गोवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यज्ञेश्वर निगळे यांचा ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हा वैचारिक (पुरोगामी) लेखसंग्रह पुस्तकरुपात प्रसिद्ध झाला आहे. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा निगळे यांनी त्यांच्या लिखाणातून कायम प्रसार केला आहे.
या लेखसंग्रहाला गोव्यातील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. अमृत कासार यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेचा संपादित अंश पुढीलप्रमाणे…
या पुस्तकाच्या पहिल्याच लेखात लेखक रसेलच्या विवेकवादाकडे वाचकास नेतात आणि लिहितात- ईश्वराविषयी नास्तिकभाव बाळगणार्या रसेल यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीबद्दलची विलोभनीय गोष्ट कोणती असेल, तर ती ही की, मनुज मनातील मांगल्याविषयी ते उत्कट आस्तिकभाव प्रगट करतात. स्वप्ने उराशी बाळगावीत आणि कठोर नियतीच्या आघातांनी ती धुळीला मिळावीत, असे वारंवार अनुभवाला येते. अशा वेळी थकल्या-भागल्या एकाकी जीवाने कोठे आसरा शोधावा? आधार म्हणून एक काल्पनिक ईश्वर निर्माण करून त्याला शरण जावे काय? या जीवाने जावे तरी कोठे? प्रखर बुद्धिवाद जोपासणार्या रसेलनी या प्रश्नाच्या उत्तरांतून मानवतेचे मांगल्य चिंतिले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. रसेल म्हणतात की, अशा परिस्थितीत माणूस देवाच्या कल्पनेला शरण गेला, तर ते कदाचित क्षम्य मानता येईल. परंतु खरा पुरुषार्थ असा दुबळा काल्पनिक आश्रय शोधण्यात नाही, तर अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपले मानसिक धैर्य कायम ठेवण्यात आहे. ईश्वरावर श्रद्धा नसताना जीवनातील मांगल्यावरील आपली श्रद्धा ढळू न देणे आणि ते मांगल्य अधिक प्रभावी कसे होईल, यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावणे, हा खरा मानवी पुरुषार्थ आहे.
‘संत बसवेश्वर आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ मानव मानवातील परस्परसंबंध स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, निरर्थक बहुदेव उपासना, वेद-ग्रंथांचे वर्चस्व, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, श्रेष्ठ-कनिष्ठता, हिंसक वृत्ती, यज्ञयागादी गोष्टींचे अनाठायी समर्थन, अतिरेकी कर्मकांड, अज्ञान, अशिक्षितपणा, दारिद्य्र, दैववादी दृष्टिकोन यासारख्या कित्येक गोष्टींशी संबंधित समाजात रूढ असलेल्या नानाविध प्रकारच्या अंधश्रद्धांचे खंडन करून त्यांच्या निर्मूलनाशी बसवेश्वरांनी सक्रियता दर्शविली. मानवाचा दृष्टिकोन विशाल आणि नि:स्वार्थी असायला पाहिजे, अशी या महात्म्याची शिकवण होती.
‘सेना, सावता आणि तुकाराम’ या लेखात संत सेना न्हावी परमेश्वरप्राप्तीसाठी होम-हवन, जप-तप आणि यज्ञयाग करून देहास कष्ट न देता संसाराचा गाडा हाकत भक्तियुक्त मार्गाने त्याची प्राप्ती करून घेता येते, असे साधे, सरळ, सहज तत्त्वज्ञान सांगणारा हा संतकवी आहे, असे लिहितात. पुढे लिहितात, संत ज्ञानेश्वरांच्या मांदियाळीतील संत सावता माळी हे आणखी एक संत. माऊलींच्या भागवत धर्माच्या माध्यमातून विविध जातींतील छोटे-मोठे संत भक्तीच्या धाग्यांनी एकत्र आले आणि आध्यात्मिक लोकशाही स्थापन झाली. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, उच्च-नीच अशा भेदभावांना थारा न देता किमान आध्यात्मिक क्षेत्रात तरी समतेचा ध्वज फडकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न भागवतधर्म जोपासणार्या संतमंडळींनी केला. आपल्या कर्मातच ईश्वर शोधण्याचा प्रयत्न करणार्या संत सावता माळी यांनी व्यवसायात पाहिलेला विठ्ठल अधिक प्रकर्षाने आणि त्यांच्या सहजोद्गारातून प्रकट झाला आहे. संत तुकारामांविषयी लिहिताना, “सतरावे शतक तुकोबांच्या प्रखर वाणीने दुमदुमले. शूद्रातिशूद्रांचा हा जननायक आपल्या वाक्युद्धातील युगसंवेदना बोलत होता. दीनदलितांच्या सामाजिक आणि आत्मिक उन्नयनासाठी जीवाचे रान करीत होते. जगाच्या कल्याणाचे उद्गार तुकोबांच्या अभंगवाणीतून रसरसून बाहेर पडत होते. जगातील सर्व महात्म्यांच्या अंत:करणातील भूतदया, करुणा, मानवता त्यांच्या अंत:करणातून ओसंडत होती.” या लेखातून प्रथमदर्शनी लेखक भागवतधर्माबाबत भावूक होताना दिसतात. अशी भावुकता विवेकनिष्ठेला दोलायमान करण्याची शक्यता असते.
लेखकाने सर्वच लेखन वेगवेगळे धार्मिक आचार-श्रद्धेसाठी कसे आवश्यक नाहीत आणि अशा तथाकथित श्रद्धा कशा अंधश्रद्धा आहेत, याची विवेकनिष्ठ चिकित्सा केली आहे. ‘धर्मोपदेशकांचा वायुविहार’, ‘सदेह वैकुंठ गमन’, ‘प्राण की मोक्ष’, ‘करणी’, ‘पितरांचा त्रास’, ‘संमोहनविद्येचा गैरवापर’, ‘गायत्री मंत्र’, ‘विचित्र अपत्य’, ‘रूद्राक्ष अलंकार’, ‘आत्मा’, ‘मनोविभ्रम’, ‘भूतबाधा’, ‘बाहेरची बाधा’, ‘दैवी संचार’, ‘तृतीयपंथी समाज’, ‘शनिदेवाची पिडा’, ‘फलज्योतिष’, ‘राजकीय भविष्य कथन’ इत्यादीबाबतच्या अंधश्रद्धांचा ऊहापोह झाला आहे. या लेखांचे वैशिष्ट्य हे की, लेखक वैज्ञानिक माहितीच्या आधारे या किस्स्यांतील बनवेगिरी उघड करतात.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्या कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव : अंधारातून प्रकाशाकडे
लेखक : यज्ञेश्वर निगळे, पर्वरी, गोवा.
प्रकाशक : विमल प्रकाशन, गोवा.
फोन (0832) 2413104