Categories
कथा

अखेरचा जोगता

वार्षिकांक - २०१५

गुंडाप्पा हा गोपाळपाणी गावचा अखेरचा जोगता. तो अगदी परवापर्यंत धोंडूबाईच्या दारी जोगवा मागायला येत असे. दारापाशी उभा राहून तो म्हणे, ‘आई, जोगता आला!’ धोंडूबाई पितळेची थाळी घेऊन येई आणि त्याला जोगवा देई- तांदूळ, काही फळं, हळदीची पूड.

परवा जोगता म्हणाला होता, “आई! एवढं देऊ नका हो! अलिकडे फार थकल्यासारखं होतं. धकवता येत नाही.’

गुंडाप्पाकडे बांबूच्या परडीत यल्लम्माच्या मुखवट्यासमोर काही तुळशीची पानं असत, फुलं नसत. जोगत्याच्या गळ्यात आणि पायांत कवड्यांच्या माळा. त्या आता मळून गेलेल्या. बर्‍याच दिवसांत स्वच्छ न केलेल्या. धोंडूबाई म्हणाली होती, ‘पोरा, बस जरा.’

‘बसतो आई!’ एक चटई टाकून जोगता दारात बसला होता. जोगत्याला यल्लम्मा देवीच्या इच्छेप्रमाणेच वागावं लागतं. तो संसारी लोकांच्या जगाबाहेरचा जीव असतो. थकला, तरी संसारी माणसांच्या घरामध्ये जाऊन बसू शकत नाही. सूर्य आग ओकीत असला, तरी गृहस्थ माणसाच्या घरच्या विहिरीचं पाणी पिऊ शकत नाही. धोंडूबाई या जोगत्याकडे मायेच्या नजरेने पाहते. वर्षाला दोन साड्या, दोन चोळ्या त्याला भेट म्हणून देते. जोगत्याला तर स्त्रीवेशातच राहावं लागतं. आजकालचं युग आहे नायलॉनचं. त्यामुळे धोंडूबाईंप्रमाणे नऊवारी काष्ट्याच्या साड्या नेसणार्‍या मराठी महिला फारच कमी. गोकुळपाणी गाव आता शहर झालं आहे, जुना खंडेरा रोड, विठ्ठल रोड आणि जुना बाजार. त्यांच्यामागे, गावकुसाबाहेर जोगत्यांची छोटीशी वस्ती.

धोंडूबाई अजूनही नऊवारी साडी नेसते. तिच्या ओळखीचा कापड दुकानदार तिला कोल्हापूरहून नऊवारी साड्या आणून देतो. स्वत:बरोबरच ती जोगत्यासाठी सुद्धा साड्या मागवते.

जोगता थोडा वेळ डोळे बंद करून बसला. धोंडूबाई त्याला म्हणाली, ‘फार फिरू नकोस, पोरा!’

जोगत्याच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटते. ‘एकटी आईच माझी काळजी करते, नाही का आई? आता मी फिरणार तरी कुठं? जुन्या गावात आमची तीन घरं आहेत, तेवढीच.’

त्यानंतर म्हणाला, ‘जाऊ द्या! सगळे जोगते जगातून जाऊ द्या! आई, जोगते राहावे असं देवीला वाटतं?’

धोंडूबाईने कपाळाला हात लावला.

जोगता उठून उभा राहिला. त्याने मान हलवली.

म्हणाला, ‘आई, तुम्हाला समजतं, पण सगळ्यांनाच काही इतकं समजत नाही.’ पुन्हा मान हलवून म्हणाला, ‘यल्लम्माला जर वाटत असतं, तर जे लोक भक्तिभावाने जोगत्यांना वाढीत, ते सगळे निघून गेले असते का? आणि पूर्वी जोगत्यांची सात-आठ घरं होती. आमचा समाज होता. ते तर सगळे एक-एक करून देवाघरी गेले. त्यांची घरंही मसणासारखी ओस पडली. नवीन मुलं आता जोगते होत नाहीत. जोगत्यांना वाढणारी माणसंही आता कमी होत चालली आहेत.’

