही विज्ञान संस्थेकडे कोणा एकाचे संशोधन मान्यतेसाठी प्रलंबित असल्याचे दिसून येत नाही. जाणकारांनी इंटरनेटवर ही माहिती घ्यावी.

            परंतु नवीन उपासना पद्धती रूढ होताना, कालबाह्य झालेली उपासना पद्धती बंद करण्याची व्यवस्था(Authority of System) नसल्यामुळे उपासना पद्धतीत पूर्णपणे गोंधळ निर्माण झाला आहे.

यज्ञाने साध्य काय होणार?

            ज्यावेळेस यज्ञ संस्कृती प्रचलित होती त्या काळात भारतातील महापूर, दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी, टोळधाड या आपत्ती वारंवार होत. लाखो लोकांचे भूकबळी जात. प्लेग, कॉलरा, देवी यासारख्या साथी वारंवार येत व हजारो लोक मृत्यूमुखी पडत, गावेच्या गावे ओस पडत. केवळ विज्ञानामुळे आज आपण या सर्व बाबींवर विजय मिळविला आहे. यज्ञामुळे कुठलेही परकीय आक्रमण रोखू शकले नाही व कुठलाही राजा युद्धात अथवा राजकारणात यशस्वी ठरू शकला नाही. याकरिता ही संकल्पना किती फोल आहे हे दिसून येते.

            आज उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होरपळत असताना उस्मानाबाद येथे यज्ञाचे प्रयोजनच कळत नाही. उस्मानाबाद यज्ञभूमी, तपोभूमी अथवा तीर्थक्षेत्रही नाही जेथे यज्ञ प्रक्रिया होण्याची परंपराही नाही. याशिवाय स्थळ, काळ व वेळ का निवडली? याचे प्रयोजनही कळत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाची, पाणीटंचाईची व चार्‍याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. शेतकर्‍याला उपयोगी असलेले पशुधन कत्तलखान्याची वाट चालत आहे. अशा वेळेस यज्ञ करून काय साधणार? हेच कळून येत नाही.

दुष्काळात होरपळणारा ग्रामीण भागातील समाज

            हजारो टन तूप व अन्नधान्य यज्ञात जाळले जात असताना ग्रामीण भागातील समाज दुष्काळाच्या खाईत होरपळून निघत आहे. दुष्काळामुळे खाण्यासाठी अन्नधान्य नाही. मुक्या जनावरांना चारा नाही तर अर्थकारणाअभावी मुलेबाळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. रोजगार करण्याची शारीरिक ताकद नाही व बुद्धिमत्तेतून रोजगार मिळण्याची शक्यता नाही. यामुळे समाजबांधव हिन-दीन झालेले आहेत. यातून पुढील पिढी व्यसनाधिन, वैफल्यग्रस्त व संस्कारहीन निर्माण होण्याची शक्यता आहे. या समाजबांधवाकडे कोणाचेच लक्ष नाही. एकीकडे उपाशी मरणारा ग्रामीण भागातील समाजबांधव व दुसरीकडे जास्त झाले म्हणून अन्नधान्याचा अपव्यय करणारा समाजातील एक गट अशी दोन टोकांची भूमिका एकाच वेळेस निर्माण झालेली आहे व बहुजन समाजापुढे एक विकृत चित्र जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदर समाजमनात ब्राह्मण समाजातील काही मूठभर धर्मांध व्यक्तींमुळे समाजाची छबी कायमची बिघडली आहे. अर्थात हे धर्मांध लोक ब्राह्मण समाजात 1 टक्काही नाहीत. बौद्धिक कष्ट करून आपली उपजीविका करणारा 90% समाज यातून पूर्णपणे अलिप्त अहे. काही बोटावर मोण्याइतक्या व्यक्तींकडे सरकारी नोकरी अथवा इतर गैरमार्गाने जमलेल्या पैशाचा धार्मिक उन्माद आहे.

जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न!

            भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी भारताला जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न दाखविले आहे. जर हे स्वप्न वास्तवात आणावयाचे असेल तर, यासाठी नवे सामाजिक संकल्प, नवे विचार व एकसंघ भारतीय समाज निर्माण केला पाहिजे. कुठल्याही धार्मिक, जातीय व पोट शाखाभेद या कारणावरून समाज विघटित होता कामाचे नाही.

बहुजन समाजाच्या आरशात आपला चेहरा पहा!

            लोकशाहीत केवळ आत्मसमाधानासाठी अथवा स्वत:च्या गरजेसाठी किंवा इच्छेनुसार एखादी गोष्ट केली म्हणून भागत नाही. इतर समाजाच्या दृष्टीने हे कृत्य कुठल्या स्थायीभाव  ठेवून केले याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. नाहीतर समाजव्यवस्था ही हे कृत्य कुठल्या समाजाच्या व्यक्तीने केले यावर त्याचे मूल्यमापन करत असते. विशेषत: अल्पसंख्यांक समाजाने आपली प्रतिमा बहुजन समाजाच्या आरशात जपावी लागेल. कारण वारंवार राजकारणात आम्हाला स्थान नाही, समाजकारणात कोणी विचारत नाही अशी तक्रार करणार्‍यांना काही अर्थच उरत नाही. जोपर्यंत ब्राह्मण समाज बहुजन समाजाच्या संवेदनांशी, समाजजीवनाशी व स्पंदनाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत बहुजन समाजाच्या वेदना ब्राह्मण समाजास कळत नाहीत व बहुजन समाज तळागाळातील ब्राह्मण समाजाच्या वेदना जाणू शकत नाही, तोपर्यंत एक गैरसमजाची वावटळ सगळीकडे पसरलेली असेल. व ही वाट अंध:कारमय असेल, ही कोंडी कुठेतरी फुटलीच पाहिजे. व्यक्तिगत स्वरूपात देवधर्म करताना तुम्हाला कुठलाही अडथळा येऊ शकत नाही किंवा तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे. समाजजीवनामध्ये सामुहिक पातळीवर एखादा समारंभ करताना आजूबाजूच्या वातावरणाचे व समाजपरिस्थितीचे व समाजमनाचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे याकरिता आपण अधिक दक्षतेने वागले पाहिजे! काळाशी जुळवून घेताना परिवर्तन अनिवार्यच आहे!

            धार्मिक कर्मकांडापासून निर्माण झालेला हा लढा ज्ञानेश्वर माऊलींपासून अद्यापही अपुरा आहे. एकूणच यज्ञेश्वराला ज्ञानेश्वर कळाला नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागेल!

– अशोक कुलकर्णी