राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक यशवंत सुमंत यांचे 11 एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते अनेक वर्षे राज्यशास्त्राचे अध्यापन करीत होते. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होतेच पण राज्यशास्त्राचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी व्हावा यासाठी ते सतत क्रियाशील होते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थकारण, आणि धर्म अशा विविध ज्ञानशाखामधील आंतरसंबंधांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केला आणि लोकशाही जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
सामाजिक-राजकीय प्रश्नाबाबत सुमंत सरांची एक मूलगामी दृष्टी होती. भांडवलशाही, जातीव्यवस्था आणि लिंगभाव या दोषांनी ग्रासलेल्या आपल्या समाजात परिवर्तनासाठी राजकारण कितपत आणि कसे वापरता येईल याबाबत त्यांचा मोठा अभ्यास होता. आधुनिकता व परंपरा याची भारतीय समाजात एक बेमालूम सरमिसळ दिसते. त्यामुळे केवळ आधुनिक मूल्यांचा आग्रह धरणारं राजकारण आपल्याकडे यशस्वी होऊ शकणार नाही असं त्यांचं मत होतं. म्हणून येथील सर्व परंपरा त्याज्य ठरवणं त्यांना मान्य नव्हतं. परंपरेत, उदाहरणार्थ संत परंपरेत आधुनिक मूल्ये आहेत. त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन पण त्याच्या आधारावर पुढचं पाऊल टाकण्यासाठी, कष्टकर्यांना आणि शेतकर्यांना बरोबर घेऊन स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यावर आधारीत राजकारण करता येऊ शकतं असं त्यांचं मत बनलं होतं. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला पुरोगाम्यांनी गंभीरपणे घ्यावे असं त्यांना वाटे.
सुमंत सरांचा हा विचार महाराष्ट्र अंनिसने स्वीकारून परिवर्तनाची वाट सुरू ठेवली. समाज सुधारक व संत यांचाच वारसा पुढे चालविताना वारकर्यांशी समन्वय साधून जादूटोणा विरोधी कायद्यासाठी डॉ.सदानंद मोरे आणि त्यांचे सहकारी यांची मदत अंनिसने घेतली होती.
महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेमध्ये विरोध होता पण काही साम्यस्थळेही होती. अशा मुलभूत साम्यस्थळांचा विचार व्हायला हवा अशी समन्वयाची भूमिका सुमंत सर मांडीत.
क्षीण झालेल्या पुरोगामी चळवळीतील विविध गटांनी एकमेकांशी संवाद-समन्वय करावा असा त्यांचा आग्रह होता. याबाबतचे आपले विचार ते महाराष्ट्राच्या विविध भागात पसरलेल्या कार्यकर्त्यांपुढे मांडत राहिले. अशा कार्यकर्त्यांचे अभ्यास वर्ग ते घेत. महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची सातत्याने वैचारिक देवाण-घेवाण सुरू होती. महाराष्ट्र अंनिसची वैचारिक मांडणी करताना डॉ.नरेंद्र दाभोलकर सुमंत सरांशी चर्चा करत, त्यांना अंनिसच्या शिबीरात व अधिवेशनात बोलावत, अंनिसच्या मासिकात त्यांचे लिखाण प्रसिद्ध करीत.
सुमंत सरांना दिसत होतं की, आजूबाजूला चाललेलं जातीचं राजकारण. इथली जातीव्यवस्था घट्ट करतं. डॉ.आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या ध्येयाशी विविध पक्षांनी फारकत घेतलीय. या पार्श्वभूमीवर जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमाचं महत्व ते सतत बोलून दाखवीत. आंतरजातीय संवादाबरोबरच, उच्च जातीय मंडळींनी जात विरहित होण्याची, स्वत:च्या उच्चजातीय जाणिवा सोडून देण्याची गरज आहे हे ते वेळोवेळी अधोरेखित करीत.
जाती-अंताच्या लढ्यात महाराष्ट्र अंनिस सक्रीय आहेत. आंतरजातीय विवाह, जातपंचायतीची मुजोरी, वाळीत टाकण्याचे प्रकार याबाबत समाजभान अधिक प्रगल्भ करण्यासाठी धडपडत आहे. महाराष्ट्र अंनिस ही जातविरहित संघटना होती व आहे. अंनिसने समाजापुढे ठेवलेला हा आदर्श राजकारणातही प्रत्यक्षात आला तर ती यशवंत सुमंतांना खरी आदरांजली ठरेल.
अभ्यासक, शिक्षक, कार्यकर्ता व एक सच्चा दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात सहभागी होताना, महाराष्ट्र अंनिस त्यांचे विचार पुढे नेण्याबाबत कटीबद्ध राहील याची आम्ही हमी देतो.
– प. रा. आर्डे