‘पोरा, इतका वेळ बसला होतास, तरी धाप लागतेय?’

गुंडाप्पा डोक्याला हात लावून उद्गारला, ‘यल्लम्माची इच्छा!’

ही होती परवाची घटना. धोंडूबाईला खूप वाईट वाटलं होतं. गुंडाप्पा आता थकलाय. आता त्याला धकवता येत नाही. आजकालच्या लोकांची मनंच बदलली आहेत. गुंडाप्पाच्या भावांची मुलंही त्याची काळजी घेत नाहीत. गुंडाप्पाला बघून त्याच्या वयाचे लोक म्हणतात, ‘बायकांसारखे कपडे घालतो! हिजडा आहे की काय?’

लोक गुंडाप्पाला हसतात. गुंडाप्पाचे पुतणेही त्याला हसतात.

राम! राम! जोगता मरून गेल्यावर त्याचं सारं तुम्हालाच मिळेल. जोगता-राहतो एका विटांनी बांधलेल्या मातीच्या घरात. तिकडे आणखीही दोन-तीन घरं आहेत. ती घरंसुद्धा अशीच आहेत. पण गुंडाप्पाच्या भावांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली, संसार वाढला. मग त्यांच्या बायका अशा विटा-मातीच्या घरात थोड्याच राहणार? त्यांनी जवळच नवी घरं बांधली. नगरपालिकेने नवी घरं बांधायला परवानगी दिली. नळाचं, विजेचं कनेक्शन दिलं आणि हे सगळं गुंडाप्पाच्या नावानेच दिलं. नगरसेवकानं गुंडाप्पाच्या नावानेच दिलं. नगरसेवक गुंडाप्पाचा भाऊ रामाप्पाला म्हणाले, ‘अरे, हे सारं गुंडाप्पाच्या नावाने आलं, पण त्याच्या स्वत:च्या घरात वीज आहे? पंखा आहे? असे कसे रे तुम्ही कृतघ्न?’

‘तो घेणार नाही, साहेब!’

‘तुम्ही द्या त्याला कनेक्शन.’

‘आम्हाला तर त्याच्या घरात प्रवेश करायला मनाई आहे धर्माची!’

‘असं? मग त्याच्या घरी स्वैपाक कोण करतं?’

‘माझी बायकोच करते. माझा मुलगा त्याला डबा नेऊन देतो.’

‘तो तर यल्लाम्मादेवीचा संतान आहे. काय डबा देता तुम्ही त्याला? दही-दूध-तूप-लोणी काही देता? थांबा, त्याच्याकडेच जाऊन विचारतो.’

रामाप्पा सावध झाला. घरी जाऊन त्याने हे आपल्या बायकोला सांगितलं. आमटी, भाकरी, लोणचं आणि एक मूद भात- हेच तर जेवण ती गुंडाप्पाला देत असे. आता लोक पाहायला येणार. आपल्या तोंडाला काळे फासणार.

अर्थात, यानंतर रामाप्पाने गुंडाप्पाची माफी मागून त्याचे पाय धरले. त्याला विजेचं कनेक्शन दिलं. गुंडाप्पाच्या खोलीत पंचवीस पॉवरचा बल्ब लागला. आता जेवणात रोज दोन वेळा राजमा, दही आणि कधी कधी खीर पाहून एके दिवशी गुंडाप्पा पुतण्याला म्हणाला, ‘एवढं सगळं माझ्यासाठी आणू नकोस रे बाबा! जेव्हा माझं खायचं वय होतं, तेव्हा तर काही खाल्लं नाही. आता शरीर सुकून गेलंय, मोहन! तुझ्या आई-बाबांना सांग!’

धोंडूबाई म्हणाली, ‘पोरा, थोडं खाल्लं तर शक्ती येईल शरीरात!’

‘आई, तीस वर्षं दोन्ही वेळा नुस्ती आमटी-भाकरीच खात आलोय मी. शरीर सुकलं आता. आता चांगलं खाणं पचवणार कसं हे शरीर?’

‘लाईटही आली तुझ्या घरात!’

‘त्या उजेडात मला काही दिसत नाही.’

