दि.14 फेबु्रवारी 2013 रोजी दुपारी 12 ते 2.30 ह्या वेळेत नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील समाजकार्य महाविद्यालयात सदर परिषद संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर यात्रेतील पशुहत्येबाबत दुष्परिणाम दर्शविणार्या पोस्टरचे फलक अनावरण करून, परिषदेचे प्रमुख पाहुणे दै.सकाळ समुहाचे मुख्य संपादक व संचालक उत्तम कांबळे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. स्वागतपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन हा आपल्या जीवन बदल प्रक्रियेचा भाग आहे. प्रत्येकाने तो स्वीकारला पाहिजे. ह्या कार्यात तरूण-तरूणींनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनपर भाषणात उत्तम कांबळे यांनी, सुसंस्कृत, सुंदर, विचारी, विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी समाजातून अंधश्रद्धा आणि पशुहत्या यासारख्या अनिष्ट प्रथा हद्दपार करण्याचे आवाहन केले. अंधश्रद्धा ह्या आत्म्याभोवती गुरफटल्या असून त्यांना काडीचाही आधार नसताना त्या रोज नवनव्या स्वरूपात येतात. विज्ञाननिष्ठ दृष्टी बाळगल्यानेच त्यांचे खरे स्वरूप लक्षात येऊ शकेल. त्यानंतर सांघिकपणे त्यांचा प्रतिवाद करता येईल. ‘अंनिस’ने हे काम प्रखरपणे केले आहे. ‘अंनिस’ सारखी चळवळ जर प्रभावीपणे कार्यरत नसती तर समाजात आणखी विकृत अंधश्रद्धा पाहायला मिळाल्या असत्या. म्हणून त्यांनी समितीचे अभिनंदन केले.
वडांगळी येथील बंजारा समाजाचे कार्यकर्तेइंदल चव्हाण यांनी, ते करीत असलेल्या प्रबोधनाचे अनुभव कथन केले. सुरवातीला ह्या कामात अतिशय त्रास त्यांनाच व त्यांच्या कुटुंबाला सहन करावा लागला. मात्र हळूहळू समाजमन वास्तव स्वीकारायला तयार होऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र ह्या कामात ‘अंनिस’च्या सिन्नर व नाशिकच्या कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय वाघ यांनी सजीवसृष्टीच्या उत्पतीबाबत परिषदेला थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती दिली. अंनिसच्या कार्यात सर्वांचा सहभाग ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, यात्रेतील प्रबोधन कामी सिन्नर, नाशिकचे कार्यकर्ते दरवर्षी नियोजन पूर्वक काम करतात. मागील 17 वर्षांपासून हे काम सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे तसेच 12 वर्षांपासून दोडी बु॥ येथे चालू आहे. त्याचा निश्चित इष्ट परिणाम दिसून येत आहे. ह्या कामासाठी प्रसारमाध्यमे व जिल्हा प्रशासन यांचीही मदत मिळत असते. मात्र हे सहकार्य अधिक जास्त प्रमाणात मिळावयास हवे. विशेषत: जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे कायदेशीर अंमलबजावणी ह्या संदर्भात केली तर त्या अनिष्ट प्रथेला लवकर पायबंद बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे यांनी सिन्नर नाशिकच्या कार्यकर्त्यांनी अगदी सुरवातीच्या काळापासून ह्या यात्रांमधील पशुहत्याविरोधी प्रबोधनात काम करून काही प्रमाणात का होईना, ह्या अनिष्ट प्रथेला पायबंद कसा घातला हे कथन केले.
अंनिसचे राज्याचे कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी याबाबत अंनिसच्या वतीने परिषदेत ठराव मांडले ते असे-
1) महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांनी देवाच्या नावाने यात्रेत होणार्या पशुहत्येला विरोध केला आहे.
2) भारतीय घटनेत व शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोन हा महत्वाचा भाग आहे. त्या विचाराशी बोकडबळी देऊन नवस फेडणे सर्वस्वी विसंगत आहे.
3) ह्या अनिष्ट प्रथेपायी अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागते, ते योग्य नाही.
4) हिंदू धर्म असे मानतो की, सर्व प्राणीमात्रात एकच देव आहे अशा वेळी प्राण्याचा जीव घेऊन, देवाचा नवस फेडणे हे उदात्त धर्मकल्पनेशी विसंगत आहे.
5) सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे फार मोठ्या प्रमाणात पशुहत्या होत असे. गेली सहा वर्षेप्रयत्न करून शासनाने तेथील पशुहत्या पूर्णपणे बंद केली आहे. याचेच पालन वडांगळी, दोडी ह्या यात्रांंतून व्हावे.
यानंतर परिषदेचे अध्यक्ष व अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी समारोपाचे भाषण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.दाभोलकर यांनी सांगितले की, आतापर्यंत समितीने महाराष्ट्रातील दिडशेच्या वर यात्रा-जत्रातील पशुहत्या थांबविण्यात यश मिळविले आहे. ‘चिवरी’ येथील पशुहत्या थांबण्यासाठी केलेले प्रयत्न आणि तेथे घडलेला बाका प्रसंग त्यांनी परिषदेत कथन केला. तेव्हा सर्वजण अवाक् झाले. यात्रा जत्रांतून होणार्या पशुहत्यांमागील आर्थिक गणित त्यांनी मांडले. जवळपास साडेतीनशे कोटींची आर्थिक उलाढााल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ह्यावेळी होत असते. आरोग्याची हेळसांड होते ती वेगळीच. एकूणच गरीबाला अधिक मागे ठेवणार्या प्रथांपैकी प्रभावी अशी ही पशुहत्या प्रथा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. त्यानंतर डॉ.दाभोलकर यांनी परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रत्येक ठरावामागची भूमिका स्पष्ट केली. शासनाने याबाबत कठोर भूमिका घेऊन, पशुहत्या तात्काळ थांबविण्यासाठी योजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून, परिषदेत मांडलेले पाच ठराव परिषद स्वीकारीत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तातडीने सदर ठराव मा.जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्याचे ठरले.
सदर परिषदेचे प्रास्ताविक महेंद्र दातरंगे, सूत्रसंचालन डॉ.ठकसेन गोराणे, आभार प्रा.डॉ.लक्ष्मीकांत कावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिकच्या कार्यकर्त्यांसह शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शासकीय कन्या विद्यालयाच्या डी.एड.कॉलेजच्या प्राचार्या उपशिक्षणाधिकारी सरोज जगताप मॅडम, प्रा.डॉ.सौ.कावळे, अॅड.रंजना गवांदे(संगमनेर), विजया गोराणे, बंडोपंत दातरंगे, व्ही.टी.जाधव, सिन्नरहून कार्याध्यक्ष अरूण घोडेराव, अशोक घरटे, महाले तात्या, डॉ.शिवराम हिरे, ओमप्रकाश शिरसाठ, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी दोनशेच्या वर कार्यकर्ते-प्रतिनिधी व मान्यवर परिषदेला उपस्थित होते.
– डॉ. ठकसेन गोराणे