‘मला तर तू “आई” म्हणतोस. मी जर मोठ्या पॉवरचा बल्ब दिला, तर घेशील?’

गुंडाप्पाला खूप हसू आलं. अंधारात स्वत:चा बिछाना दिसला तरी खूप झालं! कोनाड्यात यल्लम्मा आहे. तीच त्याला पाहते. आणि यल्लम्माच्या आदेशावरून त्याच्या खोलीत बिळात एक साप राहतो. सापाला सगळं समजतं. गुंडाप्पाच्या पुतण्याने जेवण आणल्यावर तो फणा उभारतो. गुंडाप्पा हाताने त्याला पुन्हा बिळात ढकलतो.

‘तुम्हाला मी “आई” म्हणतो, तुमच्यापुढे मन मोकळं करतो. ‘तो साप माझा चांगला मित्र आहे.’

धोंडूबाई त्याच्याकडे पाहत राहते. गुंडाप्पा म्हणाला, ‘माणसं किती दुष्ट असतात! भावाच्या घरी टी.व्ही.आहे. “रामायण” मालिका लागायची, तेव्हा मी जरा त्याच्या व्हरांड्यात बसत असे. ऐकायला चांगलं वाटे. पण मी दाराजवळ बसलो आहे, हे लक्षात आल्याबरोबर तो टी.व्ही.चा आवाज कमी करीत असे. केरोसीन संपलं की, कंदिलाऐवजी मेणबत्ती पेटवून तिच्या उजेडात मी जेवत असे. ‘यल्लम्माची इच्छा!’ धोंडूबाईचं मन जड झालं. एकेकाळी मुलं लहान होती, तेव्हा गुंडूमामा त्यांना गोष्टी सांगत असे.

एके दिवशी गुंडाप्पा म्हणाला होता, ‘आई! तुमच्या मुलांवर माझी किती माया होती, हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. तुमच्या मुलां-मुलींना किती दिवसांत पाहिलं नाही मी. तुमची मुलगी माझ्या गळ्याभोवती हात टाकून झुलायची. तोसुद्धा यल्लम्माचाच आशीर्वाद!’

‘तिला तुझा लळा होता, पोरा! तुला ती आवळ्याचं तेल पाठवायची, कंगवा द्यायची. तू तिला यल्लम्माच्या मंदिरातल्या माळा द्यायचास. त्या सगळ्या तिने जपून ठेवल्या आहेत म्हणते, ‘गुंडूमामाचा आशिर्वाद आहे हा.’

‘तुमच्या लेकरांची खूप माया वाटायची मला. त्यांचे लाड करायला मला आवडायचं; पण अलिकडची मुलं मला बघितल्यावर घाबरतात. काय करणार आई! मी केस कापू शकत नाही, बायकांप्रमाणे केस विंचरून वेणीही घालू शकत नाही. फार कष्ट हो आई! देह म्हणजे फार कष्ट! रोज हरितकीचा पाला कच्चा खातो. त्यामुळे देहातून कामवासना निघून जाते. यल्लम्माचा नियम! इतकं सुकलंय माझं शरीर, इतकं सुकलंय!’

आज जोगता निघून जाताना धोंडूबाई फाटकापर्यंत गेली. निघून जातोय जोगता. एकेकाळी चांगला धट्टाकट्टा जवान होता. आता त्याचे केस रूक्ष झाले आहेत. शरीर कृश झाले आहे. पण तो लोकवस्तीच्या दिशेने जात नाही. तो जातो गावकुसाबाहेरच्या जोगत्यांच्या वस्तीकडे. तिकडे एकेकाळी तीन जोगत्यांची घरं होती. आता त्या घरांचे फक्त अवशेषच उरले आहेत. धोंडूबाई बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहते. जोगत्यांना मित्र नसतात, म्हणून जोगते जोगत्यांनाच शोधतात. गुंडू तर हयात आहे. तो मृत जोगत्यांना का शोधणार? गुंडू एका झाडाची फांदी तोडून घेतो. त्यानंतर ती फांदी विटांच्या आणि चिखलाच्या ढिगावर आपटीत राहतो. धोंडूबाईला समजतं, की तो मृत जोगत्यांना बोलावतो आहे. दुपारचा एक वाजलेला. रणरणतं ऊन. तो मृत जोगत्यांना हाका मारतोय. धोंडूबाईला ठाऊक आहे, गुंडाप्पाच्या डोळ्यांतून अश्रू येताहेत.

कौसल्या तिचा हात धरून म्हणते, ‘घरात चल, आई!’ तो तर यल्लम्माचा माणूस आहे. तो काय करतोय हे गृहस्थ लोकांनी पाहायचं नसतं.

दोन दिवस धोंडूबाई ‘आई! जोगता आला!’ अशी गुंडाप्पाची हाक कधी येईल, म्हणून वाट बघत होती.

धोंडूबाई एकटीच राहते. मुलगे, सून, दोन नाती वेगळ्या जागेत राहतात. कधी आणि कुठल्या कारणाने अशी व्यवस्था झाली हे धोंडूबाई कुणालाही सांगत नाही. पण खाणं-पिणं, वस्तूंची देवाणघेवाण त्यांच्यामध्ये चालू असते. नाती धोंडूबाईंकडून वेण्या घालून घ्यायला येतात. परीक्षेच्या वेळी सून येऊन मुलींना आजीजवळ अभ्यास करायला बसवून जाते.

मुलगा येऊन धोंडूबाईंना म्हणाला, “आई, गुंडूमामाची एवढी काळजी का करतेस? दोन दिवस आला नाही म्हणून? येईल. तुझ्याकडं कसा बरं येणार नाही तो? येईल.

‘नाही रे, माझ्या मनात पाल चुकचुकतेय. तुला कसं समजणार?’

जोगते एकेक करून मरून चालले आहेत. धोंडूबाईला वाईट वाटतंय आणि चाळीस वर्षांपासून ती गुंडाप्पाला पाहतेय. तो दिसणार नाही, या विचारानेच…. तो काय सामान्य माणूस आहे?

मुलगा म्हणाला, ‘आई, आज रात्री मी तुझ्या खोलीत सोबतीला झोपतो. आज तू नाही म्हणू नकोस. भाऊबहिणी काय म्हणतील?’

‘जा, जेवण करून ये. अरे, एकदा तू फोटो काढला होतास ना गुंडूचा? आहे का रे तो फोटो?’

‘शोधून बघतो आई, असेल घरात कुठेतरी. गुंडूमामाला किती आनंद झाला होता! तेव्हा तर मी शाळेत होतो. नंतर त्या फोटोची एक प्रिंट मी त्याला फ्रेम करूनही दिली होती.

‘हो, भिंतीवर लावलाय असं म्हणत होता तो.’

‘आई, तू त्याचं घर पाहिलंयस?’

‘जोगत्याचं घर पाहायला तर आपल्याला बंदी असते.’

‘लहानपणी तर त्याला बघून भीती वाटायची मला.’

धोंडूबाईने नि:श्वास टाकला. ‘भीती? अरे, तो तर साधा आपल्यासारखाच माणूस आहे. जा बाळा, जेऊन ये.’

‘तूही जेऊन घे.’

‘अरे, ज्येष्ठ महिन्यातल्या अवसेला मी रात्री जेवते का? उपास-तापास मानते मी, माधव! अजूनही मी खणखणीत आहे. पण जुनी माणसं गेली, की दु:ख होतं.’

‘बघ तू, उद्या येईल गुंडाप्पा.’

त्या दिवशी रात्रीच धोंडूताई माधवला म्हणाली, ‘तू तुझ्या मित्रांना सांग, गुंडाप्पाची गोष्ट कोण सांगणार? किती जुनी प्रथा आहे! लिहिणार तरी कोण? जोगत्यांच्या घरची मुलं-मुली या दहा-बारा वर्षांपासून शाळेत जायला लागली आहेत.’

‘हे जोगते आहेत कोण? कुठून आले?’

‘ते त्यांनाही ठाऊक नाही. शिवाजी महाराजांनी त्यांना हेर आणि खबरे म्हणून नेमलं होतं. महाराजांना मदत करायचे ते.’

‘म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून हे जोगते होते म्हणायचं!’

‘हो तर! शिवाजी महाराजांच्या काळी तर लोक जोगत्यांना खूप मानीत.’

या गोकुळपाणी गावापासून दहा मैलांवरच यल्लमाचं मंदिर आहे. पूजेच्या दिवशी घरातला जो थोरला मुलगा असेल, त्याला देवीचे भक्त जोगता करतात. आधीच्या दिवशी त्याला चांगलं-चुंगलं खाऊ घालतात. दुसर्‍या दिवशी यल्लम्माच्या मंदिरात नेऊन त्याला निर्वस्त्र करतात. पानं असलेल्या लिंबाच्या डहाळ्या तोडून त्या त्याच्या सर्वांगावर बांधतात. त्यानंतर तो मुलगा देवीची पूजा करतो. त्याची आई त्याला म्हणते, ‘इतके दिवस तू माझा मुलगा होतास, आजपासून तू देवी यल्लम्माचा मुलगा आहेस.’ पूजा संपल्यावर त्याला साडी-चोळी नेसवतात. त्याला केस कापायची बंदी असते. जोगता स्त्रीवेशात राहतो. यल्लम्माची परडी घेऊन फिरतो.

‘भिक्षा वाढा!’ असं म्हणत नाही; फक्त ‘जोगता आला!’ असं म्हणतो. जोगता लग्न करीत नाही. रोज कच्ची हरितकी खातो.’

‘का, बरं आई?’

‘त्यामुळे कामवासना नष्ट होते.’

‘मामा तर भावाच्या घरचंच जेवतो.’

‘भाऊ, बहिणी, पुतणे-भाचे हेच जोगत्याला जेऊ घालतात. त्याचं सारं करतात.’

‘जोगता मेल्यावर अंत्यसंस्कारही तेच करतात?’

‘नाही. जोगत्याचं दहन करीत नाहीत. त्यांची एक उंच भिंतीची विहीर असते. मरण आल्यावर जोगत्याला जाणीव होते. तेव्हा जोगता त्या विहिरीच्या काठावर बसतो. मरण आल्यावर विहिरीत पडतो.’

‘किती वेदना होत असतील, नाही का आई?’

दोन दिवसांनीच रडण्याचा आवाज ऐकू आला. लोकांची गर्दी दिसली. ही गर्दी गुंडाप्पाच्या घरासमोरच आहे हे धोंडूबाईला दिसलं. सगळे आपापसात कुजबुजत होते. धोंडूबाई कौसल्याला म्हणाली, ‘चल मला घेऊन!’

‘तू जाणार तिकडे, आई?’ माधवने विचारलं.

‘तूही चल.’

‘आई, तू जाऊ नकोस, नको जाऊस!’

‘मला अडवू नकोस, माधव! तो माझा जोगता होता. मी त्याला जोगवा देत होते. आता तर तो आपल्यात नाही. त्याचं घर आता पाडून टाकणार, नाही का?’

जोगत्याच्या घरात प्रागैतिहासिक अंधार. विटा-मातीचं घर. छोटंसं अंगण त्यानंतर दोन्हीकडे भिंत बांधलेली, विटांनी तयार केलेली वाट. त्यानंतर एक रुंद भिंत असलेली एक खोल विहीर. त्या विहिरीच्या भिंतीवर….. साखळी धरून दगडासारखा स्थिर गुंडाप्पा बसलेला होता- गोकुळपाणी गावचा अखेरचा जोगता, पूर्ण निर्वस्त्र-दिगंबर त्याचे लांब केस त्याच्या अंगावर रूळत होते.

-गेला तो! कुणीतरी बांबूने त्याला धक्का दिला. जोगत्याचा देह विहिरीत पडून गेला.

काही क्षणानंतर क्षीण असा एक आवाज आला. प्रस्तरीभूत अशा एका प्रागैतिहासिक वृक्षाचं पतन झालं. विहिरीतून त्याचाच आवाज आला होता.

– महाश्वेता देवी

अनुवाद विलास गीते, अहमदनगर

संपर्क : मोबा.9764316921